गुप्तधन -४

Submitted by अँड. हरिदास on 1 July, 2019 - 14:34

"सखाची अवस्था पाहून पुरुषोत्तम, अघोरी आणि प्रभाकरच्या चेहऱ्यावर स्मित झळकले....!!!"

****

इतकं सारं सोनं पाहून सखा आवक झाला..आनंदाने आपण वेडे होणार की काय? असं त्याला वाटू लागलं. इतक्या सोन्याचं काय करायचं..? सोनं विकायचं कुठे?? पाहिले तर घर घ्यायचं...!

या कपड्यात सर्व धन घे..! आणि हो, उचलताना गाठोडं पाठीवर नाही तर थेट डोक्यावर घ्यायचं.”

अघोरीच्या बोलण्याने सखाची तंद्री भंगली. त्याने पटापट सर्व सोनं अघोरीने दिलेल्या त्या केसरी कपड्यात टाकलं, गाठ मारली आणि गाठोडं डोक्यावर घेतलं.

अघोरीने पुढीची सूचना दिली.

" सखा, तुझ्या नशिबात धन होतं.. ते काढून द्यायची जबाबदारी माझ्यावर होती. मी तुला गुप्त धन काढून दिलं आहे. पण, ध्यानात घे.. कोणतही गुप्तधन हे शापितच असतं.. त्याचं कितीही शुद्धीकरण केलं तरी शापचा प्रभाव लगेच नष्ट होत नसतो. त्यामुळे लक्षपूर्वक एक. तुला धन मिळालं पण त्याचा उपभोग तुला इतक्यात घेता येणार नाही. किमान 21 दिवस तुला वाट बघावी लागणार आहे."
आता मी सांगतो ते ध्यान देऊन ऐक..कारण, मी सांगितलेल्या विधीत थोडी जरी चूक झाली तर प्रकरण तुझ्या अंगलट येईल. तेंव्हा सगळं नीट पार पडलं पाहिजे.
सगळ्यात पाहिले आता हे गाठोडं तू पुढचे 21 दिवस उघडून बघायचं नाही. तुझ्या घराच्या उत्तर भागात या धनाला जमिनीत पुरून ठेवायचं. तुला गुप्त धन मिळालं असल्याचं कुणालाही बोलायचं नाही.. अगदी बायकोला सुद्धा सांगायचं नाही. मी तुला एक मंत्र सांगेन..दररोज रात्री बरोबर 12 वाजता तो मंत्र धन पुरलं त्याठिकाणी जाऊन 108 वेळा पाठ करायचा. 21 व्या दिवशी रात्री बरोबर 12 वाजता धन बाहेर काढायचं..तेंव्हा त्या धनावरील शापाचा प्रभाव पूर्णपणे नष्ट झाला असेल. ध्यानात ठेव यात जरा जरी चूक झाली तर सोन्याचे दगडं होऊन जातील..! अघोरीने सखा च्या कानात मंत्र सांगितला आणि तो निघून गेला. पुरुषोत्तम ही त्याच्या मागोमाग गेला. प्रभाकर आणि सखाने धनाचं गाठोडं घरी आणलं..रात्रीच घराच्या उत्तर दिशेला गड्डा खोदून त्यात धन पुरून टाकलं. 21 दिवसांनी धनाचे वाटे करायचे ठरवून दोघेही आपआपल्या घरी गेले.

जे झालं ते एवढ्या झटपट झालं की सखाला विचार सुद्धा करता आला नाही. तो घरात बसून आता विचार करू लागला. रात्रीचा प्रसंग त्याला आठवत होता. पण, त्यातील बऱ्याच बाबी विस्मृतीत गेल्या होत्या. ज्या अघोरीने त्याला सोनं काढून दिलं, त्याचा चेहरा कितीही प्रयत्न केला तरी त्याला आठवत नव्हता. पुरुषोत्तमच्या बाबतीतही असंच काहीसं त्याला जाणवत होतं. आपण धन काढलं पण ते नेमकं किती होतं, याची जेंव्हा तो कल्पना करायला लागला तेंव्हा त्याला जाणवलं की त्याला काहीच आठवत नाहीये.
सखाने शेवटी विचार करणे सोडून दिले.
जाऊ द्या, जितकं आहे, तितकं 21 दिवसानंतर कळणारच आहे. आताच कशाला त्याचा विचार कारायचा?

