महाराष्ट्रातील संभाव्य रामसर स्थळे व त्यांचे संवर्धन

Submitted by Dr Raju Kasambe on 26 July, 2019 - 07:19

महाराष्ट्रातील संभाव्य रामसर स्थळे व त्यांचे संवर्धन

१९७१ साली इराणमधील रामसर शहरात भरलेल्या ‘कन्वेन्शन ऑन वेटलँड्स’ ह्या जागतिक परिषदेला ‘रामसर परिषद’ मानले जाते. ह्याच परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापरासंबंधीचे निर्णय घेण्यात आले.
ह्या आंतरराष्ट्रीय परिषदेतील चर्चेद्वारा महत्वाच्या पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी प्रत्येक देशाने राष्ट्रीय स्तरावर करावयाच्या कृतींचा आराखडा तयार करण्यात आला. हा कृती आराखडा नंतर १९७५ मध्ये झालेल्या दुसऱ्या परिषदेत संमत करण्यात आला.
ह्या कृती आराखड्यात मान्य केल्याप्रमाणे प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील जागतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित करावे असे ठरले. अशा स्थळांचे मग त्या देशाने योग्य प्रकारे संवर्धन करावे तसेच तेथील जैवविविधतेचा पर्यावरणपूरक वापर करावा असे स्वीकारण्यात आले. ह्या आराखड्यात ‘पाणथळ जागेची’ व्याख्या सुद्धा करण्यात आली. पाणथळ जागेच्या व्याख्येत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाड्या, समुद्रकिनारे, भातखाचरे, दलदलीचे प्रदेश आदी जागांचा यात समावेश केला जातो. त्यात वाहते तसेच शांत पाणी असलेली पाणस्थळे, बारमाही तसेच हंगामी पाणथळीच्या जागांचा समावेश केला जातो. समुद्री पाणथळीच्या जागांसाठी (खाऱ्या पाण्याची सरोवरे, समुद्र किनारऱ्यावरील भरती ओहोटीच्या जागा इ.) ओहोटीच्या वेळेस एकूण खोली सहा मीटरपेक्षा अधिक नसावी हा नियम करण्यात आला.
भारताने रामसर करारावर १९८२ मध्ये सही केली व सहभागी झाला.

‘रामसर’ मान्यतेचे नऊ जागतिक निकष:
रामसर परिषदेत ‘रामसर स्थळ’ घोषित करण्यासाठी एकूण नऊ जागतिक निकष वा मापदंड मंजूर करण्यात आले आहेत. पहिला निकष हा नैसर्गिक वा अर्ध- नैसर्गिक पण दुर्मिळ प्रकारातील पाणथळ जागा असावी. उदाहरणार्थ बुलडाणा जिल्ह्यातील लोणारचे सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले असून त्यात खारे पाणी आढळते. जगात अशी सरोवरे फार कमी आहेत. दुसरा निकष हा त्या ठिकाणी आढळणाऱ्या संकटग्रस्त वन्यजीवांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी असलेले महत्त्व अधोरेखित करतो. तिसरा निकष त्या विशिष्ट जैवभौगोलिक प्रदेशातील वनस्पती व वन्यजीवांच्या संवर्धनासाठी असलेले महत्त्व अधोरेखित करतो. चौथा निकष वनस्पती व वन्यजीवांच्या जीवनचक्रातील त्या पाणथळीचे महत्त्व (जसे स्थलांतरादरम्यान) विचारात घेतो. पाचवा व सहावा निकष पक्ष्यांसंबंधी असून ह्यामध्ये वीस हजार पाणपक्ष्यांचा आढळ वा एखाद्या पक्षी प्रजातीच्या जागतिक संख्येच्या एक टक्का पक्ष्यांचा आढळ असणे जरुरी मानले गेले आहे. महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्र (इंम्पॉर्टंट बर्ड एरीया अर्थात आय. बी. ए.) घोषित करण्यासाठीच्या जागतिक निकषांमध्ये सुद्धा हे दोन निकष बघितले जातात. सातवा व आठवा निकष स्थानिक मत्स्य प्रजातींचा आढळ व त्या पाणथळीचे महत्त्व ह्यावर आधारित आहे. शेवटच्या व नऊव्या निकषात पक्षी सोडून इतर वन्यजीव प्रजातींच्या जागतिक संख्येच्या एक टक्का सदस्यांचा आढळ असणे जरुरी मानले गेले आहे.

