द डेथ ट्रॅप भाग १५

Submitted by स्वाती पोतनीस on 28 July, 2019 - 07:51

स्वाती पोतनीस
द डेथ ट्रॅप
भाग १५

विक्रमचा फोन आला आणि क्रांतीही नरेंद्रबरोबर तिकडे यायला निघाली. विक्रमने घडलेल्या घटना नरेंद्रला फोनवर सांगितल्या होत्या. रात्रीत घडलेली एक अनपेक्षीत घटना म्हणजे एक व्यक्ती नवतेजच्या घरात घुसली होती. पोलीस नवतेज आणि काव्याला घेऊन निघाले तेव्हा अजून कोणी व्यक्ती घरात असल्याची चाहूल लागली नव्हती. कदाचित ती व्यक्ती वरच्या मजल्यावर एका खोलीत असण्याची शक्यता होती. कोण होती ती व्यक्ती? आणि आत्ता कुठे आहे? काव्याला ती व्यक्ती घरात घुसल्याचे समजले असेल का? विक्रम आणि सुहानी घरात गेले तेव्हा दार का उघडे होते? ते असलेल्या खोलीला बाहेरून कडी कोणी लावली? काव्याने की त्या व्यक्तीने? बरेच प्रश्न अनुत्तरीत होते.
क्रांती आणि नरेंद्र बागेपाशी गेले. गेटवर पाटी लावली होती. बागेची वेळ सकाळी सात ते अकरा. म्हणजे अकरा वाजेपर्यंत तरी ते नवतेजच्या घरावर लक्ष ठेऊ शकणार होते. ते दोघे तिथे पोचल्यावर विक्रम आणि सुहानी घरी जायला निघाले.
“काही घडले का?”
“नाही. आत कोणी असेल असे वाटत नाही.”
“मग तो इसम गेला कुठे?”
“तेच कळले नाही. बंगल्याला दुसरे गेटही नाही. तो बाहेर आला असता तर सहज दिसले असते.”
नरेंद्र आणि क्रांती घरावर लक्ष ठेऊन होते. पण काहीच हालचाल दिसली नाही. बऱ्याच वेळाने अजिंक्यचा फोन आला. “पोलिसांनी बेकरीची बारकाईने तपासणी केली. पण माल काही सापडला नाही. आता नवतेज खूप वैतागला आहे. तो कोठारेंवर कावतो आहे. नवतेज आणि काव्या आता कोणत्याही क्षणी घरी येतील. तुम्ही लक्ष ठेवा.”
साधारण साडेनऊच्या सुमारास नवतेज आणि काव्या परत आले. यानंतर बराच वेळ कुठलीच हालचाल दिसली नाही. सव्वादहाला नवतेज आपली गाडी घेऊन बाहेर गेला. त्यानंतर दहा मिनिटांत काव्यापण बाहेर आली. तिने बाहेर जायचे कपडे घातले होते. जाताना तिने घराला आणि गेटला कुलूप लावले आणि गाडी घेऊन ती बाहेर गेली. नरेंद्रला तिथेच थांबवून क्रांती काव्याच्या मागे गेली. काव्या सरळ बेकरी आउटलेटमध्ये गेली. बेकरी उघडलेली होती. नेहमीप्रमाणे लोकांची गर्दी बेकरीत झालेली होती. जणूकाही काहीच घडले नाही अशाप्रकारे बेकरीचे कामकाज चालु होते. क्रांतीने अजिंक्यला फोन केला. अजिंक्य कोणाशीतरी फोनवर बोलत होता. पाच मिनिटांनी नरेंद्रचा फोन आला. त्याने क्रांतीला वेदांतीच्या घरी जाण्यास सांगितले. क्रांती घरी पोहोचली पण नरेंद्र मात्र घरी आलेला नव्हता.
.....
काव्या बेकरीची तपासणी करून कोठारे आणि अजिंक्य पोलीस ठाण्यात परत जायला निघाले. रात्रभराच्या कामाचा ताण आणि अपयशामुळे आलेले नैराश्य त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. “अजिंक्य परत गेल्यावर मला चंदेललाही सोडून द्यावे लागेल. त्याला फक्त प्रश्न विचारयला ताब्यात घेतले होते. मी काही त्याला जास्त वेळ अडकवून ठेऊ शकत नाही.”
अजिंक्य काहीच बोलला नाही. त्याने फक्त खांदे उडवले. सगळे पोलीस ठाण्यात पोहोचले आणि हवालदार म्हणाला, “कोठारे साहेब तुम्हाला दोन वेळा फोन आला होता.”
“कोणाचा?”
“त्याने नाव सांगितले नाही. तुमच्याशीच बोलायचे आहे असे म्हणत होता.”
“त्याचा नंबर घेतला का?”
“त्याने दिला नाही. तो परत फोन करेल.”
