द डेथ ट्रॅप भाग ७

Submitted by स्वाती पोतनीस on 27 July, 2019 - 02:11

स्वाती पोतनीस
द डेथ ट्रॅप
भाग ७

वेदांतीच्या लक्षात आले, ‘ही माणसे खूप दुष्ट आहेत. आदल्या दिवशी ती बद्रीशी बोलत असताना त्या गुन्हेगारांपैकी कुणीतरी नक्की पहिले असणार. त्यांनी कोणताही वेळ न घालवता बद्रीला मारून टाकले होते. बद्रीने तिला काही माहिती खरंच दिली आहे किंवा नाही याची खातरजमा करण्याचे कष्टही त्यांनी घेतले नाहीत. एकप्रकारे बद्रीच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत.’ कल्पनेनेही तिच्या अंगावर काटा आला. आता तर या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची तिची जिद्द अजूनच वाढली. रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर वेदांतीने रिक्षा पकडली. ती थेट कॉलेजसमोरच्या दुकानात गेली. तिला खात्री होती, एव्हाना काही माल त्या दुकानात पोहोचला असणार. बद्रीची जागा नक्कीच नव्या मुलाने घेतली असणार.
वेदांती दुकानात शिरली. ते दुकान तसे मोठे होते. तिथे स्टेशनरी आणि खाण्याचे पदार्थ असे दोन विभाग होते. तीन चार टेबले टाकलेली होती. काही मुले माणसे खाण्याचे पदार्थ घेऊन टेबलांभोवतीच्या खुर्च्यांवर बसून खात होती. दुकानात जास्त गर्दी कॉलेजच्या मुलांची होती. काही मुले केक घेऊन निघून जात होती. वेदांतीने केकची मागणी केली. काउंटरवरच्या माणसाने तिला पन्नास रुपये भरून टोकन घेण्यास सांगितले. वेदांतीने पैसे भरले आणि निळे टोकन घेऊन बाजुला होणार तेवढ्यात एका मुलाने पाचशे रुपये दिले. त्याला पांढऱ्या रंगाचे टोकन दिले गेले. ती केक घ्यायला गेली. पण तिचे लक्ष त्या मुलाकडे होते. त्या मुलाला काही पैसे परत दिले गेले नाहीत हे तिच्या लक्षात आले. त्या मुलानेही पैसे परत मागितले नाहीत. तो वेदांतीच्या शेजारी येऊन उभा राहिला. काउंटरवरच्या माणसाने तिला एक छोटे खोके आणि एक चमचा दिला. ती जवळच्याच टेबलापाशी जाऊन बसली. तिचे लक्ष काउंटर कडे होते. तिने पाहीले तिच्यासारखेच एक खोके त्या मुलालाही दिले. पण ते देण्याआधी तो खाली वाकला होता. म्हणजे जरी वरून खोके तसेच असले, तरी त्या मुलाला दिलेला केक वेगळ्या कप्प्यातून काढलेला होता. कदाचित खाली काव्या बेकरीचे कार्टन ठेवलेले असेल. वेदांतीला बसल्या जागेवरून ते मात्र दिसत नव्हते. तो मुलगा ते खोके घेऊन निघून गेला.
वेदांतीने आपल्या समोरचे खोके उघडून चमच्याने केकचे दोन भाग केले. एक भाग उचलून पहिला. तो सर्वसामान्य केकसारखाच होता. तिने चमच्याने त्याचे तुकडे केले. त्यात संशयास्पद काहीच नव्हते. तिने छोटा तुकडा उचलून खाऊन बघितला. केकची चव सुंदर होती. पण तिने तो केक खायचा मोह आवरला आणि खोक्यासकट तो केक पर्समध्ये ठेवला. ती परत काउंटरपाशी गेली. पाचशेची नोट समोर ठेऊन तिने सांगितले, “केक”.
त्या माणसाने निळे टोकन देऊन तो साडेचारशे रुपये परत दयायला लागला.
वेदांती म्हणाली, “मला पाचशेवाला केक पाहिजे.”
“बर्थडे केक आपल्याकडे मिळत नाहीत.”
“मला बर्थडे केक नको आहे. पाचशेवाला केक द्या.”
“असा केक इथे मिळत नाही.”
वेदांतीला वाटले असे म्हणावे, ‘मगाशी त्या मुलाला दिलात तसा केक पाहिजे.’ परंतु ती हे उघड म्हणू शकत नव्हती. ती म्हणाली, “ माझ्या मैत्रिणीने तर सांगितले इथे मिळेल म्हणून.”