पुढच्या 21 दिवसात सखाचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. दररोज रात्री तो धनाच्या जागी जाऊन अघोरीने सांगितलेल्या मंत्राचा जाप करायचा. आणि, दिवसभर सोन्याचं काय करायचं, याची स्वप्न रंगवत बसायचा. दिवस माळवायाला आला की त्याची पाऊले आपसूकच बारकडे वळायची. त्याचं कुठल्याचं कामात लक्ष नव्हतं.
आता आपल्याला काम करायची गरजच नाही, ही त्याची पक्की धारणा झाली होती.
एक एक करत 21 दिवस सरले..
आज रात्री धन बाहेर काढण्याचा मुहुर्त होता. सखाला अचानक आठवलं की गेल्या 21 दिवसात प्रभाकर त्याला एकदाही भेटलेला नाही. आज धन काढायचा दिवस..पण, आपला हिस्सा घेण्यासाठी ही प्रभाकरने संपर्क केलेला नाही. त्याला या गोष्टीचं मोठं नवल वाटलं. मात्र, त्याने त्यावर जास्त विचार केला नाही."येईल जेंव्हा यायचं तेंव्हा.." असा विचार करुन त्याने तो विषय मनातून काढून टाकला.
रात्री बरोबर 11 वाजता सखा घरातून बाहेर पडला.
त्याची बायको मुलाला जवळ घेऊन गाढ झोपली होती. त्याने उशाला असलेली बॅटरी घेतली आणि दबक्या पावलांनी तो बाहेर आला. आवाज न होता त्याने दाराची कडी काढली आणि बाहेर येऊन परत दार बंद केले. धन काढण्यासाठी फावडे त्याने अगोदरचं आणून ठेवलं होतं. एका हातात बॅटरी आणि दुसऱ्या हातात फावड घेऊन तो घराच्या उत्तर दिशेला आला. बरोबर 12 वाजता त्याने धन उकरायला सुरवात केली. 10 मिनिटातच त्याला ते गाठोडं सापडलं. उतावीळ पणे त्यानं गाठा सोडल्या काही तोडल्या..गाठोडं मोकळं झालं..कापड दूर करुन पाहताच सखाच्या छातीत एक जोरदार कळ आली. गाठोद्यात विटा आणि दगडं बांधलेली होती. सखाचे हातपाय थरथर कापू लागले. अघोरीने सांगितलेला सर्व विधी आपण अचूक पार पडला. मग, असं कसं झालं? सोन कुठं गेलं..?
सखाचे मंत्र बोध झाले..त्याच डोकं बधिर झालं..धन गेलं..जवळचे पैसे गेले..पाच लाख..आपण पाच लाखांनी फसवलो गेलोय..?
पहिल्यांदाचं सखाच्या मनात शंका निर्माण झाली. जसजशी घटनांची उकल तो आपल्या मनात करु लागला..तस तशी फसवलं गेल्याची भावना पक्की होऊ लागली. आपल्या पायावर धोंडा स्वत:च्याच हाताने पाडून घेतल्याने स्वत:वर चरफडण्याशिवाय आता दुसरा काहीच पर्याय त्याच्यासमोर नव्हता. पण, हे झालं कसं?
आपण आंब्याचं झाड बघितलं.. स्वतःच्या हाताने सोनं काढलं..गाठोडं बांधलं..हे कसं शक्य आहे..?
रागाची एक सनक त्याच्या डोक्यात उठली..खाली पडलेलं फावड उचललं आणि सखा प्रभाकरच्या घराकडे निघाला..इतक्या रात्री सखा आलेला पाहून प्रभाचा बाप बुचकळ्यात पडला. सखाने प्रभाकरबद्दल विचारताच..प्रभा 20 दिवसापूर्वीच मुंबईत काम शोधण्यासाठी गेला असल्याचे त्याला समजले.
सखाचा धीर आता सुटू लागला होता.. त्याने तडक पुरुषोत्तमच्या निवासाचा रस्ता धरला..सकाळी चार वाजेच्या सुमारास सखा पुरुषोत्तमकडे पोहचला. पण, त्याच्या घराला मोठं कुलूप होतं. आता काय करावे? सखाला काहीच उमजत नव्हते. धनाच्या लालसेत आपण जवळचा पैसा गमावला..डोक्यावर तीन लाखाचं कर्ज करुन घेतलं..!
स्वतः च्या वेंधळेपणाला दोष देण्याशिवाय सखाजवळ काहीच पर्याय नव्हता. त्यातच, आपल्याला सोनं दिसलं कसं?
धनाचं तर आपण आपल्या हाताने गाठोडं बांधलं..मग त्याचे दगड कसे झाले?
डोक्याचा भुगा व्हायची पाळी आली...पण, सखाला कशाचाचं उलगडा झाला नाही...
रात्रभरच्या धावपळीने थकून भागून अखेर सखा घराच्या दिशेनं वळला.
एव्हाना, दिवस उजाडला होता. कोवळं ऊन सर्वत्र पसरलं होतं. सकाळच्या प्रसन्न वातावरणाने सर्वत्र उत्साहाचं वातावरण पसरलं होतं...सखा गावाच्या वेशीपर्यंत पोहचला.थकव्यामुळे चालणं असाह्य झाल्याने जवळच असलेल्या मंदिराच्या पायरीवर बसला.
सकाळी सकाळी मंदिरात महाराजांचं प्रवचन सुरु होतं..
“माया बहुरूपी बहुरंग । माया ईश्वराचा संग ।
माया पाहाता अभंग । अखिळ वाटे ।
मायेच्या लक्षणांचं निरुपण करतांना महाराज सांगत होते,
“माया ही सदैव दृग्गोचर असते. दृष्टीसमोर साकार असते. तिचा विस्तार चर्मचक्षूने पाहता येतो. परंतु जे दिसते ते सारे क्षणभंगुर असते, नाशिवंत असते. विवेक बुद्धीने पाहिले असता त्यातील फोलपण ध्यानी येतो. माया अनेक रूपात दिसते. आपण पाहू तितक्या रंगात आणि आकारात असते. त्यामुळे तिचे रूप असीम, अमर्याद असते. कल्पनेची भरारी जितकी जाईल तेथवर मायेचा विस्तार असतो..कारण माया म्हणजेचं एक कल्पना..माया म्हणजेच नजरबंदीचा खेळ..!”

