८४ वा पक्षी ..!!

Submitted by लोकेश तमगीरे on 4 July, 2019 - 06:29

लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा येथे मी सामुदायिक आरोग्य विभागात प्रकल्प समन्वयक म्हणून दोन वर्ष काम केले. या दोन वर्षाच्या काळात मी बऱ्याच नवीन गोष्टी शिकलो. व्यावसायिक विकासासोबतच माझातील काही सुप्त कलागुणांना खुलण्यास व बहरण्यास इथे वाव मिळाला किंबहुना ते मला इथे ज्ञात झाले. आदरणीय प्रकाश काका आणि मंदा काकू यांच्या प्रेरणेने माझा काम करण्याचा उत्साह खूप वाढायचा. कामाच्या व्यतिरिक्त व्यक्तीचित्रण, लेख, माडिया आदिवासी संस्कृतीचे छायाचित्रण, माडिया चालीरीतींचे व्हिडिओज तयार करणे, पक्षी निरीक्षण आणि त्यांचे व्हिडिओ डॉक्युमेंटेशन इ. अनेक छंद मी जोपासले. माझ्या सामुदायिक आरोग्याच्या कामासोबतच प्रकाश काका या माझ्या छंदांची पण स्तुती करायचे. त्यामुळे ह्या गुणांचा अधिकाधिक विकास होत गेला. या सोबतच आणखी एक चांगलं व्यसन मला इथे लागलं आणि ते म्हणजे सायकलिंग चं. सायकलिंग सोबतच पक्षी–निरीक्षणाचं वेढ पण खूप वाढत गेलं. रोज सकाळ-संध्याकाळ सायकलिंग करत असतांना मी माझा डी.एस.एल.आर कॅमेरा सोबत घेऊन जायचो. भामरागड तालुका हा पूर्ण घनदाट जंगलाचा भाग असल्यामुळे इथे नानाविध प्रकारचे पक्षी दिसायचे. जंगलातून येणारे पक्ष्यांचे कुतूहल निर्माण करणारे वेगवेगळे आवाज मला जणू काही जंगलाच्या आत यायला प्रेरित करायचे. आणि म्हणून सुरुवातीला फक्त डांबरी रस्त्यावरून सुरु झालेला माझा सायकल प्रवास हळू-हळू पुढे जंगल वाटांकडे वळला. त्यामुळे मला आणखीन नवीन जातीचे पक्षी दिसण्यास मदत झाली. काही काळानंतर सततच्या अभ्यासाने मला आवाजांवरून सुद्धा काही पक्षी ओळखायला यायला लागले.

असचं एकदा मुख्य भामरागड रस्त्याहून बेजुर फाटा लागताच सायकल घेऊन आत वळलो. काही अंतर जंगलवाट पार केली की एक मोठं शेत लागतं. या शेताला लागूनच एक मोठा नाला आहे. नेहमीप्रमाणेच सायकल उभी करून माझं पक्षी बघणं सुरु होतं. नाल्याच्या पलीकडील शेतामध्ये दोन मुलं ताडाच्या झाडावर चढली होती. नित्य-नियमाप्रमाणे ती आधल्या संध्याकाळी लावलेला जमा झालेल्या ताडीचा माठ उतरवत होती. माझी नजर त्यांच्याकडे जाताच मी नाला ओलांडून ताडीच्या झाडाच्या दिशेने जायला लागलो. ताडी कशी काढतात हे मला कॅमेरा मध्ये रेकॉर्ड करायचं होतं. अचानक मला एक वेगळा, कधी न ऐकलेला, कर्कश असा आवाज आला. 'हा कुठला तरी नवीन पक्ष्याचा आवाज आहे' असे मला ज्ञानात येताच मी थोडा सावध झालो आणि त्यांच क्षणी तिथेच कुठलीही हालचाल न करता शांत उभा राहिलो. पक्ष्यांची नजर खूप तीक्ष्ण असते शिवाय यांना मनुष्यासारखी बाह्याकृती दिसली की लागलीच ते सावध होतात किंबहुना उडून जातात. परंतु त्या पक्ष्याला बहुदा मी असल्याच्या अंदाज आला होता. लगेच त्याच्या पंखांचा फडफडण्याचा आवाज आला आणि तो उडायला लागला. माझे डोळे आणि कॅमेरा त्याला पाहण्यास आतुर झाले होते. कॅमेरा पण ऑटो-फोकस कंटीन्यूअस मोड मधे रेडी करून ठेवला होता. माझी तर्जनी कॅमेराच्या प्रेस शटर रिलीज बटन वर सज्ज होती. दुसऱ्याच क्षणी एक मोठ्या काळ्या रंगाचा, पिवळी चोच असलेला आणि मुख्य म्हणजे त्या पिवळ्या चोचीच्या वर पिवळ्या-काळ्या रंगाचं शिंग असलेला पक्षी दिसला. मी एकदम आनंदाने मनातल्या-मनात ओरडलो,
....अरे...अरे...हॉर्नबिल...मालाबार हॉर्नबिल..!!!

