निसर्गातला “फ्री सेल” आणि भुरटे चोर

Submitted by Dr Raju Kasambe on 20 July, 2019 - 01:20

निसर्गातला “फ्री सेल” आणि भुरटे चोर

“अहो तिकडे बघा ‘फ्री सेल’ लागलाय”
सौ मोठ्या उत्साहाने मला सांगते. मी बाईक सांभाळत ते होर्डिंग बघतो. अशी होर्डिंग्ज आणि पेपरातल्या मोठ्या जाहिराती बघून आम्ही अनेकदा खरेदी करायला जातो. नंतर कळते की “फ्री” काहीच नव्हते. थोडीफार सूट होती. त्या जाहिरातीत कुठेतरी ‘तारांकित’ केलेलं होतं. म्हणजे कुणी कुणाला सहज फुकट म्हणून असं काही देत नसतं. हे पुन्हा पुन्हा अनुभवून सुद्धा ‘फ्री सेल’च्या पाट्या आम्हाला भुरळ घालत राहतात.

जंगलात सुद्धा असं होतं का? सुरुवातीला जंगलात फिरायला गेलो की आपल्याला सुंदर पक्षी फुलपाखरे दिसतात. ती आपल्याला भुरळ घालतात. नंतर आपण त्याचे निरीक्षण करायला लागतो. तेव्हा कुठे आपल्याला हळूहळू अनेक गोष्टी दिसायला लागतात. उमजायला लागतात. जंगलातील झाडं-पानं-फुलं पक्ष्यांसोबत, फुलपाखरांसोबत तसेच इतर झाडांसोबत संवाद साधताना दिसू लागतात. झाडांना जरी स्वतःला चालता-फिरता येत नसलं तरी आपली कामं इतरांकडून कशी करवून घ्यायची हे त्यांना चांगलंच साधलेलं आहे.

पावसाळ्यात कारवीला सुंदर निळीशार तर पावसाळ्याचा भर ओसरत आला की मुरुडशेंगेला (‘इंडिअन स्क्रू ट्री’) छान केशरी फुलं येतात. हिवाळा संपत आला की थंडीचा जोर कमी होऊ लागतो. एखादी कळ दाबल्याप्रमाणे निसर्ग आपले रूप पालटतो. अचानक हिरवळीला कळा लागते आणि सगळं जंगल कसं तपकिरी दिसायला लागतं.

तुम्ही जंगलात फिरायला आलात तर तुम्हाला वनस्पतींना लागलेली सुंदर रंगीबिरंगी फुलं दिसतील. फुलपाखरांचा पाठलाग करत असताना मला मात्र त्या विविध प्रकारच्या वनस्पतींना लागलेली सुंदर रंगीबिरंगी फुलं दिसत नाहीत त्या वनस्पतींवर लागलेल्या रंगीत ‘पाट्या’ वाटायला लागतात. त्या वाचाव्याशा वाटतात. कारवीला आलेली निळीशार फुलं, मुरुडशेंगेला आलेली केशरी फुलं, घाणेरीची उग्र वास असलेले फुलांचे गुच्छ, किंवा आपल्या घरी कुंडीत असलेली पेंटसची, कॉस्मोसची, इक्झोराची विविधरंगी फुलं!! काय बरं लिहिलं असेल ह्या फुलांवर?

खरं तर, ही फुलं म्हणजे जणूकाही निसर्गातील ‘जाहिरातीचे होर्डींग्जच’ असतात. ह्या प्रत्येक झाडावर, वेलीवर, फुलपाकळ्यांच्या ह्या भडक रंगात लिहिलेले असते ‘सेल... सेल...फ्री सेल”. जंगलात शेकडो वृक्ष लता, वेली, झुडुपे असतात. पण सर्वच ठिकाणी हा ‘सेल’ लागलेला नसतो. तो सिझनल असतो. ऋतूमानाप्रमाणे लागतो. बदलत्या ऋतूमानाप्रमाणे झाडांनी केलेली ही भडक रंगातली निसर्गाच्या भाषेतील जाहिरात इवल्या फुलपाखरांना, पक्ष्यांना, कीटकांना बरोबर वाचता येते. उमगते.

