*भाग दुसरा*
'पुरूषोत्तम'
नाव 'उत्तम' असलं तरी हा पुरुषोत्तम नावाचा प्राणी मोठा पाताळयंत्री होता. बाई बाटली आणि पैश्यासाठी कुठल्याही थराला जायची त्याची तयारी होती.
प्रभाने सखाला त्याच्याकडे नेऊन सगळी गोष्ट सांगितल्यावर त्याला जणू काही हर्षवायू झाला. प्रत्यक्षात त्याने गंभीरपणाचा आव आणला. परंतु आतून तो भलताच खुश झाला होता.
पुरुषोत्तमने गंभीरपणे सखाला न्याहाळत बोलायला सुरुवात केली..!
“ नशीबवान आहेस..!, लोकांचे जन्म जातात पण त्यांना एक तोळा सोनं घेता येत नाही.. तुला तर आयताच खजिना मिळण्याचे संकेत आहेत.”
'सखा खुश झाला'
“पण , बाबा स्वप्नात दिसलं ते आंब्याच झाड ती जागा आपल्याला सापडणार कशी..?”
सखा ने आपली शंका उघड केली.
“ तू नशीबवान आहेस, पण थोडा मूर्ख सुद्धा आहेस. हे तुला इतकं सोपं वाटलं का?”
इतकं बोलून पुरुषोत्तम ने समाधी मुद्रा धारण केली. दहा मिनिटानंतर त्याने जेंव्हा डोळे उघडले तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते.
“सखा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे..मार्गही सापडला आहे.”
पुरुषोत्तम सांगू लागला..
“ काही वर्षांपूर्वी घाटाच्या खाली एक भल मोठ्ठं आंब्याचं झाड होत. त्या झाडाच्या खाली तुझ्या कुण्या तरी पूर्वजांने ते धन पुरून ठेवलं. त्याला त्या धनाचा उपभोग घ्यायचा होता. पण त्याला अकाली मृत्यू आला. काळच्या ओघात झाड नष्ट झाले.. पण, ज्यानें धन ठेवलं त्याचा जीव त्या धनात अडकून पडला. त्यामुळे तो त्या धनाचा रक्षक बनला. आता त्याला मुक्ती हवी आहे...गेल्या दिवसात योगायोगाने काही गूढ संकेत जुळून आले आहेत.. तुझ्या सुदैवाने त्याकाळात तुझा त्या भागात अनभिज्ञ पणे का होईना, पण वावर राहिला. रक्ताने आपल्या घराण्यातील रक्त ओळखले..म्हणून त्याने तुला स्वप्नात दृष्टांत दिला. त्याच्या काही अपूर्ण वासना पूर्ण केल्या, धनाची शांती केली की तो खजिना तुझ्या हवाली करेल..!”
“पण, त्याच्या वासना पूर्ण कशा करायच्या..? ”
सखाच्या प्रश्नावर पुरूषोत्तमने मिश्किल हसत उत्तर दिले.
“ त्यासाठी आपल्याला एक विधी करावा लागणार आहे.. वेळ कमी आहे..सामानाची जुळवाजुळव करावी लागेल.”
“काय काय सामान लागेल?”
“तो तुझा प्रांत नाही, तू फक्त पाच लाख रुपयांची व्यवस्था कर”
पाच लाख
सखाचे डोळे पांढरे झाले
“महाराज इतके पैसे मी कोठून आणू?”
“मूर्ख माणसा, मला सोन्याने भरलेली पेटी दिसतेय..आणि तू पाच लाखासाठी रडतोय..! जा ते तुझ्या नशिबात नाही"
पुरुषोत्तम रागात येताच प्रभाकरने बाजू सांभाळली.
“महाराज, रागावू नका. उद्या सायंकाळी आम्ही व्यवस्था करतो.”
बाहेर आल्यावर प्रभा सखावर चांगलाच उखडला
“तुला मी आधीच सांगितलं होतं.. पण, तुझा संशय अजूनही गेला नाही"
“तसं नाही, पण इतके पैसे आणायचे कोठून?”
“धन पाहिजे तर काहीतरी व्यवस्था करावीच लागेल..बघ मित्रा, असा चान्स प्रत्येकाला मिळत नाही..आणि कुणाला माहीत पेटीत किती सोनं आहे ते. ती पेटी शंभर किलोची असली तर..! तुझ्या दहा पिढ्या बसून खातील.”
आणि तसेही असल्या पूजा मोठ्या खर्चिक आणि विलक्षण असतात..तुला पुरुषोत्तम ने सांगितले नाही. पण मला माहित आहे. हे काम एकट्या पुरुषोत्तमच्या आवाक्यातील नाही..नक्कीच यात तो त्याच्या गुरु ची मदत घेणार आहे. त्यामुळे त्याला पैसा लागेलचं.
प्रभाच्या बोलण्यावर सखाने विचार केला..एकदा धन मिळलं की खरंच आपल्याला काय कमी आहे?
"करतो व्यवस्था!"
अस सांगून सखाने प्रभाचा निरोप घेतला
***
-क्रमशः-
मस्तय कथा, येऊ द्या अजून
मस्तय कथा, येऊ द्या अजून