महाराजांची उपदेशवाणी सखाच्या हृदयापर्यंत जाऊन भिडली. त्याचा विवेक आता काम करु लागला..!
“'माया' म्हणजेच नजरबंदीचा खेळ.”
त्याला आठवले..!
'लहान असतांना त्याने जत्रेत नजरबंदीचा खेळ बघितला होता.. जादूगार माणसाचे तलवारीच्या साह्याने दोन तुकडे करायचा..
टोपीतून नोटांची बरसात करायचा..
खिशातून कोंबडा काढायचा..
सहा फुटाचा माणूस क्षणात अदृश्य करायचा.."
“हे कसं शक्य आहे..? ”
सखाच्या बालमनाला प्रश्न पडला होता..!
त्याची आजी म्हणाली होती.. “हा सगळा नजरबंदीचा खेळ.”
तुमची नजर काही काळ ताब्यात घेतली की तुम्हाला हवा तो भास करवता येतो.. विज्ञान त्याला 'संमोहन' संबोधते.
सखाच्या डोक्यात प्रकाश पडला.. त्याचे डोळे खाडकन उघडले.
“दारुच्या अमलात अघोरीने आपल्याला नजरबंदीचा खेळचं दाखविला.
गुप्तधन..आंब्याचे झाड..सोन्याच्या गिन्या..सगळं खोटं.. नुसता भास!
प्रभाकर, पुरुषोत्तम, अघोरी यांनी आपल्याला कसं फसवलं, हे सखाच्या घ्यानी आलं..”
आधीच निराशेने ग्रासलेले त्याचे मन पश्चातापाच्या आगीत होरपळून गेलं...
“ इतर पडतात तसंच हे गुप्तधनांचं स्वप्न पडलं.. मूर्खासारखं आपण ते प्रभाकरला सांगितले. आणि, वेंधळ्यासारखा त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला..नुसता विश्वास ठेवला नाही तर धनाच्या लालचेपोटी पाच लाखाची रक्कम गमावली...
पाच लाखाची आठवण होतांच सखाच्या छातीत कळ उठली..त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या.”
पण, करणार काय? आता वेळ निघून गेली होती..!

समाप्त

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवट आवडला. जान बची लाखो पाये.
आजच्या काळात सुध्दा गुप्तधन, स्वस्तात सोने मिळतंय हे पाहून पैसे, जीव गमावणारे बरेच लोक, सोनार आहेत. अगोदर अगदी मुर्खासारखे वागतात नि नंतर पोलिस स्टेशन गाठतात. माझ्या ओळखीचा एक सोनार असाच मरता मरता वाचला होता. नंतर ग्राहकांना २३,२२ कॅरेट सांगून १८ कॅरेट चं सोनं विकत होता.

चांगली कथा.

इतकं सारं सोनं पाहून सखा आवक झाला..>>> इथे अवाक हवं.