Hornbill 1 edited.jpg

रिफ्लेक्स ऍक्शन ने माझ्या तर्जनीने जोरदार प्रेस शटर रिलीज बटन दाबली. खट...खट...खट...खट...खट...खट...खट असा सहा-सात वेळा आवाज करत माझ्या कॅमेऱ्यात त्या मालाबार धनेश चे ६-७ फोटो कैद झाले. स्वच्छंद भरारी मारत तो हॉर्नबिल निघून गेला. निळ्या आकाशात दिसेनासा होत पर्यंत मी त्याच्याकडे एकटक बघत राहिलो. मी त्याला मनात "थँक-यु हॉर्नबिल" म्हटले आणि आतोबांचे (श्री विलास मनोहर - लोक बिरादरीचे जुने कार्यकर्ते. लोक बिरादरीत त्यांना सर्वजण प्रेमाने "आतोबा" म्हणतात.) सुद्धा आभार मानले. त्यांनीच मला या भागात मालाबार हॉर्नबिल दिसतो म्हणून सांगितले होते आणि त्यामुळे मी या भागात हॉर्नबिलच्या शोधात हिंडायचो. नंतर कॅमेरामध्ये क्लिअर फोटोज आलेत की नाही हे तपासलं. फोटोज एकदम मस्त आले होते. एक वर्षांपासून पाहण्यासाठी आतुर असलेल्या मला मालाबार हॉर्नबिलचे दर्शन होताच मी खूप धन्य झालो. कॅमेरा आत ठेवला, आपली सायकल घेतली आणि हेमलकसाला सर्वांसोबत हा अविस्मरणीय अनुभव वाटायला सुखात परतलो. माझ्या भामरागड मधील पक्ष्यांच्या यादीत मालाबार हॉर्नबिलची ८४वा पक्षी म्हणून भर झाली.

शब्दांकन:
डॉ लोकेश तमगीरे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वाह मस्तच!

इतर अजून पक्ष्यांचे फोटो देखिल पहायला आवडतील

मस्त फोटो .
इतर अजून पक्ष्यांचे फोटो देखिल पहायला आवडतील >> ++१

तुमची लेखमाला आधी वाचली नव्हती कारण शीर्षकामुळे कशावर आहे काही कळाले नव्हते. आता जाऊन वाचेन.

अहाहा ! काय सुरेख क्लिक केलाय ! उडणाऱ्या पक्षाचा स्थिर आणि स्पष्ट फोटो !
बाकीचे ८३ पण बघायला /वाचायला आवडतील >>> +१ मला सुध्दा..

बाक़ी ८३ तर नक्कीच बघायला आवडेल पण त्याहीपेक्षा ह्या संग्रहाचा शंभरी पार करणारा क्षण लवकर पहायला अधिक आवडेल. खुप साऱ्या शुभेच्छा !

