शेतातल्या पारावरुन विकांतघराच्या ओसरीतून.. (सुरुवात)

Submitted by निरु on 24 July, 2019 - 14:42

शेतातल्या पारावरुन विकांतघराच्या ओसरीतून.. (सुरुवात)

मुखपृष्ठ

मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांची शेतघरं (फार्म हाऊसेस)असतील आणि बर्याच जणांची विकांत घरं (विकेंड कॉटेजेस) पण असतील…

परंतु आपल्या ह्या मायबोलीवर अशासाठी एखादा कट्टा, ग्रुप, फोरम आधी कुणी काढलेला मला तरी अजून आढळलेला नाही..

म्हणूनच ह्या विषयावर सुसंवाद व्हावा, आपल्या काही गरजा असतील, अडचणी असतील, आनंद असेल, अगदी कटु आठवणीही असतील….

तर हे सगळं आपण इथे शेअर करावं, ते एकत्रित स्वरुपात एका ठिकाणी असावं यासाठी या ग्रूपचं,फोरमचं प्रयोजन…

आपण इकडे काय करू शकतो…..?

तर खरंतर बऱ्याच गोष्टी करू शकतो...

आपापल्या शेतघरात,विकांतघरात केलेली धमाल, मजा, मस्ती इथे देउ शकतो….

आपल्या शेतघराचे, शेताचे, विकांत घराचे, त्याच्या आजूबाजूच्या बागेचे फोटो शेअर करू शकतो…

आपण लावलेला भाजीपाला, आपण लावलेली झाडं, त्यांना आलेली फुलं फळं हे सगळं सगळं आपण इथे माहिती म्हणून किंवा फोटोतून देऊ शकतो…

आपल्या आवारात आलेले पक्षी, प्राणी, फुलपाखरं, किटक यांच इथे सगळ्यांना दर्शन घडवू शकतो..

जर कोणी सोलार हीटिंग, सोलार पॉवरचे, रेन वॉटर हार्वेस्टिंगचे म्हणजेच पर्जन्य जलसंधारणाचे प्रयोग केले असतील, ते यशस्वी झाले असेल, कदाचित अयशस्वीही झाले असतील, हे सगळं सगळं इथे देऊ शकतो…

अयशस्वी गोष्टींवर उपाय मिळतीलच याची गॅरेंटी नाही पण कदाचित मिळूही शकतील, इतरांच्या अनुभवाचा फायदा होऊ शकेल, निदान जे कोणी नवीन प्रयोग करणार आहेत ते फसलेल्या प्रयोगातली तीच चूक पुन्हा करणार नाहीत तर त्या कृतीमध्ये सुरुवातीलाच सुधारणा करून एक नवीन सुधारित कृती आपापल्या शेतात, विकांत घराच्या आवारात राबवू शकतील.

आपले झाडांच्या लागवडीचे प्रयोग, भाजीपाला लागवडीचे प्रयोग, फळांबाबतचे, फुलांबाबतचे प्रयोग हेही आपण इकडे देऊ शकतो..

एखादा पध्दतशीर ऍप्रोच ठेवून एखादी विशिष्ट लागवड केलेली असेल तर त्याची माहिती देऊ शकतो..

कंपोस्टिंग असेल, गांडूळ खत असेल, शेततळे असेल, विहीर खणणे असेल, विहीर पुनर्भरण असेल, बोरवेल असेल, बोरवेल रिचार्ज असेल... अशा सगळ्या गोष्टी, यशस्वी, अयशस्वी अनुभव, त्यावर जाणकारांकडून कळलेले आणि त्यानुसार केलेले प्रयोग आणि त्यानंतर शेवटी मिळालेले यश किंवा पुन्हा आलेलं अपयश हे सगळ आपण येथे देऊ शकतो..

एखाद्या विशिष्ट परिसरात विशिष्ट झाडं, झुडपं, फळं, फुलं ही जर चांगल्या पद्धतीनी बहरली असतील आणि ते इथे सांगितलं तर त्याच्या आजूबाजूच्या परिसरातले या ग्रुपचे सभासद किंवा वाचक त्याप्रमाणे त्या हवामानात, त्या मातीमधे सहजपणे, स्वाभाविकपणे रुजणारी, बहरणारी योग्य ती लागवड करू शकतील..

त्या परिसरात न बहरणारी विसंगत झाडं लावा, त्यात अयशस्वी व्हा यामधे त्यांचा वेळ वाया जाणार नाही... पदरी निराशा पडणार नाही.