त्या माणसाने तिच्याकडे रोखून पाहीले. त्या नजरेत संशय होता. पण हे क्षणभरच. तो लगेच हसून म्हणाला, “तुम्हाला चुकीची माहिती सांगितली आहे किंवा ते दुसरे दुकान असेल.” एव्हाना तिच्यामागे रांगेत तीन चारजण येऊन उभे राहिले होते. यापेक्षा उघड आपण विचारू शकत नाही हे तिच्या लक्षात आले. तिने पटकन निळे टोकन उचलले आणि केक घेऊन ती बाहेर पडली. तिने डॉक्टर दिवेकरांना फोन लावला. पल्लवी त्यांच्या संपर्कात होती हे तिला माहित होते. बऱ्याच वेळ फोनची घंटी वाजली. पण फोन काही उचलला गेला नाही. शेवटी तिने रिक्षा थांबवून डॉक्टरांचा पत्ता सांगितला. जाता जाता तिने दोन तीन वेळा फोन लावला. पण डॉक्टरांनी फोन उचलला नाही.
ती दवाखान्यात पोहोचली तेव्हा तिथे सात आठ रुग्ण बसलेले होते. रीसेप्शनीस्टने तिला नाव विचारले. वेदांतीचे नाव ऐकल्यावर ती कावरीबावरी झाली. काही न बोलता तिने कागदावर नाव लिहून घेतले. वेदांती जाऊन बाकावर बसली. तिने आजूबाजूला नजर फिरवली. एक रुग्ण तिच्याकडे रोखून बघत होता. तिला तो बरोबर वाटला नाही. त्याचा चेहरा गुंडासारखा होता. त्याला काही आजार झाला असेल असे त्याच्या चेहऱ्यावरून वाटत नव्हते. तिचे लक्ष रीसेप्शनीस्टकडे गेले. ती घाबरून त्याच्याकडे पहात होती. नवीन रुग्ण आल्यावर त्याचा केसपेपर बनवायचा असतो हेही बहुदा ती विसरली असावी. एकूणच तेथील वातावरणात तणाव जाणवत होता.
वेदांतीचा नंबर आल्यावर ती आत गेली. “डॉक्टर, मी वेदांती विद्वंस. पल्लवीची मैत्रीण.”
“बरं, काय होते आहे तुम्हाला?”
“डॉक्टर, मला काही होत नाही आहे. पल्लवी तुमच्याकडे आली होती एका महत्वाच्या कामासाठी.”
“हे बघा मॅडम, माझ्याकडे बोलायला वेळ नाही आहे. तुम्हाला ट्रीटमेंटची गरज आहे असे मला वाटत नाही. तुम्ही निघालात तर बरे होईल.”
“डॉक्टर पल्लवीचा खून झाला आहे आणि तो का झाला असावा हे तुमच्या लक्षात आले असेलच. मी तोच शोध पुढे चालु ठेवणार आहे.”
“इकडे जरा आडव्या पडा मॅडम. मला तुम्हाला तपासू देत.”
वेदांती तेथील बेडवर आडवी पडली. एकीकडे तिचे बोलणे चालु होते, “प्लीज, मला मदत करा. तिने तुम्हाला काय काय सांगितले ते तरी सांगा. तिची आणि माझी भेट व्हायच्या अगोदरच तिच्या बाबतीत दुर्घटना घडली. प्लीज डॉक्टर, तुम्हाला काय माहिती आहे ते सांगा.”
“मॅडम, तुम्ही शांत पडून रहा. केव्हापासून ताप येतो आहे तुम्हाला?” तेवढ्यात मागे दार उघडल्याचा आवाज झाला आणि गुंडासारखा दिसणारा रुग्ण डॉक्टरांच्या टेबलापाशी येऊन उभा राहिला.
डॉक्टर त्याला म्हणाले, “तुम्ही जरा बाहेर थांबता का? या मॅडमना तपासून झाले की मी तुमच्याशी बोलतो. दोघांकडे एक खुनशी नजर टाकून तो बाहेर निघून गेला.
डॉक्टर म्हणाले, “तुमची तब्बेत आत्ता तरी चांगली वाटते आहे. डॉक्टर म्हणून तुम्हाला एक सल्ला देतो. तब्बेत बिघडायला नको असेल तर तुमच्या घरी जा. घरचे तुमची काळजी घेतील.”
“डॉक्टर या माणसाने तुम्हाला धमकी दिली आहे का?”
“रुग्णांसाठी मला दवाखाना चालु ठेवावा लागत आहे. उद्या मीच रुग्ण झालो तर आश्चर्य वाटून घेऊ नका. मी तुम्हाला दुसऱ्या डॉक्टरांचे नाव सांगतो. त्यांना तुम्ही रविवारी भेटा.”
असे म्हणून डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन पॅड वर एक नंबर लिहिला. “हे तुमच्या रोगाचे निदान करू शकतील. या तुम्ही आता.”
