द डेथ ट्रॅप भाग २

Submitted by स्वाती पोतनीस on 25 July, 2019 - 01:18

स्वाती पोतनीस
द डेथ ट्रॅप
भाग २
पल्लवी गाडीत बसली आणि तिने डॉक्टर दिवेकारांना फोन केला. “डॉक्टर, पल्लवी अग्निहोत्री बोलते आहे.”
“बोल पल्लवी”
“डॉक्टर माझे तुमच्याकडे एक महत्वाचे काम आहे. मी यासाठी फोन केला की तुमच्या दवाखान्यात खूप गर्दी असते आणि नंबर लावून वाट पहायला माझ्याकडे वेळ नाही आहे.”
“O.k. असं कर दवाखान्यात आलीस की रिसेप्शनीस्ट कडून निरोप पाठव. मी तुला लगेच भेटतो.”
“thank you डॉक्टर.”
.....
पल्लवीने पुडी डॉक्टरांच्या समोर ठेवली. “डॉक्टर यातली भुकटी बघा आणि कशाची आहे ते मला सांगा.”
डॉक्टरांनी पुडी उघडली. आत पांढरट पिवळसर रंगाची भुकटी होती. त्यांनी दोन बोटांच्या चिमटीत ती उचलली आणि त्याचा वास घेतला. साधारण विनेगर सारखा वास येत होता. डॉक्टरांचा चेहरा गंभीर झाला. त्यांनी विचारले, “हे तुला कुठे मिळाले?”
“डॉक्टर, मी तुम्हाला आत्ता काही सांगू शकत नाही आहे. परंतु हे काय आहे ते मला सांगता का?”
“हेरोईन आहे असे वाटते. पण ते लॅब मध्ये तपासणीसाठी दिल्यास खात्री करून घेता येईल.”
“मला तीच शंका होती. डॉक्टर तुम्ही ही तपासणी करून घेऊ शकता का?”
“पल्लवी मला माहित आहे तू एक चांगली मुलगी आहेस. तू भलत्या गोष्टींच्या नादी लागणार नाहीस. पण हा काय प्रकार आहे ते मला कळल्याशिवाय मी तुला काहीही मदत करणार नाही. तू मला आधी हे तुला कुठे मिळाले ते सांग.”
“डॉक्टर माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे. मला एका पार्टीला जायचे आहे.”
“कसली पार्टी? रेव्ह पार्टी का?”
“डॉक्टर मी असे काही करेन का?”
“मला माहित आहे ग. मी मजा केली. पण इथे तू एकटी रहातेस. मी तुला, तुझ्या घरच्यांना चांगले ओळखतो. त्यामुळे तू काय करते आहेस हे विचारणे माझे कर्तव्य आहे.”
“ही पावडर आमच्या कंपनीच्या गोदामात एका खोक्यात मला सापडली.”
“ह्याचा काही पेस्टीसायडल उपयोग आहे असे माझ्या माहितीत तरी नाही.” डॉक्टर म्हणाले.
“म्हणूनच तर मी हे तपासणीसाठी आणले आहे.”
“मला सविस्तर सांगशील का नक्की तुझा काय विचार आहे ते? कुठल्याही धोकादायक प्रकारात लक्ष घालू नकोस.”
“डॉक्टर माझ्याकडे खरच वेळ नाही आहे. आमच्या कंपनीचे मालक नवतेज यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस आहे. त्याची पार्टी आहे. मला जावेच लागेल. आणि घरी यायलाही उशीर होईल. उद्या संध्याकाळी मात्र मी तुम्हाला सविस्तर सांगेन. तुम्ही प्लीज तपासणी करून घ्याल का?”
“ठीक आहे. उद्या सकाळी मला दहा वाजता फोन कर.”
.....
