द डेथ ट्रॅप भाग ४

Submitted by स्वाती पोतनीस on 26 July, 2019 - 00:57

स्वाती पोतनीस
द डेथ ट्रॅप
भाग ४
बुधवारी सकाळी दाराच्या फटीतून वर्तमानपत्र आत पडले. वेदांतीला ते वाचायला अजिबात वेळ नव्हता. तिला लवकरात लवकर मुंबई गाठायची होती. तिला खात्री होती की तिने कितीही बजावले तरी पल्लवी गप्प बसणार नव्हती. तिने काही धोकादायक पावले उचलायच्या आत वेदांतीला तिच्या मदतीला जायचे होते. वेदांतीने वर्तमानपत्र उचलून घेतले आणि दिवाणखान्यातील टेबलवर टाकले. विवेकने ते उचलले आणि वाचायला सुरुवात केली. त्याने जोरजोरात हाका मारून वेदांतीला बोलावले, “वेदांती लवकर ये.”
“विवेक, तुला माहित आहे न मी मुंबईला निघाली आहे. मग आत्ता कशाला मला हाक मारतो आहेस?”
“अग, ही बातमी बघ किती शॉकींग आहे?”
“कुठली बातमी?”
“हा फोटो बघ.” वेदांती बातमी बघू लागली. वर एका प्रेताचा फोटो होता. फोटोतली मुलगी पल्लवी होती. तो फोटो पाहून वेदांती मटकन खाली बसली. “हॉरीबल आहे हे विवेक. हे कसे काय झाले? अरे परवाच मी तिच्याशी बोलले होते.”
“दे पेपर इकडे. मी तुला बातमी वाचुन दाखवतो.”
विवेकने बातमी वाचायला सुरुवात केली, ‘आज पहाटे मुंबई पुणे रस्त्याजवळील एका आडरस्त्यावर वरील प्रेत दिसून आले. सदर मुलगी साधारण बावीस तेवीस वयाची असून तिच्या अंगावरून मोठे जड वाहन गेले असावे. हा अपघात कोणीही बघितला नाही. कोणत्या वाहनाने हा अपघात झाला असावा हे कळत नाही आहे. ती तिथे कशी आली असावी याचा कुठलाही अंदाज येत नाही. याठिकाणी आजूबाजूला फारशी वस्ती नसलेल्या रस्त्यावर हे प्रेत एका टेम्पोवाल्याला दिसून आले. तिच्याजवळ कोणतेही सामान सापडले नाही. त्यामुळे तिची ओळख पटणे कठीण जात आहे. ही मुलगी कॉलेजला जाणारी किंवा नोकरी करणारी असावी. कोणी तिला ओळखत असल्यास खालील नंबरवर वाशी पोलीस ठाण्यात फोन करावा. नंबर 40xxxxxx.’ वेदांतीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वहात होते. काही वेळ ती बोलू शकली नाही. विवेकने थोडा वेळ तिला रडू दिले. मग तो म्हणाला, “चल आवर. मी पण येतो तुझ्याबरोबर मुंबईला,”
क्षणभर वेदांतीला वाटले त्याला बरोबर घेऊन जावे. पण तिने स्वतःला सावरले. तो बरोबर असता तर ती आपले काम नीट करू शकली नसती. “नको विवेक. मी आत्ता एकटीच जाते. बाकीच्या मैत्रिणी मला भेटणार आहेत. शिवाय तुझी कामे सोडून आयत्यावेळेस तू कसा काय येणार?”
“नक्की ना? नाहीतर मी कामांची व्यवस्था लावून तुझ्याबरोबर येतो.”
“नको नको. मला गरज वाटली तर मी तुला बोलावून घेईन.” वेदांती घाईघाईने म्हणाली.
