बाप-लेक

Submitted by आस्वाद on 26 July, 2019 - 18:47

नेहाला कळा सुरु होताच निशांत तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला. पुढचे काही तास हुरहूर, काळजी आणि वाट पाहण्यात गेले. जेव्हा आतून रडण्याचा आवाज आला तेव्हा निशांत, आजी, आजोबा आणि बाळाची ताई सगळेच आनंदले. ताई तर आनंदाने नाचायलाच लागली. तिला एक छोटुकला भाऊ मिळणार आहे, हे तिला जेव्हा आई- बाबांनी सांगितलं तेव्हा पासून तिला त्याला बघायची घाई झाली होती. इतके महिने वाट पाहून पाहून ती कंटाळलीच होती. डॉक्टरनि आत जायला परवानगी दिल्याबरोबर सगळे आत गेले. त्या छोट्याशा रूम मध्ये आनंद ओसंडून वाहत होता. निशांतनी बाळाला उचलून घेतलं आणि पटकन त्याची पापी घेतली.बाकी सगळे बाळाला बघण्यात गुंग होते तेव्हा निशांत नेहाकडे बघत उभा होता. हळूच तिच्या डोक्यावरून हात ठेऊन त्यानी विचारलं, "कसं वाटतंय ?" तिनी पण हसून म्हटलं "छान, मोकळं!". त्याला मनूच्या वेळेचं आठवलं. तेव्हा नेहा मनू झाल्यावर खूपच थकली होती आणि तिच्या हातात बाळ दिल्यावर तर घाबरूनच गेली होती. या वेळेला नेहापण जरा कमी थकलेली दिसत होती आणि पुष्कळच बिनधास्त वाटत होती. शेवटी ४ वर्षांचा अनुभव गाठीशी होता तिला "आईपणाचा"!

सगळं स्थिरस्थावर झाल्यावर निशांत, आजोबा आणि मनू घरी जायला निघाले. आजी रात्री थांबणार होती हॉस्पिटल मध्ये. गाडीत बसताच मनू म्हणाली ,"भूक लागली". मग तिच्या आवडीच्या रेस्टॉरंट मध्ये जेऊन रात्री घरी पोचले. मनू तर दिवसभर मस्ती करून थकून गाडीतच झोपून गेली होती. तिला कडेवर उचलून निशांत घरात आला. तिला बेडवर झोपवून तो बाहेर आला. बाबांना पण दिवसभर दगदग झाली होती. ते पण थकून झोपायला गेले. निशांतला मात्र झोप येईना. आत्ताच्या आत्ता उठून हॉस्पिटल मध्ये जावं, असं वाटायला लागलं. आजीच्या ऐवजी आपणच थांबायला हवं होतं, असं वाटलं. नेहाला जर काही लागलं रात्री तर, याची चिंता वाटायला लागली. त्याने नेहाला फोन केला. तिच्याशी बोलल्यावर त्याला जरा बरं वाटलं. मग तो पण उठून झोपायला गेला. रात्री उशिरा पर्यंत मित्र मैत्रिणींचे, नातेवाईकांचे फोन येत होते. सगळ्यांशी बोलता बोलता मध्यरात्र उलटून गेली.

सकाळी मनू उठली आणि निशांतला पण उठवू लागली. निशांत पण आज ताबडतोब उठला. कितीही झोप येत असली तरीही आज "आईकडे /आजीकडे जा" असं म्हणता येणार नव्हतं. उठून तो फ्रेश होऊन आला तर मनू खेळत बसली होती. "मनुताई, जा ब्रश करून ये, मी दूध गरम करतो" असं म्हणून तो किचन मध्ये जायला लागला. "तू करून दे मला ब्रश" मनूने फर्मान काढलं. "अगं, तुला येतं ना करता, मग कर ना" निशांत किचन मधून म्हणाला. तशी मनू त्याच्याजवळ येऊन बिलगली. "नाही, आज तूच करून दे. मम्मा तर करून देते मला ब्रश मी स्कूल मध्ये जाते तेव्हा" आता मात्र निशांतला टेन्शन आलं. इतक्या ४ वर्षात कधी असं झालंच नाही कि तो आणि मनू दोघंच दिवसभर "एकटे". आज पहिल्यांदाच त्याला मनूला ब्रश करून द्यावा लागणार होता. नेहाच मनूला रोज तयार करायची डे केयर मध्ये पाठवायला. कसबसं त्याने तिला ब्रश करून दिला. मग दूध गरम करून तिला कप मध्ये दिलं. तिनी पण पटकन दूध संपवलं. "आपण बाळाला बघायला कधी जायचं?" तिनी विचारलं. "बस, तयार होऊन निघूया" तो म्हणाला. मनू पण आजोबांना उठवायला पळाली.

