द डेथ ट्रॅप भाग १२

Submitted by स्वाती पोतनीस on 28 July, 2019 - 06:07

स्वाती पोतनीस
द डेथ ट्रॅप
भाग १२
नरेंद्रने दारा आणि जॉर्जला एकत्र रिक्षेतून जाताना पाहीले. त्याने मागुन येणाऱ्या रिक्षेला खुण करून थांबविले. नरेंद्र रिक्षेत चढला आणि त्याने ड्रायव्हरला पुढच्या रिक्षेचा पाठलाग करण्यास सांगितले. रिक्षा ड्रायव्हरने विचारले, “साहेब काही लफडा नाही ना?” नरेंद्रने त्याचा परवाना दाखविला आणि सांगितले,
“काळजी करू नकोस. तुला काहीही प्रॉब्लेम होणार नाही. पण ती रिक्षा बरीच पुढे गेली आहे. तिला कसे गाठणार?”
“मी आत्ता त्या रिक्षेला गाठतो.” असे म्हणून त्याने सफाईने गर्दीतून रिक्षा पुढे नेली. अंतर राखून तो त्या रिक्षेचा पाठलाग करू लागला.
मधेच पुढची रिक्षा थांबली. काही अंतरावर नरेंद्रनेही आपली रिक्षा थांबवली. नरेंद्रने दाराला रिक्षेतून उतरताना पाहीले. तेवढ्यात रिक्षेच्या पुढे एक मोटार येऊन थांबली. दारा त्या मोटारीत जाऊन बसला. नरेंद्रचा फोन वाजला. फोन अजिंक्यचा होता. “नरेंद्र, मी तुझ्या मागेच आहे पटकन गाडीत येऊन बस.”
रिक्षाचे भाडे देऊन नरेंद्र गाडीत येऊन बसेपर्यंत अजिंक्यने पुढच्या मोटारीचा नंबर पाहून ठेवला. MH 04 CG 1412 नंबरची निळ्या रंगाची फोर्ड मोटार होती ती. त्याने गाडी सुरु करेपर्यंत फोर्ड आणि रिक्षा दोन्ही निघून गेल्या होत्या. दोनच मिनिटांत अजिंक्यने मोटारीला गाठले. लांबून त्यांना मोटारीत फक्त दोन डोकी दिसत होती.
“अजिंक्य, मला वाटते आपण रिक्षाला सोडायला नको होते. जॉर्ज नक्की त्या रिक्षेतून निसटला. मी त्याच्या मागावर जाऊ शकलो असतो.”
“नरेंद्र लक्षात घे. आज जॉर्ज जिममधून ज्याप्रकारे गायब झाला त्यावरून पोलीसांना त्याचा संशय नक्कीच येणार. ते काही करून जॉर्जला शोधून काढतील. आणि तो आपल्याला सापडला तरी त्याला या प्रकरणाची कितपत माहिती आहे कुणास ठाऊक. या प्रकारच्या धंद्यात बरीच माणसे काम करत असतात. ते सगळे एकमेकांशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडलेले असतात. पण ते त्यांना माहीत नसते. आपल्याला फार वेळ न घालवता लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास करायचा आहे. कितीतरी लहान म्हणजे सतरा अठरा वयाची मुले सुद्धा ड्रग्जच्या आहारी गेलेली आहेत. अजुन मुले या व्यसनाची शिकार व्हायच्या आधी आपल्याला शक्य तेवढे प्रयत्न करून जास्तीत जास्त गुन्हेगारांना पकडायचे आहे. आत्तातरी आपले टार्गेट दारा आहे. कारण आपल्याला माहीत आहे तो यात गुंतलेला आहे. जर त्याला एकटे गाठता आले तर आपण त्याच्याकडून बरीच माहिती घेऊ शकू. आपल्याला पोलिसांचाही पूर्ण पाठींबा आहे.”