एवढ्यात फोन वाजला. कोठारेंनी फोन उचलला. ते फोनवरचे बोलणे ऐकत होते. नंतर त्यांनी विचारले, “तुम्ही कोण?” पण फोन बंद झालेला होता. त्यांच्या चेहऱ्यावरचे नैराश्य कुठल्या कुठे पळाले होते. उत्साहाने ते आपल्या सहकाऱ्यांना म्हणाले, “रिलॅक्स होऊ नका. आपल्याला परत बाहेर जायचे आहे.” अजिंक्य निघायच्या तयारीत होता. पण कोठारेंनी त्यालाही थांबवले. अजिंक्यने प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पाहीले.
“अनामिक.” कोठारे म्हटले. “त्याने टीप दिली आहे. चंदेलला सोडू नका. त्याच्या घरात ड्रग्ज मिळतील.”
“मग आता?” अजिंक्यने विचारले.
“मी कमिशनर साहेबांची परवानगी घेतो.”
परवानगी मिळाल्याबरोबर कोठारे चंदेलला जिथे बसवले होते त्या खोलीत गेले आणि चंदेलला माहिती दिली. त्याबरोबर तो संतापला. पण यावेळेस आपले काही चालणार नाही हे लक्षात आल्यावर त्याने एक फोन करायची परवानगी मागितली. कोठारे त्याला बाहेर घेऊन आले आणि फोन वापरायची परवानगी दिली. चंदेलने बऱ्याच वेळा फोन लावून बघितला पण फोन लागला नाही. तेव्हा कोठारेंनी त्याला परत आतल्या खोलीत नेऊन बसवले. चंदेल लावत असलेला फोन नंबर कोणाचा आहे ते कोठारेंनी त्यांच्या सहकार्याला शोधून काढायला सांगितले आणि मगाचचा ताफा घेऊन ते अजिंक्यबरोबर चंदेलच्या घरी गेले. अजिंक्यने क्रांतीला तीन फोटो पाठवले. आणि लगेच क्रांतीचा फोन आला.
“अजिंक्य फोटो मिळालेत. काय करायचे?”
“या तिघांची लवकरात लवकर माहिती पाहिजे आहे. अगदी एका तासात मिळाली तरी चालेल.”
“हं. म्हणजे तू मला पप्पांच्या पाया पडायला लावणार.”
“नाईलाज आहे क्रांती. आपल्याकडे एवढी सक्षम यंत्रणा नाही आहे. आणि वेळही कमी आहे. गुन्हेगार सावध झालेले आहेत.”
“ओ.के. मी बघते.”
ते चंदेलच्या घरी पोहोचले. घरात फारसे सामान नव्हते. दोन खोल्यांमध्ये एक दोन कपाटे वगैरे सामान होते. कोठारे आणि इतर पोलीस सराईताप्रमाणे सर्व सामानात शोधाशोध करत होते. अजिंक्यही त्यांना मदत करत होता. परंतु ड्रग्ज कुठे मिळाली नाहीत. आता परत जायला निघावे या विचारात कोठारे असताना अजिंक्यने गॅलरीचे दार उघडले. “तिथे काही नाही.” एक पोलीस म्हणाला. पण तरीही अजिंक्य गॅलरीत गेला. तिथे एका मांडणीत चप्पल बूट तर काही खोकी ठेवलेली होती. अजिंक्यने एक खोके उचलले. त्यात जुने बूट ठेवलेले होते. बूट उचलल्यावर खाली काही दिसले नाही. तेव्हा बुटाच्या आत हात घातल्यावर दोन तीन पुड्या मिळाल्या. अशीच अजुन दोन तीन खोकी होती. त्यातही काही पुड्या मिळाल्या. एकूण माल काही लाखांचा होता. कोठारेंनी तो ताब्यात घेतला.
गाडीत बसल्यावर अजिंक्य म्हणाला, “चंदेलला अडकवायला हा माल पुरेसा आहे. पण काहीतरी चुकते आहे असे नाही तुम्हाला वाटत?”
“म्हणजे काय म्हणायचे आहे तुम्हाला?”
“माल सहजी सापडला.”
“सहजी कुठे सापडला?”
“माल आपल्याला गेल्या गेल्या नाही सापडला. पण तसेही असा माल कुणी कपाटात, तिजोरीत नक्कीच ठेवणार नाही. एक प्रोसिजर म्हणून आपण कपाटात, गादीखाली, बेडच्या कप्प्यांमध्ये, माळ्यावर शोध घेतो. पण जर मला माझ्या घरात ड्रग्ज ठेवायची असतील तर कुणालाही संशय येणार नाही अशा ठिकाणी मी ती ठेवेन. मग ऑबव्हीयस अशी जागा कोणती तर जुन्या अडगळीच्या सामानात ठेवणे.”
“बरोबर आहे. तुमचा मुद्दा थोडा थोडा माझ्या लक्षात येतो आहे. तुम्ही बोलत रहा.”
