जांभा खडकांच्या देशा ...

Submitted by मनीमोहोर on 29 June, 2019 - 18:04

कोकण म्हटलं की त्याला एकच विशेषण सार्थ आहे आणि ते म्हणजे “ सुंदर “ ! तिथली वृक्षराजी, त्यात लपलेली छोटी छोटी घरं, निळेशार शांत समुद्र किनारे, त्यातुन आत आलेल्या छोट्या छोट्या खाड्या, लहान लहान व्हाळ , नागमोडी रस्ते , हे सगळं तर सुंदर आहेच पण कळस म्हणजे तिथले खडक ही वैशिष्ट्य पूर्ण आणि सुंदर आहेत. तुम्ही म्हणाल खडकात कसलं सौंदर्य ? चला तर मग, सांगतेच आता ह्या खडकांच्या सौंदर्याबद्दल.

सह्याद्री पर्वतात सगळीकडे जरी काळा खडक दिसत असला तरी कोकणात विशेषतः तळकोकणात मात्र काळा खडक मिळत नाही तर तिथे लाल खडक मिळतो ज्याला “जांभा” हे नाव आहे. हा लॅटेराइट प्रकारचा खडक आहे जो सहसा उष्ण आणि ओल्या विषुववृत्तीय प्रदेशांत सापडतो. . यात लोह आणि बॉक्साइट ही खनिजे असतात. वेगवेगळया ठिकाणच्या जांभा खडकात ह्या दोन खनिजांचे प्रमाण वेगवेगळे असते त्यामुळे ह्याचा रंग ही सर्व ठिकाणी एकसारखा नसतो. जिथे लोह जास्त असते तिथे लाल रंग अधिक दिसतो आणि जिथे बॉक्साईट जास्त असते तिथे पांढरा रंग अधिक दिसतो. लाल पांढऱ्या रगांमुळे नैसर्गिक रित्याच ह्याला सौंदर्य प्राप्त होते. तसेच हा खडक अतिशय खडबडीत असतो ह्यावरून हात फिरवला तरी खडबडीत पणा जाणवतो. त्यामुळे एक प्रकारचे नैसर्गिक डिझाईन ह्यावर तयार होते आणि ह्या खडकांच सौंदर्य अधिक खुलून येत. हा खडक सच्छिद्र असतो. साध्या डोळ्यांना ही छिद्र सहज दिसतात. सच्छिद्र असल्याने हा वजनाने इतर दगडांपेक्षा हलका असतो . त्याच्या ह्याच गुणधर्मामुळे कोकणात बांधकामासाठी विटांऐवजी ह्या दगडाचा वापर मुबलकपणे केला जातो. एका विशिष्ट मापात कापलेल्या दगडाचा वापर बांधकामासाठी करतात .कोकणात ह्याला “चिरा” असं म्हटलं जातं. चिऱ्याचं बांधकाम सुंदर, मजबूत आणि प्रतिष्ठित ही समजलं जातं.

जांभा खडक ( कापलेला )
800px-जांभा.jpg

आमच्या घराच्या मातीच्या भिंती आम्ही बरेच वर्षांपूर्वी चिऱ्याच्या केल्या होत्या. त्यासाठी सड्यावरचा खडक गडयांनी पहारीने फोडला होता. मग त्याचे ठराविक आकाराचे चिरे ही पहारीनेच तयार केले होते. नंतर ते चिरे सड्यावरून म्हणजे डोंगरमाथ्या वरून डोक्यावरून वाहून घरापर्यंत आणले गेले होते. आता मशीनच्या सहाय्याने चिरे पाडणं सोपं झालं आहे आणि घरापर्यंत रस्ता झाल्यामुळे ते बांधकामाच्या जागे पर्यंत आणणं ही इझी झालं आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी केलेल्या कष्टांची कल्पना ही येणं कठीण आहे. असो. सिमेंटचा गिलावा करून चिऱ्याच्या भिंती गुळगुळीत केल्या जातात किंवा तशाच ही ठेवल्या जातात. मला स्वतःला चिऱ्याच्या भिंती लालच आवडतात कोकणच्या हिरवाईत ही लाल घरं फार उठून दिसतात. पण आमच्या घराच्या भिंती मात्र सिमेंट ने गुळगुळीत केलेल्या आहेत.

आमच्या गावात सड्यावर म्हणजे गावाजवळ असलेल्या टेकडीच्या माथ्यावर सगळीकडे हाच खडक आहे ज्यावर कोणत ही पीक घेता येत नाही की कोणतं झाड ही लावता येत नाही.पण कोकणातल्या माणसांनी आपल्या बुद्धीने आणि अपार कष्टाने या ओसाड सड्यावर ही नंदनवन फुलवण्याची किमया केली आहे. कलमाच्या आंब्याला आवश्यक तेवढे मोठे खड्डे ह्या कातळात खोदून नंतर त्यात लाल माती भरून कलम लावण्यात आली. ही कलमं ह्या कातळात खोदलेल्या खड्ड्यात छान रुजली आणि आज अनेक वर्षे आम्हाला गोड रसाळ आंबे देत आहेत. असं ही म्हणतात की देवगड हापूस चा जो एकमेवद्वितीय स्वाद असतो तो ह्या मातीत असणाऱ्या लोहामुळेच असतो.

