व्यसन, एक दुर्दैवी निरिक्षण

Submitted by अतुल ठाकुर on 13 July, 2019 - 10:43

संशोधनाच्या दरम्यान अनेक मनोगतं ऐकली. त्यांचा अभ्यास करावा लागला. त्यामुळे जुन्या समजूती मागे पडल्या. दु:खाच्या अतिरेकाने, प्रेमात वैफल्य आल्याने माणसे दारुला जवळ करून व्यसनी होतात असे हिन्दी चित्रपट पाहून वाटायचे. आजुबाजुला तसे कधी घडताना दिसले नाही. प्रत्यक्ष संशोधनाच्या वेळीही तसे दिसले नाही. बहुतेकांनी झिंग येण्यासाठी, उत्सुकता, गंमत म्हणून दारुचा प्याला जवळ केला होता. पण माणसे दारु कधी सोडतात, कशामुळे सोडतात हा भाग सुद्धा महत्त्वाचा होताच. ते अभ्यासताना मात्र काही पॅटर्न दिसून आला. त्याबद्दल लिहिताना मी जे काही लिहित आहे ते अगदी वैयक्तीक मत असल्याने संशोधनाच्या विभागात हे लेखन टाकलेले नाही. शिवाय सर्वांच्याच बाबतीत हे असे असते असेही नाही. पण जे जाणवले ते दुर्दैवी वाटले म्हणून हा लेखनप्रपंच.

व्यसनमुक्तीचा अभ्यास करताना असं जाणवलं की बहुतेकांचे डोळे स्वतःच्या जीवावर बेतलं की उघडतात. पण आपल्या व्यसनामुळे इतरांना अतोनात त्रास होतो आहे, बायकामुलांचा छळ होतो आहे, चांगले मित्र दूर जात आहेत, शरिरीक, मानसिक, भावनिक, आर्थिक सर्व आघाड्यांवर नुकसानच होत आहे. चाललं आहे हे योग्य नव्हे या कारणासाठी फार कमी लोकांनी व्यसन सोडले असेल. असं दिसतं की मला व्यसनामुळे शारिरीक त्रास सुरु होतो. मला डायबेटिस होतो, माझा रक्तदाब वाढतो, माझं लिव्हर खराब होतं. पोटाचे विकार जडतात, मानसिक आजार होतात. अशा अनेक गोष्टी होतात. मग मी मरणाच्या दारात पोहोचतो. किंवा माझा अपघात होतो. किंवा मला नोकरीवरून काढून टाकतात. किंवा मला घरातून हकलून देतात. आपण अगदी रस्त्यावरच आल्यासारखे होते. घरचे विचारत नाहीत. मित्र उभे करत नाहीत. तेव्हा कुठे आपण आपल्या व्यसनाबाबत काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटायला लागतं.

मला नेमकी हीच गोष्ट अतिशय दुर्दैवाची वाटते. कारण हा रॉकबॉटम गाठेपर्यंत आपण बायकोला मारझोड केलेली असते, मुलांना मारलेलं असतं. आईवडिलांना शिव्या दिलेल्या असतात. आपल्यामुळे घरची म्हातारी माणसे आजारी पडू लागलेली असतात. आपल्यामुळे मुलांचे बालपण हरवलेलं असतं. आपल्यामुळे कुटूंबाला समाजात, नातेवाईकांत मान वर करता येत नसते, आपण पैशासाठी अनेकांना फसवलेले असते हे फारसे कुणाच्या गावीही नसते. व्यसन का सोडायचं तर आता ते माझ्या शरीराला सोसत नसतं. व्यसन का सोडायचं तर त्यामुळे माझी नोकरी गेलेली असते. व्यसन का सोडायचं तर त्यामुळे माझी बायको मला सोडून जाणार असते. व्यसन का सोडायचं तर त्यामुळे मी रस्त्यावर आलेला असतो.

