जांभा खडकांच्या देशा ...

Submitted by मनीमोहोर on 29 June, 2019 - 18:04

कोकण म्हटलं की त्याला एकच विशेषण सार्थ आहे आणि ते म्हणजे “ सुंदर “ ! तिथली वृक्षराजी, त्यात लपलेली छोटी छोटी घरं, निळेशार शांत समुद्र किनारे, त्यातुन आत आलेल्या छोट्या छोट्या खाड्या, लहान लहान व्हाळ , नागमोडी रस्ते , हे सगळं तर सुंदर आहेच पण कळस म्हणजे तिथले खडक ही वैशिष्ट्य पूर्ण आणि सुंदर आहेत. तुम्ही म्हणाल खडकात कसलं सौंदर्य ? चला तर मग, सांगतेच आता ह्या खडकांच्या सौंदर्याबद्दल.

सह्याद्री पर्वतात सगळीकडे जरी काळा खडक दिसत असला तरी कोकणात विशेषतः तळकोकणात मात्र काळा खडक मिळत नाही तर तिथे लाल खडक मिळतो ज्याला “जांभा” हे नाव आहे. हा लॅटेराइट प्रकारचा खडक आहे जो सहसा उष्ण आणि ओल्या विषुववृत्तीय प्रदेशांत सापडतो. . यात लोह आणि बॉक्साइट ही खनिजे असतात. वेगवेगळया ठिकाणच्या जांभा खडकात ह्या दोन खनिजांचे प्रमाण वेगवेगळे असते त्यामुळे ह्याचा रंग ही सर्व ठिकाणी एकसारखा नसतो. जिथे लोह जास्त असते तिथे लाल रंग अधिक दिसतो आणि जिथे बॉक्साईट जास्त असते तिथे पांढरा रंग अधिक दिसतो. लाल पांढऱ्या रगांमुळे नैसर्गिक रित्याच ह्याला सौंदर्य प्राप्त होते. तसेच हा खडक अतिशय खडबडीत असतो ह्यावरून हात फिरवला तरी खडबडीत पणा जाणवतो. त्यामुळे एक प्रकारचे नैसर्गिक डिझाईन ह्यावर तयार होते आणि ह्या खडकांच सौंदर्य अधिक खुलून येत. हा खडक सच्छिद्र असतो. साध्या डोळ्यांना ही छिद्र सहज दिसतात. सच्छिद्र असल्याने हा वजनाने इतर दगडांपेक्षा हलका असतो . त्याच्या ह्याच गुणधर्मामुळे कोकणात बांधकामासाठी विटांऐवजी ह्या दगडाचा वापर मुबलकपणे केला जातो. एका विशिष्ट मापात कापलेल्या दगडाचा वापर बांधकामासाठी करतात .कोकणात ह्याला “चिरा” असं म्हटलं जातं. चिऱ्याचं बांधकाम सुंदर, मजबूत आणि प्रतिष्ठित ही समजलं जातं.

जांभा खडक ( कापलेला )
800px-जांभा.jpg

आमच्या घराच्या मातीच्या भिंती आम्ही बरेच वर्षांपूर्वी चिऱ्याच्या केल्या होत्या. त्यासाठी सड्यावरचा खडक गडयांनी पहारीने फोडला होता. मग त्याचे ठराविक आकाराचे चिरे ही पहारीनेच तयार केले होते. नंतर ते चिरे सड्यावरून म्हणजे डोंगरमाथ्या वरून डोक्यावरून वाहून घरापर्यंत आणले गेले होते. आता मशीनच्या सहाय्याने चिरे पाडणं सोपं झालं आहे आणि घरापर्यंत रस्ता झाल्यामुळे ते बांधकामाच्या जागे पर्यंत आणणं ही इझी झालं आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी केलेल्या कष्टांची कल्पना ही येणं कठीण आहे. असो. सिमेंटचा गिलावा करून चिऱ्याच्या भिंती गुळगुळीत केल्या जातात किंवा तशाच ही ठेवल्या जातात. मला स्वतःला चिऱ्याच्या भिंती लालच आवडतात कोकणच्या हिरवाईत ही लाल घरं फार उठून दिसतात. पण आमच्या घराच्या भिंती मात्र सिमेंट ने गुळगुळीत केलेल्या आहेत.