वेदांती आरामबसमध्ये बसली. तिने मोबाईल उघडून बघीतला. बऱ्याच मैत्रिणींचे फोन येऊन गेले होते. तिने मुद्दाम फोन उचलले नव्हते. मैत्रिणींनी मोबाईलवर बरेच निरोपही पाठवले होते. वेदांती कुठे आहे अशी विचारणा होत होती. काही मैत्रिणींनी पल्लवीच्या आईला फोन केला होता. पल्लवीच्या वडिलांनी पोलिसांना फोन केला होता. ते दोघे मुंबईला बारा वाजेपर्यंत येणार होते. मैत्रिणी पल्लवीच्या घरी बारा नंतर जाणार होत्या. वेदांतीलाही त्यांनी तिच्या घरी येण्याचा निरोप मोबाईलवर पाठविलेला होता. वेदांतीच्या मनात विचारचक्र चालु झाले. तिला मनोमन खात्री वाटत होती. हा अपघात नाही. घातपात आहे. अशावेळेस ती जर पल्लवीच्या घरी गेली तर तिथे नवतेज ऍग्रोमधील लोकांशी भेट होण्याची शक्यता होती. तिचा आणि पल्लवीचा काही संबंध आहे हे कोणाला कळू न देणे इष्ट होते. त्यामुळे वेदांतीच्या घरी आत्ता जायचे नाही हे तिने मनाशी पक्के केले. तिने ठरविले कोणाच्याही फोनला किंवा निरोपाला उत्तर द्यायचे नाही. तिने फोन बंद करून ठेवला. शिवाय तिला नवतेज ऍग्रोमध्ये मुलाखतीसाठी जायचे होते.
वेदांती प्रथम मुंबईमधील तिच्या सासूबाईंच्या घरी पोहोचली. त्या पुण्याला आल्यापासून ही सदनिका बंदच होती. तिथे एक दोन शेजारी सोडले तर आजूबाजूला रहाणारे कोणी तिला कोणी ओळखतही नव्हते. ती इमारत जुन्या काळात बांधली गेल्यामुळे आत्ताप्रमाणे त्या सोसायटीत चार पाच इमारती, पहारेकरी असे काहीही नव्हते. भेटायला येणाऱ्यांनी गेटवर नोंद करणे असा शिरस्ता तिथे नव्हता. त्यामुळे ती इमारतीत शिरली तेव्हा तिला कोणीही आडवले नाही. मुंबईत लोक सकाळी लवकर घराबाहेर पडत असल्यामुळे आत्ता इमारतीत मोलकरणींशिवाय घराबाहेर कुणी दिसणार नाही हा अंदाज तिने केला.
नवतेज ऍग्रोच्या ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी तिला स्वतःमध्ये काही बदल करायचे होते. तिने डोक्यावर पुढच्या केसांचा पफ बनविला. उरलेल्या मागच्या केसांचे पोनी बांधले. नाजूक लाल काड्यांचा कॉम्प्युटरचा चष्मा डोळ्यांवर चढविला. डोळ्यांमध्ये काजळ घालून ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक लावली. चेहऱ्याला कधीच मेकअप न लावणारी वेदांती एवढ्याशा मेकअपनेसुध्दा एकदम वेगळी दिसायला लागली. ती कायम पॅँट शर्ट मध्ये असे. त्याऐवजी तिने लेगीन्स आणि कुर्ता चढवला. आता तिच्यात अमुलाग्र बदल झाला होता. त्यात तिने स्कार्फ बांधला. यामुळे तर तिला तिच्या मैत्रिणींनीसुध्दा पटकन ओळखले नसते. पल्लवी नवतेज ऍग्रोच्या ऑफिसमध्ये पोहोचली. एच आर मध्ये तिची मुलाखत घेण्यात आली. व्यवस्थापिका कपूर तिला म्हणाली, “आमच्या कडून तुमची निवड झालेली आहे. परंतु शेवटचा निर्णय आमचे व्यवस्थापकीय संचालक घेतील. आज आमच्या इथे घडलेल्या एका दुःखद घटनेमुळे ते ऑफिसला येऊ शकलेले नाहीत. त्यामुळे उद्या ते तुमची मुलाखत घेतील.”
दुसऱ्या दिवशीची सकाळी नऊची वेळ ठरवून ती तेथून बाहेर पडली. खरेतर तिला आजच कामाला सुरुवात करायची होती. जेवढा उशीर होईल तेवढे पुरावे मिळणे अवघड जाणार होते. शिवाय तो माल गोडाऊन मधून दुसरीकडे हलवला जाण्याची शक्यता जास्त होती. तिने सुमितला फोन लावला. फोन व्यस्त होता. सुमित ‘मास मिडिया’ शिकत असताना तिचा वर्गमित्र होता. आता तो मुंबईत काम करत होता. ती घरी पोहोचली आणि सुमितचा तिला फोन आला, “काय म्हणतेस वेदांती? आज कशी काय आठवण झाली?” “मला काही माहिती हवी आहे.”
