युगांतर- आरंभ अंताचा भाग ६

Submitted by मी मधुरा on 21 July, 2019 - 06:22

ब्रह्मदेवांचा क्रोध ! ज्यामुळे त्यांनी स्वपुत्री मृत्यूलोकात धाडली! देव - देवतांना भोगाव्या लागलेल्या या शापप्राप्त यातनांच्या अग्निकुंडात बळी पडला अजून एका अप्सरेचा! अद्रिका! मृत्युलोकी मस्य रुप धारण करण्याचा ब्राह्मदेवांचा शाप भोगण्यासाठी ती धरेवर अवतरली. धरेवरून पहटेच्या काषायवर्ण सुर्यदेवांचे रुप पाहून तिला मनोमन आनंद झाला. सुर्यदेवांचे प्रतिबिंब यमुनेच्या जलप्रतलावर पडलेले होते. नदी प्रवाहावर येणाऱ्या अलगद लाटांनी त्या प्रतिबिंबाला अस्थिर करत सर्व जलास केशरी छटा दिली होती. सुर्यदेवाच्या त्या लोभस रुपाकडे पाहत अद्रिकेने भानूदेवाला नमन केले आणि यमुनेच्या जलप्रवाहात प्रवेश केला. पापणी लवते न लवते तोच तिचे एका विशाल मत्स्यात रुपांतरण झाले. मिळालेल्या नविन शरिराचे अवयव ती हलवून पाहू लागली. नाजूक कल्ले, दोन मोठ्ठे डोळे, काळभोर शेपटी. सगळ आत्मसात करायला तिला काहीसा वेळ लागला. काही काळातच प्रवाहाचे जलतुषार शेपटीने दुरवर उडवत तिने जलातून बाहेर यायचा प्रयत्न केला. परंतु हवेतील प्राणवायु आता तिच्या योनीला स्विकारता येणे अशक्य होते. जलाच्या आतच विहार करावा लागणार म्हणून खिन्न होत तिने जलातच विहार करायला सुरवात केली. अद्रिकेला वाटले तितक्या सहजणे तिची शापातून सुटका होणार नव्हती बहुदा!
अंबराल्या सुर्यदेवांचे स्थान आता भुप्रतलावरून अगदी मधोमध दिसत होते. वाढू लागले तसे धरेचे आणि जलाचे तापमान हळूहळू अधिक होत गेले. छेदी नरेश सुधन्वा उष्णतेच्या दाहाची तमा न करता वनात शस्त्र घेउन वाट चालत होता. पितरांच्या आज्ञेनुसार प्राण्याची शिकार केल्या शिवाय त्याला परतणे शक्य नव्हते. निर्मनुष्य वनात एकेक ध्वनी कान देउन तो ऐकत होता. कोण जाणो, शिकार करायला जावे आणि कोणी आपणास भक्ष्य बनवावे. वाऱ्याने सळसळणाऱ्या पर्णाचा आवाज येत होता. अचानक त्याला शिकारी पक्षाची चाहूल लागली. डोक्यावर घिरटी घालून त्या पक्षाने पायाच्या पंजातल्या चिट्टी वरचा दाब काढून घेतला आणि जवळच्या वृक्षाच्या फांदीवर बसला. चिट्टी उचलून सुधन्वाने वाचली. त्यांच्या रजस्वला धर्मपत्नीने गर्भधारणेची व्यक्त केलेली इच्छा त्या पत्रात वाचून सुधन्वा राजा धर्मसंकटात सापडला. पितरांची आज्ञा पाळणे हा धर्म आहे तर धर्मपत्नीची इच्छा पूर्ण करणे हे आद्यकर्तव्य! आज्ञा पूर्ण झाल्या शिवाय महाली परतणे अनुचित! आज्ञा दिलेले कार्य पूर्ण करावयास किती घटिका, दिन, सप्ताह लागतील हे तोही सांगू शकत नव्हता.
त्याला सुवर्णमध्य उमगला. शस्त्र जमिनीवर टेकत त्याने जवळच्या घनडाट वृक्षाची काही पर्णे काढली. धर्मपत्नीचे स्मरण करत त्याने वीर्य पर्णात मंत्रबंधित करून पक्षाकडे सुपूर्त केले. शिकारी पक्ष्यांने छेदी महालाचा मार्ग धरला. वाटेतल्या डोंगर, दर्यांवरून अधिक अंतर ठेवत पक्षांने अर्धा मार्ग पुर्ण केला होता. पंखाना अजून जोरात फडफडवत पक्षाने वेग वाढवला. तितक्यात एक दुसरा शिकारी पक्षी तिथे घिरट्या घालू लागला. त्या शिकारी पक्षाने अचानक झालेल्या आक्रमिक धक्क्याने संदेशवहन करणाऱ्या पक्षाच्या चोचीतून पर्णकोष यमुना नदीच्या प्रवाहात पडला.
सुर्यदेव पश्चिमेस झुकले आणि नदीचे जल शितल बनत गेले. मत्स्य अद्रिका सांज वेळी अस्वस्थपणे नदीप्रवाहात येर झारा घालत होती. तिच्या अस्वस्थपणाचे कारण ग्रहण केलेला पर्णकोष होता, याची तिला कल्पनाही नव्हती.

क्रमशः

#Mahabharat
#Yugantar_Aaramb_Antacha
#Yugantar_Part6

©मधुरा

Part 5 link :

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2544387885620572&id=10000148...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धर्मपत्नीचे स्मरण करत त्याने आपले वीर्य पर्णांमध्ये मंत्रबंधित करून पक्षाकडे सुपूर्त केले.
कृपया हे प्रसंग टाळावेत, किंवा फक्त सुचक लिहावं. असे प्रसंग ठळक करून त्याच आधारे हिंदू धर्माची कुचेष्टा करण्यासाठी काही मंडळी आतुर असतात. त्यामुळे त्यांच्या हाती कोलित दिल्यासारखे होते. छान आहे हा भागही.

Nice..
keep posting! keep writing!
waiting for next episode.

भाग ५ पर्यंत आवडली कथा. लिखाण छान.
मात्र ईथे काही गोष्टी खटकल्या.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

ह्यात खटकणारी कोणतीही गोष्ट नाही. वरील कथेतील बहुतांश शब्द हे महाभारतात आहेत. ही कथा महाभारताची सुरुवातीची कथा आहे.