महाराष्ट्रातील संभाव्य रामसर पाणथळ जागा:
रामसर मान्यतेच्या नऊ निकषानुसार विचार केला तर महाराष्ट्रातील अनेक पाणथळीच्या जागा पात्र ठरतात. २००८ मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व्दारा ‘पोटेंशिअल अँड एक्झीस्टिंग रामसर साईट्स इन इंडिया’ हा ग्रंथ प्रकाशित केला गेला. त्यात जायकवाडी पक्षी अभयारण्य (जि. औरंगाबाद), वेंगुर्ला रॉक्स (बर्न्ट आयलंड, जि. सिंधुदुर्ग), माहूल शिवडीची खाडी (जि. मुंबई), नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य (जि. नाशिक), ठाण्याची खाडी (जि. ठाणे-मुंबई) ह्या पाणथळ जागांचा समावेश होता. पण त्यांनंतर पक्षीमित्रांची संख्या वाढली व अनेक पाणथळींवर आढळणाऱ्या पक्ष्यांबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाली. आता पुन्हा एकदा आपण रामसर निकषांचा विचार केला तर उजनीचे धरण (भिगवण) (जि. पुणे-सोलापूर), हतनूर धरण (जि. जळगाव), नवेगावबांध (जि. गोंदिया), लोणार सरोवर (जि. बुलडाणा) ह्या स्थळांचा सुद्धा संभाव्य स्थळांच्या यादीत समावेश होतो. विशेष म्हणजे लोणार सोडून इतर सर्व जागा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व बर्डलाईफ इंटरनॅशनल व्दारा महत्वपूर्ण पक्षीक्षेत्रे (इम्पॉर्टंट बर्ड एरिया) म्हणून घोषित केलेल्या आहेत (संदर्भ: २०१६ मधील प्रकाशित आय. बी. ए. चा ग्रंथ).

जायकवाडी पक्षी अभयारण्य (जि. औरंगाबाद):
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यात असलेले जायकवाडीचे प्रचंड धरण १९७५ मध्ये गोदावरी नदीच्या पात्रावर बांधण्यात आले. इथे नैसर्गिक उंच-सखल भाग नसल्यामुळे हे धरण सपाट भागातच पसरलेलं आहे. साहजिकच तेथे ५५ किमी लांब आणि २७ किमी रूंद असा प्रचंड जलाशय तयार झाला आहे. १९८६ साली जायकवाडी पक्षी अभयारण्य घोषित करण्यात आले. ह्याच जलाशयाला ‘नाथसागर’ असे सुद्धा नाव दिले गेले आहे. या ठिकाणी ५०,००० हून अधिक पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच १०,००० पेक्षा अधिक करकरा क्रौंच दिसून आले होते. हजारो अग्निपंख (रोहित), इतर अनेक प्रकारचे रहिवासी तसेच स्थलांतरित बदके व चिखलपायटे पक्षी येथे आढळून येतात. स्थानिक पक्षी अभ्यासक डॉ. दिलीप यार्दी ह्यांनी या ठिकाणी २१३ प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद केली आहे. धरणाच्या आजूबाजूला असलेल्या गावातील शेतकरी अनधिकृतपणे धरणातील पाण्याचा शेतीसाठी उपसा करतात तसेच उन्हाळ्यात धरणाच्या कोरड्या पडलेल्या पात्रात गाळपेरा पद्धतीचे पिक घेतात.
२०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या अहवालात जायकवाडी रामसर स्थळ म्हणून प्रस्तावित करण्याचे घोषित केले होते. गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी पक्षी महोत्सव चालू करण्यात आला आहे.