“कसली माहिती?”
“तुला मुंबईतल्या ड्रग रॅकेटबद्दल काय माहिती आहे?”
“तुला नक्की काय माहिती हवी आहे? म्हणजे मधे पकडल्या गेलेल्या ड्रग डीलर्सबद्दल की आत्ता जे त्यात काम करत आहेत त्यांच्याबद्दल.”
“आत्ता जे त्यात काम करत आहेत त्यांच्याबद्दल.”
“मी तुला देतो माहिती. आपल्यातील करारानुसार तुला ही माहिती कशासाठी हवी आहे हे मी विचारणार नाही. तरीपण सांगतो तू जर यात काही स्टिंग ऑपरेशन वगैरे करणार असशील तर ते खूप धोकादायक आहे. यात बऱ्याच वेगवेगळ्या एजन्सीज काम करीत आहेत. त्यांचे जाळे फार मोठे आहे. आणि मोठे मोठे लोक यात गुंतलेले आहेत. ते कोणासमोर येत नाहीत. ज्यांची पब्लिक इमेज खूप चांगली आहे असे सुध्दा लोक यात आहेत. एकच नाव फक्त असे आहे की जे कोणालाच माहित नाही. त्या व्यक्तीचे अस्तित्व आहे हे पोलिसांना माहित आहे. परंतु नाव कुणालाच माहित नाही. असे म्हणतात ती खतरनाक व्यक्ती या गेममधली सर्वात मोठी प्लेयर आहे.”
“मला माहित आहे सुमित, प्रत्यक्ष विकणाऱ्या माणसाला नक्की माहित नसते आपल्याला माल पुरविणारा कोण आहे किंवा आपण कोणासाठी काम करतो. तो फक्त मधल्या माणसाला भेटलेला असतो. त्यामुळे बाहेरून ही माहिती मिळणे अशक्य आहे. म्हणून तर मी तुला फोन केला. तुझे खबरे असतीलच. आणि मुंबईतला माझा खबऱ्या तू आहेस.”
“मी तुला सांगतो त्या चहाच्या टपरीवर ये. समोरासमोर माहिती देणे सोयीचे होईल.”
वेदांती सुमितने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचली. सुमित आधीच येऊन तिची वाट पहात होता. वेदांती समोर आली तरी त्याने तिला ओळखले नाही. शेवटी तिने हात हलवून म्हटले, “हाय सुमित.” कसा आहेस?”
“आं? वेदांती तू. अगं किती बदल झालाय तुझ्यात? लग्नानंतर तू एवढी बदलशील असे वाटले नव्हते.”
“काही वेळा बदल गरजेचे असतात.”
“ओह. आले लक्षात.”
“कसा आहेस तू?”
“मस्त. तू कशी आहेस?”
“बोअर झाले होते. पण बरेच दिवसांनी मनासारखे काम मिळाले आहे.”
“ही घे. तुला हवी ती माहिती.”
“ही माहिती तुझ्याकडे तयार होती वाटते?”
“हो. यातल्या काही लोकांना पकडून देण्यात माझाच हात होता. परंतु ही पकडली गेलेली मंडळी फक्त प्यादी आहेत. त्यातील काहीजण निसटले. जे पकडले गेले त्यांना जास्तीत जास्त चार पाच वर्षांची शिक्षा होईल. त्यांच्या केसेस अजुन चालु आहेत. त्यांच्या जागी दुसरी मंडळी येऊन पुन्हा ऍक्टीव्ह झाली आहेत. त्यांना पकडून काही उपयोग नाही. खरे सूत्रधार मिळाले पाहिजेत. ती माणसे मात्र नामानिराळी राहतात. हे घे कागद. यावर कुठे कुठे विकले जाते. जे काम करत आहेत त्यांची नावे, आणि काही सप्लायर्सची नावे आहेत. खाली मी ज्यांना पकडून दिले होते त्यांचे फोटो आणि बातमी आहे.”
वेदांतीने ते फोटो चाळले. जवळजवळ दहा बारा अठरा ते पंचवीस वयोगटातली मुले त्यात होती. फोटोतील चेहरे फारसे स्पष्ट दिसत नव्हते. तिने ते कागद सॅकमध्ये ठेऊन दिले.
