फुलपाखरांचे उद्यान उभारणी

Submitted by Dr Raju Kasambe on 26 July, 2019 - 07:07

फुलपाखरांचे उद्यान उभारणी

गेल्या काही वर्षात “बटरफ्लाय गार्डन वा बटरफ्लाय पार्क”ची संकल्पना हळूहळू भारतात रुजायला लागली आहे. “बटरफ्लाय गार्डन” नेमका काय आहे? तो कसा उभारतात? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. भारतात अनेक ठिकाणी शासकीय तसेच वैयक्तिक असे अनेक “बटरफ्लाय गार्डन” आज उभारले गेले आहेत, उभारले जात आहेत.
“बटरफ्लाय गार्डन” म्हणजे असा बगीचा जेथे अनेक प्रकारची फुलपाखरे एखाद्या छोट्या प्रदेशात कमी वेळात बघता येतील. “बटरफ्लाय गार्डन” म्हणजेच फुलपाखरांचे उद्यान किंवा बाग होय.
फुलपाखरांच्या उद्यानाला अगदी घटकाभऱ्यासाठी दिलेली भेट आपल्याला फार मोठा आनंद देऊन जाते. सिंगापूर आणि लंडनच्या फुलपाखरांच्या बंदीस्त उद्यानाला दरवर्षी लाखो लोक भेट देतात. दुर्दैवाने भारतात सध्या तरी त्याच्या तोडीचे फुलपाखरांचे उद्यान नाही.

फुलपाखरांची उद्याने मूलतः दोन प्रकारची असू शकतात, खुले तसेच बंदिस्त. फुलपाखरांचे बंदिस्त उद्यान म्हणजे एखाद्या छोट्याशा बागेला जाळ्या लावून चोहू बाजूनी बंदिस्त करून घेतल्यानंतर त्यात विविध प्रजातीची फुलपाखरे पकडून आणून अथवा पैदास करून सोडली जातात. उद्यान बंदिस्त असल्यामुळे फुलपाखरे बाहेर उडून जाऊ शकत नाहीत, अर्थात जेवढी फुलपाखरे सोडू तेवढी जास्त फुलपाखरे एका ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. अशाप्रकारची फुलपाखरांचे बंदिस्त उद्याने जेंटींग आयलंड (सिंगापूर), सिंगापूर विमानतळ, लंडन तसेच इतर अनेक ठिकाणी आहेत.

सिंगापूरचा “बटरफ्लाय पार्क” म्हणजे हिरव्या जाळ्या लावून पिंजऱ्यासारखा बंदीस्त करण्यात आलेला अख्खा बगीचा होय. ह्या बगीच्यात अनेक प्रजातीची रंगी-बिरंगी मोठी आणि सुंदर शेकडो फुलपाखरे दररोज सोडली जातात. खरे तर त्याकरिता फुलपाखरांचे शेकडो कोशीत विकत घेतले जातात. हे कोशीत विविध ठिकाणांवरून आयात केले जातात. हे कोशीत पुरविण्याचा मोठा व्यवसाय निर्माण झाला असून त्याद्वारा हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आपल्या देशातील (विशेषतः हिमालयातील आणि सह्याद्री पर्वतरांगातील) आदिवासींना अशा प्रकारचा रोजगार उपलब्ध करून देणे सहज शक्य आहे. त्यासाठी भारतीय वन्यजीव संवर्धन कायद्यामध्ये थोडी लवचिकता आणने आवश्यक आहे.
या ठिकाणी हे नमूद करणे आवश्यक आहे की आपल्या देशात फुलपाखरांचे बंदिस्त उद्यान उभारायला खूप साऱ्या परवानग्या घ्याव्या लागतात. ज्या एखाद्या सामान्य व्यक्तीला त्याच्या हयातीत मिळविणे शक्य होणार नाही ! त्याचे कारण असे की फुलपाखरांचे बंदिस्त उद्यान हे एक प्राणी संग्रहालय (Zoo) मानले जाते आणि फुलपाखरे सुद्धा वन्य प्राणी असल्यामुळे त्यांना भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ लागू होतो. तसेच झू ऑथॉरिटी ऑफ इंडियाची परवानगी घेणे अनिवार्य ठरते. जी मिळणे अत्यंत जिकीरीचे काम ठरते. अनेक शासकीय प्राणी संग्रहालयांना सुध्दा झू ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या नियमांची धास्ती असते !