निशांतने नेहाला फोन करून काय आणायचं, काय नाही ते सगळं विचारून घेतलं. चहा, नाश्ता बनवून निशांत आंघोळीला गेला. बाबा पण आले तयार होऊन. त्यांना चहा देऊन निशांत मनूला म्हणाला, "मनू, लवकर तयार हो, आपण निघू थोड्या वेळात". "मला आंघोळ कोण घालणार?" मनू म्हणाली. निशांतनी अगदी धोरणीपणे म्हटलं "आज आंघोळीला सुट्टी, तू तुला हवा तो ड्रेस घालून ये तर". मनू उड्या मारत तिच्या रूम मध्ये गेली. तिचा आवडता ड्रेस घालून आली. असा इतका झगमग ड्रेस घालून आलेली पाहून निशांतला हसूच फुटलं. "अगं ,आपल्याला हॉस्पिटल मध्ये जायचंय, पार्टीला नाही" तो समजावणीच्या सुरात म्हणाला. तशी मनू फुरंगुटून म्हणाली "पण हाच माझा फेव्हरेट ड्रेस आहे. मला हाच घालायचा आहे."
"अगं, पण हा ड्रेस तर मम्मानी पार्टी साठी आणलाय ना. मग आज घालशील तर खराब होऊन जाईल." पण अशा लॉजिकला भीक घालेल तर ती मनू कुठली! ती अगदी हिरहिरीने कसा हाच ड्रेस तिला आज घालणं "आवश्यक" आहे हे पटवायला लागली. निशांत मनात म्हणाला "बॅलिष्टर होशील पोरी!". त्याने असहायपणे बाबांकडे पाहिलं. बाबा मात्र आपण त्या गावचेच नाहीत, आपण काही ऐकलं नाही कि पाहिलं नाही, असं भासवत मोबाईल मध्ये डोकं घालून बसले होते. नेहमी त्याच्या जागी नेहा असायची आणि तो बाबांच्या जागी. आज त्याला पहिल्यांदाच आपल्या 'नाकर्तेपणाची' लाज वाटली आणि नेहाबद्दल आदर द्विगुणित झाला. रोज सकाळी या मायलेकींची खडाजंगी त्याच्या माहितीची होती. पण तो नेहमी नेहालाच "जाऊ दे ना, लहान आहे ती, करू दे तिला जे करायचं ते " हेच ऐकवायचा अगदी आणीबाणीची परिस्थिती आली तर. आज पण त्याने हात टेकले. मनू आनंदाने शूज घालायला पळाली. हे महाभारत झाल्यावर बाबा म्हणाले, "अरे, मनूला काही खायला दे ना. तिला भूक लागली असेल". मनू पण लगेच "पॅनकेक, पॅनकेक" ओरडायला लागली. निशांतनी गुपचूप पॅनकेक बनवायला घेतलं. गरम गरम पॅनकेक बनवून मनूला खायला दिले. तिनी लगेच चॉकलेट सिरप मागून घेतलं. मी टाकणार, म्हणत ती भलीमोठी सिरपची बाटली हातात घेतली आणि अक्खी उपडी धरली. तिला काही समजायच्या आत सगळं सिरप अंगावर, कपड्यांवर सांडलं. मनूने लगेच भोकाड पसरलं. बाबांनी उगी उगी करत तिला शांत करायचा प्रयत्न केला. निशांत सगळं स्वच्छ करून मनूला बाथरूम मध्ये घेऊन गेला. आता तिला अंघोळ घालण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्याने आज पहिल्यांदाच तिला अंघोळ घातली. नेहासारखं इतकं पाणी नको घेऊस, इतका साबण नको लावूस असं काहीही ना म्हणता मनूच्या मनासारखी अंघोळ घालून दिली. मनू तर निशांतवर भारीच खुश झाली. "डॅडी, तूच रोज अंघोळ घालून देत जा" ती आनंदाने म्हणाली. निशांतला हसूच आलं. खरं म्हणजे त्याला पण भारी मजा आली तिला अंघोळ घालताना. ती पाण्यात दंगा करताना पाहून. आजपर्यंत आपण का नाही कधी हे केलं, याचंच त्याला आश्चर्य वाटलं. त्याला कधी कधी नेहा म्हणायची मनूला आंघोळ घालायला. पण तो नेहमीच "मला नाही घालता येत" असं म्हणून उडवून लावायचा. "अशी कशी नाही येत? स्वतः तर करतोस ना?" नेहाच्या या प्रश्नाला त्याच्याकडे कधीच उत्तर नसायचं. खरं म्हणजे त्याला भीती वाटायची तिला अंघोळ घालताना कधी दुखापत तर नाही होणार ना याची, पण हे तो कधीच बोलला नाही. मनूला त्याने परत नवीन कपडे घालून दिले, तिचा आवडता बो लावून दिला. इतका जामानिमा करता करता उशीरच झाला.

हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर त्याने बाळाला उचलून घेतलं. बराच वेळ तो आणि मनू बाळासोबत खेळत होते. नाईलाजानेच उठून तो आईला घरी सोडायला गेला. आई पण थकली होती. रात्रभर बाळ रडत होतं, त्यामुळे अजिबात झोप झाली नव्हती. पण नातवाच्या पुढे झोपेचं खोबरं झालेलं पण तिला चालत होतं. लगेच बाळ कसा निशांतसारखाच हुशार आहे, हे ती निशांतला सांगू लागली. "अगं आई, तो फक्त रडत होता रात्रभर. त्यात त्याची हुशारी कशी कळली तुला?" निशांत हसत म्हणाला" "न कळायला काय झालं? बाळाचे पाय पाळण्यात दिसतात." आई म्हणाली. आई-वडिलांचे आजी-आजोबा झाले की नातवंडांपुढे लॉजिक वगैरे गुंडाळून ठेवतात, हे त्याने मनूच्या वेळेसच पाहिलं होतं. ती पहिलीच नात असल्याने विशेष कौतुक होतं तिचं. आईने आंघोळ केली तोपर्यंत निशांत जेवण घेऊन आला. थोडं आई साठी ठेऊन बाकी बाबांसाठी त्याने डब्यात भरून घेतलं. मग परत हॉस्पिटलला गेला.

नेहा आणि बाळ झोपलं होतं. त्याने बाबांना डब्बा दिला. नेहाला तर हॉस्पिटलमध्येच जेवण मिळत होतं. मनू कंटाळली होती. दोघंही झोपले असल्याने तिला मुळीच दंगा करता येत नव्हता. निशांत आल्यावर तिला हायसं वाटलं. "डॅडी, मला बोर होतंय" ती खुसफुसत म्हणाली. मग निशांत तिला बाहेर घेऊन गेला. समोरच दुकान होतं. तिथे जाऊन त्याने नेहासाठी कार्ड घेतलं, तिच्या आवडती फुलं घेतली, बाळासाठी फुगे घेतले. "बाळासाठी चॉकलेट्स घ्यायचे का?" मनूने विचारलं. "अगं, बाळाला दात कुठेय चॉकलेट्स खायला? बाळ फक्त दुदू पितो, बेटा" हसू आवरत निशांत म्हणाला. "ओह, खरंच!!" मनू म्हणाली. पण आपण तुझ्यासाठी चॉकलेट्स घेऊ शकतो." "माझ्यासाठी??"" मनू आश्चर्याने म्हणाली. "हो, तू ताई झालीस ना आता. म्हणून तुझ्यासाठी गिफ्ट. " "मी आणू का?" मनू आनंदाने उड्या मारू लागली. निशांतने हो म्हणताच मनू चोकोलेट्स आणायला पळाली. हातात मावेल इतके चोकोलेट्स पाहून निशांत हसला. मनूने निशांतला सगळे चोकोलेट्स दिले. "डॅडी, हे माझ्यासाठी. आणि हे तुझ्यासाठी, मम्मासाठी. आणि हे आजी आबांसाठी" तिने डिक्लेर केलं. निशांतला मनापासून कौतुक वाटलं. असं सगळ्यांसाठी आणायला हि कधी शिकली? इतकी मोठी झालीसुद्धा आणि आपल्याला तर कळलंच नाही, त्याने पटकन तिला उचलून तिची पापी घेतली. त्याने सगळं सामान घेतलं आणि मनूला जेवायला घेऊन गेला. तिची आवडती डिश ऑर्डर केली. आज पहिल्यांदाच तो मनूला एकटा जेवायला घेऊन आला होता. तिची आवडती डिश मिळाल्यावर तिला चवीचवीने खाताना पाहून त्याला हसू येत होतं. दर घासाला यम्मी, यम्मी म्हणत ती खात होती. आपल्या लेकीला इतकं पोटभरून जेवताना पाहून समाधानाने भरपूर टीप ठेवली.