“हो. आणि आपल्याला वेदांतीलाही विसरून चालणार नाही. जोपर्यंत हे लोक सापडत नाहीत तोपर्यंत ती मोकळेपणाने बाहेर हिंडू शकणार नाही.” नरेंद्र म्हणाला.
यानंतर बराच वेळ काही न बोलता ते मोटारीचा पाठलाग करत होते.
“नरेंद्र, क्रांतीला कळव आपण काव्या बेकरीत न जाता दाराच्या मागे जात आहोत ते.”
फोर्ड मोटार आता नवी मुंबईच्या दिशेने चालली होती. रस्ता बराच गर्दीचा होता. त्यामुळे पुढच्या गाडीवर लक्ष ठेऊन कौशल्याने मार्ग काढत जावे लागत होते. पुढची गाडी सिग्नलला थांबली. अजिंक्यने आपली गाडी पुढच्या गाडीच्या जवळ न्यायचा प्रयत्न केला. परंतु त्याला ते शक्य झाले नाही. दोन्ही गाड्यांच्या मधे बऱ्याच गाड्या होत्या. सिग्नल हिरवा झाला आणि फोर्ड गाडी सुसाट निघाली. तिच्या मागे बऱ्याच गाड्या निघाल्या. अजिंक्य तिथे पोचला आणि लाल दिवा लागला. नाईलाजाने अजिंक्यला थांबावे लागले. तोपर्यंत फोर्ड गाडी दिसेनाशी झाली.
दिवा हिरवा झाल्यावर तोही सुसाट निघाला. बरेच अंतर त्यांनी काटले, पण फोर्ड गाडी कुठेच सापडली नाही. “अजिंक्य, हाच रस्ता पुढे नवतेज गोदामाकडे जातो. आपण तिकडे जाऊन बघूया. जर त्यांच्यात खरेच संबंध असेल तर लपण्यासाठी तो गोदामाचा आश्रय घ्यायची शक्यता आहे.”
अजिंक्य गोदामाच्या दिशेने निघाला. ते आता मुंबईच्या बाहेर आले होते. गर्दी कमी झाली होती. आजूबाजूची वस्तीही विरळ झाली होती. रस्त्याच्या मध्ये दुभाजक असल्यामुळे समोरून येणाऱ्या गाड्यांना चुकविण्याचा प्रश्नच नव्हता. अजिंक्यने गाडीचा वेग अजुन वाढवला. आता ते नवतेज गोदामाच्या रस्त्यावर होते. नरेंद्र रस्त्यावर नजर ठेवून होता. निळी फोर्ड अजूनही त्यांच्या दृष्टीक्षेपात आली नव्हती. आणि नरेंद्र मधेच ओरडला, “अजिंक्य समोरून निळी फोर्ड येते आहे.” अजिंक्यने गाडीचा वेग थोडा कमी केला आणि गाडी चालवता चालवता तोही दुभाजकाच्या पलीकडे समोरून येणाऱ्या गाडीकडे बघू लागला. गाडीचा नंबर जरी दिसला नाही तरी गाडीत दोन माणसे होती हे मात्र त्यांना दिसले. जॉर्ज ड्रायव्हरच्या शेजारी बसलेला होता. दाराचा मात्र पत्ता नव्हता.
“अजिंक्य, आपण जॉर्जच्या मागे जाऊया का? कारण दाराला फोर्डमध्ये बसताना मी पाहीले होते.”
“नरेंद्र तू असे बोलायला लागलास की मला माझे मत बदलावे लागते. तू मगापासून जॉर्जच्या नावाचा जप लावला आहेस. त्यामुळे मलाही वाटू लागले आहे की कदाचित जॉर्ज आपल्याला माहिती देऊ शकेल.”
“हो ना. मग चल, वळव गाडी. आपण जॉर्जला गाठूया.”