“चंदेलचे कुटुंब इथे नाही. तो एकटा रहातो. त्यामुळे त्याच्या घरात फारसे अडगळीचे सामान असायचे कारण नाही. मग इथे लपवण्यासाठी अशी जागा ही एकच होती.”
“म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे की ती ड्रग्ज आपल्याला सापडावी म्हणून मुद्दाम तिथे ठेवलेली होती?”
“बरोबर. आणि ठेवणाऱ्याचा उद्देश हा होता की आपल्याला वाटावे चंदेलनेच ती लपवून ठेवली आहेत.”
“हो खरंच की. म्हणजे चंदेल निर्दोष असून त्याला अडकवायचा हा प्रयत्न आहे.”
“नाही कोठारे. चंदेल दोषी आहे हे आपल्याला माहीत आहे. इतर वेळ असती तर त्याला सोडवण्याचा प्रयत्न झाला असता. पण आता जेव्हा पाणी गळ्याशी येत आहे असे वाटले त्यावेळेस कोणता तरी मासा पोलिसांच्या गळाला लागावा म्हणून चंदेल अडकेल अशी व्यवस्था केली गेलेली आहे. नाहीतर तो आत्तापर्यंत ड्रग्ज स्वतःकडे ठेवत नाही ही माहिती आपल्याला मिळालेलीच होती की.”
“म्हणजे तुम्हाला जे वाटते आहे की कर्ता करविता वेगळा आहे ते खरे शाबित होत आहे असे दिसते.”
“बरोबर. मला नुसते वाटत नाही, तशी खात्री आहे.”
.....
यानंतरचा प्रवास शांतपणे चालु होता आणि अजिंक्यचा फोन वाजला. क्रांतीने अजिंक्यला जी माहिती दिली तिचा त्याला फारसा धक्का बसला नाही. पण त्याने क्रांतीला सांगितले, “मला वाटत होतेच, कुठेतरी पाणी मुरते आहे. तुम्ही सगळेजण लगेच तिकडे जा. आम्ही इकडून येतो आहोत. पण तुम्ही आमच्या आधी पोचाल. लगेच आत घुसा. कुणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे.”
त्याचे बोलणे ऐकून कोठारेंनी विचारले, “कुठे जायचे आहे? काही महत्वाचे आहे का?”
पण अजिंक्यला उत्तर द्यावेच लागले नाही. कोठारेंचा फोन वाजला. कमिशनर पंडीत फोन वर होते. ते म्हणाले, “कोठारे, तुम्ही अजिंक्य सांगेल तिकडे जा. जरूर असल्यास अजुन पोलिसांना ठाण्यातून बोलवून घ्या.”
“अजिंक्य, कुठे जायचे ते सांगा. कमिशनर साहेबांचा फोन होता.”
याच्या पुढे अजिंक्य सांगेल त्या रस्त्याने पोलिसांची जीप जात होती. आपण नवतेजच्या घरी जातो आहोत का?”
“होय.” ते घरापाशी पोहोचले. घरासमोर अजिंक्यची गाडी होती. म्हणजे क्रांती, विक्रम वगैरे तिथे पोचले असणार. अजिंक्य आणि कोठारे पिस्तोल हातात घेऊन आत शिरले तर समोर धक्कादायक दृष्य त्यांच्या नजरेस पडले. नवतेज जखमी अवस्थेत बेशुद्ध होऊन खाली पडला होता. काव्याला क्रांती आणि वेदांतीने पकडून ठेवले होते. आणि एका मुलाला नरेंद्र आणि विक्रम मारत होते. तोही त्यांचा प्रतिकार करत होता. पोलिसांनी त्या मुलाला पकडले आणि सगळेजण पोलीस ठाण्यात गेले. कोठारेंनी नवतेजला इस्पितळात पाठवण्याची व्यवस्था केली.
.....
“अजिंक्य आता मला सांगा हे काय आहे ते.”
“मला जे माहित आहे ते मी सांगतो. तुम्ही ज्याला पकडले आहे त्याचे नाव आदी. ज्याच्याबद्दल आपल्याला गणेशने सांगितले होते. याला आम्ही गणेशबरोबर काव्या बेकरीत जाताना पाहीले होते. तो कधी कधी बेकरीत जात असे त्यामुळे गणेशला त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. मला सुरुवातीपासून संशय होता, चंदेल फक्त प्यादे आहे. खरा सूत्रधार वेगळा आहे. पण ज्याअर्थी नवतेजच्या इतर मालाबरोबर हा माल येतो त्याअर्थी तो किंवा त्याच्या घरातले कुणीतरी सामील असणार असे मला वाटत होते. नाहीतर चंदेल तिथे माल मागविण्याचे धारिष्ट्य करणार नाही. मला नवतेजचा संशय येत होता. पण त्याच्या विरुद्ध कुठलेच पुरावे मिळाले नाहीत. ना पल्लवीला ना वेदांतीला.
