महाराष्ट्र देश माझा

Submitted by Dr Raju Kasambe on 27 July, 2019 - 21:51

महाराष्ट्र देश माझा

(ह्या कवितेत महाराष्ट्रातील किती गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख आलेला आहे ते कृपया मोजावे).

सातपुडा सह्याद्रि अन दख्खन
विदर्भ मराठवाडा खानदेश अन कोंकण
कृष्णा गोदावरी तापी भीमा अन कावेरी
काटक राकट पवित्र बनवी भूमी भारी
महाराष्ट्र देश माझा, लई भारी, लई भारी १

ऊस कापूस हापूस अन पायरी
कांदा नारळ केळी द्राक्ष अन संत्री
गहू धान ज्वारी नाचणी अन बाजरी
धनधान्य फळांची इथे रेलचेल भारी
महाराष्ट्र देश माझा, लई भारी, लई भारी २

अमृततुल्य कांदेपोहे शिरा उपमा अन मिसळ पाव
वडापाव आलुबोंडा शेवभाजी अन झुणका भाकरी
तांबडा पांढरा वर्‍हाडी सावजी अन कोल्हापुरी
ठसकेबाज जेवणाची इथे चव भारी
महाराष्ट्र देश माझा, लई भारी, लई भारी ३

श्रीखंड खरवस कंदीपेढे शिकरन अन बासुंदी
शंकरपाळे अनारसे शेवई अन चिक्की
लाडू करंज्या मोदक अन पुरणपोळी
गोडधोड पक्वान्नाची इथे चंगळ भारी
महाराष्ट्र देश माझा, लई भारी, लई भारी ४

पोवाडा भारुड अन भूपाळी
ओवी अभंग अन भैरवी
भावगीत भजन अन आरती
मराठी गाण्याची तर्‍हा लई भारी
महाराष्ट्र देश माझा, लई भारी, लई भारी ५

ताडोबा टिपेश्वर नागझीरा अन चांदोली
नान्नज नंदुर लोणार अन जायकवाडी
कर्नाळा पेंच काटेपूर्णा अन राधानगरी
वनराईने नटली मराठी भूमी भारी
महाराष्ट्र देश माझा, लई भारी, लई भारी ६

शेकरू वाघ बिबळे अन रानगवे वनी
माळढोक काळवीट अन चौशिंगा माळरानी
हरियाल रानपिंगळ्याची इथे उंच भरारी
दुनिया दौडे बघण्या वन्यप्राणी भारी
महाराष्ट्र देश माझा, लई भारी, लई भारी ७

डॉ. राजू कसंबे
डोंबिवली (पू), जि. ठाणे, महाराष्ट्र
कर्णपिशाच्च: 9004924731.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इकडे निसर्ग संपदेने नटलेल्या महाराष्ट्राचं वर्णन पाहून आपण चिऊताई आणि मोगली यांना महाराष्ट्र वसती करण्यास अतिशय उत्तम आहे हा निरोप कळवावा ही विनंती.