दुसरा पर्याय म्हणजे फुलपाखरांचे खुले उद्यान उभारणे ! खुल्या उद्यानात फुलपाखरांना बंदीस्त केलेले नसते, तर त्यांच्या सर्व नैसर्गिक गरजा पूर्ण होत असल्याने फुलपाखरेच येथे मोठ्या संख्येत जमतात. फुलपाखरे स्वतःहून ह्या उद्यानात येतात-जातात. मुक्तपणे बागडतात. फुलपाखरांच्या खुल्या उद्यानाचा हा पर्याय त्या मानाने सोपा आणि अमलात आणण्याजोगा आहे. सुदैवाने, आज तरी फुलपाखरांचे खुले उद्यान उभारण्यासाठी कुठलीही परवानगी घ्यावी लागत नाही. महाराष्ट्रातील ठाणे शहरात ओवळा येथे येउरच्या जंगलाला लागून उभारण्यात आलेला “ओवळेकर वाडी बटरफ्लाय गार्डन” ह्याचे सुंदर उदाहरण होय. राजेंद्र ओवळेकर ह्या उत्साही निसर्गवेड्या शिक्षकाने स्वतःच्या वाडीत, स्वखर्चाने हे फुलपाखरांचे खुले उद्यान विकसित केले आहे.

फुलपाखरांचे खुले उद्यान उभारण्यासाठी उद्यानायोग्य जागा, मनुष्यबळ, फुलपाखरांबद्दल तसेच वनस्पतींबद्दलचे शास्त्रीय ज्ञान, भूप्रदेशाच्या नियोजनाचे (Landscaping) थोडेफार ज्ञान आणि आर्थिक तयारी ह्या गोष्टींची आवश्यकता असते. उद्यान जनतेसाठी खुले करून त्याद्वारे आर्थिक मिळकत कमवायची असेल तर प्रचार कौशल्य व व्यवस्थापन कौशल्य जरुरी आहे. केवळ स्वतःच्या आनंदासाठी उद्यान उभारायचे असेल तर मात्र प्रचार कौशल्य जरुरी नाही.

उद्यानायोग्य जागा:
फुलपाखरांचे खुले उद्यान उभारायचे असेल तर ज्या प्रदेशात फुलपाखरांची भरपूर विविधता आहे (जंगलातील खाजगी जमिनी), किंवा जंगलाला लागून असलेली जागा (उदा. शेतजमीन), किंवा शहराच्या सीमेवरील जमीनी अशा प्रकारच्या जागा निवडता येतील. मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेल्या भागात मध्यवस्तीत, कोरड्या प्रदेशात, ओसाड ठिकाणी (जेथे वनस्पती उगवणार नाहीत) अशा जागा टाळाव्यात. भारतात वाळवंटी प्रदेश, बर्फाच्छादित प्रदेश आणि शुष्क गवताळ प्रदेश सोडले तर इतर ठिकाणी फुलपाखरांचे खुले उद्यान उभारले जाऊ शकते.

मनुष्यबळ:
फुलपाखरांचे खुले उद्यान उभारायचे म्हणजे त्यासाठी उद्यानाच्या क्षेत्रफळाप्रमाणे मनुष्यबळ लागते. त्यामध्ये फुलपाखरांबद्दल तसेच वनस्पतींबद्दल शास्त्रीय ज्ञान असणाऱ्या व्यक्ती, पूर्ण वेळ उद्यानाची काळजी घेणारे माळी तसेच सर्व व्याप सांभाळणारा व्यवस्थापक किमान जरुरी असतो.