आपण एका विशिष्ट परिसरामध्ये विशिष्ट बाबतीत (उदाहरणार्थ विहिर खणणे, ठिबक सिंचन) मजुरांचे दर किंवा अशा बाबीही शेअर करू शकतो जेणेकरून जर कोणी आपल्याला जास्त दर सांगत असतील तर आपली फसगत होणार नाही आणि आपली अपेक्षा कमी दराची असेल आणि जर ती रास्त नसेल तर त्या अयोग्य अपेक्षेमुळे आपल्याला माणूस मिळत नाही, टिकत नाही असं होऊन आपण नसताना शेत घराचा, विकांत घराचा मेंटेनन्स दुर्लक्षित रहात असेल तर ते टाळलं जाईल…

हे करणारी माणसं, टीम हवी असेल आणि इतरांकडून ती इथे कळली तर अदरवाईज अशी माणसं, टीम न मिळाल्यामुळे आपलं अडलेलं, रखडलेलं एखादं कामही मार्गी लागू शकेल..

यात सगळ्यात मजेचा म्हणा, आनंदाचा म्हणा, सहयोगाचा म्हणा असा अजून एक भाग म्हणजे जर जवळपासच्या घरा-परिसरातील सभासद एखाद्या विशिष्ट वारी जाणारच असतील तर आधी ठरवून भेटले, एकत्रच गेले, एकमेकांकडे गेले तर त्याची मजा आगळीच…. (कार पुलिंगमुळे पर्यावरणाची बचत हा Added/Fringed Benefit)

एखाद्या वेळी आपल्या घरातील इतर सभासद एखाद्या दिवशी यायला मोकळे नसतील आणि म्हणून जायचा कंटाळा येणार असेल तर अन्य सभासदांबरोबर एकत्र जाऊन त्या कंटाळ्यावर मात तर होतेच पण एक वेगळा आनंद मिळतो आणि सोबत नसल्यामुळे आपलं जाणं जे टळणार असेल तर सोबत मिळाल्यामुळे ती फेरी होऊ शकते, तिथलं एखादं काम होऊ शकतं, खरंतर एकदम मजेदार, आनंददायक प्रवास होऊ शकतो....

एकमेकांच्या फार्मवरच्या वस्तूंच आदान प्रदान याच्यासारखी तर आनंददायी दुसरी गोष्ट नाही.

एखाद्या वेळी आपल्याकडे एखादं पीक, एखादं प्रोड्यूस हे जर क्वान्टिटी मधे कमी असेल आणि त्या कमीपणा मुळे त्याची विक्री वाहतूक हे जर फायदेशीर होत नसेल तर जवळपासच्या सभासदांच्या एकत्रित पिकामुळे प्रोड्युस मुळे हीच गोष्ट यशस्वी होऊ शकेल.

त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने निवृत्ती नंतर निसर्गात रमण्यासाठी म्हणजे वानप्रस्थासाठी घर बांधलं असेल किंवा बांधणार असेल किंवा एखाद्याला त्याची वाडी/फार्म "ब्रेड आणि ब्रेकफास्ट" साठी सुयोग्य बनवायची असेल तर इथल्या चर्चेचा कदाचित उपयोग होऊ शकेल...
किंवा हे ज्यांनी आधीच केलेलं आहे अशा व्यक्तीही इथे छान माहिती देऊ शकतील..

यातला बाकी सर्व भाग क्षणभर बाजूला ठेवला तरी तिथे घालवलेले मौजमजेचे क्षण इथे शेअर केले तर अन्य मायबोलीकरांनाही त्याचा आनंद घेता येईल..

तेव्हा मित्रांनो जे जे शेतघर मालक आहेत, विकांत घर मालक आहेत त्यांनी त्यांना हा फोरम आवडला तर इथे जरूर हजेरी लावा… लिहा.. व्यक्त व्हा… प्र.चि. द्या...

ज्या लोकांनी नुसताच प्लाॅट घेतलाय पण घर बांधलं नाहीये आणि ज्यांनी काहीच घेतलं नाहीये पण घेण्याचा विचार आहे ते ही अर्थातच इथे सहभागी होऊ शकतात..

आणि जे नुसते वाचक आहेत त्यांचही इथे स्वागतच…!!!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कल्पना आहे निरू भाऊ. शेतकरी असलो तरी वाचक म्हणून आवडेल मला इथे हजेरी लावायला.

@ चक्रम माणूस,

पहिल्या वहिल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आणि विशेष आभार...

चांगली कल्पना आहे.

