युगांतर - आरंभ अंताचा भाग ३

Submitted by मी मधुरा on 20 July, 2019 - 07:57

हस्तिनापुरात आनंद वार्ता पसरली. सम्राट प्रतिप यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली होती. पुरुवंशाचा दिपक! बाळाला हातात घेउन सम्राटनी प्रेमाने त्याच्या तेजस्वी मुखकमलावरून हात फिरवला. "शंतनू....!" त्यांच्या मुखातून नाव बाहेर पडताच सर्वांनी युवराज शंतनू च्या नावाने जयघोष सुरु केला. ढोल-नगारे वाजवत जल्लोषाचे ध्वनी हवेच्या लहरींसोबत सर्वत्र पसरले.

युवराज शंतनू दिवसागणिक एकएक कलांमध्ये पारंगत होत होता. वेळाचे चाक बालपणापासून यौवनापर्यंतचा प्रवास करत आयुष्यातल्या एका मनमोहक वळणावर येउन ठेपले. शंतनू हस्तिनापुरनगरीचा सम्राट बनला. धर्म आणि न्यायाचे राज्य अबाधित टिकून राहावे याची संपूर्ण जवाबदारी त्यानी त्याच्या भक्कम खांद्यावर पेलली.

न्यायदानाचे कार्य पूर्ण करून वनविहाराला म्हणून शंतनू महाराज डोंगरावरून कोसळणाऱ्या नदी किनारी येउन बसले. नदीच्या पाण्याबद्दल त्यांना कायमच अनामिक ओढ वाटायची. तो शुभ्र प्रवाह, पारदर्शकता, पवित्रता.... रथअश्व तिच्या तटाकडे वळवायला शंतनूला भाग पाडायचे. नदीतटी आसनस्थ होत त्याने प्रवाहाच्या पाण्यास स्पर्श केला. त्या थंड स्पर्शाने शंतनूचे मन शहारले. कदाचित त्याचा भास असावा, पण जलसुद्धा त्याच्या स्पर्शाने शहारल्याच त्याला जाणवलं. मंत्रावल्यासारखा तो त्या पाण्याच्या पृष्टभागावरून हात फिरवत होता. प्रवाह त्याच्या हातांवर आदळून मार्ग बदलत होता.

इतक्यात पल्याडच्या तटावरचा पैंजणांचा मंजूळ स्वर त्यांच्या कानी पडला. नजर त्या दिशेने वळवत आपल्या या एकांतात मधे कोणी बाधा घालण्याची हिंमत केली ते बघायला शंतनूने मान मान उंचावली. समोर मृगनयनी श्वेत वस्त्रातली हिऱ्यांच्या दागिन्यांनी सजलेली स्त्री. साक्षात स्वर्गसुंदरीच! काळभोर विशाल नेत्र, लांबसडक वळणदार केस.... शंतनू तिच्याकडे पाहतच राहिला. 'ते रुप, ते लाघवी हास्य किती परिचयाच वाट्ट नै?' निशेसमयी अंबरात दिसणाऱ्या शांत चंद्रकोरी कडे एकटक पहावे वाटते. ही सुंदरी आणि त्या चंद्रकोरी मध्ये नेमक काय अंतर आहे? तो हरवला. तिच्या त्या विशाल नेत्रांमध्ये. आपले अस्तित्व विसरून तिच्या डोळ्यांत हरवलेला शंतनू कितीतरी घटिका तिला न्याहाळत होता. संध्या सरून रात्रीने अंबरावर लुकलुकणाऱ्या चांदण्यांचे दिवे उजळवले. त्या अंधूकशा प्रकाशात ती सुंदरी दिसेनाशी झाली. शंतनू अस्वस्थ झाला. रंजक स्वप्नातून अनैच्छिकपणे जागे व्हावे आणि ते स्वप्न एकाएकी विरून जावे, अशी स्थिती झाली. त्याने नजर तिक्ष्ण करत तिला पाहण्याचा एक व्यर्थ प्रयास केला.
हताशपणे तो रथावर चढला. रथाने महालाचा मार्ग धरला. नदीतट दिसे पर्यंत शंतनूची नजर तिला शोधत होती.

©मधुरा

क्रमशः

#Yugantar_Part3
#Mahabharat
#Yugantar_Aarambh_Anatacha

Part 2 link : https://m.facebook.com/story.php?story_fbid=2539196086139752&id=10000148...

Part 4 Link:
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2542474512478576&id=10000148...
Note: Picture found on net.

Group content visibility: 
Public - accessible to all site users