अजिंक्यने गाडीचा वेग परत वाढवला. परंतु बऱ्याच अंतरापर्यंत दुभाजक असल्यामुळे उलटे फिरून जॉर्जचा पाठलाग करणे त्यांना शक्य झाले नाही.
वैतागून नरेंद्र म्हणाला, “अरे हा दुभाजक संपतच नाही आहे. आपल्याला जॉर्जला गाठणे शक्यच होणार नाही. एव्हाना तो बराच पुढे गेला असेल.”
“नरेंद्र माझ्या फोनमध्ये बघ. क्रांतीने आपल्याला फोटोबरोबर दाराचा पत्ता पाठवलेला आहे. कदाचित जॉर्जने दाराला घरी सोडले असेल.”
“म्हणजे आपण दारालाच शोधणार आहोत तर.” अजिंक्य नुसता हसला.
नरेंद्र पुढे म्हणाला, “अरे पण जॉर्ज तर रिक्षातून उतरला नव्हता. मग गाडीत कधी बसला?”
“मधे बराच वेळ गाडी आपल्या नजरेआड होती. मधे केव्हातरी तो गाडीत बसला असेल.”
“आपण पाठलाग करतो आहोत हे त्याला कळले असावे.”
“कदाचित.” अजिंक्य म्हणाला. “म्हणून त्यांनी आपल्याला चुकवले असण्याची शक्यता आहे.”
नरेंद्रने दाराचा पत्ता वाचुन दाखवला. “दाराचे घरही याच मार्गावर वाटेत लागते.” ते आता दाराचे घर शोधू लागले. रस्त्याच्या दोन्ही बाजुला आता वस्ती दिसत नव्हती. अंतराअंतरावर एखादे घर नाहीतर छोटे हॉटेल दिसत होते. पुढे गेल्यावर काही अंतरावर त्यांना एक टायर बांधलेले दिसले. नरेंद्रने पत्ता पाहून सांगितले. “हाच दाराचा पत्ता आहे. यात गॅरेजचा उल्लेख आहे.” अजिंक्यने गॅरेजपाशी गाडी थांबवली.
ते एक छोटे कच्चे बांधलेले घर होते. बाहेर गॅरेज व आतील बाजूस रहाण्याची सोय असावी. बाहेर मोठे मोठे टायर्स एकावर एक रचून ठेवलेले होते. गॅरेज बंद होते. कोणाची चाहूल लागत नव्हती. दोघे वळसा घालून मागच्या बाजुला गेले. तिथे एक दार लोटलेले त्यांना दिसले. दाराला हलका धक्का देताच दार उघडले गेले. घर दोन खोल्यांचे होते. बैठकीच्या खोलीत दोन खुर्च्या होत्या. त्यातील एक तुटली होती. दुसरी खुर्ची आडवी पडलेली होती. खुर्चीचा एक दांडा तिथे पडलेला होता. त्याला रक्त लागलेले होते. खोलीतील बाकीचे सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. त्या सामनाच्या मधेच दारा पालथा पडलेला होता. त्याचा चेहरा एका बाजूने दिसत होता. जवळ जाऊन बघितल्यावर त्याचे डोळे उघडे आहेत हे दिसले. त्या डोळ्यात जिवंतपणा नव्हता. त्याच्या अंगावर जागोजागी जखमा दिसत होत्या. डोक्याच्या जखमेतून रक्ताचा ओघळ आलेला होता. बरीच मारामारी झालेली दिसत होती. अजिंक्य आणि नरेंद्र बाहेर आले. नरेंद्रने इन्स्पेक्टर कोठारेंना फोन लावला आणि दाराच्या मृत्यूची बातमी दिली.
“तो विभाग माझ्या अखत्यारीत येत नाही. परंतु मी त्या विभागाच्या पोलिसांना तिथे पाठविण्याची व्यवस्था करतो.” इन्स्पेक्टर कोठारेंनी उत्तर दिले.
.....
