कोणालाही भीती वाटावी असे मोठे, भयानक डोळे, समोरच्याकडे रोखून पाहिलं की त्याची क्षणात पापणी झुकावी अशी भेदक नजर, कुणाचीही भीतीने गाळण उडावी असा भारदस्त खर्जातला आवाज... अवघा पडदा व्यापून टाकणारं हे भारदस्त व्यक्तिमत्व होतं अमरीश पुरी... आज त्यांची ८७ वी जयंती. या चतुरस्र अभिनेत्याला गुगलने डुडलद्वारे आदरांजली वाहिलीय. हिरोप्रधान सिनेमांमध्ये एकाच साच्याचे व्हिलनचे रोल मिळूनही आपल्या अभिनयाच्या बळावर त्यात जीवंतपणा आणणाऱ्या अमरीश पुरींचा हा अनोखा सन्मानच.
हिंदी चित्रपट सृष्टीत महानायक म्हणून जसं अमिताभचं निर्विवाद वर्चस्व आहे, अगदी तसंच महाखलनायक म्हणून अमरीश पुरी यांचं स्थान आहे, असं मला वाटतं. खलनायकाच्या भूमिकेसाठी अभिनयाच्या मर्यादा येतात, तोच तोचपणा येतो. पण, तरी अमरीश पुरी यांनी अभिनयाच्या पातळीवरही इतर खलनायकी भूमिका करणाऱ्या कलाकारांच्या तुलनेत बाजी मारली आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
भाऊ मदन पुरी, चमन पुरी यांच्या पावलावर पाऊल ठेऊन अमरीश हिरो होण्यासाठी मुंबईत आले खरे, पण हिरोचा चेहरा नसल्याने त्यांना सगळीकडे नकार मिळायला लागला. पहिल्याच स्क्रीन टेस्टमध्ये त्यांना नकारघंटा ऐकायला मिळाली. त्यांनी मग ईएसआयसीमध्ये नोकरी धरली. उरलेल्या वेळेत ते सत्यदेव दुबे, गिरीश कर्नाड, पृथ्वी थिएटर्स यांच्याबरोबर नाटकांमध्ये काम करू लागले. त्यांनी मराठीतही काम केलेलं आहे. 'शांतता कोर्ट चालू आहे' हा त्यांचा पहिला मराठी सिनेमा, जो याच नावाच्या नाटकावर बेतलेला होता. १९७१ मध्ये ‘रेश्मा और शेरा’ सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर अनेक सिनेमांत त्यांनी साइड रोल केले. १९८० साली आलेल्या 'हम पाँच' सिनेमात त्यांनी मुख्य व्हिलनचा रोल केला. सिनेमा हिट झाला. तेव्हा ते चाळिशीत होते. त्यानंतर विधाता, शक्ती अशा अनेक सिनेमांची त्यांच्याकडे रीघ लागली.
ऐंशी आणि नव्वदच्या दशकांत क्वचित असा सिनेमा असेल, ज्यात अमरीश पुरी नसतील. ‘मिस्टर इंडिया’तील मोगॅम्बो, ‘घायल’मधील बलवंत राय, ‘दामिनी’मधील कावेबाज वकील चड्ढा, ‘विश्वात्मा’मधला अजगर जुर्राट, ‘त्रिदेव’मधला भुजंग, ‘नगिना’मधील मांत्रिक, ‘गदर’मधला अशरफ अली, नायकमधील भ्रष्ट मुख्यमंत्री अशा असंख्य भूमिका त्यांनी अजरामर करून ठेवल्या आहेत. सिनेमांतून व्हिलन हद्दपार होऊ लागल्यानंतर ते चरित्र भूमिकांकडे वळले. ज्या ताकदीने त्यांनी व्हिलन रंगवला, त्याच ताकदीने त्यांनी ‘घातक’मधला अन्यायग्रस्त शंभूनाथ रंगवला. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मधील चौधरी बलदेव सिंग प्रत्येक सीनमध्ये लक्षात राहतात... 'जा सिमरन जा'... हा क्लायमॅक्सचा डायलॉग केवळ त्यांच्यामुळेच लक्षात राहिला. ‘चाची ४२०’ मधील दुर्गाप्रसाद भारद्वाजचं कॉमिक टायमिंग अफाट होतं. प्रियदर्शनने १९९२ मध्ये अमरीशजींना मध्यवर्ती भूमिका देत ‘मुस्कुराहट’ नावाचा एक सुंदर सिनेमा बनवला होता. बाप-मुलीच्या नात्यावर आधारित या सिनेमात अमरीश पुरींचा अभिनय लाजवाब आहे. अमरीश पुरींच्या अभिनयाची दखल हॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्गने घेतली आणि ' इंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम'मध्ये त्यांना ‘मोलाराम’ची भूमिका दिली. ती इतकी प्रसिद्ध झाली की त्याच पद्धतीच्या अनेक भूमिका हिंदी चित्रपटांत त्यांच्या वाट्याला आल्या. या सिनेमासाठी त्यांना टक्कल करावं लागलं. या भूमिकेनंतर त्यांनी कायमस्वरुपी टक्कल ठेवलं. रिचर्ड अटेनबरोच्या ‘गांधी’मध्येही ते होते. १९८० आणि १९९० च्या दशकात ९० टक्के सिनेमांत अमरीश पुरी असायचे. त्यांच्या व्यक्तिमत्वाला डोळ्यासमोर ठेऊन रोल लिहिले जाऊ लागले. त्यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं, ज्यात तीन फिल्मफेअरचा समावेश आहे. त्यांनी हिंदी, मराठी, पंजाबी, तमिळ, तेलगू, कन्नड, इंग्लिश अशा विविध भाषांतील चारशेवर सिनेमांत भूमिका केल्या. लांब कोट, डोक्यावर काऊबॉयसारखी गोल हॅट, डोळ्यांवर काळा चष्मा, ओठांत महागडी सिगार, हातात पेग, आजूबाजूला हुजरेगिरी करणारे चार पाच चमचे आणि अल्पवस्रांकित ललना… अमरीश पुरींचा व्हिलन बऱ्याचदा असा स्टायलिश, उंची असायचा. याव्यतिरिक्त चित्रविचित्र वेशभूषा असलेले मांत्रिकाचे रोलही त्यांनी ताकदीने उभे केले. ज्या काळात हिरोचा प्रत्येक सिनेमात हिरोची एकसारखीच हेअरस्टाइल, कपडे, डायलॉग डिलिव्हरीची स्टाइल असायची, त्या काळात प्रत्येक सिनेमात अमरीश पुरींचा लूक, बोलण्याची स्टाइल आणि एखादा लक्षवेधी डायलॉग असायचा. सिनेमात जितके तापट, खतरनाक रोल त्यांनी केले त्याच्या विरोधाभासी त्यांचे व्यक्तिमत्व होते. प्रत्यक्ष जीवनात ते नम्र, कुटुंबवत्सल होते. त्यांच्याकडून सहकलाकारांबाबत आगळीक घडल्याच्या बातम्या अद्याप मी तरी वाचलेल्या नाहीत. त्यांच्या व्यसनांबाबतही माहिती नाही, बहुधा करीत नसावेत. अशा या जेंटलमेन खलनायकाचं १२ जानेवारी २००५ रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी ब्लड कॅन्सरने त्यांचं निधन झालं. त्यांना आदरांजली वाहताना गुगलने म्हटलंय, If at first you don’t succeed, try, try again—and you might end up like Indian film actor Amrish Puri, who overcame an early setback on the way to fulfilling his big screen dreams.. तुम्हाला पहिल्या प्रयत्नात यश मिळत नसेल तर सतत प्रयत्न करीत राहा, कदाचित तुमचा शेवट अमरीश पुरी यांच्यासारखा होईल, ज्यांना सुरुवातीला अपयश पदरी आलं, पण नंतर ते अवघा पडदा व्यापून उरले. अशा महाखलनायकास विनम्र आदरांजली.
महा(खल)नायक – अमरीश पुरी
Submitted by टोच्या on 22 June, 2019 - 07:30
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
विनम्र आदरांजली ! लेख आवडला.
विनम्र आदरांजली !
लेख आवडला.
माझा आवडता कलाकार. त्यांना
माझा आवडता कलाकार. त्यांना पहाताना मला नेहमी वाटायचं की वैयक्तिक आयुष्यात हा माणूस फार प्रेमळ असेल.
प्रत्यक्षात कसे होते ते माहित नाही.
सुमित, शाली प्रतिसादाबद्दल
सुमित, शाली प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मस्त लेख.आज डुडल पाहिल्या
मस्त लेख.आज डुडल पाहिल्या पासूनच आठवण येत होती.खरंच त्यांच्या साठी रोल लिहिले जावे अश्या ताकदीचा अभिनेता.Miss him in today's films.
मला मुस्कराहट, मुझे कुछ कहना है,चाची 420,घातक,दामिनी,घायल सगळेच रोल आवडतात.
