द डेथ ट्रॅप भाग ८

Submitted by स्वाती पोतनीस on 27 July, 2019 - 07:15

स्वाती पोतनीस
द डेथ ट्रॅप
भाग ८

वेदांती तिच्या घरी नाही याचा अर्थ ती मुंबई सोडून गेली किंवा दुसऱ्या ठिकाणी ती लपून बसली असणार हा तर्क ते गुन्हेगार नक्की काढणार हे वेदांतीला माहित होते. आत्तापर्यंत तीन दिवसात तिने ज्या प्रकारे गुन्हेगारांची माहिती काढली होती त्यावरून ती पळून जाणाऱ्यातली नाही हेही ते ओळखणार. त्यामुळे त्या गुंडाला चुकवून घरी न जाता दुसऱ्या ठिकाणी जाणे गरजेचे होते. कारण ते तिला घरी केव्हाही गाठू शकत होते. त्या गुंडांना शंकाही येणार नाही असे एकच ठिकाण तिच्या डोळ्यासमोर होते. परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी त्या इसमाच्या लक्षात न येता मॉलमधून बाहेर कसे पडायचे याचा ती विचार करत असताना तिने एका आजी आजोबांना सामानाची ट्रॉली ढकलत नेताना पाहीले. त्यांची ट्रॉली सामनाने पूर्ण भरलेली होती. लिफ्टच्या दारातून मोठ्या मुश्किलीने आत ट्रॉली ढकलायचा ते आजोबा प्रयत्न करत होते. ती पटकन त्यांच्याजवळ गेली. “आजोबा मी मदत करू का?” तिच्या हातात ट्रॉलीचा दांडा देऊन आजोबा बाजुला सरकले.
तिने ट्रॉली लिफ्टमध्ये सरकवली.
“धन्यवाद.” आजी आजोबा दोघांनी तिचे आभार मानले.
तिने विचारले, “तुम्हाला कुठल्या मजल्यावर जायचे आहे?”
“बेसमेंटला” तिने B2 बटण दाबले.
“गाडी आहे का तुमच्याकडे?”
“हो आहे.”
“मी तुम्हाला ट्रॉली गाडीपर्यंत नेऊन देते.”
“उगीच कशाला तुम्हाला त्रास.”
“त्यात त्रास कसला?”
आजोबांना बरे वाटले. तसेही मॉलमध्ये फिरून ते कंटाळलेलेच होते. त्यांना आलेले पाहून ड्रायव्हर पटकन उतरला. वेदांतीने त्याला सामान डिकीत ठेवायला मदत केली. साहजिकच आजोबांनी तिला विचारले, “तुला कुठे जायचे आहे बाळा?”
“गोरेगाव ईस्ट”
“तुला बरेच लांब जायचे आहे. आम्ही तर इथून सात आठ मिनिटांच्या अंतरावर राहतो. असे करूया मी ड्रायव्हरला तुला सोडायला सांगतो.”
“नको, नको मी कॅबने जाईन.” त्यांनी आग्रह केल्यावर ती म्हणाली, “मी तुमच्या घरापर्यंत तुमच्या गाडीने येते. मग कॅबने जाईन.”
.....
इन्व्हेस्टिगेशन सर्विसेस ही नावाजलेली खाजगी गुप्तहेर संस्था होती. प्रभात रोडवरच्या पै व्हिला मध्ये त्यांचे ऑफिस होते.
अजिंक्य उंचापुरा, सरळ नाकाचा, देखणा तरूण होता. तर क्रांती अतिशय साहसी तरुणी होती. इंजिनियरिंगला दोघे एकाच वर्गात शिकत होते. तेव्हापासूनच दोघांची मैत्री झाली होती. दोघे एकाच ट्रेकींग ग्रुपमध्ये होते. दोघे मार्शल आर्ट शिकलेले होते. क्रांती पंडीतचे वडील मुंबईत पोलीस कमिशनरच्या हुद्द्यावर होते. त्यांनी क्रांतीला लहानपणापासून मुलासारखेच वाढविले होते. नरेंद्र एका ट्रेकमध्ये त्यांना भेटला. तो कॉम्प्युटरमधला किडा होता. तिघांची पटकन मैत्री जमली.
