द डेथ ट्रॅप भाग १३

Submitted by स्वाती पोतनीस on 28 July, 2019 - 06:39

स्वाती पोतनीस
द डेथ ट्रॅप
भाग १३

क्रांतीला नरेंद्रचा फोन आला. फोन झाल्यावर ती वेदांतीला म्हणाली, “अजिंक्य आणि नरेंद्र दाराच्या मागे गेलेत. ते काव्या बेकरीत जात नाही आहेत. काय करायचे?”
“आपण जाऊया तिकडे?” दोघी रिक्षाने काव्या बेकरीकडे निघाल्या. बेकरीपासून थोड्या लांब अंतरावर त्यांनी रिक्षा थांबवली. आणि त्या चालत निघाल्या. “वेदांती आपण तिथे जाऊन काय साध्य करणार आहोत? अजिंक्यला तिथे कोणी ओळखत नव्हते. तो बेकरीत जाऊन माहिती काढू शकला असता. तुला तर काव्या ओळखते. तू तिच्याक्डून काय माहिती काढणार?”
“काव्या आऊटलेटमध्ये असते. आपण थेट वरती बेकरीत जाऊया. तिथे जाऊन आपण काय करायचे ते मी आत्ता सांगू शकत नाही. पण जसा प्रसंग असेल त्याप्रमाणे आपल्याला वागावे लागेल.” वेदांती म्हणाली.
“तू एवढी धाडसी असशील याची मला कल्पना नव्हती.” त्या बेकरीजवळ पोहोचल्या आणि वेदांतीने क्रांतीला थांबवले. “काय झाले?”
“त्या गाडीतून उतरणारा माणूस बघ. मी त्याला कुठेतरी पाहीले आहे.”
“बेकरीसमोर?”
“हो. एकच मिनिट.” असे म्हणून वेदांतीने मोबाईल बाहेर काढला. तिने एक फोटो क्रांतीला काढून दाखवला. “हा बघ हा तोच माणूस आहे. मला पल्लवीने फोटो पाठवला होता. तो चंदेल आहे. गोदामाचे सर्व काम तो बघतो. तो या प्रकरणात गुंतलेला आहे हे नक्की. आणि त्याच्या बरोबरचा माणूस. तो गोदामात काम करतो. त्याचे नाव माहीत नाही.”
चंदेल गाडीतून उतरला. त्याच्या बरोबरचा माणूस गाडी घेऊन इमारतीत ठेवायला गेला.
“तू इथेच थांब वेदांती. मी बेकरीत जाते.” वेदांती बेकरीच्या विरुद्ध बाजुला असलेल्या बस थांब्यात जाऊन बाकावर बसली. क्रांती बेकरीत शिरली. आत बरीच गर्दी होती. ती सर्वात मागे थांबली. काचेच्या मागे गल्ल्यापाशी काव्या बसली होती. बाजुची लाकडी फळी वर करून चंदेल आत शिरत होता. बाकीचे विक्रेते लोकांना पदार्थ पिशवीत भरून देत होते आणि किती पैसे घ्यायचे ते ओरडून सांगत होते.
चंदेल हळू आवाजात काव्याशी बोलू लागला, “ही यादी आहे. याप्रमाणे माल पोचवायचा आहे.”
“केव्हा येईल माल?”
“साडेपाचपर्यंत गाडी येते आहे. गणेशला पाठवा तिकडे.”
“तू नाही का माल पाठवू शकत?”
“नाही. गणेशला तिकडे पाठवा. उद्याच्या उद्या माल पोहोचवला गेला पाहिजे. आधीच उशीर झाला आहे. बाकी तुम्हाला माहीत आहेच.” असे म्हणून चंदेलने लाकडी फळी उचलली आणि तो बाहेर आला. क्रांती त्याच्या मागोमाग बेकरीतून बाहेर पडली. ती काही न घेताच बाहेर पडली हे कुणाच्याही लक्षात आले नाही. तिने पळतपळत रस्ता ओलांडला. आणि बस थांब्यात जाऊन वेदांतीच्या शेजारी बसली.
“वेदांती, हा आवाज ऐक.” असे म्हणून तिने मोबाईलमध्ये टेप करून घेतलेले बोलणे ऐकवले.
चंदेल - “साडेपाचपर्यंत गाडी येते आहे. गणेशला पाठवा तिकडे.”
काव्या - “तू नाही का माल पाठवू शकत?”