तुम्हाला समविचारी मंडळी भेटोत ह्या शुभेच्छा!!

फारच सुंदर कल्पना. अर्थात माझे शेतघरं किंवा विकांत घर नाही पण इथल्या माहितीचा नक्की उपयोग होईल.

शेतघर मालक आहेत, विकांत घर मालक आहेत त्यांनी त्यांना हा फोरम आवडला तर इथे जरूर हजेरी लावा… लिहा.. व्यक्त व्हा… प्र.चि. द्या...>> छान उपक्रम पण हे खूप अपर क्रस्ट शिरीमंत लोक्स असणार . ते स्वतः कसे लिहीतील. कॅमेरा पण डीएस एल आर असेल. असिस्टंट किंवा पीआर एजन्सी पोस्ट करतील इन्स्टाग्राम सारखे. आम्ही वाचूच. उपक्रमास शुभेच्छा.

नीरु फारच छान धागा.... हि कल्पना माझ्या ही डोक्यामध्ये आली होती. पण नाही जमले.
गावी शेतघर तर आहेच आणि विकेंड होम ही तेच. रोज जायला जमलं नाही तरीही महिन्याचा एक विकेंड आम्ही तिथे एन्जॉय करतो. फक्त एन्जॉय नाही कष्ट ही करतो.
नारळी, काजू, कोकम, चिकु, हापुस, फणस आणि थोडीफार भातशेती आहे.
स्वतः घरच्याच सगळ्यांनी प्रेमाने तयार केलं आहे हे सगळं.
दरवर्षी जागेची उपलब्धता पाहून एखाद्या तरी नवीन रोपाची भर होते यात.
जमेल तस मी स्वतः ईथे थोडी-थोडी माहिती आणि फोटो नक्कीच पोस्ट करत जाईन.

IMG_20190718_154342.jpg
( यातले अजुन काही फोटो मी जागु ताईच्या निसर्गाच्या गप्पा या धाग्या वर टाकलेले आहेत तरिही आवडीने ईथे टाकत आहे)
IMG_20190718_154455.jpg

>>>>छान उपक्रम पण हे खूप अपर क्रस्ट शिरीमंत लोक्स असणार . ते स्वतः कसे लिहीतील. कॅमेरा पण डीएस एल आर असेल. असिस्टंट किंवा पीआर एजन्सी पोस्ट करतील इन्स्टाग्राम सारखे.<<<

अस नसावं अमा.
तुम्ही म्हणताय असे काही लोकं असतीलही..
पण मी पाहिलेल्या बर्याच महाराष्ट्रीयन माणसांचं (जी मुंबई किंवा तत्सम शहरातच जन्मली म्हणून म्हणा किंवा नोकरीधंद्यानिमित्त इथे आले आणि गावाला, त्या वातावरणाला खूप Miss करतायत म्हणा) आपलं एखादं "खेड्यामधलं घर कौलारु" असावं असं स्वप्न असल्याचं पाहिलेलं आहे.
मधल्या काळात एखादं छोटेखानी विकांतघर घेणं किंवा गावाला ४, ५ गुंठे जमीन घेऊन किंवा असलेल्या जमिनीत घर बांधणं (Second Home) हे ही ह्या लोकांच्या आवाक्यात आलं..
काहीजणांनी ही घरं निवृत्ती नंतर रहाण्यासाठी घेतलेली आहेत.
तर काहीजणांनी छोटीशी स्थावर मालमत्तेमधे गुंतवणूक म्हणूनही घेतली आहेत. मुंबईकरांसाठी ह्या जागा वाडा तालुका, शहापूर, मुरबाड तालुका म्हणजे ५० ते ८५ किलोमीटरच्या अंतरात आहेत.. (लोणावळा वगैरे नाही परवडत सगळ्यांना).. पुण्याला ह्या जागा कदाचित पानशेत धरण, वरसगाव वगैरे ठिकाणी असतील तर महाराष्ट्राच्या अन्य शहरात त्यांच्या आऊटस्कर्टस् ला...
आणि हे बहुतेक सगळे अगदी आत्मीयतेने ह्या सेकंड होमला स्वतः, मित्रांसोबत जातानाही पाहिलेलं आहे. अगदी मुंबई पासून दापोली वगैरे पर्यंत लांबवर..
ही चर्चा, हा फोरम प्रामुख्याने अशांसाठी आहे..
अर्थात ज्यांची मोठी शेतघरं, विकांतघरं असतील तेही व्यक्त झाले तर सोनेपे सुहागा..