गेल्या पाच वर्षांपासून अजिंक्य, क्रांती आणि नरेंद्र खाजगी गुप्तहेर म्हणून काम करीत होते. अनेक छोट्या मोठ्या गुन्ह्यांचा त्यांनी शोध लावला होता. त्यामुळे इन्व्हेस्टीगेशन सर्विसेस ही त्यांची संस्था लवकरच नावारूपाला आली होती. अतिशय गुप्तपणे शोध लावायचा असेल तर पोलीससुद्धा त्यांची मदत घेत असत. आज रविवार असल्यामुळे ऑफिस बंद होते. त्यामुळे अजिंक्य, क्रांती आणि नरेंद्रने एकत्र जेवायला जाण्याचा प्लॅन केला होता. डेक्कनवरच्या एका सुप्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये ते जेवण घेत होते. त्यांना येऊन अर्धा तासही झाला नव्हता, अजिंक्यचा फोन वाजला.
नरेंद्र म्हणाला, “आज कोणी रे तुझी आठवण काढली?”
“बघतो.” असे म्हणत अजिंक्यने फोन उचलला.
“बोल विवेक.”
....
“अरे बंद असेल फोन.”
.... फोनवरचे बोलणे ऐकता ऐकता अजिंक्यचा चेहरा गंभीर झाला. पलीकडचे बोलणे ऐकू येत नसले तरी प्रकरण गंभीर असल्याची कल्पना येत होती. क्रांती आणि नरेंद्र जेवण थांबवून प्रश्नार्थक मुद्रेने अजिंक्यकडे पाहू लागले.
“हो हो. मी येतोच ऑफिसला. ये तू लगेच.”
“माझ्या मित्राचा, विवेकचा फोन होता. त्याची पत्नी वेदांती पत्रकार आहे. तीन दिवसांपूर्वी मुंबईला गेली होती. काल सकाळपासून तिचा फोन लागत नाही आहे. मला ऑफिसला जायला पाहिजे.”
“ती त्याच्या संपर्कात नव्हती का?”
“शुक्रवारी रात्री दोघांचे बोलणे झाले होते. काल सकाळपासून तिचा फोन बंद येतो आहे.”
“तिच्या बरोबर कुणी नव्हते का?”
“तोच काहीतरी घोळ आहे. प्रत्यक्ष त्याच्याशी बोलल्यावर समजेल. तसे तो केवळ फोन लागत नाही म्हणून घाबरणाऱ्यातला नाही आहे.”
“ती काही कामासाठी मुंबईला गेली होती का?”
“नाही तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली होती. पण तो म्हणत होता. काहीतरी घोळ आहे. बघू या. तो भेटल्यावर सांगेलच.”
“आम्हीही येतो आहोत.” क्रांती म्हणाली.
तिघांनी पटकन जेवण आटोपले. ते ऑफिस उघडत असतानाच विवेक आला. अजिंक्यने सर्वांची ओळख करून दिली. कसेबसे हसून विवेकने त्यांना प्रतिसाद दिला.
अजिंक्य, नरेंद्र आणि क्रांती आपआपल्या जागेवर जाऊन बसले. विवेक अजिंक्य समोरच्या खुर्चीवर बसला. अजिंक्य म्हणाला, “विवेक मला नीट सर्व सांग.”
“वेदांती चार पाच दिवसांपूर्वी मुंबईला गेली. तिच्या सर्व मैत्रिणी तिकडे जमणार होत्या. त्यांना ट्रीपला जायचे होते.”
“मुंबईत पावसाळ्यात मैत्रिणी जमून ट्रीपला जाणार हे जरा ऑड नाही वाटत?” नरेंद्रने विचारले.
“मलाही वाटले. पण त्यांची एक मैत्रीण साताऱ्याची आहे. ती मुंबईत नोकरी करते. अजूनही दोघी पल्लवी आणि जान्हवी मुंबईलाच असतात. त्यामुळे आधी सर्व जणी मुंबईत पल्लवीकडे जमणार होत्या. दोन दिवस मुंबईत राहून साताऱ्याला जाणार होत्या.”
“ती तिच्या एखाद्या मिशनवर तर नव्हती? कारण यापूर्वी ती एकदोनदा अशीच गेली होती.” अजिंक्यने विचारले.