पल्लवी पार्टीत पोहोचली तेव्हा पार्टी अगदी रंगात आली होती. स्टेजवर ऑर्केस्ट्रा चालु होता. थंड पेये आणि स्टार्टर्स लोकांमध्ये फिरवली जात होती. पल्लवी तिचे साहेब नवतेज आणि त्यांच्या पत्नी काव्याला शोधत होती. तेवढ्यात तिला जोरात हसण्याचा आवाज आला. सगळ्यांचे लक्ष तिकडे गेले. काव्या एका स्त्रीला टाळी देऊन जोरात हसत होती. ते हसणे इतके मुर्खासारखे वाटले की नवतेजला ओशाळल्यासारखे झाले. अर्थात येणाऱ्या पाहुण्यांसाठी ही गोष्ट नवीन नव्हती. काव्या जितकी सुंदर होती तेवढीच बुध्दू होती. धिप्पाड म्हणण्याइतकी उंच आणि मजबूत होती. मोठमोठ्याने बोलणे, हसणे, कोणावरही टीका करणे ही तिची सवय होती. परंतु तिच्या सौंदर्याचा एवढा प्रभाव पडत असे की तिच्या मूर्खपणाकडे आपोआपच दुर्लक्ष केले जाई. त्यातून ती नवतेजची पत्नी होती. तो श्रीमंत तर होताच शिवाय त्याचे त्याच्या मित्रांशीच नव्हे तर सर्व कर्मचार्यांशी वागणेही चांगले होते. तो कधीही कुणाला दुखवत नसे. यामुळेच त्याच्या पार्टीत माणसांची कमतरता नसे. आपल्या पत्नीचे वागणेही त्याला आवडत नसणार, परंतु तो कधी तिला गप्प बसवत नसे.
पल्लवी त्यांच्याजवळ पोहोचली. तिने बुके देण्यासाठी हात पुढे केला. काव्याने तिच्या हातातून जवळजवळ बुके ओढून घेतला. “पल्लवी, खूप छान बुके आहे. पण तुला उशीर का झाला?”
“थोडासा उशीर झाला खरं मला. सॉरी.”
“बरोबर आहे. पार्टीसाठी तयार व्हायला वेळ लागला असेल न तुला. मला तर दोन तास पुरत नाहीत.”
पल्लवी नुसते हसली. नवतेज म्हणाला, “पल्लवी तिकडे आपल्या ऑफिसमधील सर्वजण आहेत. चल, मी तुला त्यांना भेटवतो.”
पल्लवी सर्वांच्यात मिसळून गप्पा मारू लागली. त्यांचे जेवण होत आले आणि चंदेल तिथे आला. नवतेज त्याचे स्वागतच करत होता तेवढ्यात काव्या तिथे आली आणि चंदेलला म्हणाली, “पार्टीत एवढया उशिरा आलायत कामावरही असेच उशिरा येता का?” चंदेल खजील झाला. नवतेज म्हणाला, “अरे एवढे मनावर नको घेऊस. तुला माहित आहे नं तिचा स्वभाव चेष्टेखोर आहे ते?” परंतु तिच्या बोलण्याने नवतेजलाही ओशाळल्यासारखे झाले होते.
.....
पल्लवीचे मन पार्टीत फारवेळ रमेना. शेवटी थोड्यावेळाने ती पार्टीतून घरी निघून गेली. घरी जातानाही तिच्या डोळ्यांसमोर ती दहा खोकी आणि भुकटीच येत होती. त्या खोक्यांचे पुढे काय करत असतील हे कसे शोधावे हाच विचार तिला सतावत होता. शेवटी मनाशी काही निश्चय करून तिने आपली मैत्रीण वेदांती विद्वंसला फोन लावला. वेदांती पत्रकार होती. पण तिला बंधनात राहून काम करणे आवडत नसे. त्यामुळे ती एखादा सनसनाटी विषय निवडून त्याचा पाठपुरावा करीत असे. आणि मगच बातमी घेऊन एखाद्या चॅनेलकडे जात असे. पल्लवीने तिला सर्व माहिती दिली. चलनांचे फोटोही पाठवून दिले. वर तिला सांगितले, “वेदांती, मी जमतील ते सर्व पुरावे गोळा करून तुला पाठवते.”