वापस आले तोपर्यंत नेहा उठली होती, बाळ एकदा दुदू पिऊन परत गुडूप झोपलं होतं. बाबा त्यांची वाटच पाहत होते. त्याने बाबांना आणि मनूला घरी सोडून पुन्हा हॉस्पिटलला आला. कालपासून त्याला आणि नेहाला बोलायलाच वेळ नव्हता मिळाला. आता दोघंच रूम मध्ये होते. "कशी आहेस? झोप झाली का थोडी तरी?" त्याने विचारलं. "छे रे" नेहा वैतागून म्हणाली. "मॅडम, आता तर पुढचे ४-५ महिने झोपायला नाही मिळणार आपल्याला." निशांत हसत म्हणाला. "मनू कशी राहिली? त्रास दिला का तिने सकाळी?" सकाळ पासून जे जे झालं, ते सगळं निशांतने सांगितलं. नेहाला तर हसूच येत होतं. "मनू खूपच समजदार झालीये, एकदम मोठी झाल्यासारखी वाटतेय. सगळं आपल्या हातानी करते" निशांत कौतुकाने म्हणाला." तेवढ्यात बाळराजे उठले. निशांत पटकन उठून बाळाजवळ गेला. त्याचं डायपर पाहिलं, ओलं वाटलं. त्याने डायपर चेंज केलं. त्याला नेहाजवळ देऊन हात धुवून आला. नेहा त्याच्याकडे बघतच राहिली. "निशांत, तुला डायपर चेंज करता येतं?" ती अविश्वासाने म्हणाली. "येत नाही, पण तुला पाहिलंय ना करताना मनूच्या वेळेस. ते काही रॉकेट सायन्स नाहीये." तो हसत म्हणाला.

नेहा अजूनही डोळे मोठे करून बघत होती. "बघ नेहा, मनूच्या वेळेस मी जास्त 'हॅन्ड्स ऑन डॅड नव्हतो. शक्यतोवर मी जबाबदारी घेत नव्हतो. शिवाय तू पण वर्षभर घरी होतीस. त्यामुळे निभून गेलं. पण आज मला जाणवलं की मी कित्ती काही मिस केलं. मनू बघता बघता मोठी झाली. तिला आता वर्षभराने आपली गरज पण नाही राहणार रोजची कामं करायला. मला आता यावेळेस असं नाही होऊ द्यायचंय." नेहा प्रसन्नपणे हसली. गोड धक्काच होता तिच्यासाठी.

इतक्या गडबडीत तो नेहाचं गिफ्ट द्यायलाच विसरला होता.तो गाडीतून सगळं सामान घेऊन आला. नेहाला कार्ड आणि फुलं दिले. मनूने घेतलेले सगळे चॉकलेट्स त्याच्याकडेच राहिले होते. एक नेहाला देऊन एक त्याने स्वतः घेतलं.

आज ते लेकीने दिलेलं चॉकलेट त्याला जास्तच गोड लागलं.

- समाप्त

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती गोड कथा आहे. मला खूप आवडली. न कोणता ट्विस्ट ना ही कोणती सांगण्यासारखी घटना, पण इतकी साधीशी कथासुध्दा शेवटपर्यंत वाचत रहावीशी वाटली. बाबा लेकीचं नातं आणि बाबाचं मानसिक स्थित्यंतर छान Happy

छान आहे...
नॉन स्टॉप बोर न होता वाचली...! Happy

छान आहे...
नॉन स्टॉप बोर न होता वाचली...!>>>>>+१११
निरागस लेखन>>>>> हो ना, मस्त आहे बाप-लेकीचं नातं.

धन्यवाद, सामी, रश्मी, विनिता, पद्म, मीरा, धनश्री. इतके छान प्रतिसाद पाहून आनंद झाला. खूप छोटंसं कथाबीज होतं माझ्याकडे. पण लिहिता लिहिता बरीच मोठी झाली कथा Happy

छान आहे...
नॉन स्टॉप बोर न होता वाचली...!

>>> +१

छान आहे..
नॉन स्टॉप बोर न होता वाचली...!
>>>>+1
मनु फार आवडली मला .
आणि बाप लेकीचं निरागस प्रेम पण.

Awadali!

Pages