“मला ती शंका आली होती. कारण मागे त्या हॉस्पिटलच्या प्रकरणात ती गुप्तपणे काम करत असताना मला खरे कारण न सांगता गेली होती. परंतु त्यानंतर परत न सांगता कुठलेही प्रकरण हातात घेणार नाही असे तिने मला वचन दिले होते.”
“ठीक आहे. पुढे?”
“ती बुधवारी सकाळी निघाली होती. त्यावेळेसच वर्तमानपत्रात बातमी आली तिच्या मैत्रिणीच्या – पल्लवीच्या मृत्यूची.”
“काय?” क्रांतीने आश्चर्याने विचारले.
“होय. हे पहा मी त्या दिवशीचे वर्तमानपत्र आणले आहे.”
नरेंद्रने ती बातमी मोठ्यांदा वाचली. अजिंक्यला तर काय प्रतिक्रीया द्यावी हेच सुचले नाही.
“अशीच अवस्था त्या दिवशी आमची झाली होती. मी तर वेदांती बरोबर जायला तयारही होतो. परंतु ती लगेच सावरली. जरूर लागल्यास ती मला मुंबईला बोलावून घेणार होती.”
“ती कुणाकडे रहाणार होती?”
“सर्वजणी पल्लवीच्या घरी रहाणार होत्या. कारण ती मुंबईत एकटीच रहाते. तिने एक फ्लॅट भाड्याने घेतलेला आहे. परंतु तिचा मृत्यू झाला म्हटल्यावर वेदांती आधी आमच्या मुंबईच्या फ्लॅटवर जाणार होती.”
“नंतर ती कुठे राहिली हे तू विचारलेस का?”
“नाही. ते विचारायचे माझ्या लक्षात आले नाही.”
“तुमच्यात काय बोलणे झाले?”
“परवा सकाळी मी तिला परत यायला सांगितले पण ती म्हणाली, ‘पल्लवीच्या आई वडिलांना आत्ता आमची गरज आहे. मी राहिले तर त्यांना थोडा आधार मिळेल.’ त्यावेळेस मी तिला मधून मधून फोनही करायला सांगितला. शुक्रवारी रात्री आमचे बोलणे झाले. ती दोन तीन दिवसात परत येणार असे म्हटली होती.”
“तिला काही प्रॉब्लेम झाला आहे असे तुला का वाटते आहे. कदाचित तिचा फोन बंद झाला असेल.”
“फोन बंद झाला असता तरी तिने मला एक फोन केलाच असता.”
“तिच्या एखाद्या मैत्रिणीचा नंबर आहे का तुझ्याकडे?”
“हो. तिच्या जान्हवी नावाच्या मैत्रिणीचा नंबर माझ्याकडे आहे. मी तिला फोन केला होता. पण तिच्या सांगण्याप्रमाणे बुधवारी संध्याकाळनंतर त्या भेटलेल्या नाही आहेत. शिवाय वेदांती पुण्यातून बुधवारी सकाळी निघाली होती. पण मैत्रिणींना ती बुधवारी संध्याकाळी भेटली. जान्हवीच्या म्हणण्याप्रमाणे वेदांतीची बस वाटेत बंद पडली होती. पण त्या रात्री जेव्हा माझे आणि वेदांतीचे बोलणे झाले तेव्हा तिने मला याबाबत काहीच सांगितले नाही. शिवाय दिवसभर तिचा फोनही लागत नव्हता. तिने मैत्रिणींना एकदाही फोन केला नाही. मला याच गोष्टीचे आश्चर्य वाटले.”
“बरं तू जान्हवीला ट्रीपबद्दल काही विचारलेस का?”
“नाही. तसे विचारणे मला बरोबर वाटले नाही. आधीच मी तिला वेदांतीबद्दल विचारल्यापासून ती चिंतेत पडली आहे. वेदांती कुठली असाईनमेंट करते आहे का अशी तिलाही शंका आली.”
“तुमच्या मुंबईच्या शेजाऱ्यांना फोन केलास का?”
“हो. केला. त्यांनी तिला परवा पाहीले होते. कालपासून घराला कुलूपच आहे. आता मी आणखीन कोणालाच विचारू शकत नाही तिच्याबद्दल.”