माहूल शिवडीची खाडी (जि. मुंबई):
ट्राँम्बे व माहूल-शिवडीच्या खाडीतील दलदली अरबी समुद्राला मिळालेल्या आहेत. एकंदरीत हा पट्टा भरती-ओहोटीच्या दलदलीचा भाग (inter-tidal mudflat) आहे. जमिनीकडील बाजूला सर्वत्र कांदळवने (mangroves) पसरलेली आहेत. एकूण विस्तार १० किमी लांबी आणि ३ किमी रुंदी असलेला हा दलदलीचा पट्टा उत्तर गोलार्धातून स्थलांतर करून येणाऱ्या हजारो पक्ष्यांचे हिवाळी आश्रयस्थान बनतो. त्यात विशेष करून चिखलपायट्या पक्ष्यांचा समावेश असतो. कच्छच्या रणातून आणि मध्य पूर्वेतून स्थलांतर करून येणारे हजारो छोटे रोहित येथे जवळपास सहा महिन्यासाठी आश्रयाला येतात. येथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक रसायनांचे प्रदूषण असूनसुद्धा पक्षी येथे येतात व मुक्काम करतात हे आश्चर्यच होय. या ठिकाणी १५ ते २२००० छोट्या रोहित पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. सोबत हजारो चिखलपायटे (waders) पक्षी असतातच. येथे स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांची एकूण संख्या ५०,००० असावी असे अनुमान केले जाते.
२०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या अहवालात माहूल-शिवडीची खाडी रामसर स्थळ म्हणून प्रस्तावित करण्याचे घोषित केले होते. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व्दारा ‘फ्लेमिंगो फेस्टीवल’ (महोत्सव) चे आयोजन करण्यात येते. या दलदली पासून नव्या मुंबई ला जोडणारा ‘मुंबई ट्रांस हार्बर लिंक’ असा प्रचंड पूल बांधण्यात येणार असून त्यामुळे दलदली नष्ट झाल्या तर रोहित पक्षी येथे येण्याचे थांबतील अशी भीती व्यक्त केल्या जाते.

नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य (जि. नाशिक)
नाशिक जिल्ह्यातील निफाडजवळ असलेले नांदूर मध्यमेश्वर म्हणजे गोदावरी व कडवा नद्यांच्या संगमावर बांधलेल्या धरणामुळे तयार झालेले विशाल जलाशय होय. १९०७-१९१३ दरम्यान येथे बंधारा बांधल्या गेल्या होता. गेल्या एक शतकात गाळ साचून तसेच वनस्पतींची वाढ होऊन ह्या ठिकाणी पक्ष्यांसाठी उत्कृष्ट असा अधिवास निर्माण झाला. अर्थातच अशी पाणथळ जागा हजारो पक्ष्यांना आकर्षित करते. श्री दत्ताजी उगावकरांनी या ठिकाणी २३० पक्षी प्रजातींची नोंद केली आहे. दरवर्षी याठिकाणी येणाऱ्या पक्ष्यांची संख्या २०,००० हून नेहेमीच अधिक असते. २०१३ मध्ये या ठिकाणी २,५०० करकरा क्रौंच आढळून आले होते.
२०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या अहवालात नांदूर मध्यमेश्वर रामसर स्थळ म्हणून प्रस्तावित करण्याचे घोषित केले होते.

ठाण्याची खाडी (जि. ठाणे-मुंबई):
ठाणे खाडीचा पूर्व किनारा ठाणे व नवी मुंबई जिल्ह्यांमध्ये येतो तर पश्चिम भाग बृहन्मुंबई जिल्ह्यात येतो. उल्हास नदीचे गोडे पाणी ठाणे खाडीला येऊन मिळते. तसेच ह्या तिन्ही जिल्ह्याचे सांडपाणी उल्हास नदी तसेच ठाणे खाडीत येऊन मिळते. अर्थात त्यामुळे ठाण्याच्या खाडीतील पाणी खूप प्रदूषित झाले आहे. खाडीच्या भोवती कांदळवने तसेच मिठागरे आहेत.
ठाण्याची खाडी हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांनी गजबजते. या ठिकाणी एक लाख पक्षी आसरा घेऊ शकतात. विशेष करून हजारोच्या संख्येत स्थलांतर करून येणारे छोटे व मोठे रोहित मुख्य व महत्त्वाचे आकर्षण ठरते. सोबतच हजारोच्या संख्येत येणारे चिखलपायटे (waders) पक्षी जसे छोटा टिलवा (Little Stint) व समुद्री कुरय (Gulls). पक्षी अभ्यासकांनी ह्या ठिकाणी १७९ प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद केली आहे.
२००४ मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व्दारा ठाणे खाडीला महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्र घोषित करण्यात आले. २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या अहवालात ठाणे खाडीचा रामसर स्थळ म्हणून सहभाग केलेला नव्हता. २०१५ मध्ये महाराष्ट्र शासनाने ठाणे खाडीला ‘फ्लेमिंगो अभयारण्य’ म्हणून मान्यता दिली. त्यामुळे ठाणे खाडीच्या संवर्धनाचा मार्ग सुकर झाला. पूर्वी खाडीत मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांना आता कांदळवन विभाग ‘बर्ड गाईड’ म्हणून प्रशिक्षण देत असून होडीत बसून पक्षी निरीक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक स्थानिक कोळी कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहेच, सोबतच सर्वांना ठाणे खाडीतील पक्षीवैभव अनुभवणे शक्य झाले आहे. २०१६ मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व्दारा ठाणे खाडीला रामसर दर्जा मिळावा म्हणून निवेदन देण्यात आले.