सुहानी आणि विक्रम पबमधे गेले. पब फारसा मोठा नव्हता. वातावरण खूपच छान होते. तीन रांगांमध्ये टेबले मांडलेली होती. दोन भिंती गडद रंगात रंगवलेल्या होत्या. तर दोन बाजुला भिंतींच्या ऐवजी काचा होत्या. दिव्यांचा झगमगाट होता. डान्स फ्लोअर काचेच्या पलीकडे होता. तिकडे रंगीबेरंगी फिरते दिवे लावलेले होते. संगीत खूप मोठ्या आवाजात लावलेले होते. त्याचा आवाज इकडेही स्पष्ट ऐकू येत होता. पलीकडे जाण्यासाठी दार होते. बरीचशी जेवणाची टेबले भरलेली होती. तिथे तरूण आणि मध्यमवयीन माणसे होती. डान्स फ्लोअरवर काही तरूण मुले मुली नाचत होती. काहींच्या हातात ग्लास दिसत होते. तिथे दारू विक्री होत होती हे स्पष्ट होते.
विक्रमने पैसे भरले तेव्हा त्यांना डान्स फ्लोअरवर जायची परवानगी मिळाली. दोघे डान्स फ्लोअरवर जाऊन नाचू लागले. बाजुला एक खोली होती. दारावर ‘स्मोकिंग झोन’ अशी पाटी होती. तर दुसऱ्या दारावर ‘वॉश रूम’ अशी पाटी होती. विक्रम म्हणाला, “मी स्मोक करून येतो.” तो आत गेला. आत दोन तीन टेबले आणि काही खुर्च्या ठेवलेल्या होत्या. विक्रमने एक खुर्ची खिडकीजवळ ओढून घेतली. खिशातून मोबाईल बाहेर काढला आणि मोबाईलमधे निरोप लिहित असल्याचा बहाणा करू लागला. दोन तीन तरूण मुले सिगारेट ओढत होती. पाच मिनिटांत सिगारेट संपवून ती मुले बाहेर निघून गेली. तिथे संशयास्पद काही आढळले नाही.
विक्रम तिथून बाहेर आला. आणि “काही नाही” असे खुणेने सुहानीला सांगितले. सुहानी ‘वॉश रूम’मध्ये गेली. आत दोन तीन मुली आरशासमोर उभ्या होत्या. एक केस सारखे करत होती तर एक लिपस्टिक लावत होती. सुहानी एका आरशासमोर उभी राहून केस विंचरायला लागली. दोन मिनिटे झाल्यावर तिने तोंड धुतले. आणि मेकअप करायला लागली. त्या मुली बाहेर गेल्या तसे तिने एक एक टॉयलेट तपासायला सुरवात केली. तेवढ्यात कुणाची तरी चाहूल लागल्यावर ती आतच थांबली. दोन मुली आत आल्या. सुहानीला त्यांचे पाय दिसले. एकीच्या पायात पांढऱ्या उंच टाचेच्या चपला होत्या. तिने काळा स्कर्ट घातलेला होता. तर दुसरीच्या पायात काळ्या रंगाचे उंच टाचेचे बूट होते. सुहानीला त्यांचे बोलणे ऐकू येत होते.
“किती?’
“एक”
“पाच”
नंतर थोडावेळ शांतता होती.
“ए ऐक. इथे नाही. बाहेर जाऊन.”
हे बोलणे संशयास्पद नक्कीच होते. पुन्हा पावलांचे आवाज बाहेर जाताना ऐकू आले. बाहेर जाणारे दार बंद केल्याचा आवाज ऐकू आल्यावर सुहानी वॉश रुमच्या बाहेर आली. डान्स फ्लोअरवर जाताना तिचे आजूबाजूला लक्ष होते. काळा स्कर्ट आणि पांढऱ्या चपला घातलेली मुलगी पबमधून बाहेर जात होती. तिने ड्रग्ज खरेदी केले असावेत. पण तिचा पाठलाग करून उपयोग नव्हता. विक्रेतीला शोधणे गरजेचे होते.
