आला आला पाऊस आला

Submitted by Dr Raju Kasambe on 27 July, 2019 - 09:08

आला आला पाऊस आला

“पेर्ते व्हा...पेर्ते व्हा” अशी मंजुळ आवाजातील ‘पावश्या’च्या (कॉमन हॉक कुक्कु) आवाजातील हाळी ऐकू आली की समजून जायचे मृग नक्षत्र सुरु होतेय. हा पक्षी सहजी दृष्टीस पडत नसला तरी त्याचा आवाज प्रत्येक शेतकऱ्याचा परिचयाचा असतो. काही जण तर त्याच्या आवाजाचे वर्णन ‘पाऊस आला... पाऊस आला’ असे करतात. तसेच ‘चातक’ (पाईड कुक्कु) पक्ष्याचे आगमन. त्याच्या मागाहून येणाऱ्या पावसाची वर्दी घेऊन येणारे. केवळ पावसाचे पाणि पिऊन हा पक्षी जगतो असा समज लोकांमध्ये दिसून येतो. शेतीवाडीची मशागत करून जमीन पेरणीसाठी तयार करून झालेली असते. लांब मिशा असलेला मृगाचा किडा अंगणात येऊन पडतो. कास्तकारीन माऊली हळदकुंकू लाऊन त्या किड्यांची पूजा करते. देवा मृगाचा पाऊस चांगला बरसू दे रं बाबा!

संपूर्ण हिवाळाभर शांत असणाऱ्या कोकिळा, खरे तर कोकीळराव, अचानक भल्या पहाटेपासून कुहूकुहू चे कुंजन करायला लागतात. त्या कुहूकुहूची वाढत जाणारी पट्टी आणि शेवट तर अगदी आता हा केकाटतोय अशी. कावळे कोकिळेचा पाठलाग करायला लागतात. कावळे प्रत्येक वाळकी काटकी, दोरी किंवा लोखंडी तारा खेचायला लागले की त्यांना घरटे बांधायची घाई झाली आहे असे लक्षात येते.

उन्हाळ्याचे शेवटचे दिवस मोठ्या वन्यजीवांसाठी कठीण असतात. हळूहळू पाण्याचे स्त्रोत आटत जातात. घनदाट जंगलातील संपूर्ण वन्यजीवन पाणवठ्यावर केंद्रित होतं! वाघ बिबटांना पाणवठ्यावर ठिय्या मांडून छान डुंबायला आवडतं. पण इतर वननिवासी जीवांना पाणि पिऊन तहान भागवायची असते. म्हणून ही श्वापदं राजेमंडळी थोडे दूर जाऊन छान सावलीत आराम फर्मावतात.

भर उन्हाळ्यात पळस, पांगारा, काटेसावर (शाल्मली), बहावा आदी वृक्ष फुलांनी बहरलेले असतात. मधुरस प्राशन करणाऱ्या पक्ष्यांची अशा झाडांवर झुंबड उडालेली असते. ह्याच संधीचा फायदा घेऊन शिंजीर (सनबर्ड) तसेच फुलटोचा पक्ष्यांची वीण आटोपली जाते. जमिनीवर घरटे करणारे टिटवी सारखे पक्षी पावसाच्या आगमनापूर्वी पिल्लं घरटे सोडून चालायला लागतील अशा प्रकारे विणीचे नियोजन करतात. नदीकाठी कोरड्या पडलेल्या पात्रात घरटे करणारे नदी सुरय (रिव्हर टर्न), शेकाटे (ब्लॅक-विंग्ड स्टील्ट), आर्ली (प्रॅटीनकोल) तसेच रंगीत पाणलावा (पेंटेड स्नाईप) पक्षी सुद्धा पावसाच्या आगमनापूर्वीच विण आटोपून घेतात. थोडा जरी उशीर झाला तर नदीच्या फुगलेल्या पात्रात त्यांची अंडी-पिल्लं वाहून जातात.