आपसूकच त्यांचे पाय, पंख तिकडे पळायला, उडायला लागतात. कसला बरे सेल असतो ह्या झाडांवर? बहुतेक झाडांना वर्षातून एकदाच बहर येतो. काही झाडांना वसंतात, काहींना ग्रीष्मात, तर काहींना वर्षाऋतूत. झाडं फुलांनी लदबदुन जातात. उन्हाळ्यात फुलणाऱ्या झाडांची तर संपूर्ण पालवी गळून पडते. लग्नाळू वर वा वधु सजावी तशी ही झाडं भडक रंगाच्या फुलांनी सजतात. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे इतर बहुतेक वृक्ष वेलींनी पालवी त्यागलेली असते. त्यामुळे एकंदरीत तपकिरी असलेल्या दृश्यात ही भडक फुलांची जाहिरात पक्षी-फुलपाखरांना नजरेत भरते.

तसे बघितले तर झाडांना बोलता येत नाही. त्यांना आपल्यासारखी भाषा नाही. मग त्यांना कुठला संदेश द्यायचा असेल तर ते कसे देत असतील?
मग ही रंगीत फुलांची कल्पना त्यांना सुचली असावी. रंगीत फुलांद्वारे हा मूक संदेश संपूर्ण जंगलात पसरतो. ह्या झाडावर मोफत मधुरस मिळतोय!! तिकडे लाल, केशरी फुलं लागली आहेत ना ...तिकडे! फ्री... फ्री... फ्री!! मग काय...जंगलातील साऱ्या पक्ष्यांची, फुलपाखरांची हा मोफतचा मधुरस चाखायला भल्या पहाटेपासूनच वर्दळ सुरु होते. एका फुलावरून दुसऱ्या फुलावर. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर. मस्त मोफतची ‘पार्टी’ करीत पक्षी, फुलपाखरे पळापळ करीत राहतात. भराऱ्या घेत भिरभिरत राहतात.

ह्या ‘मोफत’ची खाऊगिरी करणाऱ्या पक्ष्यांना, फुलपाखरांना माहित नसते की हा जो ‘सेल’ लागलाय तो खऱ्या अर्थाने ‘फ्री’ नाही. तर झाडं ह्या मधुरसाच्या मोबदल्यात त्यांच्याकडून काम करवून घेतायत. आता पक्ष्यांना, फुलपाखरांना, कीटकांना कुठले काम सांगणार ही झाडं? तर, झाडं पक्ष्यांना काम सांगतच नाहीत मुळी. ते त्यांच्याकडून करवूनच घेतात.

वनस्पतींनी आपल्या फुलांची रचनाच (आणि रंगच) मुळी अशी करवून घेतली आहे की पक्षी किंवा फुलपाखरू मधुरस चाखायला आले की त्याच्या फुलातील परागकण पक्षी किंवा फुलपाखरांच्या अंगाखांद्यावर चिकटतील. मग ही परागकणांची डाक आपसूकच एका फुलावरून दुसऱ्या फुलावर पोहोचवली जाते. अगदी ती घेऊन जाणाऱ्या जीवाला त्याची विशेष जाणीवसुद्धा होऊ न देता! तर काय की, झाडं आपला कार्यभाग उरकून घेतात. पुंकेसरातील परागकण दुसऱ्या फुलातील स्त्रीकेसरामध्ये पोचलेले असतात. परागीभवनाची प्रक्रिया पूर्ण होते. वनस्पती, झाडं स्वतः चालून जाऊ शकत नाहीत म्हणून त्यांनी स्वतःच्या जनुकांचा प्रसार करण्याची ही क्लुप्ती शोधून काढली.

झाडांना फुलांमधील परागीभवनाची प्रक्रिया अर्थात फलन झाल्याचे लगेच कळते. ज्या फुलातील परागीभवनाची प्रक्रिया पूर्ण झाली असते त्या फुलाच्या पाकळ्यांचा रंग फिक्का पडतो. एकदोन दिवसात पाकळ्या गळून पडतात. अर्थात ‘फ्री सेल’ बंद झालेला असतो. त्या फुलात आता कुठलाही मधुरस शिल्लक राहत नाही. खरे म्हणजे आता फुकटचा मधुरस वाटायची आवशकता नाही हे त्या फुलाला कळलेले असते. शंकासूर तसेच कितीतरी प्रकारच्या फुलांची रचना फुलपाखरांच्या अंगावर परागकण कसे चिकटवता येतील ह्या दृष्टीने केलेली असते. म्हणजे मधुरस एकदम आतल्या भागात आणि परागकण मात्र फुलाच्या बाहेर प्रवेशव्दारात!!

