बिरादरीची माणसं - मनोहर काका

Submitted by लोकेश तमगीरे on 14 June, 2019 - 02:09

भामरागड पुलावरून पाणी असतांना गावातील लोकांना घरी आश्रय द्यायचा असो किंवा रणरणत्या उन्हात तेंदूपत्ता तोडतांना होरपळून गेलेल्यांची तहान शमवायची असो……
कुणाचे दुःख कमी करायचे असो की कुणाचा आनंद द्विगुणित करायचा असो……
जन्म दाखला, बँक अकाउंट, मनी विथड्रॉव्हल, किराणा, बाजार करणे.. इत्यादी लोकांच्या कुठल्याही कामासाठी आपली दुचाकी घेऊन नेहमीच तयारीत असणारी ही व्यक्ती.
चांगल्या कामासाठी "नाही" हा शब्द न वापरणाऱ्या ह्या व्यक्तीचा हात बिनशर्त सदैव मदतीसाठी तयार असतो …..
हो अगदी बरोबर ओळखलं..."डॉ. प्रकाश बाबा आमटे" या भाऊंच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये आपले नाना पाटेकर ज्यांना “येम्पलवार” म्हणून बोलावतो ना ... तीच ही व्यक्ती.

‘मनोहर नारायण येम्पलवार’ …… जन्म १२/३/१९५६ रोजी चंद्रपूर जिल्हाच्या सावली तालुक्यातील पाथरी गावचा. तीन बहीण-भावंडांमध्ये मनोहर काका सर्वात लहान. आई ताराबाईला कुष्ठरोग असल्यामुळे, काका वयाच्या सहा-सातव्या वर्षीच आईसोबत “आनंदवन” वरोऱ्याला राहायला आले. त्याकाळात आनंदवन सोडून इतर कुठेही महारोग्याला आपलं मानणारं, त्यांना आत्मसन्मान, आत्मबल देणारं कुणीही नव्हतं. काकांनी चौथी पर्यंतचं शिक्षण आनंदवन मधील शाळेतच घेतलं. मुलांच्या कोवळ्या मनात सामाजिक बांधिलकी रुजविणारी ही शाळा. पुढील शिक्षणासाठी काका अमरावती येथील महामना मालवीय विद्यालयात दाखल झाले. श्री. बाबा आमटे यांचे जवळचे मित्र तपोवन संस्थेमध्ये ट्रस्टी असल्याने हे सहज शक्य झाले. महारोग्यांच्या मुलांनी चांगल शिकावं असे बाबा आणि साधना ताईंना नेहमीच वाटायचं.

मनोहर काकांच्या वडीलांना नाटक, गाणे, भजन यांचा छंद ... साहजिकच तो गुण काकांमध्येसुद्धा आला. शाळेमध्ये नाटक, नाच करणे, ढोलकी वाजवणे, तबला वाजवणे इत्यादी अभ्यासाव्यतिरिक्त अनेक गोष्टींमध्ये काका रमले. १९७६ साली मॅट्रिक झाल्यानंतर काका घरी परतले. आनंदवनाची ओढ तर होतीच. आता पुढे शिक्षण घेण्याऐवजी आनंदवनमध्ये काम करूया असा विचार करत असतांना काका वयाच्या २२ व्या वर्षी ‘सोमनाथ प्रकल्पाला [http://www.anandwan.in/somnath-camp.php]’ आले. त्यावेळी शंकर दादा जुमडे हे सोमनाथ प्रकल्पाचे ट्रस्टी होते. त्यांनीं मनोहर काकांना शेतीची कामे दिली. हे साल होतं १९७८ चं. मनोहर काकांना सोमनाथला आठ महिने झाले होते तेव्हा प्रकाश भाऊंचा निरोप आला की, लोक बिरादरी दवाखान्यासाठी मदत म्हणून निःस्वार्थी आणि प्रामाणिक कार्यकर्ता पाहिजे. मनोहरकाकांची कामाची जिद्द आणि कामातील प्रामाणिकपणा बघता शंकर दादांनी त्यांना लोक बिरादरी प्रकल्पात जाण्यास सांगितले. बिरादरीच्या बांधकामासाठी नेहमी सामान घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये काका हेमलकसासाठी निघाले. मनोहर काका, प्रकाश भाऊंना याआधी कधीच भेटले नव्हते. त्यामुळे भेटण्याची आतुरता निश्चितच होती. २८ डिसेंबर १९७८ साली हा योग जुळून आला. संपूर्ण दिवसभराचा थकवा एका क्षणात नाहीसा झाला. आणि प्रकाश भाऊंनी सुद्धा काकांना आपलंसं करून घेतलं.

आणि मग काय ... दुसऱ्या दिवशी पासून काम सुरु. सुरुवातीला माडिया भाषा समजत नव्हती. माडिया बांधवांशी जुळवायचं असेल तर त्यांची भाषा येणं गरजेचं. खूप माडिया शब्द लिहून काढले पण शेवटी कुठलीही भाषा बोलल्याशिवाय येणारच नाही हे समजलं आणि अखेर तुटकं - फुटकं का होईना पण बोलून बोलूनच भाषेवर प्रभुत्व मिळवलं. "हे काम माझं नाही" असला प्रकार बिरादरीत मुळीच नाही. म्हणून सगळे कामे करावी लागायची. सकाळी प्रकाश भाऊ आणि मंदा वहिनींचा वॉर्ड राऊंड व्हायचा त्यावेळी मनोहरकाका हजर रहायचे. नंतर ७ ते ९ पर्यंत भामरागडला भाजी, दूध विक्री इ. करायचे. त्यावेळी पेपर मिलचे बरेच कामगार लोक भामरागडला भाजी, दूध इ . घ्यायला यायचे. नंतर ९ वाजेपासून पुढे ओ.पी.डी सुरु व्हायची. पेशंटचे कार्ड काढणे, गोळ्या - इंजेक्शन देणे, आय.पी.डी. चे पेशंट बघणे आणि रविवारी रुग्णांचे कपडे, बेडशीट्स धुणे इ. सर्व कामे मनोहर काका करायचे. बऱ्याच वेळा भाऊ-वहिनी नसतांना ओ.पी.डी देखील बघावी लागायची. त्या काळात सेरेब्रल मलेरिया खूप जास्त. अशा वेळी पेशंटला सलाईन चालू असतांना ती संपेपर्यंत बसून राहाव लागायचं. माडिया आदिवासींसाठी इंजेक्शन, इंट्राकॅथ, सलाईन बॉटल्स या सगळ्या गोष्टी नवीन … त्यामुळे कुणी हात झटकून काढू नये याची खबरदारी घ्यावी लागायची. ९ ते १२ ओ.पी.डी झाली की मग शेतीची कामे सुरु आणि मग नंतर पुन्हा दुपारी ३ वाजता ओ.पी.डी.

२१ नोव्हेंबर १९८१, मनोहर काका आणि संध्या काकू यांच्या लग्नाचा दिवस. संध्याकाकूसुद्धा १९७८ पासून हॉस्पिटलमध्येच काम करायच्या. दोघांची भेट बिरादरीतच झाली. दोघांची कामे हॉस्पिटलमध्येच होती. शेवटी मनंसुद्धा जुळली. आणि मग प्रकाश भाऊ, मंदा वहिनी, आत्तोबा [विलास मनोहर], रेणुका ताई, नाना [गोपाळ फडणीस], दादा पांचाळ, कुष्ठरोगी सहकारी मित्र आणि माडिया बांधव यांच्या समवेत हे लग्न मोठ्या उत्साहात पार पडलं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मंगलाष्टके तर स्वतः मंदा वहिनींनी म्हटली. त्याकाळी कॅमेरा नव्हता. त्यामुळे लग्नाच्या फोटोच्या हार्ड कॉपीज तर नाही आहे पण सॉफ्ट कॉपीज मनोहर काकांच्या मनामध्येच साठवलेल्या आहे.

बाबा आणि साधनाताई यांची हेमलकसा भेट म्हणजे बिरादरीमध्ये सर्वांसाठी पर्वणीच असायची. साधनाताई साधारणतः गणपतीच्या सुरुवातीला यायच्या. प्रकाशभाऊ, आत्तोबा, मनोहरकाका इ. ताईंना घेण्यासाठी जीप घेऊन निघायचे. तो वेळ म्हणजे पावसाळा. सगळीकडे नद्या-नाले तुडुंब भरलेले. मग सहकारी मित्र आणि मनोहर काका नद्या-नाल्यांमध्ये दोन्ही बाजूला उभे राहायचे आणि प्रकाशभाऊ पाण्याच्या खोलीचा अंदाज घेत गाडी काढायचे. 'भीती" हा शब्द प्रकाशभाऊंच्या डिक्शनरीत नव्हताच मुळी. "निर्भीडपणा" हा गुण मनोहरकाका भाऊंकडूनच शिकले.

एक गोष्ट मनोहर काका वारंवार सांगतात की, "बाबा, साधनाताई, प्रकाशभाऊ, मंदावहिनी यांनी आम्हाला कधीच वेगळं समजलं नाही. आम्ही त्यांच्या कुटुंबातलेच आहोत असे आम्हाला सदैव वाटते.” "कुठल्याही चांगल्या कामासाठी नाही म्हणायचं नाही आणि संस्थेच्या कामासाठी तर मुळीच नाही" असं मनोहर काका म्हणतात. मध्यरात्री कंदीलाच्या प्रकाशात सलाईन लावायचं असो की प्रकाशभाऊ शस्त्रक्रिया करतांना बॅटरी टॉर्च घेऊन कैक तास उभे राहायचे असो, थंडीमध्ये आगीच्या बाजूला झोपले असतांना भाजलेल्या रुग्णाच्या वेदना कमी करण्यासाठी रोज ड्रेसिंग करायची असो, की सेरेब्रल मलेरियाच्या रुग्णाची सलाईन संपेपर्यंत थांबायचे असो ... मनोहर काकांनी ही सर्व कामे मनोभावे केली आहेत.
"चल मनोहर, आपल्याला निघायचं आहे" असे प्रकाशभाऊंनी म्हंटल्यावर हॅन्डपंप दुरुस्तीसाठी जेवणाचा डबा बांधून इतर सहकाऱ्यांसोबत मनोहर काका बाहेर पडायचे. बाहेर पडले की १२ -१२ तास एटापल्ली [त्यावेळी एटापल्ली तहसील होतं] मधील वेग-वेगळ्या गावातील हॅन्ड पंप दुरुस्ती करायचे. प्रकाश भाऊ, आत्तोबा, मनोहर काका यांनी त्यावेळी १०० पेक्षा अधिक गावांमध्ये हॅन्ड पंप दुरुस्ती केली आहे. लोकांना प्यायला आणि इतर कामांकरिता पाण्याची सोय, हे ही आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे, म्हणून हे काम चालायचे. मनोहर काका प्रकाश भाऊंविषयी मोठ्या अभिमानाने सांगतांना म्हणतात, "आज जगामध्ये असा एकही डॉक्टर शोधून सापडणार नाही ज्यांनी स्वतः येवढ्या हॅन्ड पंप दुरुस्ती केली असेल".
१९८३ मधे बिरादरीमधे नेगल [बिबट्या] आला. तेव्हा त्याला जेवण देण्यापासून तर त्रिवेणी संगमावर प्रकाशभाऊंसोबत फिरायला नेण्याची मजा काही औरच. मूक प्राणी सुद्धा आपल्यावर केवढं प्रेम करतात हे काकांना नेगलने शिकवलं. मनोहरकाका एक गोष्ट सांगतात की, “बिरादरी मध्ये 1988 साली टीव्ही आला. वीज नसल्यामुळे काही तासांसाठी जनरेटरवर सुरु रहायचा. ताडपत्रीच्या मांडवात बेजुर, कोयनगुडा, हेमलकसा, टेकला आणि आसपासच्या गावातले लोक रामायण आणि महाभारत पाहण्यासाठी जमायचे. कुणीच त्यांच्या आयुष्यात टीव्ही प्रकार बघितला नव्हता. जवळ जवळ शंभर पेक्षा जास्त आदिवासी लोकांनीं रामायण-महाभारत भारतात कुठेच एकत्र बघितले नसेल आणि तेही दुर्गम आदिवासी भागात. आमच्यासाठी तो तर गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच होता.”

प्रकाश भाऊ मनोहर काकांना "सगळ्यांचा मित्र" असं संबोधतात तर मंदा वहिनी त्यांना “अजातशत्रु” म्हणजे ज्याचा शत्रू अद्याप जन्माला नाही असं म्हणतात. “अतिशय नम्र आणि सगळ्यांशी मिळवून घेणारं हे दांपत्य” अशी भाऊ-वहिनींकडुन मिळालेली कौतुकाची थाप निश्चितच जगण्याचं समाधान देणारी आहे.

गिरीश आणि मनीष[हेमंत] ... ही मनोहर-संध्या दाम्पत्यांची दोन मुलं. ओपीडीमध्ये दोरीच्या पाळण्यामध्ये वाढलेली ही मुलं. दोघांचेही दहावीपर्यंतचे शिक्षण इतर माडिया आदिवासी मुलांसोबत ‘लोक बिरादरी आश्रम शाळा, हेमलकसा’ आणि बारावी ‘आनंद-निकेतन, वरोरा’ येथून झाले. पुढील वाट या दोघांनी स्वतःहूनच शोधली. मनोहर काका म्हणतात की, "त्यांच्या पुढील आयुष्याचा निर्णय तेच चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात...आम्हाला फक्त त्यांच्या निर्णयाला साथ द्यायची आहे". आज मोठा मुलगा मनीष [हेमंत] पुण्याच्या आय.आय.बी.पी कॉलेज मधून एम.बी.ए झाला आहे आणि पुण्यामध्ये चांगल्या पदावर जॉब करतो. "क्लासिकल डान्स मध्ये करिअर करून काय फायदा? ... आणि तेही मुलांनी? " अशा स्टिरिओटाईप विचारसरणीला झुगारून काकांचा लहान मुलगा गिरीश, याने पुण्याहून कथ्थकमध्ये एम.ए केलं आहे. गिरीश आता पुण्यामध्ये कथ्थक शिकवितो आणि त्यातच पुढे पी.एच.डी करण्याचा प्रयत्न आहे. प्रकाश भाऊ आणि मंदा वहिनी दोघांबद्दल आवर्जून सांगतात की, “दोघेही पुण्यासारख्या शहरामध्ये राहात असतांनासुद्धा आताही त्यांचे लोक बिरादरीशी संबंध तेवढेच घट्ट आहेत”. भाऊ-वहिनींना सुद्धा दोघांचा खूप अभिमान आहे.

दरवर्षी ‘लोक बिरादरी’ मध्ये गणपती बसतो. तेव्हा सर्व सहकारी मित्र एकत्र येऊन भजन करतात. आजही भजनाला मनोहर काकांच्या तबल्याशिवाय रंगतच येत नाही. आता वयाची बासष्टी ओलांडली ... आणि ‘बिरादरी’ मध्ये येत्या डिसेंबरला चाळीस वर्षे पूर्ण होतील काकांना .... तरी कामाप्रती समर्पण आणि प्रामाणिकपणा तेवढाच आहे. सध्या काकांचे पाहुण्यांना, पर्यटकांना प्रकल्प दाखवण्याचे काम सुरू आहे...

असे आमचे मनोहर काका.
संस्थेचा हिशोब नागेपल्लीला पोहोचवून देण्यासाठी ६० किलोमीटरचं अंतर सायकलने गाठणारे ....
बाबांच्या [श्री. बाबा आमटे] जीपचा आवाज येताच सर्रास गाडीकडे पळत सुटणारे…..
मध्यरात्री इमर्जन्सी पेशंट आला असतांना सदैव तयार असणारे....
मोठ्यांसोबत मोठं आणि लहानांसोबत लहान होणारे ......
कोणत्याही चांगल्या कामासाठी नेहमीच सज्ज असणारे……
स्वतःचे दुःख विसरून दुसऱ्यांना सतत हसवणारे आणि चेहेऱ्यावर सतत स्मित हास्य ठेवणारे…….
कुठलाही इगो न आणता माणुसकी जपणारे……..
अगदी नावाप्रमाणेच सर्वांचे "हृदय जिंकणारे" मनोहर काका आणि त्यांच्या अविरत प्रामाणिक कार्याला लोक बिरादरीचा सलाम....!!!

शब्दांकन:
डॉ. लोकेश व डॉ. सोनू,
सामुदायिक आरोग्य विभाग,
लोक बिरादरी प्रकल्प,
हेमलकसा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान , खरे तर लोकांना आमटे परिवार माहीत असतो पण असे हे अदृश्य हात माहीत नसतात ते माहिती करुन दिल्या बद्द्ल धन्यवाद , लिहीत राहा शुभेच्छा

खुप छान लेख.
ही मालिकाच अतिशय सुरेख आहे.
प्रत्येक लेखासोबत जर बिरादरीतला एखादा फोटो टाकला तर दुधात साखर.
पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.

सर्वांचे मनःपूर्वक आभार.
मी फोटो टाकायचा प्रयत्न करत आहे पण अपलोड होत नाही आहे. वारंवार "Failed" असा मेसेज येत आहे.