ती रात्र

Submitted by Kajal mayekar on 29 June, 2019 - 13:57

मी रोज ह्याच रस्त्यावरून घरी जातो फक्त आज जरा जास्तच ऊशीर झाला आहे. मला अस का वाटतय कि माझ्या पाठीमागे कुणीतरी आहे... त्याची नजर टोचतेय माझ्या पाठीला... मला ह्या सुनसान वाटेवरून जाताना जाणवत आहे.
कोण बर असेल पाठीमागे... चोर.?? पण चोर असता तर कधीच माझ पाकिट मारून गेला असता... गेल्या अर्ध्या तासापासून मला कोणाची तरी नजर टोचतेय... पाठीमागे नक्कीच माझ्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे... कोण असू शकत.?? दरोडेखोर तर नसेल... ते लोक असेच रात्री अपरात्री एकट्या दुकट्या माणसाला लुटतात... पण मग हा दरोडेखोर मगासपासून काय टाईम पास करतोय.?? घरी जायच नाही का ह्याला.?? लुट आणि निघ ना आपल्या मार्गी... अरे हा माझा पाठलाग करत घरापर्यंत तर नाही ना येणार... म्हणजे मग घरी ह्याला बराच खजिना हाती लागायचा... नाही एक मिनिट जर का हा दरोडेखोर आहे तर तो घरापर्यंत का येईल... तिकडेतर त्याला watchmen, cctv camera सगळ्यांकडून धोका आहे... म्हणजे तो घरापर्यंत येणार नाही... मग हा मुर्ख मला लुटत का नाही.?? नक्की हा दरोडेखोरच आहे ना की.??
आयच्या गावात भुताबिताचा काही प्रकार तर नाही ना.??? म्हणजे आता मी मेलो... नक्की भुतच असणार... कोणते भुत असेल.?? ब्रम्हराक्षस, समंध, आग्या वेताळ, मुंजा, खवीस, मटमट्या, डाकीण, जखीण, हडळ वगैरे असे महाराष्ट्रीयन भुत असेल की मोक्ष न मिळाल्यामुळे अतृप्त आत्मा.???

समीर.. ए समीर बाळा... पाठीमागून आवाज आला.

म्हातारी.?? हो हा म्हातारीचाच आवाज... पण माझी आज्जी तर गावी कोकणात आहे... मग तिचा आवाज.?? आयच्या गावात खवीस... हो शंभर टक्के पाठीमागे खवीसच आहे... कारण खवीसच पाठीमागून आपल्या माणसाचा आवाज काढून हाक मारतो आणि आपण पाठीमागे वळून बघितल की परत काहीच बघण्याच्या लायकीचे राहत नाही... काही झाले तरी मी पाठीमागे वळून बघणार नाही... पण मागची व्यक्ती कोणत्या प्रॉब्लेम मध्ये असेल तर.?? म्हातारीचा आणि मागच्या बाईचा आवाज सेम पण असू शकतोच कि.!!

ए गधड्या, मी कधी पासना तुका हाको ( हाका) देतय... कान फुटले काय रे तुझे.?? पाठीमागे बघ की मेल्या... म्हातारीचा पाठून आवाज आला.

सेम.. माझी आजी पण अशीच बोलते...
ए म्हातारे गधड्या बोलायच काय काम नाय हा... मी पाठीमागे वळून न बघता पुढे चालता चालता बोललो...

मगे बघ की पाठीमागे वळून... म्हातारी म्हणाली.

मी कशाला पाठीमागे वळून बघू.?? तु ये की समोर... हव तर मी चालायचा थांबतो... पाठीमागे खवीस असेल तर तो समोर येणार नाही.

बराच वेळ झाला पाठीमागून कोणाचाही आवाज येत नाहीये... ह्याचा अर्थ तो खवीसच होता... काही आवाज नाही म्हणजे गेला वाटत... चला सुटलो एकदाचा... झाल पंधरा मिनिटांनी पोहोचेन आता घरी...

Excuse me... पाठीमागून खूपच गोड आवाज आला.

आयला इतक्या गोड आवाजाची पोरगी आपल्याला आवाज देतेय... मी पाठीमागे वळून बघणार इतक्यात डोक्यात प्रकाश पडला... *खवीस*

खवीसा साल्या, मला कितीही उकसव तु... मी पण पक्का धीट आहे... नाही पाठीमागे वळून बघणार तर नाहीच...
पाठीमागून हसण्याचा मोठा आवाज आला... बापरे काय हसतो हा.!! हसतोय कि दुसर्‍याला घाबरवतोय समजत नाही...

अरे ए कुत्र्या... पुन्हा एकदा त्याचा आवाज आला.

तु तुझे प्रयत्न चालू ठेव... मी एकदम cool attitude मध्ये बोललो... कारण मला आता माहीत आहे जो पर्यंत मी पाठीमागे वळून बघत नाही तो पर्यंत हा खवीस माझ काही एक बिघडवू शकत नाही...
अरे हे काय बराच वेळ झाला हा रस्ता अजून संपत कसा नाही.?? कधी पासून मी चालतोच आहे... खर तर इतक्यात हा रस्ता संपला पाहिजे होता...
आयच्या गावात चकवा पण लागला कि काय.?? भेंडी आजचा दिवसच बेकार आहे... पाठीमागे खवीस सोबत चकवा.. आता काय करू रे देवा... अरे हा देव.. नेमकी.. नेमकी हनुमान चालिसा आठवत नाहीये...
अरे हा काय रस्ता तर बरोबर आहे... ती काय माझी सोसायटी म्हणजे चकवा नव्हता तर...

गेली दोन वर्षे झाली... मी रोज ह्याच रस्त्यावरून घरी जातो... रोज खवीस पाठीमागून म्हातारीच्या आवाजात हाक मारतो... रोज चकवा लागल्या सारखे वाटते... रोज समोर सोसायटी दिसते पण मी कितीही प्रयत्न केला तरी मी माझ्या सोसायटी पर्यंत पोहचत नाहीये.....

Group content visibility: 
Use group defaults

मस्त, मला वाटतंय ही राब राब राबणाऱ्या प्रत्येक एम्प्लॉयीची कथा आहे. काम करता करता त्याला अनेक प्रलोभने दाखवली जातात आणि तो त्याला बळी पडतो. मग घरी रात्री उशिरा पोहचतो पण घरसुख काय लाभत नाही.

भारीय!

बोकलतचा प्रतिसाददेखील छानेय.

Thanks च्रप्स
शुभांगी
आसा
आदू
स्वस्ति

Thanks Angha
Ajay
Anjali
किल्ली

Pages