उजनी जलाशय (जि. पुणे-सोलापूर):
पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील भिगवणजवळ भीमा नदीवर १९८० मध्ये बांधल्या गेलेल्या उजनीच्या धरणाचा उद्देश आजूबाजूच्या प्रदेशातील शेतीला पाणीपुरवठा करणे हा होता. आजूबाजूचा परिसर कमी पावसाचा व निमदुष्काळी होता.
आता उजनी जलाशय हजारो पक्ष्यांचे माहेरघर झाले आहे. हजारो स्थलांतरीत पक्षी येथे हिवाळा व्यतीत करण्यासाठी येतात. भिगवण जवळच्या भादलवाडीला रंगीत करकोच्यांचे सारंगागार आहे. पक्षी अभ्यासकांनी या ठिकाणी १६० प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद केली आहे. दुर्दैवाने आजूबाजूच्या परिसरातील शेतीपद्धतीत झपाट्याने झालेल्या बदलामुळे (वाढलेली ऊस लागवड) अनेकदा जलाशयातून जादा पाण्याचा उपसा होतो. असे घडते तेव्हा रंगीत करकोच्याची वीण अयशस्वी होते. उन्हाळ्यात जलाशयाचे पाणी आटले की अनेक बेटे तयार होतात. अशा बेटांवर शेकडो पाणपक्षी वीण करतात.
हा संपूर्ण जलाशय पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत आहे. २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या अहवालात उजनीला रामसर स्थळ म्हणून प्रस्तावित करण्याचे घोषित केले होते. २०१६ मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व्दारा उजनीच्या जलाशयाला महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली. उजनी जलाशयाला पक्षी अभयारण्य तसेच रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळावी अशी अनेक वर्षांपासूनची पक्षी अभ्यासकांची मागणी आहे.

हतनूर धरण (जि. जळगाव):
तापी आणि पूर्णा नद्यांच्या संगमावर बांधल्या गेलेल्या धरणामुळे हतनूर जलाशय निर्माण झाले. हे जलाशय जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात आहे. गेल्या काही दशकात ह्या जलाशयात साचलेला गाळ व वाढलेल्या वनस्पतीमुळे ह्या जलाशयात अनेक दलदलीचे प्रदेश, छोटी बेटे आणि उथळ डबकी तयार झाली आहेत.
वर्षभर जरी येथे भरपूर पक्षी असले तरी हिवाळ्यात त्यात हिवाळ्यात हजारो स्थलांतरित पक्ष्यांची भर पडते. याठिकाणी पक्षी अभ्यासकांनी २६१ प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद केली आहे. गेल्या काही वर्षांपासून येथे नियमित पाणपक्षी गणना केल्या जाते. फेब्रुवारी २०१३ मध्ये चातक निसर्ग संवर्धन संस्था व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व्दारा केल्या गेलेल्या पक्षीगणनेत एकूण ३१,१२८ पक्ष्यांची मोजदाद केल्या गेली. त्यानंतर दरवर्षी वीस हजारपेक्षा जास्त पक्ष्यांची येथे नोंद केल्या जात आहे.
२०१६ मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व्दारा हतनूरच्या जलाशयाला महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली तसेच रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाला पत्र पाठविण्यात आले. हतनूर जलाशयाला पक्षी अभयारण्य तसेच रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळावी यासाठी वरणगाव (जि. जळगाव) येथील चातक निसर्ग संवर्धन संस्था पाठपुरावा करीत आहे.