छान लेख आहे. अमरीश पुरीं
छान लेख आहे. अमरीश पुरीं सारखा कलाकार होणे नाही. प्राण, प्रेम चोप्रा यांच्या बरोबरीने स्वतःची अमीत छाप सोडणारा हा कलाकार विरळाच.
ज्या ताकदीने त्यांनी व्हिलन रंगवला, त्याच ताकदीने त्यांनी ‘घातक’मधला अन्यायग्रस्त शंभूनाथ रंगवला>>>>>> घातक्साठीच त्यांना राष्ट्रीय की फिमफेअर चा सर्वोत्तम सहनायक म्हणून पुरस्कार मिळाला होता. क्रोध को पालना सिखो बेटे हा डॉयलॉग सर्वोत्तम होता.
तुषार कपूर व करीना सोबतचा पिक्चर ( मुझे कुछ कहेना है ) फार छान होता, त्यात अमरीश पुरींनी तुषारच्या आजोबांचे काम फार मिश्कील पद्धतीने केले होते.
अमरीश पुरी यांचे चोरी चोरी
अमरीश पुरी यांचे चोरी चोरी चुपके चुपके,DDLJ,खुशी,परदेस सारखे चित्रपट विशेष करुन आवडले.त्यांत ते प्रेमळ-हळव्या रुपात दिसलेले.
त्यांना विनम्र आदरांजली!!
मी अनु
मी अनु
<<मस्त लेख.आज डुडल पाहिल्या पासूनच आठवण येत होती.खरंच त्यांच्या साठी रोल लिहिले जावे अश्या ताकदीचा अभिनेता.Miss him in today's films.
मला मुस्कराहट, मुझे कुछ कहना है,चाची 420,घातक,दामिनी,घायल सगळेच रोल आवडतात.>>
मला त्यांची मुस्कुराहटमधील भूमिका विशेष आवडलेली. चाची ४२०मध्ये तर त्यांनी धमालच केलीय.
रश्मी,
<<अमरीश पुरीं सारखा कलाकार होणे नाही. प्राण, प्रेम चोप्रा यांच्या बरोबरीने स्वतःची अमीत छाप सोडणारा हा कलाकार विरळाच.>> अगदी.
<<घातक्साठीच त्यांना राष्ट्रीय की फिमफेअर चा सर्वोत्तम सहनायक म्हणून पुरस्कार मिळाला होता. क्रोध को पालना सिखो बेटे हा डॉयलॉग सर्वोत्तम होता.>> हो. बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरचा पुरस्कार मिळाला होता.
<तुषार कपूर व करीना सोबतचा पिक्चर ( मुझे कुछ कहेना है ) फार छान होता, त्यात अमरीश पुरींनी तुषारच्या आजोबांचे काम फार मिश्कील पद्धतीने केले होते.>> मनमौजी आजोबा.
मन्या,
<<अमरीश पुरी यांचे चोरी चोरी चुपके चुपके,DDLJ,खुशी,परदेस सारखे चित्रपट विशेष करुन आवडले.त्यांत ते प्रेमळ-हळव्या रुपात दिसलेले.>> अनुमोदन.
गर्दीश चा उल्लेख नाही केला
गर्दीश चा उल्लेख नाही केला कोणी- मस्त काम केले होते.
च्रप्स
च्रप्स
<<गर्दीश चा उल्लेख नाही केला कोणी- मस्त काम केले होते.>>
हो. त्यात हवालदाराचा रोल केलेला ना…
अमरीश पुरींनी ज्वेलथिफ या
अमरीश पुरींनी प्रेम पुजारी या चित्रपटात एका गुंडाची भूमिका केल्याची आठवतेय. 1970 सालीच त्यांनी चित्रपटात काम सुरू केले असे म्हणता येईल.
<<अमरीश पुरींनी प्रेम पुजारी
<<अमरीश पुरींनी प्रेम पुजारी या चित्रपटात एका गुंडाची भूमिका केल्याची आठवतेय. 1970 सालीच त्यांनी चित्रपटात काम सुरू केले असे म्हणता येईल.>>
विकीपीडियावर चुकीची माहिती असावी..
https://youtu.be/enaZbpri_lY
https://youtu.be/enaZbpri_lY
इथे 1 तास 23 मिनिटे 32 सेकंद या क्षणात अमरीश पुरींना पाहून घ्या.
सूरज का सातवा घोडा यातही
सूरज का सातवा घोडा यातही सुरेख काम होते त्यांचे. चित्रपटच मस्त होता.