विषय निघालाच आहे तर गडग्यां बद्दल सांगितल्या शिवाय रहावत नाहीये. जनरली दोन बागांमधलं किंवा दोन घरांमधील कुंपण विटांच किंवा तारेच असतं पण कोकणात मात्र ते जांभा दगडांचं किंवा इतर कोणत्या दगडांचं असतं ज्याला “ गडगा “ अस म्हणतात. हे गडगे फार उंच नसतात. साधारण आपल्या कम्बरेपर्यंत असते ह्यांची उंची. त्यामुळे आपण सहज गडग्यावरून पलीकडे जाऊ शकतो पण गुरं मात्र जाऊ शकत नाहीत.चिरे कापताना जे लहान मोठे दगड बाजूला उडतात त्यांचा वापर करून हे गडगे बांधले जातात. जिथे गडगा बांधायचा असेल तिथे थोडासा पाया खणून हे लहान मोठे दगड त्यावर रचत जातात आणि दोन दगडांच्या फटीत बायंडिंग साठी माती लिपतात. गडगे चांगले रुंद असतात आणि त्यावरून माणूस आरामात चालत जाऊ शकतो. ह्याच वैशिष्ट्य म्हणजे वापरलेल्या दगडांचा आकार एकसारखा नसून ही ते रचताना अशा काही कौशल्याने रचले जातात की वरचा भाग अगदी एक समान लेव्हल चा होतो. आमचा गाव अशा प्रकारच्या सुंदर गडग्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच आमच्या गावातील कारागिरांना गडगे बांधण्यासाठी पंचक्रोशीत मागणी असते.

गडगा

IMG_20170410_174623_0.jpg

हा आणखी एक ..वर चढण्यासाठी इनबिल्ट पायऱ्या
IMG_20190701_150600.jpg

काही वर्षांपूर्वी मी लंडन ला गेले होते. साईट सीईंग साठी शहराबाहेर पडल्यावर निसर्गरम्य कंट्री साईड ला सुरवात झाली. हिरवीगार कुरण, त्यावर चरणाऱ्या मेंढ्या, दूरवर पसरलेली गव्हाची शेतं, मध्येच घोड्यावरून रपेट मारणारा एखादा इंग्लिश तरुण, आपल्या आयांबरोबर फिरणारी गोरी गोंडस मुलं छोट्या छोट्या टुमदार घरांची गावं अस सगळं पहात मजेत प्रवास चालला होता. एका गावात शिरलो आणि अचानक घरांच्या कुंपणासाठी घातलेले गडगे दिसले अगदी सेम कोकणातल्या गडग्यांसारखे ! फक्त दगडांचा रंग लाल काळा नसून पिवळट होता. ते गडगे पाहून मी हजारो मैलांचं अंतर क्षणार्धात पार करून कोकणात आमच्या गावी पोचले. इंग्लंड मधल्या मे महिन्यातल्या थंड हवेत मनाने मी मे महिन्यातली आमच्या कोकणातल्या घराची लगबग अनुभवली. किती विलक्षण अनुभव होता तो !

आपण कुठे ही असलो तरी आपलं गाव आपल्या मनाच्या तळाशी सतत असत आणि काडी एवढ्या आधाराने ही आपण क्षणात गावी जाऊन पोचतो. म्हणूनच ते इंग्लंड मधले गडगे मला कोकणात घेऊन गेले.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वाना पुन्हा एकदा धन्यवाद.

शुगोल, धन्यवाद . हृदयस्पर्शी आठवण . तुझ्या पोस्ट मुळे धागा वेगळ्याच उंचीवर गेलाय.

अवांतरः एका मित्राच्या वडिलांनी जांभा दगडाकरता पारदर्शक रंग बनवला आहे. चिरा तसाच दिसेल पण पावसाचे पाणी मात्र रोखले जाईल (चिरा सछीद्र असतो) >> बेस्ट आयडीया आहे ही.

फाडी हा शब्द नवीन आहे माझ्यासाठी. ठराविक आवारात तुकडे पाडे पर्यंत तो दगड/ खडक /जांभा असतो. तुकडे पाडले की चिरा होतो.

कोकणी माणुस आणी कोकणस्थांना ( कोकणस्थ ब्राह्मण ) कोकणाचा विलक्षण अभिमान का असतो हे मला लहानपणी कळायचेच नाही, कारण आम्ही देशावरचे देशस्थ. Proud आमची प्रवास मजल, पुणे, नागपूर, कोल्हापूर व खानदेशापर्यंतच मर्यादीत. मध्येच कधीतरी कार्यानिमीत मुंबई.

पण ममो खरच सांगते मायबोली जॉईन केली ना आणी नंतर एकदा अलीबागला जाऊन आलो ना, तेव्हापासुन मी कोकणाच्या प्रचंड प्रेमात पडले. तेव्हा कळले कोकणी माणुस व कोकणस्थांची नाळ कुठे जुळलीय ते. अतीशय सुंदर व रोचक माहितीपूर्ण लेख आहे. लिहीत रहा गं. पुस्तक तर काढच.

अंजू, तू का मागे रहाते, तू पण जागु व ममोच्या लाईनीत बस की. Proud

कोकणी माणुस आणी कोकणस्थांना ( कोकणस्थ ब्राह्मण ) कोकणाचा विलक्षण अभिमान का असतो >>> काय चिवट भाऊ मी वर कोकणी माणुस पण लिहीलय ते वाचायचे सोयीस्कर रित्या टाळलेले दिसतेय. Proud

इथे वाद नकोत प्लीजच.

करेक्ट , इथे वाद घालून धागा भरकटवू नका प्लिज.

TRy to read in between the lines . मतितार्थ लक्षात घ्यायचा प्रयत्न करावा .

छान आहे लेख !!! आता मशीनने चिरे कापतात त्यामुळे ठिसूळ असतात, आधी कामगार एक एक चिरा कौश्यल्याने तासून त्याला व्यवस्थित आयताकृती आकार द्यायचे. ते चिरे एकदम मजबूत असत.

Pages