वेदांतीने विचारले, “तू सद्ध्या प्रदर्शने, किंवा गाण्याचे कार्यक्रम, व्याख्याने यावर लक्ष केंद्रित केले आहेस वाटते. मी तुझे लेख वाचत आहे वर्तमानपत्रात.”
सुमित म्हणाला, “हो. सद्ध्या मी वर्तमानपत्र आणि आकाशवाणीसाठी काम करत आहे.”
वेदांती म्हणाली, “तू काहीही सांगत असलास तरी मला हे पटत नाही आहे. हे काम करण्यासाठी तू पत्रकार झाला नव्हतास.”
“खरे आहे. परंतु मला तसे दाखवावे लागत आहे. माझे काम पूर्ण झालेले नाही. मी अजुन माहिती काढायचा प्रयत्न करतोय. मला या प्याद्यांमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. परंतु ते लोक आता सावध झाले आहेत. त्यामुळे मी उघड काम करत नाही आहे. माझ्यावर पाळत ठेवली जात आहे.”
“काय सांगतोयस?”
“आत्ताही माझ्या मागावर असलेल्या माणसाला मी चुकवून आलो आहे. यापुढे मी तुला प्रत्यक्ष भेटू शकणार नाही. तुला काहीही मदत लागली तर मला फोनवर सांग. मी फोनवर भेटलो नाही तर या सत्याकडे निरोप ठेव. तो माझा खबरी आहे. कुठलेही संकट आले तर तोही तुला मदत करेल.”
“तुला तुझ्या सोर्सेसकडून नावे कळली नाहीत का?”
“ते एवढे सोपे नाही. मला काही मोठ्या माणसांची नावे कळणार आहेत. परंतु सतत काहीतरी घटना घडत आहेत. आणि ती नावे बाहेर येत नाही आहेत. ती माणसे कामच थांबवत आहेत. काहीतरी घडत आहे. उलथापालथ होते आहे हे नक्की. चल मला निघाले पाहिजे.”
सुमितने हाक मारली, “सत्या, हे पैसे घेऊन जा.”
सत्या टेबलापाशी येऊन पेले उचलायला लागला. पैसे घेता घेता तो म्हणाला, “काहीतरी घडले असावे. दोन दिवस झाले. मार्केटमध्ये माल आलेला नाही आहे.” सुमितने सत्याचा नंबर वेदांतीला एका चिठ्ठीवर लिहून दिला आणि दोघे उठले.
सुमित गेल्यावर वेदांतीने जान्हवीला फोन लावला, “जान्हवी, मी तुझ्याकडे येत आहे.”
जान्हवी जवळजवळ ओरडलीच, “अग आहेस कुठे तू? सकाळपासून किती फोन केले तुला.”
“मी आरामबसने मुंबईला येत होते. ती वाटेतच बंद पडली. आम्हाला यायला काही वाहनच मिळेना. एक कॅब कशीबशी मिळाली. पोचेनच मी पंधरा मिनिटांत.”
“तुला कळले का इथे काय रामायण झाले आहे ते? आपल्या सगळ्या मैत्रिणी मुंबईत आल्या आहेत.” असे म्हणून जान्हवीने तिला पल्लवीबद्दल माहिती दिली. वेदांतीनेही पहिल्यांदाच बातमी ऐकत असल्यासारखे दाखविले. परंतु जान्हवीचे बोलणे ऐकल्यावर सकाळपासून दाखविलेला संयमाचा बांध फुटला. आणि ती रिक्षातच परत रडायला लागली. जान्हवीचे घर जवळ आले तसे तिने डोळ्यांवरचा चष्मा काढून टाकला. केस परत मोकळे सोडले आणि स्कार्फ बांधून टाकला. आता ती पुन्हा पहिल्यासारखी दिसायला लागली. काही झाले तरी पल्लवीबद्दल आपल्याला माहित आहे आणि आपण पुढे काय करणार आहोत हे तिला मैत्रिणींना कळून द्यायचे नव्हते.
क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतेय .. उत्कंठा वाढत आहे ..
सुमित ला वेदांतीने बऱ्याच दिवसांनी फोन केला असे संभाषणावरून वाटले .. वेदांती मुंबई ला आल्याचा उल्लेख न करताही सुमित ला कसं कळलं कि वेदांती मुंबई ला आलीये .. डायरेकट चहाच्या टपरी वर बोलावले ?!
कि मी काही मिस करतेय ?!