काव्यावर फारसा संशय घेता येत नव्हता कारण तिचे व्यक्तिमत्व. तिच्याकडे पाहून ती निर्बुद्ध आहे असेच वाटते. एवढे मोठे रॅकेट चालवण्याची क्षमता तिच्यात आहे असे वाटत नाही.
ज्यावेळेस जॉर्ज समोर आला तेव्हा एकदा असे वाटले होते की तो सूत्रधार असू शकेल. पण जेव्हा त्याने दाराचा खून केला तेव्हा त्याच्यावरचा संशय गेला. कारण सूत्रधार स्वतः खून करून सगळ्यांच्या नजरेत येण्याचा धोका पत्करणार नाही.
तुमच्या लक्षात आले का पहा प्रत्येक वेळेस ज्या संशयास्पद घटना घडल्या त्या नवतेज गोदाम, काव्या बेकरी नाहीतर नवतेजचे घर यांच्या आसपासच घडत होत्या. यामध्ये एकच माणूस असा होता ज्याच्याबद्दल आपल्याला नावाशिवाय काहीच माहित नव्हते. तो म्हणजे आदी. म्हणून आपण चंदेलच्या घरी जात असताना मी नवतेज, काव्या आणि आदीचा फोटो क्रांतीला पाठवला आणि त्यांच्याबद्दल पंजाबात काय माहिती मिळते ते काढण्यास सांगितले.
ही माहिती लवकर मिळणे गरजेचे होते नाहीतर तो गुन्हेगार मुंबईच काय कदाचित देशही सोडून गेला असता. क्रांतीने कमिशनर पंडितांना सांगीतले. पंजाब पोलिसांकडून ही माहिती मिळवणे त्यांना सहज शक्य होते.”
यावर क्रांती म्हणाली, “मला पप्पांनी माहिती दिली की पंजाब मध्ये सबरवाल नावाचा एक मोठा प्रतिष्ठीत माणूस आहे. तो ड्रग्जचा धंदा करतो असा पोलिसांना संशय आहे.”
“हो. हे नाव मी पण ऐकले आहे. पण तो कधीच सापडलेला नाही.” कोठारे म्हणाले.
“बरोबर. काव्या आणि आदी त्यांची मुले आहेत.” क्रांती म्हणाली.
“काय? आदी काव्याचा भाऊ आहे?” त्यांनी आश्चर्याने काव्याकडे पहात विचारले. तिने होकारार्थी मान डोलावली.
“मुंबईत हा व्यवसाय वाढवणे सोप्पे जावे म्हणून त्यांनी काव्याचे नवतेजशी लग्न लावले असावे. त्याला या व्यवसायाबद्दल काहीच माहित नसावे.”
“आम्हाला इतकेच माहीत आहे. बाकी काव्याला विचारा.” अजिंक्य म्हणाला.
कोठारे म्हणाले, “काव्या मॅडम, तुमची आता सुटका नाही तेव्हा आता सगळे खरे सांगून टाका.”
काव्याने कबुली जबाब दिला, “नवतेजच्या धंद्याच्या आड हे सर्व करणे आम्हाला सोपे जात होते. लग्न झाल्यावर मी त्याला माझ्यासाठी बेकरीचा व्यवसाय सुरु करून देण्याची गळ घातली. त्यामुळे आम्हाला आमचा व्यवसाय वाढवता आला. चंदेल आमचा सर्व व्यवसाय बघत होता. त्याला माहित नव्हते की त्याचा बॉस आदी आहे. उलट मी बेकरीतून ड्रग्ज पुरवावीत म्हणून तो मला ब्लॅकमेल करत होता. नाहीतर नवतेजला अडकविण्याची धमकी तो मला द्यायचा. हे उलट आमच्या पथ्थ्यावर पडले. त्याला आमचा अजिबात संशय आला नाही.”
“तू नवतेजला का मारलेस?”
“मी आणि आदी इथून निघून जाणार होतो. आदीने आज रात्रीची आमची विमानाची तिकिटे काढली होती. कधी घरी न येणारा नवतेज आज दुपारी नेमका लवकर घरी आला. त्याचे कारण सकाळी त्याने आदीची छोटी बॅग शेजारच्या खोलीत बघितली होती. त्याला संशय आला असावा हे माझ्या लक्षात आले. म्हणून मी आमचे भांडणाचे नाटक चालु ठेवले. आणि घरातून निघून जाण्याचे नाटक करत माझी बॅग माझ्या कारमध्ये ठेवली. शिवाय तुम्ही खाली बसला होता त्यामुळे त्याला तेव्हा काही विचारता आले नाही. सकाळी तुम्ही बेकरीची झडती घेतल्यावर आम्ही घरी आलो तेव्हा त्याला ती बॅग दिसली नाही आणि आदीही दिसला नाही. त्यात तुम्ही आमच्या तीन माणसांना अटक