छान लेख. माझाही आवडता कलाकार
छान लेख. माझाही आवडता कलाकार. हिरो(१९८३)मधल्या पाशा पासून आवडायला लागला, हा बहुतेक त्याचा पहिलाच चित्रपट मी पाहिलेला.
छान लेख!
छान लेख!
क्रूर विचित्र खलनायक ते
क्रूर विचित्र खलनायक ते प्रेमळ मिश्किल आजोबा हा प्रवास खरेच विलक्षण.
शाली,
शाली,
<सूरज का सातवा घोडा यातही सुरेख काम होते त्यांचे. चित्रपटच मस्त होता.>
हा सिनेमा मी फार लहानपणी दूरदर्शनवर पहिलेला. पण तेव्हा तो फार बोअरिंग वाटला होता.
मानव पृथ्वीवर, स्वाती २,आशुचँप प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
मी माझा,
मी माझा,
इथे 1 तास 23 मिनिटे 32 सेकंद या क्षणात अमरीश पुरींना पाहून घ्या.>
हो बघितला.
(No subject)
जंग मुव्हीमध्येही त्यांनी
जंग मुव्हीमध्येही त्यांनी केलेली वकिलाची भुमिकाही छान होती.
Ek thha gao jaha ka... Ek
Ek thha gao jaha ka... Ek hota thha raja... Virasat! अ वि स्म र णी य!
छान लेख. खरच खूप भारी कलाकार.
छान लेख. खरच खूप भारी कलाकार.
विनम्र आदरांजली. उत्तम लेख.
विनम्र आदरांजली.
उत्तम लेख.
माझ्या माहितीप्रमाणे त्यांची
माझ्या माहितीप्रमाणे त्यांची पत्नी मराठी आहे ( होती).
हिन्दुस्थानी क्लासीकल च्या मुम्बईतील बर्याच मेहेफिलिना त्याना बघितलेय.
विनम्र आदरांजली.
विनम्र आदरांजली.
उत्तम लेख. +100
एका animated barbie फ़िल्म मधल्या खलनायकाचा
चेहरा अमरीश पुरी सारखा दाखवला आहे.
मला अमरीश पुरी कधीच आवडला
मला अमरीश पुरी कधीच आवडला नाही. कदाचित तो साकारत असलेल्या खलनायकी कामाची ती पावती असेल,पण मला फार राग यायचा याचा.
Akki320, Indian1, मी नताशा,
Akki320, Indian1, मी नताशा, सुलू, मनिम्याऊं,jayanti p प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार
ताल आणि यादें हे ही विशेष
ताल आणि यादें हे ही विशेष लक्षात राहिलेले , अमरिश पुरींच्या भूमिकेसाठी ! अतिशय राजेशाही , बुलंद व्यक्तीमत्व !
लेख आवडला.
लेख आवडला.
सुंदर लिहीले आहे! असंख्य
सुंदर लिहीले आहे! असंख्य चांगले रोल्स आहेत अमरीश पुरीचे. नंतर केलेले भारदस्त, गंभीर बापाचे रोल्स, मधून मधून केलेले चाची ४२० सारखे किंवा चायना गेट सारखे रोल्स, आणि जवळजवळ प्रत्येक रोल मधे काहीतरी वैविध्य आणून केलेले ९०ज मधले व्हिलन्स - तहलका सारखे.
त्याची आणखी एक लक्षात राहणारी भूमिका म्हणजे "पार्टी" या- तेव्हा ज्याला आर्ट फिल्म म्हणत तशा - चित्रपटातील गंभीर रोल. बहुधा रोहिणी हट्टंगडीचा नवरा असतो. त्या पार्टीमधे इतर सगळे लोक प्रचंड बकबक करत असताना तेथे शांतपणे सामील होउन अधूनमधून एखादे वाक्य बोलणारे कॅरेक्टर त्याने जबरी उभे केले आहे.
त्याला अनेकदा एका शूटिंग मधून दुसरीकडे जाताना तेथील बेअरिंग लक्षात ठेवून नजर व एक्स्प्रेशन्स अॅडजस्ट करावी लागत असतील. उदा: खालच्या दोन्ही लिन्क्स मधली गाणी. दोन्ही चित्रपट साधारण एकाच काळातले. दोन्हीकडे स्त्रिया नाचत आहेत समोर, पण याची भूमिका वेगळी आहे
करण-अर्जुन
https://www.youtube.com/watch?v=0WQ3hGj9AXQ&t=3m22s
विरासत
https://www.youtube.com/watch?v=8mpvyQbYCuM&t=40s
Pages