अजिंक्यने एक मिनिट विचार केला आणि तो म्हणाला, “विवेक, ती नक्की कुठल्यातरी कामासाठीच गेली आहे. मला नाही वाटत ती ट्रीप वगैरेसाठी गेली होती.”
हे ऐकून विवेकचा चेहरा चिंताग्रस्त झाला. “कशावरून.”
“ती जर मैत्रीणींबरोबर रहाणार असती तर तिने तुमच्या मुंबईच्या घराची किल्ली नेलीच नसती. तिने तुला सांगितले होते का किल्लीबद्दल?”
“नाही. नव्हते सांगितले.” थोडे थांबून तो म्हणाला, “अजिंक्य काही कर. पण तिला शोधून काढ. ती संकटात आहे असे मला वाटते.”
“ती मुंबईला जाण्याआधी कोणाशी फोनवर बोलायची वगैरे कल्पना आहे का तुला?”
“नाही. स्पेसिफिक कोणा मैत्रिणीला फोन केल्याचे तिने मला तरी सांगितले नाही.”
“अजिंक्य आपण मुंबईला जाऊया.” क्रांती म्हणाली.
“मी पण येतो.” विवेक म्हणाला.
“नको विवेक. तू घरीच थांब. कदाचित तिचा फोन येईल किंवा ती घरी येईल.”
“तू माझी समजून काढतो आहेस का?”
“हे बघ विवेक. आम्ही आमच्या पद्धतीने तपास करतो. तुला मधून मधून फोन करून काय प्रगती झाली तेही कळवू. तू बरोबर असलास तर आम्हाला थोडे अवघड जाईल.” अजिंक्य म्हणाला.

“मला आज लगेच फोन करा. जेवढा वेळ जाईल तेवढे संकट वाढेल.”
“विवेक आम्ही आत्ता लगेच मुंबईला जायला निघतो. आणि तू काळजी करू नकोस. माझे वडील पोलीस कमिशनर आहेत. आपण केव्हाही त्यांची मदत घेऊ शकतो.” क्रांती म्हणाली.
.....
अजिंक्य, क्रांती आणि नरेंद्र कारने मुंबईला जायला निघाले. अजिंक्य म्हणाला, “क्रांती तुला काय वाटते? कुठे गेली असेल ती?”
“जी शंका तुला आली आहे तीच मलाही आली आहे. ती नक्कीच कुठल्यातरी कामात गुंतली असणार.”
“पहिले तीन दिवस ती विवेकला फोन करत होती. पण कालपासून फोन नाही म्हणजे मला वाटते ती संकटात असावी.” नरेंद्र म्हणाला.
“अजिंक्य आपण सुरुवात पल्लवीच्या घरापासून करूया.”
“कारण?” नरेंद्रने विचारले.
“आपण पूर्णपणे अंधाऱ्या रस्त्यावर आहोत. ती मुंबईला जान्हवीला भेटली होती. तिला तर काहीही माहित नाही आहे. वेदांती शेजाऱ्यांच्या संपर्कात नव्हती. शेवटचे ती पल्लवीच्या आई वडिलांना भेटली होती. मला वाटते आपण एकदा त्यांच्याशी बोलावे.”
“तिचा मृत्यू झालेला असताना असे जाणे बरोबर दिसेल का?”
“प्रश्न वेदांतीच्या आयुष्याचा आहे. आणि तो किती महत्वाचा आहे हे पल्लवीच्या आई वडिलांशिवाय आत्ता कोण चांगले समजून घेऊ शकेल? शिवाय आत्ता आपल्याकडे दुसरा कुठलाच लीड नाही आहे.” अजिंक्य म्हणाला.
“कदाचित हे प्रकरण पल्लवीच्या मृत्यूशी संबंधित तर नसेल?” क्रांती म्हणाली.
“असू शकेल.”
“क्रांती मला वाटते आपल्याला तुझ्या वडिलांना हे सांगावे लागेल.” नरेंद्र म्हणाला.
“मलाही तसे वाटते आहे.” मुंबईपर्यंतचा पुढचा प्रवास त्यांनी न बोलता केला.
क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users