द डेथ ट्रॅप भाग ६

Submitted by स्वाती पोतनीस on 27 July, 2019 - 01:08

स्वाती पोतनीस
द डेथ ट्रॅप
भाग ६

शुक्रवारी सकाळी वेदांती ऑफिसला जाण्याची तयारी करीत होती. तिचा फोन वाजला. फोन उचलला आणि विवेकचा आवाज ऐकू आला, “अजुन तू काय करते आहेस मुंबईत वेदांती? परत कधी येते आहेस?” “दोन तीन दिवसात येईन मी.”
“अग, पण तू थांबून काय करणार आहेस?”
“विवेक पल्लवीच्या आई वडिलांना आत्ता आमची गरज आहे. मी राहिले तर त्यांना थोडा आधार मिळेल. चालेल का मी इथे राहिले तर?”
“बरोबर आहे तू म्हणतेस ते. रहा मग तू. पण मधून मधून फोन करत रहा.”
“हो नक्की. चल, ठेऊ का फोन?”
“ओ के. बाय.” वेदांतीला हुश्श वाटले. विवेकने जास्त चौकशा केल्या नाहीत. नाहीतर तिला खोटे बोलणे अवघड गेले असते. तिने मनातूनच विवेकची क्षमा मागितली. आज वेदांतीने नवतेजवर लक्ष ठेवायचे ठरविले होते. तो ऑफिसमध्ये कोणाशी जास्त बोलतो, त्याला कोण भेटायला येते, तो कुणाकुणाला भेटतो हे कळले तर थोडाफार क्लू मिळण्याची शक्यता होती. वेदांती ऑफिसमध्ये पोहोचली. शिपायाने निरोप दिला, “तुम्हाला साहेबांनी बोलावले आहे.” नवतेज म्हणाला, “वेदांती, आज मला कामासाठी बाहेर जायचे आहे. तुला सगळ्या दुकानांमध्ये जाऊन किती पैसे जमले आहेत त्याचे आकडे घेऊन यायचे आहेत. सगळी कॅश बँकेत जमा केली आहे ना याची खात्री करून घे. तसेच विक्रीचे आकडे घेऊन ये.”
नवतेज हे तिच्याशी बोलत होता. तेवढ्यात वेदांतीचा फोन वाजला. तिने फोन बघितला आणि बंद केला. तिच्या कपाळावर उमटलेली आठी नवतेजने टिपली. “अजुन तुला ब्लँक कॉल्स येतात का?” नवतेजने विचारले. वेदांतीने होकारार्थी मान डोलावली. “तुझा फोन इथे ठेव.” वेदांतीने त्याच्यासमोर फोन ठेवला. नवतेज आपल्याला अहवाल कशा पद्धतीने हवा आहे ते तिला समजावू लागला. पुन्हा फोन वाजला. यावेळेस नवतेजने फोन उचलला आणि तो म्हणाला, “बास्टर्ड , यु वेअर टॉकींग टू युअर मदर.” आणि रागाने फोन ठेऊन दिला. “आता परत तुला फोन येणार नाही.”
“थँक यु, सर.”
“वेदांती, तुला माझे एक काम करावे लागेल. जवळच्या बँकेत माझे खाजगी खाते आहे. त्यातून पाच लाख रुपये काढून आण. आणि मग तुझ्या कामाला जा. आणि एक. बेकरीत गेलीस तरी काव्याला या पैशांबद्दल काही सांगायची गरज नाही. खरे तर, कोणालाच सांगायची गरज नाही. हे ऑफिशियल काम नाही आहे.”
वेदांतीला कळेना मगाशी आपण पाहिलेला आपल्या एम्प्लॉईची काळजी करणारा नवतेज खरा की आपल्याला वाटत आहे त्याप्रमाणे ड्रग्जमध्ये डीलिंग करणारा नवतेज खरा. अर्थात हा त्याचा दिखावासुद्धा असू शकतो. कळेलच लवकर. त्याच्या वागण्याने पाघळून जाऊन घाईघाईने मत बनवायला नको हे तिने स्वतःला बजावले.
