विडंबन-२

Submitted by हरिहर. on 22 June, 2019 - 06:46

या अगोदरची कविता पोस्ट केल्यावर आलेल्या काही प्रतिसादांमुळे ही समस्त सासरे मंडळींसाठी केली होती…
(कृपया विनोदाने घ्यावे)

पोटी आल्या कन्येचा योगे। पिता ही ग्रहदशा भोगे l
जामाताशी उपसर्गही न पोहचे l तो तर दशमग्रह ll

घेणं नास्ति, देणं नास्ति l त्या नाम जामात असती l
अहोरात्र एकच ही पुस्ती l गिरवीत जावी ll

समय प्रसंग ओळखावा l राग निपटून सांडावा l
आला तरी कळो न द्यावा l जामाताशी ll

गर्दभासामोरी टांगावी गाजरे l मग तो चालो लागे साजरे l
काम करून घ्यावे गोजरे। संयमाने ll

वानराशी म्हणावे तुझीच लाल l आपली कळो न द्यावी चाल l
मग खुशाल लादावी पखाल। हल्याच्या पाठी ll

दिसामाजी शालजोडीतील हाणावी l मासामाजी ‘दे धरणी ठाय’ ताणावी l
नयनी गोनेत्रातील करुणा आणावी l हेत साधताना ll

जे पेटल्यावीन जाळीतसे l जे जळावीण क्षाळीतसे l
जे रज्जुविनाही माळीतसे l तैसे होओनी राहावे ll

जो जामात होवुनी श्वसुरासी छळी l श्वसुर होताच दशमग्रह निर्दाळी l
मग पावे कीर्ती जळीस्थळी ll तो एक चतुर पुरुष जाण ll

जामाताशी दया न ये कामा l क्रोध नये सोयऱ्याच्या धामा l
जेथ ज्याचा महिमा l ते तेथेच योजावे ll

खळा जामातांचे ठाई l शांती धरता पडणे अपाई l
जैसे कंटक मर्दावे पायी l तेवी जामात दंडावे ll

साधता वरीलिया युक्ती l कन्या संसारी सुखी होती l
जामाताची कुंठते मती l श्वासुरापुढती ll

देखुनी कन्येच्या दु:खा l स्नुषेचा होवुनी राहावे सखा l
तेथ दाविता क्रूरता l अध:पाता जाईजे ll

मग हरेल जामाताचे दु:ख l अवघे गोत पावती सुख l
अनित्य संसारी कौतुक l ऐसे करुनी जावे ll

या उपरीही न आकळता द्वाड l जमातासमोर न लागे पाड l
मायबोलीचे ठोठवावे कवाड l तेथ 'शाली' असेची गा ll

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देखुनी कन्येच्या दु:खा l स्नुषेचा होवुनी राहावे सखा l
तेथ दाविता क्रूरता l अध:पाता जाईजे ll>>>क्या बात है

शालिदा, हेही बोल तेही बोल , अवघे तोल समयोचित ... असं झालंय ना?..
दोन्ही भूमिकेतून खूप सुंदर.लिहिलंय . (विनोद करणं खूप कठीण असतं)

धन्यवाद किट्टु! बाबा काय म्हणाले ते नक्की सांगा.
प्राचीन संपुर्ण कविता विनोदी आहे, फक्त ही ओवी सोडून. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
थँक्यू मन्या!
प्रतिसादासाठी खुप धन्यवाद मानसी.

सगळ्यांचे आभार!

@JayantiP
जो जामात होवुनी श्वसुरासी छळी l श्वसुर होताच दशमग्रह निर्दाळी l
मग पावे कीर्ती जळीस्थळी ll तो एक चतुर पुरुष जाण ll
ही ओवी तुम्ही मिस केली वाटते. Wink
अर्थात हे निव्वळ मनोरंजन म्हणून लिहिले आहे.
प्रतिसादासाठी धन्यवाद!

जरी जामात काही न वांछी, तरी द्याव्या तया उपहार भेटी.
होवून तयाची संतुष्टी, राखील राणीपरी तुमची बेटी.
जामाता म्हणू नये खोटा,
मानावा तया सगा बेटा.
लेकीच्या संसारि होणार नाही तंटा.

मस्त लिहिलंय. अगदी विचारपुर्वक. शालीदा शब्दसाठा फार आहे तुमच्याकडे.
पण हे अस अवघड लिहायला मला नाही जमत.