फुलपाखरांच्या गरजांचे शास्त्रीय ज्ञान:
एकदा का फुलपाखरांच्या खुल्या उद्यानाची जागा निश्चित झाली की मग आवश्यक असते ते फुलपाखरांच्या गरजांचे शास्त्रीय ज्ञान. आपण खुल्या उद्यानामध्ये फुलपाखरे पकडून अथवा बंदिस्त ठेऊ शकत नसल्यामुळे आपल्या जवळ एकच पर्याय उरतो, तो म्हणजे त्यांना आकर्षित करणे ! त्यासाठी त्यांच्या गरजा आपल्याला समजल्या तर पूढील कामाला दिशा मिळते.

१. सुरवंटाच्या खाद्य वनस्पती (larval host plant):
फुलपाखरांचे जीवनचक्र चार अवस्थांमध्ये पूर्ण होते. अंडी (egg), सुरवंट (caterpillar), कोशित (pupa) आणि फुलपाखरू. प्रत्येक फुलपाखरू एका किंवा अनेक पण काही विशिष्ट वनस्पतींवरच स्वतःची अंडी घालते. उदाहरणार्थ, प्लेन टायगर नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर, कॉमन क्रो नावाचे फुलपाखरू कण्हेरीच्या पानावर, तर कॉमन मोरमॉन नावाचे फुलपाखरू लिंबू व कढीपत्त्याच्या पानांवर अंडी घालते. त्या अंड्यामधून निघणारा सुरवंट त्याच वनस्पतीची कोवळी पाने खाऊन गुजराण करतो, वाढतो, व कालांतराने त्याचे कोशितामध्ये रुपांतर होते. त्या कोशितामधून निघणारे फुलपाखरू हे संपूर्ण वाढ झालेले वयस्क फुलपाखरू असते (ते पिल्लू वगैरे नसते). त्यामुळे आपल्या बागेत जेवढ्या प्रजातीच्या फुलपाखरांच्या खाद्य वनस्पती (Larval Host Plants) उपलब्ध असतील तेव्हढ्या प्रकारची फुलपाखरे आपल्या बागेत प्रजनन करु शकतील. अशा प्रकारे जन्माला आलेली फुलपाखरे त्यांच्या सर्व गरजा त्याच परिसरात पूर्ण झाल्या तर त्याच परिसरात राहण्याची जास्त शक्यता असते. आपल्या परिसरात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या जास्तीत जास्त खाद्य वनस्पती शोधून त्यांचे रोपण करावे, त्यांची बाग फुलवावी. वनस्पतींच्या वैविध्याची समृध्दी म्हणजेच आपल्या उद्यानात मुक्कामास येणाऱ्या आणि प्रजनन करणाऱ्या प्रजातींची समृध्दी होय ! उद्यानाच्या दृष्टीने कुठल्या वनस्पती महत्वाच्या आहेत ते माळ्याला वेळोवेळी समजावले गेले पाहिजे. अन्यथा निरुपयोगी तण (weeds) म्हणून फुलपाखरांच्या खाद्य वनस्पतीच उपटून काढायचा. अनेक प्रजातींची फुलपाखरे गवतावर अंडी घालतात हे येथे लक्षात घ्यावे.

२. फुलपाखरांच्या आवडी-निवडी:
फुलपाखरांना दात नसल्यामुळे त्यांना कुठलेही घन अन्न खाता येत नाही. तसेच जन्मतःच त्यांची पूर्ण वाढ झालेली असल्यामुळे त्यांना वाढ होण्यासाठी आहार घेणे गरजेचे नसते. ते केवळ द्रव रुपी आहार त्यांच्या शुंडेद्वारे शोषून घेतात. फुलपाखरांना उडण्यासाठी उर्जा मिळावी म्हणून ते भरपूर शर्करा असलेल्या फुलांमधील मधुरस (nectar) अथवा सडक्या-कुजक्या फळांमधील रस शोषून घेतात.