नवेगाव बांध (जि. गोंदिया):
नवेगाव राष्ट्रीय उद्यान भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांच्या दक्षिणेला वसलेले आहे. राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेला नवेगाव बांध हा जलाशय इटीयाडोह नदीवर बांधलेल्या बांधामुळे तयार झाला आहे. जलाशय उद्यानाच्या घनदाट जंगलाने वेढलेला आहे. ३०० वर्षापूर्वी बांधलेला हा जलाशय आता पक्ष्यांसाठी उत्कृष्ठ अधिवास झाला आहे. दरवर्षी हिवाळ्यात हजारो पक्षी येथे स्थलांतर करून मुक्कामाला येतात. दुर्दैवाने येथील पाणपक्ष्यांची गणना चांगल्याप्रकारे झालेली नाही. त्यामुळे पाणपक्ष्यांच्या संख्येची विशेष आकडेवारी उपलब्ध नाही. वनविभागाने प्रकाशित केलेल्या पक्षीसूचीमध्ये २०९ प्रजातीच्या पक्ष्यांचा अंतर्भाव आहे.
२०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या अहवालात नवेगावबांध रामसर स्थळ म्हणून प्रस्तावित करण्याचे घोषित केले. पण नंतर नवेगावबांध च्या प्रस्तावात कुठे तरी अडचण आल्याचे वनविभागातर्फे सांगण्यात आले होते.

लोणार सरोवर (जि. बुलडाणा):
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार जवळ असलेले हे खाऱ्या पाण्याचे सरोवर अंदाजे सहा लक्ष वर्षांपूर्वी झालेल्या प्रचंड उल्कापाताने निर्माण झाले असावे असे मानले जाते. त्याच्या ह्या निर्मितेचे तसेच खाऱ्या पाण्यामुळे वेगळेपण व महत्त्व आहे. तसेच याठिकाणी एक आगळीवेगळी परिस्थितीकी निर्माण झाली आहे. अंडाकृती असलेल्या सरोवराचा व्यास १.२ किलोमीटर असून सभोवती जंगलाने आच्छादलेल्या छोट्या टेकड्या आहेत. इथल्या जंगलाचा प्रकार म्हणजे शुष्क झुडूपी जंगल असून त्यात बऱ्याच प्रमाणात सागवान सुद्धा आहे. ह्या परिसरात पक्षीतज्ञांनी ११० पक्षी प्रजातींची नोंद केली आहे. सरोवरातील पाणी खारे असून त्यात विविध प्रकारची लवणे तसेच सोडा आढळतो. उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावली की सोड्याचे उत्पादन केले जाते.
परिसरात ६० वास्तूशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यात यादवकालीन तसेच हेमाडपंथी मंदिरांचा समावेश आहे. विशेष प्रसिद्ध असलेली पुरातन लोणासुर व दैत्यसुदन ह्यांची दोन मंदिरे आहेत. इ.स. २००० मध्ये लोणार वन्यजीव अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. पुढे चालून २०१६ मध्ये लोणार सरोवराचा अभयारण्यात समावेश करण्यात आला. आता अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ ३.६६ चौ.किमी. आहे.

वेंगुर्ला रॉक्स (बर्न्ट आयलंड)(जि. सिंधुदुर्ग):
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला बंदराच्या पश्चिमेला अरबी समुद्रात १४ किलोमीटर अंतरावर असलेला व्दिपसमूह होय. ह्या व्दिपसमूहात २० छोटेखानी बेटं आहेत. ही बेटं ओसाड असून येथे केवळ गवत उगवते. १९९८ मध्ये ह्या ठिकाणी हेन्झ लेनर ह्या पक्षीतज्ञाने २५००० सुरय पक्षी बघितल्याचा उल्लेख केला आहे. त्यात अंदाजे १५००० सूरय पक्ष्यांची घरटी असावीत असे अनुमान त्याने लावले होते. तसेच डॉ. सतीश पांडे ह्यांनी अंदाजे १८००० इंडियन एडीबल स्विफ्टलेट ह्या पाकोळ्या पाहिल्याचे नोंदवले आहे. ह्या बेटांवरील खडकाळ व अंधाऱ्या गुहांमध्ये इंडियन एडीबल स्विफ्टलेट ह्या पाकोळ्यांची मोठ्या प्रमाणावर वीण होते. ह्या पाकोळ्यांच्या घरट्यापासून सूप बनविल्या जाते. त्यामुळे त्यांच्या घरट्याची तस्करी होत असे. सह्याद्री निसर्ग मित्र तसेच महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे श्री भाऊ काटदरे व इतरांच्या प्रयत्नांमुळे पाकोळ्यांच्या अंड्यांची व घरट्यांची तस्करी थांबली आहे.