मात्र ही शंका व्यक्त केल्याबद्दल अतिशय आभार.
कारण अशा गैरसमजुतीमुळे हा धागा आपल्यासाठी नाही असं जर कोणाला वाटलं असतं आणि ते धाग्यापासून दूर राहिले असते तर धाग्याचा उद्देश सफल झाला नसता..
पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक धन्यवाद..

जे इतर दिवशी आपले घर आणि सुट्टीच्या दिवशी विकांतचे घर mange करतात त्यांना आणि विशेषतः महिला वर्गाला साष्टांग दंडवत

'सिद्धी'
छान सुरुवात, छान फोटो आणि शेताचा छान परिचय..
जसं जमेल तसं नक्की इथे फोटो, माहिती देत जा..

>>>पारावरून म्हणजे काय <<<

@ pracharak2002 आंब्याच्या, वडाच्या झाडाला पार बांधलेला असतो ना...
गावाकडचे लोकं पारावर बसून गप्पा मारतात..

छान.

सिद्धी वडाच्या झाडाच फोटो मिच काढलेलाआहे तुला नेटवर मिळालाय तो. तो आमच्या उरणच्या द्रोणागिरी डोंगरावर देऊळ अहे त्याच्या बाजूला आहे. तो परीसरही सुंदर आहे.

जागू ताई- होय कालच त्या फोटो वर नाव पाहील. मी फोटो डाउनलोड केला तेव्हा न्हवत पाहील. Bw
पण सांगायच राहुन गेल.

जागू ताई तु काढलेला फोटो छानच आहे. पाहताक्षणी मला आवडला. पार म्हणजे काय हे अगदी अचुक लक्ष्यात येत.

"माझ्याकडे देखिल एक फोटो आहे पण एवढा खास नाही आला.... विशेष म्हणजे मी ही हा फोटो मुरुड गावच्या डोंगरावरील दत्त मंदिरा जवळ काढला आहे."
IMG_20190726_124808.jpg

एका मायबोलीकरांना साधारणतः १६ गुंठे जागेत भविष्यात "ब्रेड अँड ब्रेकफास्ट " विकसित करायचे होते...
त्यांना इथेच मायबोलीवर मिळालेला सल्ला.. :

जरी 16 गुंठेच जागा असली तरी भविष्यातला ब्रेड अँण्ड ब्रेकफास्टचा विचार करता संपूर्ण जागेचा तुमच्या गरजेनुसार मास्टर प्लॅन बनवून घ्या.
त्यामधे आता आवश्यक असलेली व नंतर लागणारी स्ट्रक्चर्स मार्क करा.
ड्राईव्हवे, पार्किंग मार्क करा.
घरांभोवती चारही बाजूंनी थोडी मोकळी जागा सोडा.
एखादा हिरवळीचा पॅच दर्शनी भागात असू द्या. पाण्याची टाकी, सेप्टीक टँक, ड्रेनेज, केबलींग यासाठी जागा सोडा.
किचन वेस्ट, जागेतला पालापाचोळा, बायोडिग्रेडेबल वेस्ट जैविक खतात रुपांतरीत करण्यासाठी कंपोस्ट खड्ड्यासाठी जागा सोडा.
कोंबड्या, कुत्रे पाळणार असाल तर त्यांच्या रहाण्याच्या व्यवस्थेसाठी छोटीशी का होईना जागा सोडा.
केअरटेकर-माळ्याच्या रहाण्याच्या जागेचा विचार करा
सूर्य पूर्वेकडून दक्षिणेच्या बाजूने पश्चिमेकडे पोहोचतो, हा मार्ग (Sun-Path) विचारात घेऊन या बाजूला दाट सावलीची, उंच, एव्हरग्रीन झाडे लावा..
कंपाऊंड लगत सरळसोट वाढणारी झाडे लावा. किचन सांडपाण्याच्या ओलाव्यावर केळी, कर्दळी, अळू वाढवा.
कुठलीतरी सिझनल भाजी कायम तयार असेल यासाठी किचन गार्डन प्लॅन करा.
या व्यतिरिक्त उरलेल्या जागेत काही फळांची आणि काही फुलांची झाडे लावा.
शेवगा, कडिपत्ता, लिंबू अशी तुलनेने कमी श्रमाची पण रोज उपयोगी पडणारी झाडे त्यात असू द्यात.
झाडं लावताना परदेशी वाणाची लावण्याऐवजी देशी वाणाची असू द्यात ज्यामुळे ती फुलपाखरं, पक्षी, कीटक या परिसंस्थेची योग्य काळजी घेतील आणि जमिनीलाही समृद्ध करतील.
आजीबाईच्या बटव्यातली नेहमी किरकोळ आजारावर उपयोगी पडणारी औषधी झाडंही असू द्यात.
पाणी कायमस्वरुपी मिळावे याची सोय करा आणि हा पुरवठा शाश्वत आणि निरंतर रहावा यासाठी जल पुनर्भरण (Rain Water Harvesting)/ पाणी अडवा पाणी जिरवा याची सोय करा.
घर बांधाल तेव्हा त्याच्या दक्षिण बाजूच्या छपरावर किंवा गच्चीवर पाणी गरम करण्यासाठी सोलर पॅनलची व्यवस्था करा.
सुरुवातीलाच गार्डन लाईट्स, फुट लाईट्स आणि स्ट्रीट/कंपाऊंड लाईट्स साठी सोलरचा विचार करा. सुरुवातीला हा खर्च किंचित जास्त वाटला तरी विजेचा वापर वाचल्यामुळे पाच/साडेपाच वर्षात ह्याचा परतावा मिळतो आणि त्यापुढे दहा/बारा वर्ष तरी हे टिकते...
कुंपणासाठी शेर, घायपात अशा जिवंत अथवा सजीव, कडु, काटेरी कुंपणाचा वापर करा.
झाडं लावताना चुलीसाठी सरपण म्हणून बाभळीसारखी काही जळाऊ लाकडे देणारी झाडे लावा.
एखाद दुसरी गाय पाळू शकल्यास दुधाची आणि ते कमी मिळाले किंवा नाही मिळाले तरी अतिशय महत्वाच्या शेणाची/शेणखताची सोय होईल.
हे नियोजन झाल्यावर ह्याच्या अधेमधे लागवडीसाठी Cash Crop आंतरपिकांचा विचार करा.
लाखी बाग म्हणून एक Concept आहे, त्याची पुस्तके, आंतरजालावर माहिती मिळते का ते पहा...