उन्हाळ्यात पळस, पांगारा, काटेसावर (शाल्मली), बहावा (अमलताश) आदी वृक्ष भडक रंगीत फुलांनी सजतात. अशा फुलांवर साळुंकी (कॉमन मैना), भांगपाडी मैना (ब्रॅम्हीनी मैना), बुलबुल (रेड-व्हेंटेड बुलबुल), पोपट (पॅराकीट), कोतवाल (ड्रोंगो), दयाळ (मॅगपाय रॉबिन), सातभाई (बबलर), भोरडी (रोझी स्टार्लिंग), शिंजीर (सनबर्ड), कावळे (हाउस क्रो, जंगल क्रो), वटवट्या (अॅशी प्रीनिया), शिंपी (टेलरबर्ड), रामगंगा (टीट), चष्मेवाला (व्हाईटआय) सुतार (वूडपेकर), रानचिमणी (यलो-थ्रोतेड स्पॅरो), सुगरण (विव्हर) असे कितीतरी प्रकारचे पक्षी भेट देतात. त्यांची झुंबड उडते. मधुरसाच्या मोबदल्यात नकळत ते परागकणांची डाक वाहून नेतात.

टेकोमा तसेच बेशरमीला सुद्धा सुंदर निळी फुलं लागतात. त्यांना परागीभवन घडवून आणू शकणाऱ्या पक्षी-फुलपाखरांना आकर्षित करून घ्यायचे असते. आणि त्यांची ही रंगीत फुलांच्याद्वारा केलेली जाहिरातबाजी यशस्वीसुद्धा होते. पण सर्वच फुलांची रचना सर्वच पक्ष्यांच्या दृष्टीने योग्य असेल असे नाही. पक्षीप्रजातीतील आणि वनस्पतीतील वैविध्यामुळे मग काही मजेदार गोष्टी निसर्गात घडतात. शिंजीराला सुद्धा मधुरस खूप प्रिय. नव्हे तेच त्याचे प्राथमिक खाद्य. पण अनेक फुलांची लांबी त्याच्या चोचीच्या लांबीपेक्षा जास्त असते. म्हणजे फुलाच्या पाकळ्यांची मिळून बनलेली पुंगळी त्याला अगदी बुडाशी असलेल्या मधुरसापर्यंत पोहोचू देत नाही. मग काय, हुशार शिंजीर (सनबर्ड) चोरी करतो. आपल्या अनुकुचीदार चोचीने पाकळ्यांचा मिळून बनलेल्या पुंगळीच्या बुडाशी छिद्र करतो आणि सरळ मधुरस शोषून घेतो. त्यामुळे फुलाचे नुकसान होते. मधुरसाच्या मोबदल्यात त्याने करावयाचे काम घडत नाही. शिंजीर मधुरसावर ‘डल्ला’ मारून भुर्र उडून जातो. त्याची ही चोरीची क्लुप्ती सर्वच फुलांवर चालत नाही. अनेक वनस्पतीची फुलं त्याच्यासाठी अगदी योग्य असतात आणि त्याच्याकडून परागकणांची डाक वाहून घेतात. बर ह्या चोरट्यांची संख्या निसर्गात कमी नाही. शिंजीरासारख्या (सनबर्ड) पक्ष्यांनी फुलाच्या बुडाशी केलेल्या छिद्राचा फायदा उचलून विविध प्रजातीच्या माशा, मधमाशा, गांधीलमाशा, पतंग सुद्धा मधुरसाची चोरी करतात. भारतात आढळणाऱ्या शिंजीर पक्ष्यांसारखा भासणारा अमेरिकेतील गुंजनपक्षी (हमिंगबर्ड) मधुरस खाणारा पक्षी म्हणून सर्वांना परिचित आहे. हा पक्षी सुद्धा मधुरस चोरट्यांच्या (नेक्टर रॉबर) यादीत ‘मानाचे’ स्थान मिळवून आहे.

अशी मधुरसाची चोरी होऊ नये म्हणून झाडांनी सुद्धा उपाय शोधले आहेत. काही झाडांनी पाकळ्यांच्या बुडाजवळच्या पानांची जाडी वाढवली आहे किंवा त्याची चव कडवट केली आहे. काहींनी केवळ एकच दिवस फुलं उमलायचा उपाय शोधला तर काहींनी मधुरसातील गोडवाच कमी करून टाकला. एकंदरीत काय शक्कल लढवून काम करवून घेणे, मोबदला वसूल करवणे, चोरी करणे, चोरी होऊ न देणे, ह्या सगळ्या गोष्टी निसर्गात घडतंच असतात. ते फक्त आपल्याला वाचता यायला हवं.

डॉ. राजू कसंबे,
बी-२०५, त्रिमूर्ती अपार्टमेंट,
बोरकर गल्ली, टिळक नगर,
डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे
प्रकाशित: आपलं पर्यावरण, ठाणे

Group content visibility: 
Use group defaults

Pages