चंदेल - “नाही. गणेशला तिकडे पाठवा. उद्याच्या उद्या माल पोहोचवला गेला पाहिजे. आधीच उशीर झाला आहे. बाकी तुम्हाला माहीत आहेच.”
एवढेच बोलणे टेप झाले होते. “आवाज ओळखलास?” क्रांतीने विचारले.
“हा चंदेलचा आवाज आहे का?”
“हो.”
“ओळखला. त्या दिवशी आपण मला आलेल्या फोन नंबरवर परत फोन करून बघत होतो. दोनच फोन चालु होते. त्यात एक बसका आवाज आपण ऐकला. तो हाच आवाज होता.”
“बरोबर. आणि तो फोन बद्रीचा होता.”
“बद्रीचा फोन तो गेल्यानंतर वापरणे. किती भयानक प्रकार आहे हा?” वेदांतीच्या अंगावर काटा आला.
“वेदांती चल. आपण टॅक्सी घेऊ या. तो खात्रीने गोदामात जाणार. साडेपाचला माल येणार आहे असे तो म्हणत होता.”
“इथून तिकडे पोचायला किती वेळ लागेल?”
“दीड तास.”
त्यांनी टॅक्सी केली. ड्रायव्हर खूपच हळू चालवत होता. तळोज्याला पोचेपर्यंत आणि गोदाम शोधेपर्यंत त्यांना सहा वाजले. टॅक्सी ड्रायव्हरच्या वागण्यावरून तो आपल्याला फारसे सहकार्य करणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. जास्त पैसे द्यायचे आमिष दाखवून त्यांनी त्याला एक तासाने येण्यास सांगितले. “भैया तुम्ही जरा फिरून या. एक तासाने या. आधी गरज वाटली तर आम्ही तुम्हाला फोन करतो.”
“इथेच थांबतो ना.”
“नको नको. तुम्ही इथे नका थांबूत. हे निम्मे पैसे घ्या.”
“निम्मे नाही. सगळे द्या.”
“आणि तुम्ही आला नाहीत तर. आम्ही परत कसे जायचे?” ड्रायव्हरच्या लक्षात आले, या मुलींना परत जायला इथे वाहन मिळणे अवघड आहे. त्या आपल्याबरोबरच परत येणार.’ तेव्हा त्याने मान्य केले आणि तो तिथून निघून गेला.
गोदामापासून काही अंतरावर एक चहाची टपरी होती. तिथे त्या जाऊन बसल्या. टपरी म्हणजे पत्र्याचे छोटे दुकान होते. तिथे तो स्टोव्हवर चहा बनवत होता. दुकानासमोर त्याने दोन खुर्च्या आणि एक बाकडे टाकलेले होते. चहा पिता पिता त्या गोदामावर लक्ष ठेऊन होत्या. मोठे फाटक उघडलेले होते. गोदामाच्या आवारात एक मोटार आणि एक छोटी बस दिसत होती. याच मोटारीतून चंदेल काव्या बेकरीत आला होता. एका ट्रकमधून माल उतरवला जात होता. एक माणूस त्या कामावर लक्ष ठेवत होता. लांब असल्यामुळे त्याचा चेहरा दिसत नसला तरी कपड्यांवरून तो चंदेल असल्याचे कळत होते. बराच वेळ काम चालु होते.
साडेसहा वाजत आले तसे चहावाला चुळबूळ करायला लागला. त्याने विचारले, “ताई तुम्हाला अजुन काही हवे आहे का?”
“नाही नको.”
“माझी जायची वेळ झाली आहे.”
“हो का. चालेल न. तुम्ही बंद करून टाका.”
“तुम्ही इथे बाकावर बसलात तरी चालेल.” असे म्हणून त्याने खुर्च्या आत ठेवून दिल्या. क्रांती म्हणाली, “वेदांती साडे सहा वाजलेत. आपल्याला अजुन वेळ लागेल. आपण या लोकांना कळवायला हवे.”
“हो पण इथे रेंज येत नाहीये. आपण त्यांना कळवणार कसे?”
तेवढ्यात चहावाला म्हणाला, “ताई तुम्हाला थोडे मागे जायला लागेल. मागच्या वळणावर उजवीकडे गेलात तर तुम्हाला रेंज मिळेल. इथे कधी कधीच फोन लागतो. तुम्हाला तिकडेच जायला लागेल.”
“क्रांती, तू तिकडे जाऊन फोन करून येतेस का? मी इथेच थांबते.”
“अंहं. आपण दोघी जाऊया. मी तुला एकटीला इथे ठेवून जाऊ शकत नाही. अजिंक्यने मला विचारले तर मी काय उत्तर देऊ?”