मधुरस-प्रिय फुलपाखरे:
अनेक प्रजातीच्या फुलपाखरांना फुलांमधील मधुरस आवडतो. त्यामुळे फुलांमध्ये अधिक मधुरस असणारी फुलझाडे तर कुठल्याही फुलपाखरांच्या खुल्या उद्यानाची शानच वाढवितात. फुलझाडांची निवड अशा प्रकारे केली जावी की वर्षभर उद्यानात फुले उपलब्ध असतील. अनेक प्रजातीच्या घाणेरीची (Lantana) झुडुपे, इक्झोराची (Ixora) झुडुपे, पेंटास (Pentas lanceolata) आणि अशा अनेक प्रकारच्या झुडुपांची अनुभवाप्रमाणे लागवड करायला पाहिजे. प्रत्येक प्रजातीच्या फुलपाखराची शुंडा (proboscis) ही कमी-अधिक लांबीची असते. त्याप्रमाणे फुलपाखरांची फुलांची निवड सुध्दा वेगवेगळी असते. आखूड शुंडा असलेल्या फुलपाखरांना (जसे लायसेनिडी व हेस्परिडी कुळातील काही फुलपाखरे) लांब फुलातील मधुरस मिळविणे शक्य नसते. लांब शुंडा असलेल्या फुलपाखरांना (जसे पापिलीनिडी व हेस्परिडी कुळातील काही फुलपाखरे) लांब फुलातील मधुरस मिळविणे मिळविणे सोपे जाते.
म्हणून उद्यानात विविध आकाराची फुले वर्षभर उपलब्ध असणे सुध्दा महत्त्वाचे आहे.
आणखी एक मजेदार गोष्ट अशी की आपला सर्वांचा आवडता गुलाब हा फुलपाखरांच्या दृष्टीने एकदम निरूपयोगी वनस्पती होय. त्यामुळे उद्यानात गुलाबाची लागवड करून जागा, श्रम व पैसे व्यर्थ खर्च करू नये. त्यावर कुठलेही फुलपाखरू आकर्षित होत नाही.

मधुरस-नावडणारी फुलपाखरे:
सर्वच प्रजातीच्या फुलपाखरांना फुलं आवडतात हे काही खरे नाही. अनेक प्रजातीच्या फुलपाखरांना फुलं अजिबात आवडत नाहीत. अशा फुलपाखरांना केवळ उग्र दर्प असलेली सडकी-कुजकी फळे, प्राण्यांचे मल-मुत्र, तसेच ओलसर जागा आवडतात. त्यांना आवश्यक ती द्रव्ये ती अशा ठिकाणी मिळवतात. त्यामुळे अशा फुलपाखरांसाठी उद्यानात एखाद्या भांड्यात सडकी-कुजकी फळे झाडाला लटकवून (मुंग्या लागू नयेत ह्या उद्देशाने) ठेवतात. अशा सडक्या-कुजक्या फळांवर भरपूर फुलपाखरे आकर्षित होतात. अशा फुलपाखरांमध्ये अनेक प्रजातीची ब्राऊन फुलपाखरे, कॉमन नवाब, ब्लॅक व टॉनी राजा, ब्लू ओकलीफ, कॉमन बॅरन, गॉडी बॅरन, आदींचा समावेश होतो. साधरणतः निम्फालिडी कुळातील फुलपाखरे विशेषतः ह्या प्रकारात मोडतात.