वन्यपशुपक्ष्यांना निसर्गचक्र चांगलंच अवगत असतं. त्यांना संपूर्ण दिनदर्शिका आत्मसात असते. जून महिन्यात पाऊस पडणार आणि सगळीकडे हिरवळ पसरणार. सुगीचे दिवस येणार. हिरवळ पसरताच त्यावर अंडीपिल्ली जन्माला घालणारे कीटक फुलपाखरे आनंदाने बागडू लागतात. अचानक सर्वत्र रंगीबेरंगी फुलपाखरांची रेलचेल जाणवू लागते. कितीतरी प्रजातीचे कीटक हजारोच्या संख्येत जन्माला येतात. कुणी फुलातील मधुरस शोषण्यात गुंग होतो तर कुणी पाने कुरतडून जमवीत असतो. बळीराजा शेतात पेरणी करून संपूर्ण शेत कसं हिरवंगार करून टाकतो.

पक्ष्यांना ह्या सुगीच्या दिवसांची दिड-दोन महिने आधीच चाहुल लागलेली असते. कोतवाल पक्षी (ड्रोंगो) एप्रिल मध्येच भर उन्हात झाडावर घरटे बांधतो. तर वेडा राघू (ग्रीन बी-ईटर) आणि धीवर (किंगफिशर) एप्रिलमध्येच नदीकाठी भूसभुशीत कडा शोधून भुयारी बीळ खोदायला सुरुवात करतात. उन्हाचा तडाखा सहन करीत बिळाच्या शेवटी छोटी अंडकक्ष अर्थात ‘बेडरूम’ खोदतात. मादी त्या अंधाऱ्या बिळात अंडी घालते. कोतवाल, राघू आणि धीवर हे पक्षी स्वतःच्या विणीचे ऋतूमानाप्रमाणे नियोजन करीत असतात. अंड्यातून जन्माला आलेली पिल्लं उडण्यायोग्य झाली की जून महिन्यात पावसाच्या आगमणानंतर त्यांनी पहिले उड्डाण भरावे अशा दृष्टीने सर्वकाही नियोजित केले जाते. पिल्लांना खाद्य कमी पडू नये असा सामंजस्यपूर्ण विचार पक्षी करतात हे निश्चितच आश्चर्यजनक आहे.

शिक्रा, ससाणे, गरूड असे शिकारी व मांसाहारी पक्षी उंच झाडावर अथवा पहाडाच्या कडेकपारीत भर उन्हाळ्यात घरटे बांधून अंडी घालतात. पिल्लांचा जन्म पावसाळ्याच्या सुरुवातीला व्हावा अशीच त्यांची योजना असते. पावसाळ्याच्या आगमनासोबत जन्माला येणारी इतर पक्ष्यांची पिल्लं, मुबलक संख्येतील बेडूक, सरडे, पावसामुळे बाहेर पडणारे सर्प असे विविधरुपी खाद्य सहज उपलब्ध होते.

नवरंग (इंडियन पीट्टा), स्वर्गीय नर्तक (पॅराडाइज फ्लायकॅचर), माशिमार (फ्लायकॅचर) आणि नाचण (फॅनटेल) सारखे कीटकभक्षी पक्षी मात्र भर पावसात घरटी बांधतात. पावसाच्या आगमणानंतर कीटकांच्या संख्येत जी वाढ होते त्याचा ते फायदा उचलतात. ज्या ठिकाणी जास्तीत जास्त कीटक असतील अशाच ठिकाणी ते आपले घरटे बांधतात. अतिशय सुंदर आणि क्लिष्ट असे लांबोळके टांगलेले घरटे बांधणारे सुगरण पक्षी सुध्दा पावसाच्या आगमनाची चाहूल लागली की घरटी बांधायला सुरुवात करतात. पण सुगरणीच्या वसाहतीत खरा गोंधळ सुरु होतो तो पाऊस आल्यावरच.

पावसाच्या पहिल्या सरी बरसण्याची जणू संपूर्ण जीवसृष्टीच आतुरतेने वाट बघत असते. पहिल्या पावसाची चाहूल मुंग्यांना सर्वप्रथम लागते. पावसाच्या सरी बरसण्याच्या काही तास आधी कामकरी मुंग्या त्यांचा वारुळातील अंडी सुरक्षित उंच ठिकाणी हलवायला सुरुवात करतात. अशी अंडी घेऊन निघालेली मुंग्यांची रांग बघून कुठलाही खेडूत, शेतकरी पावसाचे भाकीत करतो. मुंग्यांच्या ह्या हवामानाच्या अंदाजावर त्यांचा संपूर्ण विश्वास असतो.