व्वा! मस्त दर्शन. हॉर्नबील दिसतोच मोठा झोकदार! तुम्ही फोटोपण सुरेख घेतलात, विशेषतः आकाशाच्या बॅकग्राऊंडवर करडी झाक न येता सुंदर निळाई पसरलीय त्यामुळे हॉर्नबीलचे रंग छान खुललेत.

अजूनपर्यंत फक्त ह्याच्या चुलत भावानं, करड्या धणेशानच दिल दर्शन मला. यंदाच्या हिवाळ्यात कोकणवारीत बघू हे महाशय प्रसन्न होतात का!

@चैत्रगंधा:
धन्यवाद !
अजून काही पक्ष्यांची माहिती, फोटोज टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करतो.

@ देवकी: @ वृंदाली: @मन्या:
आपल्या सर्वांचे धन्यवाद...!
आपल्या प्रतिक्रियांमुळे मला लिहिण्याची प्रेरणा मिळते.

@anjali_kool: @ अनघा:
आभार! बाकीच्या काही निवडक पक्ष्यांबद्दल पण लिहिण्याचा प्रयत्न करतो.

@ शाली @ वावे
धन्यवाद आपले ...!! फोटो चे श्रेय माझ्या कॅमेराला.

@ अज्ञानी:
हा ... हा ... ! सेन्चुरी करण्याचा प्रयत्न सुरु राहील.
आपल्या आशावादी शब्दांबद्दल धन्यवाद !

खूप सुंदर लिहिलेय. दिसण्याची अपेक्षा नसताना जेव्हा अचानक काही दिसते त्याचा आनंद अवर्णनीय असतो.
बाकी ८३ पण येउदे आणि शंभरावाही Happy Happy

कोकणात गावी राखी धनेश पुष्कळदा पाहिले. मलबार धनेश दिसेल ही अपेक्षाही केली नव्हती. एकदा अचानक झाडावर एक पक्षी ओझरता दिसला, ती पांढरी लेस मात्र स्पष्ट दिसली. कुठला पक्षी हेच कळेना, मलबार धनेश असेल हे डोक्यातही आले नाही. तोही झाडांमागे लपाछपी खेळत थोड्या वेळाने अचानक बाहेर येऊन बोडक्या खांबावर बसला... त्याला बघून काय वाटले ते अवर्णनीय आहे.

@सुनिधी:
धन्यवाद ..!
फार काळा पासून चालत आलेल्या शिकारी मुळे इथे वन्य प्राणी कमी आहे.
खूप आत किंवा डोंगरात शिरलं की अस्वली दिसतात. जेही प्राणी आणि ते प्रकाश भाऊंच्या "वन्य प्राणी अनाथालयातच" आहे.

काही महिने जंगलातून सायकल ने फिरलं की भीती थोडी कमी होते.

@ रॉनी:
कौतुकास्पद शब्दांबद्दल धन्यवाद ..!
वाह ....तुम्ही ग्रे-हॉर्नबिल बघितला ... छानच.
कोकणात बरीच हॉर्नबिल आहेत. नक्कीच दिसेल तुम्हाला...बेस्ट ऑफ लक.

@ jayshree deshkulkarni: @ किल्ली: @ स्वाती२:
धन्यवाद सर्वांचे ...!!
बाकीचे क्लिक्स पण टाकण्याचा नक्की प्रयत्न करतो.

@ साधना :
धन्यवाद ..!
"दिसण्याची अपेक्षा नसताना जेव्हा अचानक काही दिसते त्याचा आनंद अवर्णनीय असतो." ------ हे अगदी खरं बोलले.
तुम्ही पण धनेश बद्दल आपले अनुभव लिहा ..... आम्हाला वाचायला नक्कीच आवडेल.

Pages