आमच्या गावात सड्यावर म्हणजे गावाजवळ असलेल्या टेकडीच्या माथ्यावर सगळीकडे हाच खडक आहे ज्यावर कोणत ही पीक घेता येत नाही की कोणतं झाड ही लावता येत नाही.पण कोकणातल्या माणसांनी आपल्या बुद्धीने आणि अपार कष्टाने या ओसाड सड्यावर ही नंदनवन फुलवण्याची किमया केली आहे. कलमाच्या आंब्याला आवश्यक तेवढे मोठे खड्डे ह्या कातळात खोदून नंतर त्यात लाल माती भरून कलम लावण्यात आली. ही कलमं ह्या कातळात खोदलेल्या खड्ड्यात छान रुजली आणि आज अनेक वर्षे आम्हाला गोड रसाळ आंबे देत आहेत. असं ही म्हणतात की देवगड हापूस चा जो एकमेवद्वितीय स्वाद असतो तो ह्या मातीत असणाऱ्या लोहामुळेच असतो.

विषय निघालाच आहे तर गडग्यां बद्दल सांगितल्या शिवाय रहावत नाहीये. जनरली दोन बागांमधलं किंवा दोन घरांमधील कुंपण विटांच किंवा तारेच असतं पण कोकणात मात्र ते जांभा दगडांचं किंवा इतर कोणत्या दगडांचं असतं ज्याला “ गडगा “ अस म्हणतात. हे गडगे फार उंच नसतात. साधारण आपल्या कम्बरेपर्यंत असते ह्यांची उंची. त्यामुळे आपण सहज गडग्यावरून पलीकडे जाऊ शकतो पण गुरं मात्र जाऊ शकत नाहीत.चिरे कापताना जे लहान मोठे दगड बाजूला उडतात त्यांचा वापर करून हे गडगे बांधले जातात. जिथे गडगा बांधायचा असेल तिथे थोडासा पाया खणून हे लहान मोठे दगड त्यावर रचत जातात आणि दोन दगडांच्या फटीत बायंडिंग साठी माती लिपतात. गडगे चांगले रुंद असतात आणि त्यावरून माणूस आरामात चालत जाऊ शकतो. ह्याच वैशिष्ट्य म्हणजे वापरलेल्या दगडांचा आकार एकसारखा नसून ही ते रचताना अशा काही कौशल्याने रचले जातात की वरचा भाग अगदी एक समान लेव्हल चा होतो. आमचा गाव अशा प्रकारच्या सुंदर गडग्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच आमच्या गावातील कारागिरांना गडगे बांधण्यासाठी पंचक्रोशीत मागणी असते.

गडगा

IMG_20170410_174623_0.jpg

हा आणखी एक ..वर चढण्यासाठी इनबिल्ट पायऱ्या
IMG_20190701_150600.jpg

काही वर्षांपूर्वी मी लंडन ला गेले होते. साईट सीईंग साठी शहराबाहेर पडल्यावर निसर्गरम्य कंट्री साईड ला सुरवात झाली. हिरवीगार कुरण, त्यावर चरणाऱ्या मेंढ्या, दूरवर पसरलेली गव्हाची शेतं, मध्येच घोड्यावरून रपेट मारणारा एखादा इंग्लिश तरुण, आपल्या आयांबरोबर फिरणारी गोरी गोंडस मुलं छोट्या छोट्या टुमदार घरांची गावं अस सगळं पहात मजेत प्रवास चालला होता. एका गावात शिरलो आणि अचानक घरांच्या कुंपणासाठी घातलेले गडगे दिसले अगदी सेम कोकणातल्या गडग्यांसारखे ! फक्त दगडांचा रंग लाल काळा नसून पिवळट होता. ते गडगे पाहून मी हजारो मैलांचं अंतर क्षणार्धात पार करून कोकणात आमच्या गावी पोचले. इंग्लंड मधल्या मे महिन्यातल्या थंड हवेत मनाने मी मे महिन्यातली आमच्या कोकणातल्या घराची लगबग अनुभवली. किती विलक्षण अनुभव होता तो !

