द डेथ ट्रॅप भाग १०

Submitted by स्वाती पोतनीस on 27 July, 2019 - 08:09

स्वाती पोतनीस
द डेथ ट्रॅप
भाग १०

सकाळी साडेआठची वेळ. वेदांतीच्या घरात तिघेजण जेवणाच्या टेबलवर न्याहारी करत बसले होते. क्रांतीने विचारले, “वेदांती, कसली धावपळ चालली आहे तुझी? ये न लवकर. आम्हाला भूक लागली आहे. तुझी वाट बघतो आहोत.”
नरेंद्र म्हणाला. “मी नाही वाट बघू शकत. मी सुरुवात करणार.”
अजिंक्य म्हणाला, “मी सुरुवात केली सुद्धा.”
पर्स घेऊन वेदांती टेबलपाशी आली. “आले आले. मलाही भूक लागली आहे.”
“हे काय, तू कुठे जायच्या तयारीत आहेस?”
“ऑफिसला.”
“वेडी आहेस का?” नरेंद्र म्हणाला.
“काय हे नरेंद्र. ती तुझी कॉलेज फ्रेंड नाही आहे.”
“सॉरी सॉरी. मला म्हणायचे होते. आता तुझे ऑफिस विसर. तू तिथे जाणे म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ करण्यासारखे होईल.”
“पण तिथूनच मला माहिती मिळू शकते आहे.”
“तू आधीच खूप माहिती मिळवलेली आहेस. तीही कमी वेळात. आधी आपण त्या माहिती वरूनच कामाला सुरुवात करू या. शिवाय तू तिथे जाणे आता धोक्याचे आहे. त्यांनी तुला ओळखले आहे. तू चूक करायचा अवकाश ते काय करतील सांगता येत नाही.”
“पण खरेच नवतेज यामागे आहे किंवा काय हे कुठे आपल्याला कळले आहे.”
“आता आपण ती रिस्क घेऊ शकत नाही. वेदांती, तू आता आमची जबाबदारी आहेस. मला तुझ्या नवऱ्याला उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळे यापुढे तू एकटीने कुठलेच काम करायचे नाहीस. नाहीतर तो तुला परत बोलावून घेईल. तूच नाही तर आपण कुणीच एकट्याने काम करायचे नाही. दोघा दोघांनी काम करू या.”
“ओके. यु आर द बॉस.”
“मला वाटते वेदांतीला जे फोन येत होते त्यापासून आम्ही सुरुवात करतो.” क्रांती म्हणाली.
“मलाही कळेल तुमची कामाची पद्धत.”
“आम्ही त्या बिल्डींग पासून सुरुवात करतो जिथे बद्री गायब झाला होता. तो कुणाला नक्की भेटला होता ते शोधले पाहिजे. आम्हाला पत्ता दे.” अजिंक्य म्हणाला.
“बरे अजून एक गोष्ट माझ्याकडून करायची राहिली होती.” वेदांती म्हणाली.
“कोणती गोष्ट?”
“मला डॉक्टर दिवेकरांनी एक नंबर दिला होता, प्रिस्क्रिप्शनच्या नावाखाली. तिथे फोन करायचा आहे.”
“तो नंबर कोणाचा असेल हे तुझ्या लक्षात नाही आले?” अजिंक्यने विचारले.
“नाही. कसे काय लक्षात येईल? तुला कळले?”
“इन्स्पेक्टर कोठारे. फोन करून बघ.”
वेदांतीने डॉक्टर दिवेकरांनी दिलेल्या नंबरवर फोन लावला. पलीकडून आवाज आला, “बोला वेदांती मॅडम. सकाळी सकाळी फोन केलात? आम्हाला चौकीत तरी पोचू द्या की.”
“सॉरी. अजुन तुमची ड्युटी सुरु झाली नसणार हे माझ्या लक्षातच आले नाही.”
“अहो बोला. आम्ही चोवीस तास ड्युटीला बांधील आहोत.”
“माझे काम नाही आहे तसे. पण हा नंबर डॉक्टर दिवेकरांनी मला दिला होता.”
“हो. जेव्हा डॉक्टरांनी ती पावडर तपासायला दिली, ताबडतोब माझ्याकडे बातमी आली होती.”
“हो का?”
“नवीन काही माहिती कळली तर आम्हाला कळवा.” होकार देऊन वेदांतीने फोन ठेऊन दिला. ती आश्चर्यचकीत झाली होती.
“तुला कसे कळले अजिंक्य?”