केलीत. त्यामुळे त्याला सकाळपासून माझा संशय येत होता. त्याचा संशय जावा म्हणून मी त्याच्या मागोमाग घरातून निघाले आणि बेकरीत गेले. तो थोड्या थोड्या वेळाने बेकरीत फोन करून मी आहे याची खात्री करून घेत होता. दुपारी मी जेवणाच्या सुट्टीत बेकरीतून निघाले आणि घरी आले. त्याने बेकरीत फोन केल्यावर मी तेथून गेल्याचे त्याला कळले. तो मला फोन करत होता. पण मी फोन उचलला नाही. मला लवकर घरी येऊन इथून निसटायचे होते. पण आम्ही घरातून निघायच्या आत तो घरी आला. त्याने आदीला बघितले आणि मला जाब विचारायला लागला. मी त्याला प्रेमाने आम्हाला जाऊ देण्याची विनंती केली. पण तो ऐकेना. त्याला आम्हाला पोलिसांच्या ताब्यात द्यायचे होते. म्हणून मी गोळी झाडली पण तेवढ्यात तुमच्या माणसांनी येऊन आम्हाला पकडले.”
“म्हणजे रात्री घरात शिरलेला माणूस आदी होता तर.” अजिंक्य म्हणाला.
“हो.”
“मग तो होता कुठे. घरातच लपला होता का? आणि त्याने घरात आल्यावर दार का उघडे ठेवले होते?”
“तुमची माणसे घरावर लक्ष ठेवत आहेत हे रात्रीच माझ्या लक्षात आले होते. अर्थात तेव्हा ती तुमची माणसे आहेत हे मला माहित नव्हते. पण मी आदीला तसे कळवले. आदी बागेतून बंगल्याच्या आवारात उतरला आणि घरात शिरला. त्याने दाराला मुद्दाम कडी घातली नाही. आमच्या अंदाजाप्रमाणे तुमची माणसे घरात शिरली. आणि छोट्या विजेरीच्या उजेडात घर तपासायला लागली. आम्ही वरून हे सर्व पहात होतो. आम्ही मुद्दाम एक खोके त्या खोलीत ठेवले होते. तुमची माणसे ते पहायला खोलीत शिरल्याबरोबर आम्ही दार लावून घेतले.”
“त्याने काय साध्य झाले? त्यांनी आम्हाला फोन करून हे कळवले.”
“हो पण आम्हाला तेवढा वेळ तर मिळाला असता. आम्ही त्यावेळेसच इथून निघून जाणार होतो. आम्ही जॉर्जला आमची व्यवस्था करायला सांगितली होती. आमच्या हालचालींवर तुम्ही लक्ष ठेवून आहात हे आम्हाला माहित होते. त्यामुळे बाहेर व्यवस्था झाल्याशिवाय आम्ही घरातून बाहेर पडू शकत नव्हतो. आम्ही असेही ठरवले होते की कसेही करून आदीला माल घेऊन इथून बाहेर पाठवायचे. कारण त्याच्यावर कोणाचा फारसा संशय नव्हता. मी नंतर गेले असते. पण आमची व्यवस्था व्हायच्या आत तुम्ही आलात. त्यामुळे आम्हाला सकाळी बाहेर पडता आले नाही.”
“हा सगळा वेळ आदी होता कुठे? तो कुणालाच दिसला नाही. नवतेज वरच्या मजल्यावर आला होता. त्यालाही तो दिसला नाही.”
“आमच्या घराला मागुन एक जिना आहे जो खाली गॅरेजपाशी जातो. त्या जिन्याने खाली जाऊन तो माझ्या गाडीत लपला होता. तो सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी मी बॅग गाडीत ठेवायचे नाटक केले.”
“तुम्ही विमानाने जायचा प्रयत्न केला असता तरी आम्ही तिथेही नजर ठेऊन तुम्हाला पकडले असते.” कोठारे म्हणाले.
“म्हणून आदी एकटा ड्रग्ज घेऊन जाणार होता. तो कसाही निसटला असता कारण त्याच्याबद्दल कुणालाच माहिती नव्हती. नंतर तुम्ही कुठल्या कारणावरून मला पकडले असते? यातून बाहेर पडायचे सगळे मार्ग आम्ही ठरवून ठेवले होते.”
“आता मात्र आमच्याकडे एवढे पुरावे आहेत की तुम्ही यातून बाहेर पडू शकणार नाही.” इन्स्पेक्टर कोठारे म्हणाले.
एक मोठे मिशन पार पडले म्हणून सर्वजण आनंदात होते. कमिशनर साहेबांनी तिथे येऊन सर्वांचे कौतुक केले. फक्त वेदांतीच्या डोळ्यात अश्रू होते. पल्लवी सारखी मैत्रीण गमावल्याचे.

