दानपेटी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 14 July, 2019 - 11:53

देवापुढे नसो
कधी दानपेटी
रित ही ओखटी
वाटे मज ॥
असतो का कधी
देवाचा तो धाक
म्हणे पैसा टाक
कधी का तो ॥
असो धर्म पेटी
स्थळ चालविण्या
सोय ही करण्या
येणा-याची ॥
परंतु तयात
गोवू नये देवा
ऑफरिंग नावा
ठेवूनिया ॥
बाह्य मार्गावरी
पेटी ती ठेवावी
पावती फाडावी
हवी तर ॥
नको त्या धनिका
व्हीआयपी सेवा
जणू काही देवा
लाडका तो ॥
सुटो वहिवाट
ऐसी जनरीत
एकाच रांगेत
सारे राहू ॥
विक्रांता दिसतो
पैशांचा बाजार
जणू तो संसार
इथे दुजा ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !
ओखटी म्हणजे व्यर्थ, निरर्थक.

मला वाटतं ओखटी म्हणजे वाईट. आम्हाला "आपेश मरणाहून ओखटे" हा दत्ताजी शिंदे यांच्या विषयी धडा होता. अब्दाली शी झालेल्या लढाईत त्यांनी हे उदगार काढले होते. अपयश हे मानहानी कारक आहे असं त्यांना वाटत होते. बहुतेक वोखटा शब्द पुढे वाईट बनला असावा.
अनेक ठिकाणी अन्नछत्र/ भंडारा नाव देऊन मंडळं जेवणं घालतात. पंगतीत लोक बसलेले असताना इकडे लाऊडस्पिकरवर "ज्या भाविक भक्तांना वर्गणी द्यायची असेल त्यांनी कार्यालयात जमा करावी, सढळ हाताने अन्नदान करण्यास मदत करा." असे जोरजोरात पुकारणे सुरू असते. असले प्रकार आवडत नाहीत.