महा(खल)नायक – अमरीश पुरी

Submitted by टोच्या on 22 June, 2019 - 07:30

कोणालाही भीती वाटावी असे मोठे, भयानक डोळे, समोरच्याकडे रोखून पाहिलं की त्याची क्षणात पापणी झुकावी अशी भेदक नजर, कुणाचीही भीतीने गाळण उडावी असा भारदस्त खर्जातला आवाज... अवघा पडदा व्यापून टाकणारं हे भारदस्त व्यक्तिमत्व होतं अमरीश पुरी... आज त्यांची ८७ वी जयंती. या चतुरस्र अभिनेत्याला गुगलने डुडलद्वारे आदरांजली वाहिलीय. हिरोप्रधान सिनेमांमध्ये एकाच साच्याचे व्हिलनचे रोल मिळूनही आपल्या अभिनयाच्या बळावर त्यात जीवंतपणा आणणाऱ्या अमरीश पुरींचा हा अनोखा सन्मानच.
हिंदी चित्रपट सृष्टीत महानायक म्हणून जसं अमिताभचं निर्विवाद वर्चस्व आहे, अगदी तसंच महाखलनायक म्हणून अमरीश पुरी यांचं स्थान आहे, असं मला वाटतं. खलनायकाच्या भूमिकेसाठी अभिनयाच्या मर्यादा येतात, तोच तोचपणा येतो. पण, तरी अमरीश पुरी यांनी अभिनयाच्या पातळीवरही इतर खलनायकी भूमिका करणाऱ्या कलाकारांच्या तुलनेत बाजी मारली आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
भाऊ मदन पुरी, चमन पुरी यांच्या पावलावर पाऊल ठेऊन अमरीश हिरो होण्यासाठी मुंबईत आले खरे, पण हिरोचा चेहरा नसल्याने त्यांना सगळीकडे नकार मिळायला लागला. पहिल्याच स्क्रीन टेस्टमध्ये त्यांना नकारघंटा ऐकायला मिळाली. त्यांनी मग ईएसआयसीमध्ये नोकरी धरली. उरलेल्या वेळेत ते सत्यदेव दुबे, गिरीश कर्नाड, पृथ्वी थिएटर्स यांच्याबरोबर नाटकांमध्ये काम करू लागले. त्यांनी मराठीतही काम केलेलं आहे. 'शांतता कोर्ट चालू आहे' हा त्यांचा पहिला मराठी सिनेमा, जो याच नावाच्या नाटकावर बेतलेला होता. १९७१ मध्ये ‘रेश्मा और शेरा’ सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर अनेक सिनेमांत त्यांनी साइड रोल केले. १९८० साली आलेल्या 'हम पाँच' सिनेमात त्यांनी मुख्य व्हिलनचा रोल केला. सिनेमा हिट झाला. तेव्हा ते चाळिशीत होते. त्यानंतर विधाता, शक्ती अशा अनेक सिनेमांची त्यांच्याकडे रीघ लागली.
ऐंशी आणि नव्वदच्या दशकांत क्वचित असा सिनेमा असेल, ज्यात अमरीश पुरी नसतील. ‘मिस्टर इंडिया’तील मोगॅम्बो, ‘घायल’मधील बलवंत राय, ‘दामिनी’मधील कावेबाज वकील चड्ढा, ‘विश्वात्मा’मधला अजगर जुर्राट, ‘त्रिदेव’मधला भुजंग, ‘नगिना’मधील मांत्रिक, ‘गदर’मधला अशरफ अली, नायकमधील भ्रष्ट मुख्यमंत्री अशा असंख्य भूमिका त्यांनी अजरामर करून ठेवल्या आहेत. सिनेमांतून व्हिलन हद्दपार होऊ लागल्यानंतर ते चरित्र भूमिकांकडे वळले. ज्या ताकदीने त्यांनी व्हिलन रंगवला, त्याच ताकदीने त्यांनी ‘घातक’मधला अन्यायग्रस्त शंभूनाथ रंगवला. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मधील चौधरी बलदेव सिंग प्रत्येक सीनमध्ये लक्षात राहतात... 