....समाप्त....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Swati 14 no chi katha kuth aahe... 14 no la 13 chi katha disat aahe.. plz check & post it again...

मस्त झाली कथा।.. आवडली. Happy
सगळे भाग वाचले Happy
पल्लवी गेल्याचे दुःख आहेच
पुढच्या कथेत तिला जिवंत करा Wink

मस्त कथा एकदम!!!
सगळे भाग एकामागोमाग टाकल्यामुळे लिंक पण कायम राहिली..
फक्त एक प्रश्न उत्सुकता म्हणून, पल्लवीचा खुनी कोण? म्हणजे मास्टरमाईंड काव्या असली तरी पल्लवीला नक्की मारलं कोणी??

स्वाती, कथेचा वेग आणि माबो वर कथा टाकायचा वेग दोन्ही उत्तम हाताळलत. या वेगामुळे कदाचित या आधीच्या भागांना प्रतिक्रिया टाकल्या गेल्या नाहीत, पण खूप दिवसांनी सलग कथा वाचण्याचं समाधान मिळालं. या साठी धन्यवाद, कथा छानच लिहिलीय.

द डेथ ट्रॅप भाग १४ का दिसत नाहिये मला Sad सर्च करुन ही मिळत नाहिये.... कुणी तरी लिंक द्या प्लिज Sad

खूप सुंदर आणि वेगवान कथा. कुठेही रेंगाळली नाही. आणि मागोमाग भाग टाकल्याने लिंकही चान राहिली.. बऱ्याच दिवसांनी छान आणि पूर्ण कथा वाचायला मिळाली. धन्यवाद..

व्वा !! एक नंबर Happy १४ व्या भागाची लिंक ही मिळाली त्या बद्दल धन्यवाद ! फार मस्त कथा होती. खूप आवडली

छान झाली कथा.
पण मला काव्याचा संशय आधीच आला होता Wink निर्बुद्ध असण्याचं नाटक करत असणार असंच वाटलं होतं.

स्वाती, कथेचा वेग आणि माबो वर कथा टाकायचा वेग दोन्ही उत्तम हाताळलत. या वेगामुळे कदाचित या आधीच्या भागांना प्रतिक्रिया टाकल्या गेल्या नाहीत, पण खूप दिवसांनी सलग कथा वाचण्याचं समाधान मिळालं. या साठी धन्यवाद, कथा छानच लिहिलीय. + १११११

Sasmit+1