पहिला पाऊस बरसतो तेव्हा वन्यप्राणी रानावनात कुठल्याही आडोशाला धावून जात नाही. प्रत्येक प्राणी चींब भिजून घेतो. अंगाची होणारी लाही शांत होते. तहानलेली जमीनही शक्य तेवढे पाणि शोषून घेते. तिची तहान भागली की मग जमिनीवर पाण्याचा लोट वाहायला लागतो. छोटा ओहोळ नैसर्गिक उतार पकडून खालच्या दुसऱ्या ओहोळाला जाऊन मिळतो. छोटा प्रवाह तयार होतो. पावसाची तीव्रता वाढली की असे ओहोळ ओढ्याला, ओढे नदीला जाऊन मिळतात. बघता बघता नदी दुथडी भरून वाहायला लागते. अचानक पूर येतो.

जमिनीच्या सर्वांगावर उन्हाच्या तडाख्याने पडलेल्या भेगा पहिल्या पावसाने भरून जातात. जमिनीच्या आत आणि वारुळात अतिशय सुसंघटीत अशा वारुळात राहणाऱ्या वाळवीला पंख फुटतात. जमीनीतून बाहेर पडून अशा वाळवी उंच उड्डाण भरतात. हे त्यांचे शेवटचे उड्डाण असते. मिलन झाले की ह्या सर्व वाळवी मरून पडलेल्या दिसतात. पण वारुळातून बाहेर पडणाऱ्या हजारो वाळवी म्हणजे कीटकभक्षी पक्ष्यांसाठी तसेच सरड्यानसाठी मोठी मेजवानी असते. अशा ठिकाणी राघू, दयाळ, कोतवाल, शिक्रा, चिरक, घार, असे अनेक प्रकारचे पक्षी वाळवीचा फन्ना उडवायला जमतात.

गेल्या काही वर्षात निसर्गचक्र बदलले की काय अशी शंका यायला लागली आहे. वर्षागणिक पाऊस बेभरवशाचा होत चाललाय. पडला तर धो-धो नाही तर कोरडा ठणठणीत! कमी दिवसात जास्त पाऊस पडतोय. त्यामुळे शेती तसेच जंगलातील जमिनीची धूप वाढली आहे. हिमालयातील अनादी काळापासून बर्फाच्छादित असलेली शिखरं वितळायला लागली आहेत. निसर्गाचे प्रकोप पुनःपुन्हा व्हायला लागले आहेत. ढगफुटी, सुनामी, भूस्खलन, भूकंप, गारपीट, दुष्काळ आदी कोपांची वारंवारिता निश्चितच वाढली आहे. पशु-पक्षी, निसर्ग मानवाला इशारे देतो आहे. ते आपण समजून घेण्याची वेळ आलेली आहे.

डॉ. राजू कसंबे,
पक्षीशास्त्रज्ञ
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लेख. सर पावश्या म्हणजेच भारद्वाज काय? कोतवाल आणि फ्लायकॅचर एकच आहेत का. हवेतल्या हवेत किडे मटकावणाऱ्या पक्षाला आमच्याकडे कोळसा म्हणतात.

वाह, मस्त लेख...

शेवटचा परिच्छेद विचार करायला भाग पाडणारा...

छान लेख. फोटो टाकून नटवता आला असता.
> पिल्लांना खाद्य कमी पडू नये असा सामंजस्यपूर्ण विचार पक्षी करतात हे निश्चितच आश्चर्यजनक आहे. > आश्चर्य काय त्यात! नैसर्गिक आहे ते...

छान लिहिले आहे!
प.च.मा., पावश्या आणि भारद्वाज वेगळे आहेत.
कोतवाल म्हणजेच कोळसा. काळा असतो आणि शेपटी दुभंगलेली असते.