“ठीक आहे. चल. मी पण येते. आपण ड्रायव्हरलाही बोलावून घेऊ.” दोघी उलटे काही अंतर चालत गेल्या. खरेतर त्या आल्या तो रस्ता सरळ होता. पण आता परत चालत जाताना त्यांच्या लक्षात आले मध्ये एक फाटा होता. डांबरी रस्ता बनवलेला होता. त्या रस्त्यावर दोन तीन मिनिटाच्या अंतरावर एक छोटेसे टपरीवजा गोदाम दिसत होते. गोदाम बंद होते. बरेच दिवसात कुणी त्याचा वापर केला असल्याचे वाटत नव्हते. त्या रस्त्यावर जायला लागल्यावर खरोखरच त्यांना मोबाईलला थोडी रेंज मिळाली. क्रांतीने अजिंक्यला फोन लावला आणि घडलेल्या घटना सांगितल्या.
“तुला वाटते आहे का माल लगेच गोदामाच्या बाहेर जाईल?”
“वेदांतीला खात्री वाटते आहे.”
“मग तुम्ही चंदेलचा पाठलाग करा. आम्ही इथून निघतो. जरी वेळेत पोहोचलो नाही तरी त्यावेळेस ठरवूया काय करायचे ते. मधून मधून काय घडते आहे ते आम्हाला कळवत रहा.”
वेदांतीने तोपर्यंत टॅक्सी ड्रायव्हरला फोन केला होता. “दहा मिनिटांत तो येतो आहे.”
दोघी चालत परत टपरीपाशी येऊन पोहोचल्या. त्या परत जात असताना ट्रक समोरून येताना त्यांनी पाहीला. ट्रकचा नंबर PB 02 पासून सुरु होणारा होता. म्हणजे ट्रक पंजाबचा होता. गोदामातून छोटी बस बाहेर पडत होती.
“यातून गोदामातले कामगार जात असणार.”
“म्हणजे आता चंदेल केव्हाही तिथून निघेल. वेदांती गणेश तुला माहीत आहे न?”
“हो तो बेकरीत वरच्या मजल्यावर काम करतो.”
“तो कदाचित या गाडीत असण्याची शक्यता आहे.” क्रांती म्हणाली.
“असे कर तू खाली वाक. म्हणजे तू त्याला दिसणार नाहीस.” वेदांती पाठमोरी बसून मान खाली घालून फोनमध्ये बघू लागली. छोटी बस त्यांना ओलांडून पुढे गेली तसे वेदांती सरळ झाली आणि मागे वळून बसच्या दिशेने पाहू लागली. तिला गाडीत बसलेल्यांचे चेहरे ओझरते दिसत होते. परंतु त्यात गणेशला शोधेपर्यंत गाडी पुढे गेली. क्रांतीने मागुन त्या बसचा फोटो काढला आणि अजिंक्यला पाठवला.
“क्रांती, गोदामातले बहुतेक कामगार गेले असणार. आता चंदेल केव्हाही निघेल.” आपला ड्रायव्हर लवकर आला तर बरे.” ती असे म्हणेपर्यंत त्यांची टॅक्सी आली. त्या टॅक्सीत बसल्या आणि त्यांनी टॅक्सी पुढच्या वळणावर त्या दुसऱ्या छोट्या गोदामाच्या दिशेने नेण्यास सांगितली. त्यांना थोडया वेळ वाट पहावी लागली. चंदेलची गाडी त्यांना जाताना दिसली. त्यानंतर दोन तीन मिनिटांनी त्यांनी ड्रायव्हरला निघायला सांगितले. जसे ते मुख्य रस्त्याला लागले मोबाईलला व्यवस्थित रेंज दिसायला लागली. क्रांतीने अजिंक्यला फोन लावला, “अजिंक्य आम्ही चंदेलचा पाठलाग करत आहोत. मी तुला एक फोटो पाठवला आहे. ती गाडी आत्ता गोदामातून निघाली. त्या गाडीत गणेश असण्याची शक्यता आहे. या मुलाला चंदेलने गोदामात बोलावले होते. तो काव्या बेकरीत काम करतो.”
“त्याला मी कसे ओळखणार?”
“वेदांती सांगेल तुला.” तिने फोन वेदांतीला दिला.
“अजिंक्य, गणेश साधारण पंचविशीचा असेल. मध्यम उंची, बारीक, केस बारीक कापलेले. बहुतेक काव्या बेकरीचा गणवेश घातलेला असेल. आकाशी रंगाचा चौकटीचा शर्ट आणि निळी पॅँट.”