भविष्यात ब्रेड अँण्ड ब्रेकफास्ट केलंत तर उत्तमच, पण नाही केलं तरी तुमच्या विकेंड/रोजच्या/निवृत्ती नंतरच्या आनंदी निवासा साठीही हे नियोजन उपयोगी पडेल..
शुभम् भवतु....

निरुदा छान माहिती दिलीत !!! मी "ज्यांनी काहीच घेतलं नाहीये पण घेण्याचा विचार आहे " या कॅटेगरीतील आहे. बघूया स्वप्न पूर्ण होतेय का ते.

निरुदा खरच छान माहिती.
"ब्रेड अँड ब्रेकफास्ट " Concept आवडली.

कंपोस्ट साठी अजुन थोडी माहीती - घरात निघणारा भाजीचा कचरा, उष्टे खरकटे, पालापाचोळा हा वाया न घालवता तो ३ बाय ३ फूटांचा खड्डा करून त्यात टाकावा. ह्याचे सुंदर कंपोष्ट खत तयार होते. त्यामुळे आपल्याला कचरा लांबवर न्यावा लागत नाही. व घाणही येत नाही. ह्यासाठी घरामागील कोणताही कोपरा निवडला तरी चालेल.
- हे कंपोस्ट "उरलेल्या जागेत जी काही फळांची आणि काही फुलांची झाडे लावणार यासाठी फार उपयोगी पडते".

शशांकजी, जागू - अभिप्रायाबद्दल धन्यवाद......

>>>मी "ज्यांनी काहीच घेतलं नाहीये पण घेण्याचा विचार आहे " या कॅटेगरीतील आहे. बघूया स्वप्न पूर्ण होतेय का ते.<<<
@ गोल्डफिश : स्वप्न मनापासून पाहिलं तर नक्की पुरं होईल..

'सिद्धि' फोटो, माहिती आणि मुख्य म्हणजे तुझा या ग्रुपवरचा वावर खूप छान..!!!
Keep It Up...

निरू, खूप छान माहिती.

जैविक कचरा जिरवण्यासाठी गांडुळांचा वापर केल्यासही उत्तम दाणेदार खत मिळते. अगदी चहा पावडरसारखे दिसते. त्यात झाडांच्या वाढीसाठी उत्तम असलेली पण rare असलेली द्रव्ये तयार होतात. ओलावा धरून ठेवायची क्षमता असल्याने झाडांना पाणी कमी लागते.

Pages