यावर क्रांतीने उत्तर दिले, “हीच तर त्याची स्ट्रेन्थ आहे. तो विचार फास्ट करतो. कृती फास्ट करतो. म्हणूनच लहान वयात तो एवढा यशस्वी झाला आहे.”
कोणी स्तुती केली की अजिंक्य कानकोंडा होत असे. आताही त्याने लगेच विषय बदलला.
“तो पत्ता देते आहेस न तू?”
पत्ता घेऊन अजिंक्य आणि नरेंद्र बाहेर पडले.
“वेदांती तुला ज्या वेगवेगळ्या नंबर्सवरून फोन आले होते ते कुणाचे आहेत ते आपण शोधून काढूया.”
वेदांतीने नंबर्स दिले. क्रांतीने पुण्याच्या इन्स्पेक्टर गुंजाळांना फोन लावला, “बोला मॅडम, काय काम काढले?”
“मी तुम्हाला काही नंबर्स देते. ते कुणाचे आहेत आणि सध्या कुठे आहेत ती माहिती हवी आहे.”
क्रांतीने त्यांना सात नंबर्स दिले.
“अर्ध्या तासात सांगतो.”
“क्रांती आपण त्या नंबर्सवर फोन करून बघूया. निदान त्यातले कुठले नंबर्स चालु आहेत ते तरी कळेल.”
“चांगली कल्पना आहे. पण फोन तुझा वापरू नकोस. मी तुला एक फोन देते त्यावरून नंबर लाव.”
क्रांतीने एक साधा नोकियाचा फोन काढून दिला. वेदांतीने एका मागोमाग एक नंबर लावून बघितले. ओळीने तीनही नंबर बंद असल्याचा निरोप येत होता. वेदांतीने चौथा नंबर लावला आणि रिंग वाजली. पलीकडून फोन उचलला गेला. एक खरखरीत आवाज ऐकू आला. “हॅलो.” तो आवाज ऐकूनच दोघींच्या अंगावर काटा उभा राहिला. वेदांतीने घाईघाईने फोन बंद केला.
“पुढचा नंबर लाव.”
वेदांतीने नंबर लावला. यावेळेसही रिंग वाजली. पलीकडून बसका आवाज ऐकू आला, “बोलो जी.” वेदांतीने पटकन फोन बंद केला. पुढचे दोन नंबर तिने लावले. परंतु ते फोन बंद होते. तेवढ्यात एका फोनची रिंग वाजली. तो फोन वेदांतीच्या मोबाईलवर आला होता. तिने फोन उचलला. पलीकडून नवतेज बोलत होता. “वेदांती, तू अजुन ऑफिसला कशी आली नाहीस?”
“सॉरी सर, मी पुण्याला घरी आले होते. पण मुंबईला यायला मला अजुन बस मिळाली नाही आहे. मला बहुतेक उशीर होईल.”
“मग तू तसे कळवायला पाहीजे होते.”
“हो सर, मी नऊ नंतर फोन करणारच होते.”
“ठीक आहे. पण तुला यायला दोन वाजून गेले तर आज तू ऑफिसला येऊ नकोस. मी कामासाठी बाहेर जाणार आहे.”
पुनः एकदा फोनची रिंग वाजली. यावेळेस फोन इन्स्पेक्टर गुंजाळांचा होता. क्रांतीने फोन स्पीकरवर टाकला, “बोला सर, माहिती मिळाली का?”
“तुम्ही सांगितल्यावर आम्हाला माहिती मिळवायलाच पाहीजे. तुम्ही मला सात नंबर दिले होते. त्यातले दोन चालु आहेत. एक नंबर ०१०ने शेवट होतो. नाव दारा. सहा फूट उंच, तगडा, चेहऱ्यावर खुनशी भाव, व्यवसाय गाड्या दुरुस्तीचा पण तो ड्रग पेडलर असल्याचा संशय आहे. दोन वेळा तुरुंगात जायची वेळ आली होती, पण केसमधून सुटला. दुसरा नंबरही एका ड्रग पेडलरचाच आहे. परंतु जेव्हा त्याला पकडले गेले तो अठरापेक्षा कमी वयाचा मुलगा होता. त्याच्यावर गुन्हा शाबित होऊ शकला नाही. त्यामुळे त्याला सोडले गेले. पण अशी शंका आहे की तो मुलगा फक्त रस्त्याने चालला होता. तिथल्या पार्किंग लॉटच्या ऍटेंडंटच्या म्हणण्यानुसार जो माणूस ड्रग्ज विकणाऱ्याशी बोलत होता त्याला पकडायला हवे होते. परंतु पोलिसांची गाडी तिथे येत असतानाच एक बाईक तिथे आली. आणि तो माणूस बाईकवर बसून निघून गेला.”
“पण मग फोन कुणाच्या नावावर होता?”
“त्या मुलाच्या. त्याचे नाव बद्री. तो त्या कॉलेजचा विद्यार्थी होता. चौकशीनंतर समजले तो बारावीचा विद्यार्थी आहे. त्याच्याजवळ कुठलेही ड्रग्ज सापडले नाहीत.”
“मग तो फोन अजूनही चालु आहे का?”
“हो अर्थात. आत्ता तो फोन रेल्वे स्टेशनच्या आसपास आहे.”
“तो फोन तुम्ही टॅप करू शकता का?”
“नाही. एकतर आम्ही त्या प्रकरणाशी जोडले गेलो असेल तरच परवानगी मिळते. आणि त्यासाठी सबळ कारण असावे लागते. ही माहिती सुद्धा ऑफीशियली मिळवलेली नाही. म्हणून इतक्या लवकर मिळाली.”
“ऑफीशियली नाही म्हणजे? मग कशी मिळाली?”
“मुंबई पोलिसात आमचेही मित्र आहेत.”
“ओ के. थॅंक यू सर. एक एक मिनिट सर. मला तुम्ही त्या दोघांचे फोटो पाठवू शकता का?”
“हो पाठवतो.”
“दाराचे लोकेशन पाठवा.”
जे ऐकले त्यानंतर दोन मिनिटे दोघी स्तब्ध बसून राहील्या. काय प्रतिक्रीया द्यावी हे दोघीनाही समजेना. हे प्रकरण किती गुंतागुंतीचे आहे याची कल्पना त्यांना आलीच होती. तेवढ्यात क्रांतीचा फोन वाजला. गुंजाळांनी दाराचे लोकेशन आणि दोघांचे फोटो पाठविले होते. दाराचा चेहरा खरोखरीच खुनशी दिसत होता. तर बद्रीचा चेहरा फोटोतही मिस्कील हसरा दिसत होता. तो कोवळा लहान मुलगा आहे हे कळत होते. त्याचा चेहरा पाहून वेदांतीच्या मनात पुनः अपराधाची भावना उफाळून आली.
“क्रांती, याच्या मृत्यूला मी जबाबदार आहे.”
“वेदांती मनातली ही अपराधाची भावना काढून टाक. तो एक गुन्हेगार होता. त्याच्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळाली.”
“पण एवढ्याशा गुन्ह्याची एवढी मोठी शिक्षा?”
“आपल्याला काय माहित वेदांती. तो कॉलेजमध्ये शिकत होता. कदाचित तो मुलांना ड्रग्जची सवय लावत असेल. आणि हा खूप मोठा अपराध आहे. याच्यामुळे कितीतरी मुले ड्रग्जच्या आहारी गेली असतील. ज्यांना हे असले शौक परवडत नाहीत ती मुले घरातून बाहेरून पैसे चोरत असतील. त्यांच्या पालकांचे काय. ते याबाबतीत अनभिद्न्य असतील. आपला मुलगा ड्रग्जच्या आहारी गेला आहे हे कळेपर्यंत कधी कधी खूप उशीर होतो. काही वेळेस ती मुले उपचारांच्याही पलीकडे जातात.”
“तुझे हे बोलणे ऐकल्यावर माझी अपराधी भावना थोडी बोथट झाली आहे खरी. पण हे त्याचे मरायचे वय नव्हते.”
“आपल्या क्षेत्रात इतके भावनाप्रधान असून चालत नाही.”
वेदांतीने काही उत्तर दिले नाही.
“वेदांती बद्रीच्या नावावर असलेला फोन अजूनही चालु आहे. बद्री तर या जगात नाही. तो फोन कोणीतरी वापरत आहे.”
“पण कोण. त्याचा चेहरा कुठला?”
“तो चेहराच तर आपल्याला शोधायचा आहे.” क्रांती म्हणाली.
“आपण या बाबतीत इन्स्पेक्टर कोठारेंची मदत घेऊ शकतो का?”
“नाही. कारण एकतर त्यांना काही सांगणे म्हणजे आपले पत्ते उघड करणे. तसेही ते आत्ता आपल्यावर लक्ष ठेऊन असणारच. पण ते आपल्याला कोणताही अडथळा तरी आणत नाही आहेत. एकदा आपण त्यांच्याकडे गेलो की ते सांगतील त्याप्रमाणे आपल्याला तपास करावा लागेल. नाही. नको. आपण त्यांच्याकडे जायला नको.”