“ठीक आहे.” म्हणून अजिंक्यने फोन बंद केला.
त्यांना मुंबईत पोचेपर्यंत साडेआठ होऊन गेले. त्या ड्रायव्हरला रस्ता सांगत होत्या. परंतु आपण पुढच्या गाडीचा पाठलाग करत आहोत हे त्यांनी ड्रायव्हरला कळू दिले नाही. किंवा त्याच्या लक्षात आले असेल तरी त्याने तसे दाखवले नाही. याचे कारण पैशाचे आमिष. मधेच त्या त्याला वेग वाढवायला सांगत होत्या. एक दोनदा त्यांनी वेग कमी करायला सांगितला. तेव्हा तो थोडा वैतागला. परंतु आम्ही पत्ता शोधत आहोत असे सांगून त्यांनी त्याला गप्प केले.
थोड्या वेळाने पुढची गाडी थांबली. चंदेल खाली उतरलेला त्यांनी पाहीला. परंतु पुढचे त्याचे वागणे बुचकळ्यात टाकणारे होते. गाडीतून उतरल्यावर ड्रायव्हरशी एक शब्दही न बोलता तो जवळच्या इमारतीत शिरला. त्याच्या हातात कसलेही सामान नव्हते. ड्रायव्हरने गाडी सुरु केली. एक मिनिटासाठी यांना कळले नाही काय करावे. पण दोघींनी एकाच वेळेस ड्रायव्हरला गाडी पुढे घेण्यास सांगितली. साधारण पंधरा मिनिटांनी पुढची गाडी एका इमारतीत शिरलेली दिसली. तेव्हा त्यांनी टॅक्सी थांबवली. त्याला पैसे देऊन त्या खाली उतरल्या.
इमारतीत पोहोचल्यावर पुढच्या गाडीचा ड्रायव्हर लिफ्टपाशी गेला. त्याच्या हातात एक खोके होते. याही दोघी त्याच्यापाठोपाठ इमारतीत शिरल्या. तो अजुन लिफ्ट खाली येण्याची वाट पहात होत्या. लिफ्ट खाली आल्यावर तो लिफ्टमध्ये शिरला. याही त्याच्यापाठोपाठ लिफ्टमध्ये शिरल्या. त्याने पाचव्या मजल्याचे बटण दाबले आणि यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहीले. वेदांतीने उत्तर दिले, “पाच.”
लिफ्ट थांबल्यावर तिघे लिफ्टमधून बाहेर आले. त्या मजल्यावर दोन सदनिका होत्या. एका सदनिकेवर पाटी होती ‘खुराना’. त्याने त्या सदनिकेपाशी जाऊन कुलूप उघडले आणि आत शिरून तो दार लावू लागला. तसे त्याही दारापाशी गेल्या. वेदांतीने एका हाताने दार थोपवले. तो संशयाने त्यांच्याकडे पाहू लागला. त्याने विचारले, “काय काम आहे?”
“तुमच्याशी काम आहे.” दोघी आत शिरायला लागल्या तसा त्याने विरोध केला. वेदांतीने हाताने दरवाजा ढकलून पूर्ण उघडला. क्रांती पुढे झाली तसा तो मागे सरकला. दोघी आत शिरल्या.
तो गडबडला होता. त्याला कळेना काय करावे. दोघी आत जाऊन सोफ्यावर बसल्या. क्रांतीने त्याला खुणावले, “बसा.” क्रांतीच्या आवाजात असे काहीतरी होते की तो गुपचूप समोरच्या खुर्चीवर बसला. त्याने हातातले खोके शेजारच्या खुर्चीवर ठेवले. ती आता काहीतरी बोलेल या अपेक्षेने तो क्रांतीकडे पाहू लागला. पण प्रथम बोलली ती वेदांती. “तुम्ही खुराना?”
त्याने होकारार्थी मान डोलवली. “बद्री खुराना तुमचा कोण?”
क्रांतीने चमकून तिच्याकडे पाहीले. तिने बद्रीबद्दल ऐकले होते. परंतु त्याचे आडनाव खुराना आहे असा कधी उल्लेख तिने ऐकला नव्हता. तिने खुरानाकडे पाहीले. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तिला कळले नाही. त्यांची नजर चुकवून दुसरीकडे पाहून त्याने उत्तर दिले, “बद्री माझा मुलगा.”
क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users