३. भूप्रदेशाचे नियोजन (Landscaping):
फुलपाखरांचे खुले उद्यान उभारताना सुरुवातीपासूनच भूप्रदेशाचे कसे नियोजन करायचे आहे त्या गोष्टी स्पष्ट असायला हव्या. उद्यानामध्ये माळी तसेच उद्यानाला भेट देणाऱ्या व्यक्तींसाठी पध्दतशीर नियोजित केलेले पथमार्ग असावेत. ते सिमेंटचे असणे जरुरी नाही. त्याचे नियोजन अशाप्रकारे केलेले असावे की फुलांच्या ताटव्याजवळ जाताना इतर वनस्पती तुडवल्या जाऊ नयेत.

फुलपाखरांच्या दृष्टीने कोवळे उन्ह फार महत्वाचे असते. फुलपाखरे शीत रक्ताचे जीव असल्यामुळे दररोज त्यांना स्वतःच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी उन्हात पंख शेकत बसावे लागते. त्यामुळे उद्यानात भरपूर उन्हं पडणारे भाग राहतील याची काळजी घ्यावी. अशा भागात फुलांचे ताटवे व सुरवंटाच्या खाद्य वनस्पतीचे वाफे तयार करावेत. ‍

अर्थात मोठी झाडे लावताना उद्यानाच्या मोजक्याच अथवा विशिष्ट भागात सावली पडेल अशी खबरदारी घ्यावी. उद्यानाची जागा मोठी असल्यास अशी झाडे उद्यानाच्या पूर्व दिशेला लावावीत. जागा कमी असल्यास पश्चिम दिशेला लावावीत. अनेक वनस्पतींना चांगली वाढ होण्यासाठी तसेच फुलं येण्यासाठी भरपूर उन्हं लागतं. अशा वनस्पती भरपूर उन्हं पडेल अशा ठिकाणी लावाव्यात.

उद्यानात एक रोपवाटिका राखली जावी. शक्य तितक्या सुरवंटाच्या खाद्य वनस्पतींची थोडी रोपं इथे जाळीबंद आणि सुरक्षित ठेवावीत. कारण उद्यानात अनेकदा काही रोपटी मरून जातात तर काही रोपटी खादाड सुरवंट संपवून टाकतात. अशा वेळेस दूरवरून मिळविलेली सुरवंटाची खाद्य वनस्पती उद्यानात टिकवून ठेवता येते.

उद्यानाच्या जागेत कुठे नैसर्गिक खोलगट भाग असेल तर त्या जागेवर चिखल निर्माण होईल अशा दृष्टीने जास्त जलसिंचन करावे. चिखलाच्या कडेला बारीक वाळू टाकून ओलसर वाळूचा भाग तयार करावा. बऱ्याच फुलपाखरांना अशा जागा चिखलपाण (mud-puddling) करायला आवडतात.

प्रजातीनिहाय फुलांचे ताटवे फुलवले तर उद्यानाला सौंदर्य तर प्राप्त होतेच, सोबतच कुठली फुलपाखरे कुठे शोधायची ते सोपे होते. संपूर्ण उद्यानात झाडांना पाणीपुरवठा करणारी प्रणाली (जसे ठिबक सिंचन अथवा तुषार सिंचन) सुरुवातीलाच बसवून घ्यावी. दररोज फुलझाडांना पाईपने पाणी घालण्यासाठी जास्त मनुष्यबळ तसेच खर्च लागतो.

४. आर्थिक नियोजन:
फुलपाखरांचे खुले उद्यान उभारायची सुरुवात करण्यापूर्वी त्याला बऱ्यापैकी खर्च येतो आणि लागलीच उत्पन्न मिळेलच याची शाश्वती नसते, ह्या गोष्टी मनात ठेवणे जरुरी आहे. उद्यानासाठी लागणारी जागा (मोफत वा स्वतःची) उपलब्ध असेल तर त्यामानाने कमी खर्च येतो. पण विविध वनस्पतींची रोपे विकत आणणे, उद्यानाला लागणारा मासिक खर्च (पाणी, विद्युत बिल, कर्मचाऱ्यांचे पगार, तज्ञांचे मानधन इ.) हा गृहीत धरून चालावे. एकदा उद्यान उभारून झाले की काम संपले असे होत नाही. त्याची योग्य प्रकारे निगा राखली गेली नाही तर आपणास निरूपयोगी असलेल्या वनस्पतींची (weeds) अनियंत्रित वाढ होऊन आपण लावलेली रोपे मरून जातात. कालांतराने उद्यानास अवकळा येते.