वेदांतीने बँकेतून पैसे काढून आणले आणि एका कागदाच्या पाकिटात ते पैसे ठेऊन पाकीट व्यवस्थित बंद करून नवतेजला आणून दिले आणि ती कॉम्प्युटरवर काम करीत बसली. नवतेज ऑफिसमधून बाहेर जात नाही तोपर्यंत आपण ऑफिसमधेच वेळ काढायचा हे तिने ठरविले. थोड्या वेळाने एक माणूस नवतेजला भेटायला आला. तिने शिपायाला विचारले तेव्हा तिला कळले ‘हा माणूस पहिल्यांदाच ऑफिसमध्ये आला होता.’ वेदांतीने नवतेजच्या केबिनच्या दारावर टकटक केले.
“कम इन.” वेदांती आत शिरली तेव्हा नवतेज पैशाचे पाकीट त्या माणसाला देत होता. आपले तिकडे लक्ष नाही असे दाखवत ती म्हणाली, “सॉरी टू डिस्टर्ब यु सर. पण माझे ऑफिसमधले काम झाले आहे. जर तुमचे काही काम नसेल तर मी बाहेरच्या कामासाठी निघते आहे.” तिच्या वागण्या-बोलण्यात इतकी सहजता होती की नवतेजला काहीही संशय आला नाही. किंवा डिस्टर्ब झाल्याबद्दल रागविण्याचे काही कारण आहे असेही त्याला वाटले नाही. तो म्हणाला, “माझे काही काम नाही आहे. तू बाहेरच्या कामाला जाऊ शकतेस. संध्याकाळी ऑफिसला यायची गरज नाही. उद्या सकाळी मला अहवाल दे.”
ऑफिसमधून निघून वेदांतीने पहिल्यांदा बेकरीत जाण्याचे ठरविले. त्या बेकरीचा आणि या प्रकरणाचा काहीतरी संबंध आहे असे तिला खात्रीने वाटत होते. तसेही नवतेजच्या इतर दुकानांना भेट देणे हे केवळ कामाचा एक भाग म्हणून ती करणार होती. ती प्रथम तळमजल्यावर बेकरी आउटलेट मध्ये गेली. बेकरीत बरीच गर्दी होती. जास्त करून कॉलेजची मुले मुली तिथे होती. काव्या अजुन आलेली नव्हती. ती वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टपाशी गेली. आणि तो मुलगा लिफ्टमधून बाहेर आला. तिने हसून त्याच्याकडे पाहीले. परंतु तो मुलगा हसला नाही. उलट अवघडल्यासारखा ती बाजुला होण्याची वाट बघत उभा राहिला. तिने विचारले, “नाव काय तुझे?”
“बद्री”
“काय घेऊन चालला आहेस?”
“केक्स आणि क्रीमरोल्स”
“कुठे द्यायचे आहेत?”
“इथे जवळच्याच दुकानात.” तो जेवढ्यास तेवढेच उत्तर देत होता.
“कुठल्या दुकानात?” तिने जोर देऊन विचारले.
“कॉलेजसमोरच्या.”
“बघू दे मला तू कोणते केक घेऊन जातोयस ते?” ती हात पुढे करणार तोच तो घाईघाईने मागे सरकला. परंतु तिने पुढे होऊन कार्टनचे झाकण उघडले. आत काही क्रीमरोलची आणि केक्स्ची छोटी छोटी खोकी व्यवस्थित लावून ठेवलेली होती. ती एक खोके उचलायला लागली तसे तो म्हणाला, “दीदी ते चिकटवले आहे. काढले तर कस्टमर नाराज होईल.” वेदांती खोके उचलणार तोच मागून जोरात आवाज आला, “बद्री लवकर जा.” वेदांतीने मागे वळून पाहीले. काव्या मागे उभी होती. तिने काय काय ऐकले ते कळायला मार्ग नव्हता. परंतु काव्याने काही दर्शवले नाही. “हॅलो वेदांती. तू एवढया लवकर कशी काय आलीस?”
“मला आज आपल्या ऑर्डर्सबद्दल माहिती घ्यायची होती. बेकरीतल्या कोणत्या वस्तूंचा जास्त खप आहे? कोणते केक्स लोकांना जास्त आवडतात वगैरे.”
“ओह. एवढेच ना? चल मी तुला सांगते.” दोघी आउटलेटमध्ये गेल्या. जवळजवळ अर्धा तास वेदांतीने वाट पाहीली. परंतु गर्दी एवढी होती की दोघींचे बोलणे काही होईना. शेवटी वेदांती म्हणाली, “काव्या मॅडम, तुम्ही आत्ता खूपच बिझी आहात. मी तुम्हाला डिस्टर्ब करणे बरोबर नाही.”