“क्रांती असे असू शकते का की त्यांनी हा फोन मुद्दाम चालु ठेवला आहे. आपली दिशाभूल करायला. म्हणजे समजा आपण किंवा आपण नाही, अर्थात पोलीस त्यांना विचारयला गेले तर तो फोन बद्रीच्या घरातल्या कुणाकडेतरी सापडेल. म्हणजे आपलेच हसे होईल.”
“हो वेदांती. तू म्हणते आहेस ते अगदी बरोबर आहे. तुला आता त्या गुन्हेगारांची मानसिकता ओळखता यायला लागली आहे.”
क्रांतीच्या स्तुतीने वेदांती मनोमन खुश झाली, पण तिने तसे दाखवले नाही.
“क्रांती इन्स्पेक्टर गुंजाळांनी जे लोकेशन पाठवले आहे ते मला माहीत आहे. दाराचे लोकेशन रेल्वे स्टेशनच्या जवळच आहे. आणि हे कॉलेजही त्याच भागात आहे. दोनही ठिकाणे एकमेकांच्या जवळच असणार. आपण लगेच जाऊया का?”
.....
वेदांती आणि क्रांती रेल्वे स्टेशनवर उतरल्या आणि रिक्षेने कॉलेजजवळ पोहोचल्या. रिक्षेने जातानाही त्यांचे लक्ष आजुबाजूला होते. पुढे त्या चालत निघाल्या. कॉलेजजवळच एक गॅरेज होते. तिथे एक मुलगा गाडी दुरुस्तीचे काम करत होता.
“क्रांती मी तुला ज्या बेकरी बद्दल सांगितले होते ती रस्त्याच्या पलीकडे आहे. येताना आपण तिकडून येऊ या. नक्कीच ही सगळी ठिकाणे, ही माणसे एकमेकांशी जोडलेली आहेत.” पाच मिनिटे त्या चालत राहिल्या. पण तो गुंड त्या भागात कुठेच दिसला नाही. अजून कोणते गॅरेजही त्या भागात नव्हते. यावरून त्यांनी पाहीले तेच गॅरेज दाराचे असणार असे अनुमान त्यांनी काढले. दोघींनी रस्ता क्रॉस केला आणि त्या उलट्या फिरून आल्या. त्या बेकरीच्या जवळ पोहोचल्या. तेथे रस्त्यावर बरीच गर्दी जमली होती. दोन माणसांच्या भांडणाचा आवाज ऐकू येत होता. त्या पुढे झाल्या. बेकरीतला काउंटरवरचा माणूस आणि दारा यांच्यात बाचाबाची चालु होती.
दाराने हातातले पैशांचे बंडल त्या माणसाच्या अंगावर फेकले. “हे पैसे पुरते नाही आहेत.” तो ओरडला.
“मी ठरलेले पैसे दिले आहेत.”
“मी तुला सांगितलेत तेवढे पैसे दे.” असे म्हणून दाराने त्याची गचांडी पकडली आणि त्याला काउंटरवरुन बाहेर खेचले. दारा त्याला लाथाबुक्क्यांनी मारू लागला. बघ्यांपैकी कुणीही मधे पडले नाही. एक माणूस मागुन ओरडला, “अरे पोलिसांना बोलवा.” तसे दाराने त्या माणसाला सोडले आणि तो जोरात पळत सुटला. वेदांती आणि क्रांतीही त्याचा पाठलाग करू लागल्या. परंतु दारा रस्त्यामधल्या डिव्हायडरवर चढला आणि त्याने पलीकडे उडी मारली. त्यानंतर मात्र तो कुठे गेला ते कळले नाही. दोन मिनिटांत दोघी दाराच्या गॅरेजपाशी पोहोचल्या. दारा तिथे नव्हता.
क्रांतीने अजिंक्यला फोन लावण्यासाठी मोबाईल बाहेर काढला. पण फोनला रेंज नव्हती. वेदांतीच्याही मोबाईलला रेंज नव्हती.
क्रांती म्हणाली, “वेदांती, आपण जवळपास कुठेतरी जेवायला जाऊ. तिथून आपल्याला या दोघांशी बोलता येते का ते पाहूया.” दोघी जवळच्या रेस्टॉरंटमध्ये गेल्या. इथे फोनला रेंज येत होती. क्रांतीने अजिंक्यला फोन लावायचा प्रयत्न केला. परंतु “संपर्कक्षेत्राच्या बाहेर” असल्याची टेप ऐकू येऊ लागली. दोघींचे जेवण झाले. अजिंक्यचा फोन अजूनही संपर्कक्षेत्राच्या बाहेर होता. तिने नरेंद्रला फोन लावला. तरीही तीच टेप ऐकू येत होती.
क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान!