“हे बघ. मला प्रॉमिस कर मी येईपर्यंत तू वाट पाहशील. लक्षात ठेव, तू एकटीने काही करणार नाही आहेस. मी परवा मुंबईला येते आहे. मग आपण दोघी मिळून ठरवू काय करायचे ते. खूप धोक्याचे काम आहे हे. प्लीज ऐक माझे.” वेदांतीने तिला बजावले. पल्लवीने होकार देऊन फोन बंद केला. पल्लवीने जरी वेदांतीला होकार दिला असला तरी ती गप्प बसणार नाही हे वेदांतीने ओळखले. आपण लवकरात लवकर मुंबईला जाऊन पल्लवीची मदत करणे गरजेचे आहे हे तिच्या लक्षात आले. तिने नवतेज ऍग्रोची वेबसाईट उघडली. करियरच्या पर्यायावर जाऊन तिने कुठल्या नोकरीच्या जागा रिक्त आहेत ते पाहीले. यात व्यवस्थापकीय संचालकासाठी सचिव आणि जनसंपर्क अधिकारी या पदाच्या जागा रिकाम्या होत्या. तिने सचिवाच्या जागेसाठी अर्ज केला. यात पत्रकारितेचे प्रमाणपत्र न जोडता फक्त बी ए (इंग्रजी) चे प्रमाणपत्र जोडले. तिने कारकून पदाच्या एक वर्षाच्या अनुभवाचे स्वतःच्या नावाने एक प्रमाणपत्र तयार केले. वेदांतीचा नवरा उद्योजक होता. त्याच्या लेटर हेड वर ते प्रमाणपत्र छापून सही ठोकली. ते प्रमाणपत्र तिने आपल्या अर्जासोबत जोडले. ही नोकरी जर तिला मिळाली तर तिला पल्लवीला मदत करणे सोपे जाणार होते. कदाचित दुसऱ्याच दिवशी कंपनी कडून मुलाखतीला बोलावणे येण्याची शक्यता होती.
अपेक्षेप्रमाणे मंगळवारी सकाळी तिला एच आर विभागाकडून बोलावणे आले. ती मुलाखतीला दुसऱ्या दिवशी दुपारी येऊ शकेल असे तिने सांगितले. आणि ती मुंबईला जायच्या तयारीला लागली. आपल्या कामाबाबत वेदांती कायम गुप्तता पाळत असे. विवेकही तिने ते सांगावे यावर जोर देत नसे. परंतु एखाद्या ठिकाणी धोका असेल तर मात्र तिने ते सांगावे याबाबत तो आग्रही असे. आताही तिने विवेकला सगळे सांगायचे नाही असेच ठरविले. नाहीतर तो तिला मज्जाव करेल अशी तिला भीती वाटत होती. तिने विवेकला हाक मारली, “विवेक मी उद्या मुंबईला जात आहे एका आठवड्यासाठी.”
“एक आठवड्यासाठी? कुणाकडे जाणार आहेस.?”
“आम्ही कॉलेजच्या सगळ्या मैत्रिणी जमणार आहोत. काही पल्लवीकडे आणि काही जान्हवीकडे राहणार आहोत.”
“इतका अचानक कसा काय ठरला प्लान. तू मला काहीच बोलली नव्हतीस.”
“अरे आम्ही खूप दिवस ठरवत होतो. पण सगळ्यांची एकवेळ ठरेना.”
“आठवडाभर काय करणार आहात तुम्ही मुंबईत.”
“दोन तीन दिवस सहलीला जाणार आहोत. जान्हवीने सगळा प्लान करून ठेवला आहे.”
“खरे सांगते आहेस न तू मला? काही कामासाठी तर चालली नाहीस न?”
“अरे मी तुला सांगते की रे नेहमी. आता आमचे मैत्रिणींचे खूप दिवसांनी ठरले आहे. तू आता नाही म्हणू नकोस.”
“तुला जायला नको म्हणत नाही मी. पण तू माझ्या सम्पर्कात रहा. निदान मी केलेले फोन उचलत जा.”
“हो रे बाबा. मी पण करीन तुला फोन.” वेदांतीने पल्लवीला फोन करून बुधवारी मुंबईला येत असल्याचे सांगितले.
क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults