मला मायबोलीबद्दल बोलायचं आहे

Submitted by म्याऊ on 16 June, 2019 - 23:14

नमस्कार

म्याऊ हा आयडी माझा तात्पुरता आहे. त्यांमुळे संशोधन करू नये.

मायबोलीची बदलती रूपं मी बघत गेले आहे. अनेक कारणांसाठी मी मायबोलीचा प्रभावी वापर पाहिला. इथे स्त्री वादाबाबत झालेल्या चर्चा वाचल्या. लिंगनिरपेक्षता सारखे अतिशय मार्गदर्शक परिसंवाद वाचले. मी त्यात सहभागही नोंदवला. पुरूषांना इथे बोलतं केलं गेलं. काहींचे कबुलीजबाब आले. मायबोलीला जर आपण सोशल मीडीया समजणार असू तर असा वापर मी कधीही कुठेही पाहिलेला नाही.

भाषाविषयक उपक्रम, गणेशोत्सवाचे उपक्रम आणि दिवाळी अंक हे सर्व मायबोलीच्या यशातले मानाचे तुरे आहेत. हे सर्व मायबोलीचे अधिकृत उपक्रम आहेत. याशिवायही अनेक काही सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. त्या म्हणजे इथल्या मंडळींनी येऊन एक नाही दोन दोन शॉर्ट फिल्म्स बनवलेल्या आहेत. माझ्या माहीतीत नसलेले ही अनेक उपक्रम असतील. हे पण मायबोलीचेच यश नाही का ?

इथे संशोधक आहेत. खेळाडू आहेत. सायकलस्वार आहेत. ट्रेकर्स आहेत. अनेक व्यावसायिक आणि छंदी फोटोग्राफर्स आहेत. या सर्वांच्या अनुभवांनी मायबोली समृद्ध होत गेली आहे.

माझ्या माहितीत मायबोली म्हणजे नेटवर फुकट चांगले वाचण्याची सोय होती. मी त्याच साठी इथे आले. बाकीचे उपक्रम नंतर समजत गेले. मी कुणाचेही नाव घेण्याचे टाळतेय. पण इथे उत्तमोत्तम कथा, कविता, गझला, ललितं वाचायला मिळायची हे अगदी सत्य आहे. या काळात मला वर्तमानपत्रातले लेख वाचवेनासे झाले होते. कारण नव्या दमाचे साहीत्य मी इथे वाचत होते. मी पण तोडका मोडका प्रयत्न केला. पण तो अगदीच बालीश असल्याने सोडून दिला.

इथे लिहीणा-या मंडळींना खुले आकाश मिळाले. हे नैसर्गिक आहे. त्यांची जागा नव्यांनी घेतली. वाचकांची नवी पिढीही आली.

पुढे पुढे मायबोलीवर काही तरी बिनसत गेले.
कुठून आणि कसे ते सांगता येत नाही. पण साहीत्याचा दर्जा घसरला ही सुरूवात होती कि सदस्यांतली धूसफूस ही सुरूवात हे मला सांगता नाही येणार. मला इथे कारणांच्या मुळाशी जायचे नाही. परिणाम दिसताहेत. त्यावर बोलायचे आहे. कदाचित माझे इथून पुढचे लिखाण चुकीचे असेल, एकांगीही वाटू शकेल. कारण माझ्या चष्म्यातून मी लिहीणार आहे.

- नव्या साहीत्याकडे म्हणावे तसे लक्ष नाही
- नव साहीत्यिकांना मार्गदर्शन करायला कुणालाच वेळ नाही
- साहीत्यिकांचा दर्जा म्हणावा तसा नाही.
- त्यामुळे करंट अफेअर्स, राजकारण यावर चर्चा जास्त होत आहेत.
- इतर काही घडत नसल्याने राजकारण, करंट अफेअर्स पुरतीच मायबोली आहे का असे वाटते.
- जर राजकारणावरच्या चर्चांपेक्षा इतर घडामोडींमधे वाढ झाली तर राजकारणाकडे फारसे लक्ष जाणार नाही

हे काही मुद्दे आहेत.
याशिवाय राजकारणाचा चिखल होण्यामागे काही जण सातत्याने फेक आयडीज घेऊन ख-या नावाने लिहीणा-यांवर चिखलफेक करत राहतात. यावर मायबोलीचे कोणतेच धोरण नाही.

मायबोली जर सोशल साईट आहे असे म्हणणे असेल तर युझर्सला समान वागणूक हवी.
मायबोली ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे असे म्हणणे असेल तर त्या पद्धतीचा डिसक्लेमर सदस्यत्व घेताना मिळायला हवा.

अनेकदा सक्रीय सदस्यांचं जे बहुमत आहे त्यापेक्षा वेगळ्या मताची टिंगल करणे किंवा त्याच्यावर तुटून पडणे हे न्याय्य असल्याप्रमाणे मायबोलीचे धोरण असते. अल्पमताचा आदर मायबोलीवर पूर्वी व्हायचा. तो आता होत नाही. मायबोली ही इतर अनेक साईट्सपेक्षा वेगळी होती. पुरोगामी होती याचे असंख्य पुरावे आहेत.

पण ती तशीच राहिलेली आहे का याबद्दल शंका आहेत.
उजव्या विचारसरणीचा वरचष्मा मायबोलीवर जाणवतो. इथे अनेक सभ्य आयडीज फेक आयडीज घेऊन पुरोगाम्यांना त्रास देत राहतात. रॅशनलिस्टना अपमानास्पद वागणूक देण्यासाठी मायबोलीचा मुक्तपणे वापर सध्या वाढलेला आहे. उजव्या विचारसरणीचे नसाल तर तिरस्कारयुक्त , द्वेषपूर्ण वागणूक मिळते.

अनेक तटस्थ समजले जाणारे आयडीज देखील उजव्या विचारसरणीला अनुकूल आहेत. त्याचे त्यांना नक्कीच स्वातंत्र्य आहे. पण तसे ते कबूल करत नाहीत. यातले काही राजकारणाच्या धाग्यावर येऊन झाली का चिखलफेक सुरू असे शेरे मारतात आणि फेक आयडीने एका कंपूवर तुटून पडतात. मूळ आयडीने कितीही तटस्थपणाचा आव आणला तरी ही मंडळी आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांचा राग धरतात. हे दुर्दैवी आहे.

मतभेदांना जागा असावी.
माझ्या पाहण्यात काही जण आले आहेत. ज्यांच्याकडे मी मत मांडले नव्हते तोपर्यंत ते माझ्याशी खूप चांगले होते. यांच्या तोंडून मी ऐकलेल्ञा गोष्टी आहेत. काही लेखक या मंडळींना आवडायचे. पण यातल्या काहींनी आपली राजकीय विचारसरणी स्पष्ट केल्यानंतर त्यांना वाळीत टाकले गेले आहे. तसे एसएमएस पूर्वी जायचे. नंतर व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप्सवर अमूक तमूक ला रिप्लाय देऊ नका असे मेसेजेस येऊ लागले. फेसबुक ग्रुप्स काढूनही तिथे हे उद्योग झाले आहेत.

मी अनेकदा असे मेसेजेस इग्नोर केले. पण अती झाल्यानंतर संबंधितांना फोन करून सांगितले. याचा परिणाम म्हणून मलाही तीच वागणूक मिळाली. याच कारणाने मी मायबोलीवर अनेक वर्षे नव्हते. यावेसेच वाटले नाही. पण इतर ठिकाणीही रमले नाही.

अधून मधून नवे काही दमदार आले आहे का हे बघत राहीले. पण छे !
मध्यंतरी काही दमदार गझलांची सुरूवात झाली. आश्वासक वाटले. पण गझलकारांचा एक कंपू झाला आणि त्याने नको नको केले. रोगापेक्षा उपाय भयंकर झाला.

अजूनही दाद तैंचं काही येत अधून मधून येता राहतं. (तिच नाव घेतल्याशिवाय राहवत नाही. खूप आवडती लेखिका आहे ती माझी). तेव्हढ्यासाठी मायबोलीवर उगवून अंतर्धान पावणारे आयडीज पण पाहीलेत. हे माझ्यासारखेच नंतर कुठे तरी गायब होतात. खरेच आम्ही मायबोलीवर वैयक्तिक स्वार्थासाठी येतो. आम्हाला मायबोली सुधारावयाची नाही का ?

पण, आमच्या हाती आहे का हे ?
किंबहुना हे आमचे काम तरी आहे का ? मायबोलीला तसे मनापासून वाटत असेल तर सक्षम लोक आहेत इथे. आपोआप सुधारेल. पण तसे खरेच वाटतेय का कुणाला ?

मायबोलीचे मत म्हणजे कुणाचे मत आहे ? जगभर पसरलेली मायबोली आहे. ५०००० च्या पुढे पोहोचलीय ना संख्या ? (कदाचित मी खूप मागच्या जमान्यात असेन)

मग इथे मूठभरच का सक्रीय ? ही मंडळी नेमकी काय करतात ? एखादी चांगली कथा व्हायरल होते. नावाशिवाय चोरी होते ही सक्रीय न दिसणारे लोक मायबोली वाचतात याची पावतीच नाही का ? या सर्वांना सामील करून घेण्यासाठी काय योजना आहेत ?

मुठभरांच्या आवड निवड बाजूला सारून बहुजनांची आवड लक्षात घेऊन आपल्याला उपक्रम आखता येऊ शकतील का ?

माफ करा. जरा जास्तच बोलले. कुणी दुखावले गेले असल्यास क्षमस्व !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त ख-या नावाशिवाय लिहू नये याचा विरोध नको. तुम्हीही तेच केले आहे.
उर्वरीत लेखाशी सहमत.

तुमच्या सगळ्याच मतांशी सहमत नाही तरी काही मुद्द्यांशी सहमत.

माझ्या माहितीत मायबोली म्हणजे नेटवर फुकट चांगले वाचण्याची सोय होती.

Happy Happy हाच तर त्रास आहे. फुकट मिळतेय म्हणून ती कशीही वापरायची ही खास भारतीय वृत्ती आहे.

रच्याकने, मायबोलीबद्दल आस्था आहे, काहीतरी सकारात्मक व्हावे ही तळमळ आहे तर ती तळमळ व्यक्त करण्यासाठी फेक आयडी घ्यायची का गरज पडावी? आणि अशी गरज वाटत असेल तर 'काही सभ्य आयडी फेक आयडी घेऊन अमुक तमुक करतात' ही ओरड करण्यात काय अर्थ?

हाच तर त्रास आहे. फुकट मिळतेय म्हणून ती कशीही वापरायची ही खास भारतीय वृत्ती आहे.>>>दोनशे टक्के सहमत.

पण साधनाताई फेक आयडी घेऊन जर काही चांगला हेतू बाळगला तर हेतू लक्षात घ्यावा हे उत्तम. तुम्हीही फेक आयडी घेवूनच आलात की असे म्हणन्यात काय हशील? यामुळे मुद्दे बाजुला राहून धागाकर्त्याचा फेक आयडी इकडेच चर्चा वळेल. निदान येथे तरी असेच होते.

फेक आयडी कमी झाल्यास गुणवत्ता सुधारेल. टोपण नावाची सोय असली तरी सभासदत्व देताना व्हेरिफिकेशन व्हावे.

साधनातै,
हाच तर त्रास आहे. फुकट मिळतेय म्हणून ती कशीही वापरायची ही खास भारतीय वृत्ती आहे. >>>> याचा इथे काय संबंध आहे ? तुम्ही किती वर्गणी भरून येत आहात ? कहीही वापरणारे कोण आहेत ?

काही सभ्य आयडी फेक आयडी घेऊन अमुक तमुक करतात' ही ओरड करण्यात काय अर्थ? >>> तुमचा असा कुठला आयडी आहे का ? नसल्यास तुमची विकेट का पडलीय इथे ?
इथे एकाच आयडीने मत मांडणा-यांना फेक आयडींचा प्रचंड त्रास आहे. त्यासाठी मायबोली प्रशासनाने मलाही चार आयडी बहाल करावेत ही नम्र विनंती.

हल्लीची प्रसार माध्यमे असो की सोशल साईटस..सर्वत्र टी आर पी मिळवण्यासाठी काहीही सुरु असते आणि ह्यात गैर काही वाटायचे कारण नाही. टी व्ही वरील हेतुपुरस्सर वाद विवाद चर्चा असो की सोशल फोरम वरील लिखाण आणि प्रतिसाद ... ही सर्व क्षेत्र त्यातून पब्लिकला जे इंटर टेन्मेंट लागते ते देवून कमाईचा हेतु साध्य करत असतात.

मायबोली बद्दल इथे असणाऱ्या खऱ्या आणि फेक किंवा ड्यू अश्या सर्वच आयडीना मनापासून जिव्हाळा आहे म्हणून ती सर्व मंडळी इकडे येवून आपला वेळ दवडत असतात. मग कोणी तो वेळ चांगले चुंगले कथा कविता लिहायला वापरेल, कोणी त्यावर उचलेगिरीचा आरोप करायला वापरेल. हीच गोष्ट राजकीय घडामोडीच्या चर्चेविषयी होणार -- कोणी अभ्यासपूर्वक कॉंग्रेस का हरली त्याचे विश्लेषण करेल तर कोणी काहीच सुचत नसल्याने किंवा असा अभ्यास जमण्या एवढी बौद्धिक कुवतच नसल्याने उगीच भाजप आणि मोदीविरोधात चिखलफेक करत राहणार.

पाणी म्हंटले की कोणी त्याचा वापर पुजेला तीर्थ म्हणून करेल तर कोणी अजुन चिखल करायला करेल. चिखलात कमळ फूलते ते पाहुन प्रसन्न व्हायचे की डुक्कर चिखलात लोळते त्यावर हसायचे हे आपले आपण ठरवायचे असते. ह्यात कोणी प्रशासक कितीही कठोर नियम अंमलबजावणी करून शिस्त लावू शकत नाही .. व्यक्ति तितक्या प्रकृति त्यामुळे आपण कमळाकड़े पहायचे, डुकरांकडे दुर्लक्ष करायचे निर्णय तुमच्या हाती !

फेक आयडी कमी झाल्यास गुणवत्ता सुधारेल. टोपण नावाची सोय असली तरी सभासदत्व देताना व्हेरिफिकेशन व्हावे. >>>+१

मायबोलीच्या सुरुवातीस सभासद संख्येच्या बाबतीत 'फेक इट टिल यु मेक इट' ह्या उक्तीनुसार ड्यु आयडींस प्रोत्साहन मिळाले असावे असा अंदाज आहे त्यावेळेस ते जरूरी असेलही पण आता ह्या ड्यु आयडींमुळे केवळ राजकारणच नव्हे तर इतरही कुठल्याही धाग्यावर काहीही लिहित सुटण्याचे प्रमाण वाढले आहे ज्यामुळे अनेक चांगल्या माणसांना इथे वावरायला नकोसे वाटते हे सत्य आहे.

फुकट मिळतेय म्हणून ती कशीही वापरायची ही खास भारतीय वृत्ती आहे वर अनामिक राहता येण्याची सुविधाही आहे मग काय आधीच मर्कट त्यात मद्य प्यालासारखी गत होते.

माझ्या माहितीतील वेगवेगळ्या क्षेत्रातील कित्येक माणसे / आयडी आजमितीला इथे येत नाहीयेत. त्यांची उणीव मला भासते, माझ्यासारख्या अनेक आयडींनाही ती भासत असेल याची खात्री आहे.

तस्मात
टोपण नावाची सोय असली तरी सभासदत्व देताना व्हेरिफिकेशन व्हावे ह्याला संपुर्ण पाठिंबा.

हेतू अगदी चांगला आहे तुमचा ...
या गोष्टी पटल्या - "करंट अफेअर्स, राजकारण यावर चर्चा जास्त होत आहेत.
रॅशनलिस्टना अपमानास्पद वागणूक देण्यासाठी मायबोलीचा मुक्तपणे वापर सध्या वाढलेला आहे.
नव्या साहीत्याकडे म्हणावे तसे लक्ष नाही, इथे मूठभरच का सक्रीय ? वैगरे.

माझे अजुन काही मुद्दे - (हे फक्त माझ वैयक्तिक मत आहे)
- वैयक्तिक शेरेबाजी अगदीच अयोग्य आहे. पण गट बाजीही नको.

- नको त्या प्रतिसादावर (वैयक्तिक शेरेबाजी,चिखलफेक सारखे) टिप्पणी करुन त्याच महत्व वाढवण्या पेक्षा सोयिस्कर दुर्लक्ष करु.

- लिखाण कस आहे या पेक्षा कोणी लिहिलय हे पाहुन त्यावर प्रतिसाद येताना दिसतात, त्यामुळे काही खुप चांगले धागे सुद्धा शुन्य प्रतिसादा विना तसेच येतात अन जातात ही, मग काल ओघात असे ID ही गायब होतात, त्याना सगळ्यानी प्रोत्साहन देन( मी माझ्या कडुन याची सुरुवात केली आहे) जरजेच नाही का ? काही बदल, काही सुधारणा तरी सुचवुया तरच लेखनास प्रोत्साहन मिळेल ना. (इथे मी प्रतिसाद म्हणजे प्रोत्साहन, अपेक्षित सुधारणा या अर्थाने विचार करते. TRP साठी नाही)

-सभासदत्व देताना व्हेरिफिकेशन व्हावे अगदी सहमत, स्वत:ची (स्वत: पासुन सुरुवात) वैयक्तक माहीती खरी असली तर फेकपणाला आळा बसेल.

- शेवटी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ.

आयपी अॅड्रेसचे म्हणाल तर माझा आणि माझ्या सौचा एकच असतो अनेकदा. एकदा तर तिला कुठलासा लेख आवडला म्हणून तिने सरळ प्रतिसाद दिला माझ्या लॅपटॉपवरु. लॉग आऊट, लॉगीन हे तिला समजुन सांगीतले आणि प्रतिसाद बदलला मी माझ्या नावावरचा. (नाव तरी कुठे माझे आहे म्हणा. शाली हा तिचाच आयडी खरे तर) Lol
हे आपले सहज अवांतर...

मी माझा - एक महिलेचा आयडी
खरा पुणेकर - नितीनचंद्र
मयु - आशुचँप
कबीर - मंदार जोशी
हे असे आयडी ओळखता येतात. त्यासाठी काही कसोट्या आहेत. आमच्याकडे त्याचे क्लासेस घेतले जातात.
अट एकच आहे माझ्या भयकथा वाचल्या पाहीजेत.

Submitted by शंक्या on 17 June, 2019 - 11:48

वा रं गड्या.. कसोट्या घेऊनच १ तासापुर्वी जन्माला आलेला दिसतोस !
आता हा धागा चांगल्या विषयासाठी काढलाय, त्यामुळे इथे धुळवड नको, म्हणून आवरतं घेतो.

आताच आलेल्या " कोणत्या मायबोलीकरांस भेटायला आवडेल" यातले लेखक बाहेर छापील माध्यमांत लिहून पैसे कमवू शकतात. या किंवा इतरांनी ते सुरूही केले असेल. मग प्रकाशकांची अट असते याविषयावर नेटवर लिहू नका.
तर असे साहित्य कमी होत गेले असेल.
----
राजकीय चर्चा तुम्ही चानेलवर पाहता तिथे वाद होतांना दिसतातच. आरोप होतात. ते होणारच. मर्यादा सोडून "अरे तुझे घरचे बघ" असे लिहिल्यावर लेखन उडते.
--------
बाकी दोनचार ओळी लिहून मनोरंजन करणे, शाबासक्या मिळवणे हे एवढेच उरते.
---------
संध्यानंद पेप्राचं उदाहरण घ्या। प्रवासात टाइमपास आहे पण रोजच घेऊन वाचलात तर गम्मत कमी होते.
-----
ता.क. फुंकून पिणे.

मयु म्हणजे कोण?
आणि हा जावई शोध लावणारे गृहस्थ कोण आहेत?
माझा ड्यु आयडी आहे आणि मलाच माहिती नाही, हे अती वाढीव आहे

>>मी माझा - एक महिलेचा आयडी
खरा पुणेकर - नितीनचंद्र
मयु - आशुचँप
कबीर - मंदार जोशी<<

ते एक लोकांना संभ्रमात पाडता पाडता स्वताच संभ्रमित झालेले एक थोर्थोर व्यक्तिमत्त्व म्हणते की वरील आयडी एकाच इसमाचे आहेत आणि तशी शंका पण ॲडमिनबुकात व्यक्त करुन आलेले आहेत
त्यांना जरा तुमच्या क्लास चे आवताण धाडा आणि तुम्ही कसे ते ओळखता वगैरे जरा समजावून सांगा ना! Proud

त्यांना जरा तुमच्या क्लास चे आवताण धाडा आणि तुम्ही कसे ते ओळखता वगैरे जरा समजावून सांगा ना! >>> बरं

मुळात ते किरणुद्दीन म्हणजे सायकल क्लबचे किरण देशमुख असावेत. विपू चाळली की समजते बरेच.
मयुरेश पालकर या नावाचे एक उद्योजक आहेत. ते इथे असणे शक्य नाही. त्यामुळे मयु हा किरणुद्दीन यांच्या ओळखीचा सायकलिस्ट असणार हे उघड आहे. ते आशुचँप नसतील तर आमच्या जवळपासच्या भागातले कुणी तरी आहेत हे.

मी माझा म्हणजे मायबोलीवर महिला म्हणून वावरणारा एक आयडी आहे. मुळात हा आयडीच एका परदेशस्थित बल्लवांचा आयडी आहे अशी वदंता आहे.

खरा पुणेकर हे नितीनचंद्र कसे आहेत हे नंतर सांगेन. सध्या बॉस डोक्यावर उभा आहे. कबीर मंदार जोशी आहे हे माहीत आहेच. तो काही अंदाज नाही.

हायला अंदाजाने गोळ्या झाडल्यात होय
मला वाटलं काहितीरी जबर सोर्स असणार इतक्या आत्मविश्वासाने लिहिताय तर

लोकांच्या विपु चाळायला इतका फावला वेळ असेल तर माझे लेख देखील वाचा
त्यात माझ्या फोटोसकट सगळी सविस्तर माहिती पण आहे
दोन चार प्रतिसाद द्या
तुमच्यासारख्या चुकल्या कोकरांची गरज आहे मायबोलीवर

अरे भाऊ
माझी सायकल माउंटन बाईक आहे. ती बदलायची चर्चा केली तर मी सायकलिस्ट झालो का ? मी स्वप्नातच सायकलिंगला गेलो असेन दूर दूर.

मी नक्की कोण आहे हे आता मला समजायला हवे.

पहिल्यांदा एक ड्युआयडी माझ्या मागे लागलेला कि मी महिला आहे. त्याला पुरावे देऊन झाले. विपूतली गाणी ऐक म्हटले तरी ऐकायलाच तयार नाही. कारण त्या महीलेचं आणि त्या ड्युआयडीच्या ख-या मालकिणीचं वाजलेलं असावं.
एक जणाने मला पकौडेवाला ठरवलं. कारण यांचे सातत्याने एकमेकांवर वार होत असतात.
अजून एकाने मध्यंतरी आणखी एक आळ घेतलेला.
आता हे किरण देशमुख कोण आहेत ? हे सायकल चालवतात का ?

प्रत्येकाला आपल्या फिल्ड मधलेच कुणी तरी असावे असे वाटते. मला पण जेव्हढे ठाऊक आहेत त्यातच संशय घेता येतो.
मायबोलीचा अभ्यास वाढवायची गरज आहे.

बरं आता ड्युआयडी खेळायचं बंद करा.

फेक आयडी कमी झाल्यास गुणवत्ता सुधारेल. टोपण नावाची सोय असली तरी सभासदत्व देताना व्हेरिफिकेशन व्हावे. >>जोरदार अनुमोदन.

आशुचँप सडेतोड आणी व्यवस्थीत माणुस आहे, त्यामुळे त्याचा ड्यु आय डी शक्यच नाही.

जुना आय डी काही कारणाने उडाला असेल आणी मग नवीन घेतला असेल तर त्याला ड्यु कसे म्हणता येईल? ड्यु आय हा तेव्हाच असु शकतो ना जेव्हा मूळ आय डीने पण लिहीता येते. काही जणांना काही कारणामुळे जुना आय डी वापरता / लॉगिन करता येत नाही, मग तेही ड्युच होतात का?

मी माझा म्हणजे मायबोलीवर महिला म्हणून वावरणारा एक आयडी आहे. मुळात हा आयडीच एका परदेशस्थित बल्लवांचा आयडी आहे अशी वदंता आहे.

नवीन Submitted by शंक्या on 17 June, 2019 - 15:34

इंटरेस्टिंग ! काय काय संभ्रम होतात यार या लोकांना !
असो चालूदे... मलाही मी आधी कॉंगीची जानेवारीपासुन केलेली बिनपाण्याची हजामत आणि त्यामुळे उडालेले माझे दोन आयडी (त्यातील एक माझ्या खऱ्या नावाचा होता), सांगण्याची इच्छा नाही. अर्थात जर सांगितलं तर संभ्रमित लोकांची मजा बघायला मिळणार नाही.

परवाच एका विकृत डु आय डीने मी कुणाचातरी डु आय डी आहे असा प्रतिसाद दिला.
मी कोण आहे ओळख दाखवते, फक्त तुझा मोबाईल नंबर दे असं म्हणताच शेपूट घालून पळाला.
प्रॉब्लेम काय आहे, हे दोन तीन दिवसाचे जन्मलेले आय डी कितीही गलिच्छ प्रतिसाद देतात. कारण त्या आयडीशी त्यांची काहीही भावनिक गुंतवणूक नसते. मात्र गेले सहा वर्षे आय डी सांभाळताना, स्वतःच्या नावाने वावरताना आपल्या आयडीशी एक भावनिक गुंतवणूक झालेली असते. मग कुठल्याही चिखलफेकीला उत्तर देताना मी दहादा विचार करायचे. अजूनही करते, पण आता उत्तर देताना भाषा डु आयडीचीच वापरते.

तेच ना अशा विकृत घाणेरड्या विचारसरणीच्या माणसांना मायबोली का पोसते हा प्रश्नच आहे मोठा. परवाचीच गोष्ट आहे एक विकृत मनोरुग्ण स्त्री आयडी माझा मोबाईल नंबर मागत होता सारखा. परत भेटला कोणाला तर ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलचा नंबर द्या त्या विकृताला.022 2582 1810 माझ्या नंबरपेक्षा या नंबरची जास्त गरज आहे, चांगली औषध गोळ्या घ्यायला सांगा आणि नंतर इथे यायला सांगा.

मी केलेलं लिखाण चूक किंवा बरोबर कसेही असले तरी त्याची जबाबदारी माझी आहे. आपण अशी तयारी ठेवली तर मला नाही वाटत खरं नाव लपवायची गरज आहे. आपण पुस्तक छापतो तेव्हा ही जबाबदारी घेतो मग मायबोलीचा अपवाद का? खरी ओळख लपवण्यात कसलं शौर्य आहे? तुमचं मन साफ असेल तर काही लपवायची गरज काय ? समाजात जे काही चांगले झाले असे करताना सुधारकांनी त्यांची खरी ओळख कुठे लपवली. मायबोलीवर घडणारी वायफळ भांडण, वितंडवाद टाळायचे असतील तर द्या बनावट ओळखीची कवचकुंडल फेकून. तुमच्याकडं काही चांगलं देण्यासारखं आहे मग कशाला लपवा छपवी . उलट लोक तुमचं ख-या नावानं कायम स्मरण करतील. तुम्हाला तुमची खरी ओळख मिळेल.

या धाग्यावरचे जे प्रतिसाद आहेत ना, तसाच बहुतांशी मजकूर सर्व धाग्यांवर दिसायला लागला आहे म्हणून मी मायबोलीवर यायचं जवळजवळ बंद व्हायच्या बेताला आहे. नाहीतर २००० पासून, जुन्या माबोपासून मी इथे बर्‍यापैकी नियमित येत/ वाचत/ लिहित असे.

माझं माबोचं व्यसन सोडवल्याबद्दल अशा प्रकारचे एकमेकांची उणीदुणी काढणारे प्रतिसाद सतत देणार्‍या आयडीजना मनापासून धन्यवाद Proud

मयू - आशुचँप; काहीही.
मी त्यांना व्यक्तिश: ओळखत नाही आणि कधीही भेटलेलो नाही. मात्र मायबोलीवर परखडपणे आपली मते मांडणार्यांपैकी एक ते आहेत, त्यांना ड्यू आयडीची गरजच काय?
बाकी मायबोलीवरील कथा व साहित्याचा दर्जा घसरत चालला आहे, हेही तेवढेच सत्य आहे!

Pages