वेदांती प्रिस्क्रिप्शन हातात घेऊन बाहेर आली. रीसेप्शनीस्टकडे दोनशे रुपये फी देऊन ती बाहेर आली. प्रिस्क्रिप्शन ठेवण्यासाठी तिने पर्सची चेन उघडली आणि दुसऱ्या कप्प्यात तिला एक कागद दिसला. त्यावर लिहिले होते “निघून जा. नाहीतर प्राण गमावशील.”
वेदांतीला कळेना हा कागद तिच्या पर्समध्ये कुणी आणि कधी टाकला. तिच्या पर्सला दोन मोठे आणि एक छोटा कप्पा होता. त्यातील एक कप्पा तिने उघडला होता केक ठेवण्यासाठी. त्यात हा कागद नव्हता. आणि तिने चेनही लावून टाकली होती. याचा अर्थ सकाळी केव्हातरी हा कागद कुणीतरी पर्समध्ये टाकला असणार. तिला आठवले, स्टेशनवर तिने तिकीट घेतले आणि पर्सच्या दुसऱ्या कप्प्यात टाकले. तेवढ्यात तिला बद्री दिसला आणि ती त्याच्या मागे गेली. त्यानंतर रेल्वेतून उतरल्यावर तिने चेन लावली. त्यावेळेस पर्समध्ये पहाण्याचे तिला काही कारण नव्हते. अर्थात कागद केव्हा ठेवला हा मुद्दा महत्वाचा नव्हता तर आपण बेसावध राहिलो याची तिला खंत वाटली. समजा तिने पर्सची चेन लावलेली असती तरी त्या लोकांनी कुठल्या ना कुठल्या मार्गाने चिट्ठी तिच्यापर्यंत पोहोचवलीच असती.
कालपर्यंत वेदांतीला वाटत होते आपण त्यांच्या मागे आहोत, पण आता तिच्या लक्षात आले ‘ते तिच्या एक पाऊल पुढे आहेत. ती कुठे जाणार, काय करणार याचा त्यांना अंदाज आधीच येत होता. म्हणूनच त्यांनी बद्रीला संपविले. ती डॉक्टरांना भेटणार हेही त्यांच्या आधीच लक्षात आले म्हणून त्यांनी एक गुंड त्यांच्या दवाखान्यात त्यांना धमकावण्यासाठी पाठविला. ती जर पोलिसांकडे जाईल असा जर संशय आला तर ते तिला संपवायला मागे पुढे पाहणार नाहीत.
विचारांच्या नादात ती परत रेल्वे स्टेशनच्या दिशेने गेली. आता अविचाराने कुठलेही पाऊल उचलून चालणार नव्हते. तसे करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे होते. अजुन एक गोष्ट तिच्या लक्षात आली की काल संध्याकाळी काव्याशी बोलून ती बेकरीतून निघाली तेव्हापासून आत्तापर्यंत एकही ब्लँक कॉल आला नव्हता. याचे कारण एकच होते. पल्लवीच्या मोबाईलवर मध्यरात्री फोन करणारी मुलगी कोण हे त्यांना शोधायचे होते तोपर्यंत ते वेगवेगळ्या नंबरवरून फोन करत होते. आता ती मुलगी कोण आहे हे कळल्यावर त्यांनी फोन करणे बंद केले. याचा अर्थ असाही निघतो की जेव्हा तिने ब्लँक कॉल उचलला त्यावेळेस फोन करवून घेणारी व्यक्ती तिच्यासमोर होती. कोण असेल ती व्यक्ती? बरेच वेळा नवतेज समोर असताना तिला ब्लँक कॉल्स आले होते. बेकरीत असताना आले होते. याअर्थी नवतेज हा तो माणूस असण्याची जास्त शक्यता तिला वाटत होती. एकदा तर काव्यासमोर असतानाही कॉल आला होता. ती असू शकेल? की तिच्या बेकरीतील कोणीतरी? चंदेल कधी तिच्यासमोर आला नव्हता. पण तो यात सामील असणार हे पल्लवीच्या बोलण्यावरून तिला जाणवले होते. म्हणजे तीन माहितीच्या आणि एक अनामिक व्यक्ती असे चार पर्याय तिच्या समोर होते.
नवतेज तसा साधा वाटत होता. पण माणूस वरून साधा दिसू शकतो. जोपर्यंत कोणी त्याच्या मार्गात येत नाही तोपर्यंत तो कोणालाही इजा पोहोचवणार नाही. परंतु कोणी त्याच्या मार्गात आडवे आले तर तो त्या व्यक्तीला संपवून टाकू शकतो का? एवढा तो पोचलेला असेल का? तो संशयितांच्या यादीत असण्याचे अजुन एक कारण म्हणजे त्याच्याकडे विक्रीसाठी असलेला बराच माल पंजाबमधून येत असे. तो स्वतः पंजाबी असल्यामुळे त्याला तिकडून ड्रग्ज आणणे सहज शक्य होते.