'जा सिमरन जा'... हा क्लायमॅक्सचा डायलॉग केवळ त्यांच्यामुळेच लक्षात राहिला. ‘चाची ४२०’ मधील दुर्गाप्रसाद भारद्वाजचं कॉमिक टायमिंग अफाट होतं. प्रियदर्शनने १९९२ मध्ये अमरीशजींना मध्यवर्ती भूमिका देत ‘मुस्कुराहट’ नावाचा एक सुंदर सिनेमा बनवला होता. बाप-मुलीच्या नात्यावर आधारित या सिनेमात अमरीश पुरींचा अभिनय लाजवाब आहे. अमरीश पुरींच्या अभिनयाची दखल हॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्गने घेतली आणि ' इंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम'मध्ये त्यांना ‘मोलाराम’ची भूमिका दिली. ती इतकी प्रसिद्ध झाली की त्याच पद्धतीच्या अनेक भूमिका हिंदी चित्रपटांत त्यांच्या वाट्याला आल्या. या सिनेमासाठी त्यांना टक्कल करावं लागलं. या भूमिकेनंतर त्यांनी कायमस्वरुपी टक्कल ठेवलं. रिचर्ड अटेनबरोच्या ‘गांधी’मध्येही ते होते. १९८० आणि १९९० च्या दशकात ९० टक्के सिनेमांत अमरीश पुरी असायचे. त्यांच्या व्यक्तिमत्वाला डोळ्यासमोर ठेऊन रोल लिहिले जाऊ लागले. त्यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं, ज्यात तीन फिल्मफेअरचा समावेश आहे. त्यांनी हिंदी, मराठी, पंजाबी, तमिळ, तेलगू, कन्नड, इंग्लिश अशा विविध भाषांतील चारशेवर सिनेमांत भूमिका केल्या. लांब कोट, डोक्यावर काऊबॉयसारखी गोल हॅट, डोळ्यांवर काळा चष्मा, ओठांत महागडी सिगार, हातात पेग, आजूबाजूला हुजरेगिरी करणारे चार पाच चमचे आणि अल्पवस्रांकित ललना… अमरीश पुरींचा व्हिलन बऱ्याचदा असा स्टायलिश, उंची असायचा. याव्यतिरिक्त चित्रविचित्र वेशभूषा असलेले मांत्रिकाचे रोलही त्यांनी ताकदीने उभे केले. ज्या काळात हिरोचा प्रत्येक सिनेमात हिरोची एकसारखीच हेअरस्टाइल, कपडे, डायलॉग डिलिव्हरीची स्टाइल असायची, त्या काळात प्रत्येक सिनेमात अमरीश पुरींचा लूक, बोलण्याची स्टाइल आणि एखादा लक्षवेधी डायलॉग असायचा. सिनेमात जितके तापट, खतरनाक रोल त्यांनी केले त्याच्या विरोधाभासी त्यांचे व्यक्तिमत्व होते. प्रत्यक्ष जीवनात ते नम्र, कुटुंबवत्सल होते. त्यांच्याकडून सहकलाकारांबाबत आगळीक घडल्याच्या बातम्या अद्याप मी तरी वाचलेल्या नाहीत. त्यांच्या व्यसनांबाबतही माहिती नाही, बहुधा करीत नसावेत. अशा या जेंटलमेन खलनायकाचं १२ जानेवारी २००५ रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी ब्लड कॅन्सरने त्यांचं निधन झालं. त्यांना आदरांजली वाहताना गुगलने म्हटलंय, If at first you don’t succeed, try, try again—and you might end up like Indian film actor Amrish Puri, who overcame an early setback on the way to fulfilling his big screen dreams.. तुम्हाला पहिल्या प्रयत्नात यश मिळत नसेल तर सतत प्रयत्न करीत राहा, कदाचित तुमचा शेवट अमरीश पुरी यांच्यासारखा होईल, ज्यांना सुरुवातीला अपयश पदरी आलं, पण नंतर ते अवघा पडदा व्यापून उरले. अशा महाखलनायकास विनम्र आदरांजली.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पशुपत, अॅमी धन्यवाद.

फारएण्ड
<त्याला अनेकदा एका शूटिंग मधून दुसरीकडे जाताना तेथील बेअरिंग लक्षात ठेवून नजर व एक्स्प्रेशन्स अ‍ॅडजस्ट करावी लागत असतील. >
अगदी.. प्रत्येक भूमिका चॅलेंजिंगच आहे.

Pages