आपण कुठे ही असलो तरी आपलं गाव आपल्या मनाच्या तळाशी सतत असत आणि काडी एवढ्या आधाराने ही आपण क्षणात गावी जाऊन पोचतो. म्हणूनच ते इंग्लंड मधले गडगे मला कोकणात घेऊन गेले.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण कुठे ही असलो तरी आपलं गाव आपल्या मनाच्या तळाशी सतत असत>>> अगदी खरं आहे.
कोकणात ला माणूस पोटापाण्यासाठी कोकणातून बाहेर पडला पण कोकण काही त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही, तेही दोन तीन पिढ्या, नेहेमी सारखाच मस्त लेख.
दगडांवर लिहिलाहेस म्हणून विशेष धन्यवाद.

नेहमीप्रमाणे छान लेख...
एक निरिक्षण: हल्ली शहरात कोकणी खाद्यपदार्थ देणारी हाॅटेल्स हा जांभा दगड त्या विशिष्ट "फील साठी" अंतर्गत सजावटी मधे वापरतात.
आणि अस्सल वातावरण निर्मितीची काही किरकोळ उदाहरणं वगळता इतर सर्व ठिकाणी त्या जांभ्या दगडाबरोबर आधुनिक टाईल्सचा असा काही विचित्र वापर करतात की ना धड कोकण डोळ्यासमोर येतं ना अन्य काही..

मस्तच लेख. पुस्तक कधी येणार. मध्यंतरी आमच्या कँटिनमधल्या मुलाने रजा घेतली होती गावाला घर बांधत होता म्हणून गेलो होतो म्हटला. मी लगेच स्लॅब होती का घालायची विचारले शहरी सवयीने. तर म्हणे नाही कुडाचे मातीचे घर आहे. ती पण त्याच्यासाठी मोठी स्टेप होती. मी मनात जीभ चावली.

लास्ट फोटो मध्ये जे गडगे आहेत ते फॅन्टम कार्टुनात वेताळाचे पोस्ट ऑफिस असा एक भाग आहे तसे दिसते आहे. मस्त. धारपांच्या कथेत
असे लँडस्केप नेहमी असते . भारा वलेले लांब लांब पसरत गेलेले माळ मध्ये गडगे....

मस्त लेख.
अमा >>अनुमोदन. आणि वरवंड पण असते त्या जोडीला.

आहाहा कित्ती सुरेख. सुदैवाने हे सर्व रिलेट करू शकते.

घर चिरेबंदी लालचुटुक,
नको वर सिमेंटचा मुलामा,
मोहवे मनाला तेच माझ्या,
माडी हवी वर आणि मोठ्याल्या खिडक्या,
अन वर कौलारू छप्पर,
असे हवे माझ्या कोकणातले घर.

असं घर माझ्या माहेरी आहे पण वांदरे येऊन कौलं फोडतात म्हणून पत्रे घातलेत कौलांवर Sad .

सासरी चिरेबंदीच आहे पण माडी नाही, आतून उंच माळा करायची जागा आहे पण माळा नाही. चिरेबंदी घराला पुढच्या बाजूने सिमेंट मुलामा आहे Sad .

खिडक्या मात्र माहेरी सासरी लांबलचक मोठ्या आहेत. कोकणात जुन्या घरात तशात असतात मध्ये लाकडी दांडे असतात. माहेरी नवीन बांधताना ग्रील लावलंय, सासरी नवीन बांधताना जुन्यासारखं ठेवलं आहे.

बाकी गडगे चिरेबंदी सगळीकडे Happy .

एकंदरीत कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिरेबंदी बांधकाम जास्त बघितलं आहे.

तुम्ही मनाने सतत कोकणातच असता.
कोकणमय झालेल्या तुमच्यासारख्या व्यक्तीकडून कोकणातल्या अगदी बारीकसारीक गोष्टींचे वर्णन वाचतानाही अम्रुतानुभवच मिळतो... Happy

मनापासून धन्यवाद... ___/\___

छान लिहिलंय!

कलमाच्या आंब्याला आवश्यक तेवढे मोठे खड्डे ह्या कातळात खोदून नंतर त्यात लाल माती भरून कलम लावण्यात आली. ही कलमं ह्या कातळात खोदलेल्या खड्ड्यात छान रुजली >>>>>>>> अच्छा तरीच आमचा आंबेवाला, "खडकातलो आंबो असा हो, गोड असां" अशी भलामण करतो.

सगळयांचे खूप आभार.

दगडांवर लिहिलाहेस म्हणून विशेष धन्यवाद. >> हार्पेन, थँक्यू

अमा मस्त प्रतिसाद . खरच काढायचं आहे पुस्तक . बघू कधी योग येतो ते .