प्रयत्नांची गरज:
विशेष म्हणजे लोणार सोडून इतर सर्व जागा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व बर्डलाईफ इंटरनॅशनल व्दारा महत्वपूर्ण पक्षीक्षेत्रे (इम्पॉर्टंट बर्ड एरिया) म्हणून घोषित केलेल्या आहेत.
महाराष्ट्र वन विभागाने ह्या पाणथळ जागांना रामसर दर्जा मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.
२०१२ पासून सहा वर्षात महाराष्ट्र शासनाच्या विचाराधिन असलेल्या संभाव्य रामसर स्थळांपैकी एकाही स्थळाला अजूनतरी रामसर दर्जा मिळालेला नाही. पक्षीमित्रांनी पुढाकार घेऊन वन विभाग महाराष्ट्र शासन व पर्यावरण मंत्रालय, नवी दिल्ली ह्यांना ह्या बाबत पत्रे पाठवून विनंती करावी. बी.एन.एच.एस.ने पुढाकार घेतला आहेच. स्थानिक व राज्यस्तरीय प्रसार माध्यमांना ह्या बाबत बातम्या देऊन जनतेचे तसेच पक्षीमित्रांचे उद्बोधन करावे. ह्या ठिकाणी विविध कार्यक्रम घेऊन ह्या महत्त्वपूर्ण पाणथळींना नेहमी बातम्यांच्या प्रकाशझोतात ठेवावे. महाराष्ट्रात ही रामसर स्थळे घोषित झाली तर ती आपल्याला तसेच महाराष्ट्राला भूषणावह बातमी ठरेल व ह्या स्थळांना जागतिक पातळीवर मान्यता, प्रसिद्धी व संवर्धनासाठी आर्थिक पाठबळ मिळेल ह्यात वाद नाही.

डॉ. राजू कसंबे,
पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई
मोबाइल: ९००४९२४७३१.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान लेखन. माझ्या बालपणी ओढेनाले नद्या अगदी उन्हाळ्यात सुध्दा वहात असत. अनेक पक्षी करकोचे, बगळे, पाणकोंबडी, निवळी खूप पहायला मिळत. घारी तर खूप असत. कोंबड्यांची घारींपासून राखण करावी लागत होती. आणि गिधाडे भरपूर होती. आता घार, गिधाडे पहायला सुध्दा मिळत नाही. करकोचे कर्रकूच असा आवाज करत इंग्रजी व्ही आकारात रांगेत उडत ते पाहून मोठे नवल वाटायचं.

सुंदर लेख आणि माहिती.
यात वाशी आणि ठाणे जोडणार्‍या खाडीतले पक्षी अभयस्थान अद्भुत आहे. अशासाठी की मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या तीनही गजबजलेल्या आणि अशांत क्षेत्रांच्या लगत असूनही हे स्थान अतिशय निवांत आहे. जवळच भांडुप उदंचन किंवा मलनि:सारण केंद्र असूनही इथे पक्षीदर्शनासाठी शांतपणे नौकाविहार करता येतो. अर्थात सकाळी फक्त एकच फेरी असते आणि आधी नोंदणी करावी लागते. दिवसभर फेरी चालवल्या तर पाण्यात लहरी उसळून तसेच इंजीनाच्या आवाजाने पक्ष्यांना त्रास होतो. मोसमात ग्रेटर आणि लेसर फ्लेमिंगो, अनेक बगळे, इतर पाणपक्षी आढळतात. अगदी स्वच्छ जागा आहे आणि जवळून पक्षीदर्शन होते. आयरोळीहून जावे लागते. आणि तीनही नगरपालिकाक्षेत्रांतील जवळजवळ तीन कोटी लोकांसाठी अर्ध्या दिवसात जाऊन येण्याजोगे आहे.
लोणारचा प्रदेश रखरखीत आहे. तितकेसे समाधान होत नाही. अर्थात इथल्या हॅबिटाटमध्ये वेगळे पक्षी असतात. उजनी(भिगवण), जायकवाडी येथेही पक्षीदर्शन छान घडते. शिवडीला दलदल खूप आहे. बाकी स्थळे पाहायची बाकी आहेत.

खरे म्हणजे ह्या पाणथळ जागा महाराष्ट्राला जगाच्या नकाशात (रामसार च्या यादीत) आणण्याच्या योग्यतेची आहेत. पण शासन सोडून सर्वांना हे मान्य असावे. आपल्या हाती ह्या जागांचे संवर्धन व्हावे म्हणून प्रयत्न करणे एवढेच आहे. प्रतिक्रियांबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद!!