काव्याचा पर्याय तिने खोडून काढला. असे रॅकेट चालविणे ‘is not her cup of tea’ हे कुणालाही कळले असते. बेकरीत पैसे घेण्याशिवाय आणि तिथे काम करणाऱ्यांवर रुबाब करण्याशिवाय ती काहीही करत नव्हती.
आता आपण आंधळेपणाने काम न करता एकेकावर लक्ष केंद्रित करायचे हे तिने ठरविले. या विचारातच ती रेल्वे स्टेशनमध्ये पोहोचली. तिने एक पाऊल पायरीवर ठेवले तोच समोर कुणीतरी आले म्हणून त्यांना जायला जागा देण्यासाठी ती बाजुला सरकली. तसे समोरचा इसमही त्याच बाजुला सरकला. तिने वैतागून वर पाहीले. एक गुंडासारखा दिसणारा माणूस समोर उभा राहून हसत होता. त्याने विचारले, “चिठ्ठी मिळाली का?”
वेदांतीने काही उत्तर द्यायच्या आत तो निघूनही गेला. तेवढ्यात तिला हवी ती लोकल येत असल्याची घोषणा झाली. ती पळत पळत फलाटावर गेली. ती लोकलमध्ये चढली तेव्हा तिने त्या माणसाला शेजारच्या डब्यात चढताना पाहीले. तो आपला पाठलाग करणार हे तिच्या लक्षात आले. त्याला चुकविणे गरजेचे होते. ती कामगिरीवर असताना एक ड्रेस छोटी घडी घालून कायम बरोबर ठेवीत असे. आत्ताही तिच्या पर्समध्ये एक स्कर्ट आणि टॉप होता. ती पुढल्याच स्टेशनवर उतरली आणि गर्दीत मिसळून गेली. तिने आजुबाजूला पहिले. गर्दीत तो इसम कुठेच दिसत नव्हता.
ती स्टेशनमधून बाहेर आली आणि तिला तो इसम दिसला. गर्दीतून वाट काढत तो तिच्या दिशेने येत होता. ती पटकन समोरच्या मॉलमध्ये शिरली. त्याने आपल्याला आत शिरताना पाहीले असणार याची तिला खात्री होती. ती सरकत्या जिन्याच्या दिशेने जाऊ लागली. परंतु जिन्यावर न जाता ती पटकन लिफ्टमध्ये शिरली. तिसऱ्या मजल्यावर उतरून ती प्रथम महिला प्रसाधनगृहात शिरली. आत जाऊन तिने कपडे बदलले. थोडा मेकअप करून तिने लाल काड्यांचा चष्मा डोळ्यावर चढवला. दोन मुली प्रसाधनगृहातून बाहेर चालल्या होत्या. त्यांच्याशी बोलत बोलत ती बाहेर आली. तिने जिन्यापाशी त्या माणसाला उभे असलेले पाहीले. तो इकडे तिकडे बघत होता. तो तिलाच शोधत असावा. त्या माणसाने इकडे तिकडे नजर फिरवताना त्याचे लक्ष या तिघींकडे गेले.
तिने त्या मुलींना विचारले, “मी एकटी आहे. कॉफी प्यायला मला कंपनी देणार का?” त्या मुलींनी नकार दिला. त्यातील एकीने तुटकपणे उत्तर दिले, “आम्हाला अजुन फिरायचे आहे.”

तिला तरी कुठे त्यांच्या बरोबर जायचे होते. त्या माणसाने आपल्याला ओळखू नये एवढीच तिची इच्छा होती. तिचा उद्देश सफल झाला. त्याला वाटले या तिघी एकत्र आहेत. त्यात तिने वेश बदलल्यामुळे तिच्यात थोडा बदल तर झालाच होता. ही ती मुलगी असेल असे त्याला वाटले नाही. एक नजर त्यांच्यावर टाकून तो परत जिन्याने खाली गेला. तरीही तो गेटजवळ थांबून आपली वाट बघणार याची तिला खात्री होती. शिवाय इथून त्याला चुकवून ती बाहेर पडली तरी तो घरापाशी तिला गाठू शकत होता. ती माणसे आता आक्रमक बनलेली होती. घरी एकटे राहणे धोक्याचे होते. म्हणजे घरी तर ती जाऊ शकत नव्हती. तिचे विचारचक्र सुरु झाले. मुंबईत तिला अशा ठिकाणी जायला पाहिजे जिथे ती असेल अशी शंकासुद्धा त्या लोकांना येणार नाही. असे एकच ठिकाण तिच्या डोळ्यासमोर होते.
क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users