पण ते वाक्यात येणारे
“नाही आहे, नाही आहेत” खटकतय वाचताना.
सरळ “नाही किंवा नाहीत” अस नाही का लिहीता येणार?

आगागा...
काय सटासट भाग टाकलेत, व्वा.. उत्सुकता पुढील भागाची...
शुभेच्छा!!

सर्व भाग छान आहेत. वेगवान कथानक पण पल्लवी ला काही संधी न देता तिचा खून झाला माञ वेंदाती ला धमकी, पाठलाग केला गेला. तिला संधी दिली गेली.
पल्लवी पेक्षा वेंदाती चा खून करणे जास्त सोपे झाले असते.

चांगली चाललीये .. सुसाट ! वाचतेय !

“मला डॉक्टर दिवेकरांनी एक नंबर दिला होता, प्रिस्क्रिप्शनच्या नावाखाली. तिथे फोन करायचा आहे.”
“तो नंबर कोणाचा असेल हे तुझ्या लक्षात नाही आले?” अजिंक्यने विचारले.
“नाही. कसे काय लक्षात येईल? तुला कळले?”
“इन्स्पेक्टर कोठारे. फोन करून बघ.”
वेदांतीने डॉक्टर दिवेकरांनी दिलेल्या नंबरवर फोन लावला>> डॉक्टर दिवेकरांनी दिलेला नंबर वेदांती चा आपोआप पाठ झाला कि काय !? कारण
भाग ७ मध्ये प्रिस्क्रिप्शन ठेवण्यासाठी तिने पर्सची चेन उघडली आणि दुसऱ्या कप्प्यात तिला एक कागद दिसला. त्यावर लिहिले होते “निघून जा. नाहीतर प्राण गमावशील.” वगैरे आहे .. मग नंतर तिची पर्स चोरली ना ? आणि वेदांती ने नंबर मोबाईल मधे सेव केला वगैरे उल्लेख कुठे आला नाही . का मी काही मिस करत आहे ?

No you r not missing anything. But I thought it is understood when you r working on such an important. Case. Only I didn't t mention it. Sorry, I was in such a hurry while writing the story, I missed out certain things it seems. Thanks for bringing it to my attention. While writing story I should HV checked it again Next time I will take care.

No you r not missing anything. But I thought it is understood when you r working on such an important. Case. Only I didn't t mention it. Sorry, I was in such a hurry while writing the story, I missed out certain things it seems. Thanks for bringing it to my attention. While writing story I should HV checked it again Next time I will take care.