अंजू , फार सुन्दर लिहिलं आहेस.

निरु पटलं अगदी, असं काही केलं की ते फार धेडगुजरी दिसतं. दुसरा एक खटकणारा प्रकार म्हणजे जुन्या देवळाच्या गाभाऱ्यात लावलेल्या पांढऱ्या टाईल्स.

कोकणमय झालेल्या तुमच्यासारख्या व्यक्तीकडून कोकणातल्या अगदी बारीकसारीक गोष्टींचे वर्णन वाचतानाही अम्रुतानुभवच मिळतो... >> धन्यवाद शशांक

मनीमोहोर, खूप छान लेख! नेहमीप्रमाणेच! तुमचे कोकणावरचे लेख म्हणजे माझ्यासाठी कोकण सफर असते. अगदी असं हिंडवून आणता.

आजच्या जांभा दगडांच्या उल्लेखावरुन आणखी काही आठवणी जाग्या झाल्या.

इरावतीबाई कर्वे यांनी पुण्यात घर बांधलं तेव्हा त्यांनी काही भिंतींना जांभा दगड बसवला. नंतर घरी आल्यागेल्यांना घर दाखवताना त्या जांभा दगडाच्या भिंती दाखवून त्यावर प्रेमानी हात फिरवून हा माझ्या माहेरचा दगड आहे असं आवर्जून सांगत असत. ही माहिती आहे पु. लं नी सांगितलेली. त्यांच्या इरावती बाईंवरच्या लेखात. ( पुस्तक - गुण गाईन आवडी - इरावतीबाई - एक दीपमाळ ) माझ्यासाठी ही गोष्ट इथेच संपत नाही.
मी लग्नकरुन ज्या कुटुंबात गेले त्यांच्या एका नातेवाईकांकडे पहिल्यांदा जायचा योग आला. त्यांनी बोलता बोलता उल्लेख केला की हा बंगला त्यांनी इरावतीबाई कर्वे यांजकडून विकत घेतला आहे. मला वर उल्लेखलेली जांभा दगडाची भिंत आठवली. आणि मी त्यांना ती भिंत दाखवायची विनंती केली. मला कसं माहित याचं त्यांना आश्चर्य वाटलंच. आणि आपल्या घराची भिंत पुस्तकात अजरामर झालेली ऐकून समाधानही.

अजूनही त्या घरात ती भिंत आहे तशीच आहे. इरावतीबाईंच्या माहेरच्या (आणि मनीमोहोरच्या सासरच्या ) जांभा दगडाचं सौंदर्य दाखवत.

रत्नागिरी शहरात बऱ्याच ठिकाणी चिऱ्याची बांधकामे, कंपाऊंड वॉल पाहिल्या आहेत. विशेष म्हणजे पुर्वी मशिनरी नसताना एकसारखे चिरे घडवणं किती कसबाचं काम करत असतील ते कारागीर हे लक्षात येते.

पूर्वी चिर्‍याचं घर म्हणजे प्रतिष्ठा असे. आता कोकणात सर्रस चिर्‍याचे बांधकाम दिसते.

अवांतरः एका मित्राच्या वडिलांनी जांभा दगडाकरता पारदर्शक रंग बनवला आहे. चिरा तसाच दिसेल पण पावसाचे पाणी मात्र रोखले जाईल (चिरा सछीद्र असतो)

मस्त लिहिलं आहे. आजोळचं घर सुबक चिर्‍याचंच होतं. जवळजवळ १०० वर्षांचं होवून गेलं. आता मामेभावाने बंगला बांधला तो ही चिर्‍याचाच. चिरा घरासाठी वापरला जाई तसा झाडीतून घरापर्यंत जाणारी अरुंद वाट बांधून काढण्यासाठीही वापरला जाई. अश्या वाटेवर धडपडलं तर ढोपरांना चांगलंच लागे कारण खडबडीत दगड.

सहज नमूद करतोय.

चिरा म्हणजे ( शक्यतो बांधकामाकरता) एका विशिष्ट मापात घडवलेला दगड. त्यालाच 'फाडी' असाही शब्द ऐकला आहे.
उदा. चिरेबंदी वाडा, नाही चिरा नाही पणती ई.

चिर्‍यांनी बांधून काढलेली वाट म्हणजे पाखाडी

Pages