“सॉरी वेदांती. तू बघतेच आहेस ना किती गर्दी आहे ते. आपण नंतर बोलूया का?”
“हो मॅडम, चालेल. मी वरती बेकरीत जाऊन बघितले तर चालेल का? कॉम्प्युटरवरच्या आकड्यांवरूनही मला कळू शकेल. तसेही मला आकडे लिहून घ्यायचेच आहेत.”
“हो चालेल.” वेदांती बेकरीत गेली. कॉम्प्युटरपाशी बसलेल्या मुलाकडून म्हणजे गणेशकडून ती माहिती घेऊ लागली. तिने बेकरीत सगळीकडे नजर फिरवली. बद्री कुठेच दिसत नव्हता. आकडे लिहून घेता घेता तिने विचारले, “कस्टमरला तुम्ही माल कसा पोचवता?”
“बहुतेक माल एका छोट्या टेम्पोतून पाठवतो. जवळची ठिकाणे असतील आणि माल थोडा असेल तर बद्री घेऊन जातो.” तिने खोदून खोदून विचारायचा प्रयत्न केला पण गणेशकडून फारशी उपयुक्त माहिती मिळाली नाही. तिला एवढे समजले छोट्या प्रमाणावर माल हवा असेल तर बहुतेक ऑर्डर्स फोनवर येत होत्या. त्यांची पूर्तताही लगेच केली जात होती. तो सर्व माल पोहोचविण्याचे काम बद्री करीत होता. तिचे काम चालु असताना बद्री आला.
वेदांती म्हणाली, “गणेश मला बहुतेक माहिती मिळाली आहे. मी जरा इथे बसून थोडे काम करू का?”
“हो मॅडम, बसा न टेबलपाशी.” त्याने खुर्ची सरकवून शेजारच्या टेबलजवळ ठेवली. वेदांती तिथे जाऊन बसली. ती वहीत माहिती लिहित असल्याचा बहाणा करीत होती. तिचे लक्ष बद्रीवर होते. पाच मिनिटांत बद्री आणि एक मुलगा बेकरीतून निघाले. दोन मिनिटांनी वेदांतीही निघाली. तिला बद्रीचा पाठलाग करायचा होता. ती खाली येऊन रस्त्यावर आली. तिला बद्री आणि तो मुलगा कुठेच दिसले नाहीत. ती वेड्यासारखी इकडे तिकडे पहात राहिली. तेवढ्यात बद्री आणि दुसरा मुलगा दुचाकीवरून तिच्या अगदी जवळून गेले. बद्री दुचाकी चालवत होता. आणि तो मुलगा खोके हातात घेऊन मागे बसला होता. तिच्या लक्षात येईपर्यंत बद्री रस्ता ओलांडून पलीकडे गेला होता. त्याने किंचित मान वळवून तिच्याकडे पाहीले असा भास तिला झाला. त्याच्या चेहऱ्यावर स्मित होते असेही तिला क्षणभर वाटले.

वेदांतीने पटकन एक रिक्षा थांबवली आणि ती बद्रीच्या मागे निघाली. तिने रिक्षेवाल्याला सांगितले, “ती मुले जिकडे जात आहेत तिकडेच मलाही जायचे आहे. त्यांच्यावरून नजर हटवू नका. मला रस्ता माहित नाही आहे. चुकामूक होईल.” वेदांती त्यांचा पाठलाग करीत आहे असा संशयही रिक्षेवाल्याला आला नाही. थोडे अंतर गेल्यावर बद्रीने एका इमारतीपाशी दुचाकी थांबवली. वेदांती रिक्षातून उतरली. पैसे देतानाही तिने त्यांच्यावरून नजर हटवली नाही. ती जवळच्या एका स्टेशनरीच्या दुकानात शिरली आणि त्यांच्यावर लक्ष ठेऊ लागली.

बद्रीने इकडे तिकडे पाहीले आणि क्षणभर तिथेच उभा राहीला. तो आपल्याला शोधत आहे याची तिला खात्री पटली. ती दिसली नाही तेव्हा तो त्या इमारतीत शिरला. वेदांती त्या इमारतीत शिरली, तोपर्यंत बद्री लिफ्टमध्ये शिरला होता. ती तिथेच थांबून राहिली. लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर थांबली हे तिला आकड्यावरून कळले. ती जिन्याने चढून वर गेली. त्या मजल्यावर एकच मोठे दार तिला दिसले. ते डोळ्यांचे इस्पितळ होते. वेदांती आत जाऊन सगळीकडे एकदा पाहून आली. रीसेप्शनीस्टने तिला विचारले, “कोणाला भेटायचे आहे?”