थोडक्यात काय तर मी स्वार्थी म्हणून व्यसन करतो आणि मी स्वार्थी म्हणूनच मला व्यसनातून बाहेर पडायचं असतं. व्यसनामुळे आपण आपले माणुसपण गमावलेले आहे या जाणीवेपोटी व्यसन सोडणारे कितीजण असतील हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

अर्थात हे निरिक्षण सर्वांनाच लागु होतं असं नाही. पण बरीच उदाहरणं अशी आढळतात. त्यामुळे व्यसन आणि स्वार्थीपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत असं मला ठामपणे वाटतं. स्वभावाचा हा भाग पुढे कल्पना करून वाढवला तर काय दिसेल याचाही विचार कधीकधी मनात येतो. समजा अशा माणसांची व्यसन करूनदेखिल प्रकृती फारशी बिघडली नाही तर व्यसनामुळे आपल्या हातून बायकामुलांचा छळ होतो आहे म्हणून माणूस व्यसन सोडून द्यायला तयार होईल काय? कि व्यसन करून अगदी जीवावर बेतेपर्यंत किंवा काहीतरी भयंकर घडेपर्यंत हा घरच्यांचा छळ सतत चालतच राहणार? याप्रश्नाचे प्रामाणिक उत्तर शोधले पाहिजे.

मध्यंतरी परदेशातील काही डॉक्युमेंट्रीज आणि मालिका पाहिल्या. सत्य घटनांवर आधारित, महिला गुन्हेगारांच्या मुलाखतींवर आधारित अशा या मालिका होत्या. यातील बहुतेक गुन्हेगार तुरुंगवासात काळ घालवित आहेत. त्यात अनेकजणी अंमली पदार्थ घेणार्‍या होत्या हे पाहून धक्काच बसला. अंमली पदार्थांचे व्यसन हे अनेक गुन्ह्यांमधील महत्त्वाचे कारण आढळले. आपल्याकडे आपण जसे सहजपणे गाडीवर वडापाव घेतो इतक्या सहजपणे मंडळी कोकेन वगैरेंचे व्यसन केले सांगताना दिसली.

व्यसनांची लागलेली चटक, ते व्यसन मिळविण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी यामुळे हातून भयानक गुन्हे घडल्याने ही माणसे तेथील कायद्यांप्रमाणे दोन तीन जन्मठेपा, चाळीस, साठ वर्षे गजाआड घालवणार होती. अनेकजण तुरुंगातून कधीही बाहेर येणार नव्हते. काहींना पॅरोलची संधी मिळण्याआधी दहा वीस वर्षे आत खितपत पडावे लागणार होते. गुन्हेगार बायकांची मुले बाहेर होती. त्या मुलांच्या वेगळ्याच समस्या. यातील बरेच जणांना आपल्याला वाजवीपेक्षा जास्त शिक्षा झाली असे वाटत होते. तर काहीजण आपण निर्दोषच आहोत असे सांगत होते. पण व्यसन हा बहुतेकांना सांधणारा समान दुवा होता.

आता या पार्श्वभूमिवर जेव्हा मी आपल्याकडल्या व्यसनमुक्तीकेंद्रातील व्यसनी पाहतो तेव्हा मला ते आता जास्त सुदैवी वाटतात. असले काही भयंकर गुन्हे घडण्याआधीच त्यांना सुधरण्याची एक संधी मिळालेली आहे. आणि मला त्याचवेळी एक जाणवते की आपण पाहिलेल्या या व्यसनमुक्तीकेंद्रातील जगापेक्षाही एक भयानक जग पडद्याआड आहे. ज्यात अतीशय निर्घृण, आपल्याला कल्पनाही करवणार नाही असे गुन्हे व्यसनामुळे घडलेले आहेत. असे असताना रॉकबॉटम गाठण्याची वाट पाहात माणसे व्यसन करत राहतात. गळ्याशी आले तरच व्यसन सोडण्याची भाषा करतात. पण यावेळेपर्यंत या व्यसनामुळे ज्यांनी अतोनात त्रास सहन केलेला असतो त्यांचे काय? व्यसनाच्या अगदी कडेला, टोकाशी आले आणि त्याची धग स्वतःलाच लागु लागली तरच काहींना उपरती होऊ लागते. व्यसनमुक्तीच्या मार्गातील हा भाग मला अतिशय दुर्दैवी असा वाटतो.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

abuse of addictive drugs: ही व्यसनाची व्याख्या असे मला वाटते.

<<अध्यात्माच देखील व्यसन असत.>>

अगदी! अगदी!

माझा एक दोहा:

पूजापाठ दिवसभरचा, जपतप सुबहो-शाम,
काय लाभते सांग मला सोडुन अपुले काम
शरद तुज, सोडुन अपुले काम!

Pages