५. महत्त्वाची खबरदारी:
महत्त्वाची एक खबरदारी अशी की उद्यानात कुठल्याही प्रकारचे कीटनाशक, कीडनाशक, तृणनाशक रासायनिक द्रव्य (insecticides, pesticides, weedicides) वापरू नये. त्यामुळे फुलपाखरांचे सुरवंट (अर्थात फुलपाखरेच की) मृत्युमुखी पडून पर्यायाने फुलपाखरांची संख्या घटते ! खत म्हणून केवळ नैसर्गिक सेंद्रिय खत वा शेणखत अथवा तत्सम खतांचाच उपयोग करावा. उद्यानातच एखाद्या कोपऱ्यात झाडांचा पालापाचोळा सडवून त्यापासून नैसर्गिक खत तयार केले तर खत विकत घेण्याचा खर्च वाचू शकतो.

डॉ. राजू कसंबे,
डोंबिवली (पू.), जि. ठाणे, महाराष्ट्र
भ्रमणध्वनी: ९००४९२४७३१.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुलपाखरू छान किती दिसते ही कविता आठवली. डॉ साहेब, फुलपाखरे पर्यावरणासाठी चांगलीच असतात का? विषारी प्रजाती असू शकतात का, किंवा फुलपाखरे रोग वगैरे गोष्टींचा प्रसार करतात काय?

छान लेख.
माझ्या ( डोंबिवलीतील)बाल्कनीतल्या झाडांंवर गेल्या दोन वर्षांपासून फुलपाखरे येणेच बंद झाले. खरं म्हणजे आजूबाजूसही कुठेही क्वचित एखादे दिसते चारपाच महिन्यांत. कारण - शहरीकरण. मानपाडा ते हाजीमलंग डोंगर असा मोठा वन्य भाग आता वन्यच राहिला नाही.
जाऊ द्या.

मस्त माहिती, धन्यवाद.
मी घरी फक्त ब्ल्यू स्नेक वीड चे रोप लावले होते. त्यावर फुलपाखरे, चतुर आणि नित्यनेमाने पर्पल सनबर्ड येत असत.

हो, या झाडावर फार येतात फुलपाखरे. अजून दोन चार देशी आहेत. तुंगारेश्वर अभयारण्यात बरीच फुलपाखरे आहेत. सेप्टेंबर ते फेब्रुवारी. ( प्रवेश ३६रु/- सुरू केला आहे.)

ही घाणेरी लावली होती फुलपाखरांसाठी विडिओ १

हे एक झुडुप, यावर टायगर जातीची फुलपाखरे येतात. कितीही जवळ गेलं तरी खाणं सोडून जात नाहीत. विडिओ २

मस्त माहिती. आमच्या गावात बंदिस्त उद्यान आहे. फार मजा येते तिथे. हाताखांद्याडोक्यावर बरीच फुलपाखरे न घाबरता येऊन बसतात. तिथे हेही कळले की त्यांचे आयुष्य केवळ ४-५ दिवसाचेच असते.
हो, आणि खुले उद्यान केले तर एकाच जागी मोठ्या संख्येत असलेल्या सुरवंटांचे शिकारी येण्याची शक्यता नाही का?

खुले उद्यान केले तर अनेक कोळी तसेच शिकारी पक्षी सुद्धा येतात. पण ते निसर्ग चक्र आहे. आपण फुलपाखरे बघायची. त्यांची संख्या खुप वाढते. आनंद मिळतो.