“इथे आत्ता दोन मुले आली होती का?”
“जे पेशंट आले ते सर्व इथे बसले आहेत.”
“आत कोणी गेले आहे का?”
“नाही. आत एक वयस्कर पेशंट आहेत. काय काम आहे तुमचे.”
“काही नाही. सॉरी.” असे म्हणून वेदांती बाहेर आली. बद्रीची दुचाकी रस्त्यावर अजुन तशीच होती. याचा अर्थ बद्री अजुन इमारतीतच होता. ती शेजारच्या एका चहाच्या दुकानात शिरली. चहा पिता पिता ती रस्त्यावर लक्ष ठेवून होती. जवळजवळ एक तास झाला तरी बद्री इमारतीतून बाहेर आला नाही. शेवटी ती निघाली आणि रिक्षाने बेकरीत पोहोचली. काव्या गल्ल्यावर बसून पैसे घेत होती. तिने वेदांतीला थांबायला सांगितले. तिच्या मागुन आवाज आला, “दीदी मी जाऊ का घरी. माझे काम झाले आहे.”
वेदांतीने मागे वळून पहिले. बद्री उभा होता. त्याने गणवेश बदलून दुसरे कपडे घातले होते. काव्या म्हणाली, “हो, तू जा. उद्या सकाळी लवकर ये.” वेदांतीला आश्चर्य वाटले. पण तिने तसे दाखविले नाही. थोड्या वेळ काव्याशी बोलून ती पुढच्या कामाला जायला निघणार तोच तिचा फोन वाजला. नेहमीप्रमाणे ब्लँक कॉल होता. यानंतर मात्र रात्रीपर्यंत एकही ब्लँक कॉल आला नाही. रात्री तिने विवेकला फोन करून आपली खुशाली कळविली.
शनिवार आणि रविवार वेदांतीला सुट्टी होती. आज तिने कालच्या त्या इमारतीत जाण्याचे ठरविले. बद्री नक्की कोणाकडे डिलिव्हरी करायला गेला होता हे तिला शोधायचे होते. नंतर ती कॉलेज समोरच्या दुकानात जाणार होती. ती रेल्वे स्टेशनमध्ये आली. फलाट बदलण्यासाठी ती जिना चढायला लागली. तिच्या पुढे एक दोन पायऱ्या सोडून वरच्या पायरीवर तिने बद्रीला पाहीले. मागचा पुढचा विचार न करता तिने त्याला हाक मारली. दचकून त्याने मागे वळून पाहीले. तिला पाहिल्यावर तो भराभर पायऱ्या चढून वर गेला आणि गर्दीत दिसेनासा झाला. तेवढ्यात तिची लोकल आली. ती घाईघाईने लोकलमध्ये चढली. दाराजवळ दहा बारा जणी एकमेकींना धरून उभ्या होत्या. एकच मिनिट थांबून लोकल हळूहळू सुरु झाली. तिने आधाराला एकीच्या खांद्यावर हात ठेवला आणि बाहेर बघू लागली. समोरच्या रेल्वेत बरेचजण दारापाशी लोंबकळत होते. तेवढ्यात एकजण समोरच्या रेल्वेतून पडताना सर्वांनी पाहीला. त्यानंतर एकच गोंधळ माजला. समोरची रेल्वे थांबायला वेळ लागला. तोपर्यंत यांची लोकल बरीच पुढे गेली होती. यांना मागचे काही दिसेना. लोकलमध्ये या विषयावर चर्चा सुरु झाली होती. एक दोन बायका तर रडायला लागल्या होत्या. वेदांतीला काही सुचेना. ती बधीर होऊन गेली होती. अजूनही तिच्या डोळ्यासमोर बद्रीचा पडत असतानाचा भेदरलेला चेहरा येत होता.
क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे एकदम फ़ास्ट कथा ( केक्सच्या बहाण्याने युथसाठी ड्रग्स पुरवले जाणारे रॅकेट ह्यावर एक दाक्षिणात्य पिक्चर नुकताच पाहिलेला त्याची आठवण झाली)