सुहानी विक्रमला म्हणाली, “चल बाहेर जाऊन बसुया.” दोघे बाहेर काचेला लागून असलेल्या एका टेबलापाशी जाऊन बसले. आत जे ऐकले ते सुहानीने विक्रमला सांगितले. विक्रम म्हणाला, “ती काळे बूटवाली मुलगी तुला दिसली का?”
“नाही. इथे डान्स फ्लोअरवर ती नाही. किंवा हॉटेलच्या कामगारांमध्येही ती नाही दिसत.”
“मग आपण थोडा वेळ इथेच बसू. तू लक्ष ठेऊन ती मुलगी शोधायचा प्रयत्न कर.”
दोघांनी खाणे मागवले आणि सुहानी काचेतून आत दिसणाऱ्या लोकांवर लक्ष ठेऊ लागली. दोघे जवळजवळ दोन तास तिथे थांबले पण त्यांना ती मुलगी काही दिसली नाही. शेवटी दोघे तिथून बाहेर पडले. तोपर्यंत साडेसहा वाजले होते. विक्रमने फोन करून अजिंक्यला जे घडले ते सांगितले. अजिंक्यने त्यांना वेदांतीच्या घरी जाण्यास सांगितले.
.....
सुहानी आणि विक्रम घरी पोहोचले तर अजिंक्य आणि नरेंद्र तिथे आधीच पोहोचलेले होते. वेदांती आणि क्रांती मात्र अजुन आलेल्या नव्हत्या. “अजिंक्य क्रांतीने तुम्हाला सांगितले नाही का त्या कुठे जाणार आहेत ते?”
“नाही. त्यांचा काहीच फोन आला नाही. आणि आम्ही दाराचा पाठलाग करत होतो. त्यामुळे फोन करायचे लक्षात आले नाही.”
“वेदांतीला फोन लावला का?”
“दोघींचे फोन बंद आहेत.”
“आपल्या नियमाप्रमाणे न सांगता कुठे जायचे नाही असे ठरले आहे न? मग त्या कशा काय गेल्या?”
“हो. आपण त्यांना हे विचारूया. पण त्यासाठी आधी त्या यायला तर पाहिजेत.” अजिंक्यला अजुन तरी काळजी वाटत नव्हती.
अजिंक्यने मोबाईलवर बातम्या लावल्या. सगळे भोवती जमा झाले. बराच वेळ इतर बातम्या दाखवत होते. परंतु दाराच्या खुनाची बातमी काही दाखवली गेली नाही. तेवढ्यात बातमीदार म्हणाली, “आता पहा खास बातमी. मुंबईतले गुंडाराज. हा एक कुप्रसिद्ध गुंड एका बिचाऱ्या दुकानदाराला मारतो आहे. कशासाठी? तर काही हजार रुपयांसाठी. गरीब माणसाने जगायचे कसे. पुनः एकदा सामान्य माणसाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. शासन काय करते आहे?”
अजिंक्यने मोबाईल बंद केला. सगळे एकदम स्तिमित झाले होते. दाराच्या खुनाची बातमी चॅनेलपर्यंत पोहोचली नव्हती. नरेंद्र स्वतःशीच बोलला, “पण ही बातमी चॅनेलपर्यंत पोहोचली कशी?” बातमीत दारा बेकरीवाल्याला मारत असताना दाखवले जात होते.
“यावेळेसच क्रांती आणि वेदांती तिथे होत्या. नक्कीच हे शुटींग वेदांतीने केले असणार. हे तिनेच चॅनेलपर्यंत पोहोचवले असणार. त्या दोघी नक्कीच सुखरूप आहेत. काळजी करू नका. आपण त्यांना फोन लावत राहूया.” अजिंक्य असे म्हणेपर्यंत त्याचा फोन वाजला.

.....

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users