खिचडी

Submitted by दत्तात्रय साळुंके on 17 June, 2019 - 06:35

खिचडी

शाळा शिकून मोठा होईल
असं नव्हतं वाटलं आईबाला
अन् गोणत्यातल्या पाटीच्या
काळ्याकभिन्न तुकड्याला

तो काळाकुळीत फुटक्या पाटीचा तुकडा
माझा अनभिज्ञ भविष्यकाळ अन्
दुपारच्या घमघमणा-या खिचडीचा
टेकू लावलेलं तुटकं वर्तमान

दुपारची खिचडी खाणं माझं स्वर्गसुख
पण अर्धपोटी आईबा चोरायचे भूक
घरी आलो तरी वाट पहायचो उद्याची
नाकात रात्रंदिवस खिचडीच घमघमायची

आईबा सुखावलं, म्हणलं
पोरगं एकवेळ तरी पोटभर खाईल
शिकून काय गरीबाघरचं पोर
कधी बारीष्टर होईल ?

फाटकं वर्तमान सर्वत्र चटके देत होतं
रंगीबेरंगी ठिगळ अब्रू झाकत होतं
पाटीवरची अक्षरं होऊ दिली नाही धुसर
खिचडीने दिला आधार झालो बॅरिस्टर

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फाटकं वर्तमान सर्वत्र चटके देत होतं
रंगीबेरंगी ठिगळ अब्रू झाकत होतं
पाटीवरची अक्षरं होऊ दिली नाही धुसर
खिचडीने दिला आधार झालो बॅरिस्टर.
- मस्तच

फार सुरेख कविता.
वास्तव आहे हे. आजही गावाकडे खिचडी, शिधा यासाठी मुलांना शाळेत पाठवतात.

कविता फार आवडली दत्ताकाका!!

माझ्यामते, कुठल्याही सरकारचे यशापयश प्राथमिक शिक्षण किती तळागाळापर्यंत पोहोचवू शकते, मिड डे मील सारख्या योजना किती चांगल्या प्रकारे राबवू शकते यावर जोखावे!!

सिध्दी, मन्याS धन्यवाद,
शाली- अजूनही असे आहे. खूप धन्यवाद
पुंबा - मार्मिक प्रतिसादाबद्दल आभार

सुंदर कविता दत्तात्रय साळुंके!
पूर्वी शाळेत तांदूळ दिले जात, ते तांदूळ विकून एखाद्याच्या दारुड्या बापाची सोय होई.
खिचडी हा अजूनही सर्वोत्तम पर्याय नाही, पण अजूनही खेड्यापाड्यात ज्या मुलांना नीट दोन वेळचं जेवण मिळत नाही, त्यांच्यासाठी वरदानच.

आवडली कविता .
पूर्वी शाळेत तांदूळ दिले जात, ते तांदूळ विकून एखाद्याच्या दारुड्या बापाची सोय होई.
खिचडी हा अजूनही सर्वोत्तम पर्याय नाही, पण अजूनही खेड्यापाड्यात ज्या मुलांना नीट दोन वेळचं जेवण मिळत नाही, त्यांच्यासाठी वरदानच>>खरंय

@ महाश्वेता, anjali_kool अगदी खरं आहे तुमचं.. कविता आवडली खूप धन्यवाद.
@ वावे, टवाळ_एकमेव तुमचेही अनेक आभार - आवर्जुन प्रतिसाद दिलात.