हा खेळ बाहुल्यांचा! - भाग ३

Submitted by अज्ञातवासी on 9 June, 2019 - 16:06

भाग २
https://www.maayboli.com/node/70182

IMG_20190606_211522.jpg

माझा पाय त्या लिबलिबितात खोलवर रुतत चालला होता. कुठलीतरी अमानवीय, अभद्र शक्ती मला तिच्या जाळ्यात ओढतेय, असा मला भास होत होता.
...आणि पुढच्याच क्षणी रामरावाने मला बाहेर ओढले.
मी माझ्या पायाकडे बघितले. पांढरट, लालसर, ओली अशी काहीतरीच घाण माझ्या पोटरीपर्यंत आली होती.
तिकडे बघताच मला भडभडून आलं. मी सरळ बाथरूमकडे पळालो, आणि नळ चालू केला. मी पायावर पाणी सोडलं, आणि खसाखस पाय धुतले. शेजारीच एक दगड पडला होता, तो घेऊन खसाखसा कातडी लाल होईस्तोवर पाय घासला.
मला माझी कातडी अक्षरशः काढून टाकावीशी वाटत होती. त्या अभद्राचा, अमानुषचा अंशही माझ्या अंगावर नको होता.
...मात्र थोड्याच वेळात पायाची प्रचंड आग झाल्यावर मला माझ्या वेडेपणाची जाणीव झाली.
ते नळातून वाहून जात होतं, मात्र तिथे क्षणभर थांबण्याची माझी इच्छा नव्हती.
बाहेर मात्र प्रचंड दुर्गंधी सुटली होती.
"साहेब तुम्ही तर पळालात, पण तुमच्याबरोबर इथून एक मांजरीसारखी मोठी घूसबी पळाली बघा. दात विचकतच पळाली." नामदेव म्हणाला.
घुशी जमीन पोखरून भुसभुशीत करतात असं मी ऐकलं होतं. आताशा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे ही घूस जमीन पोखरत आली, आणि इथे अडकून पडली. वर येण्याच्या प्रयत्नात ती लाकडाला धडका देत होती, त्यामुळे ते लाकूड सैल झालं. आवाजही त्याचाच...
पण हे खरोखर होतं की मी फक्त माझ्या मनाच्या समाधानासाठी असं म्हणत होतो?
"पण सगळ्या घरात दगडी फरशी आणि इथे लाकूड कसं?" रामराव म्हणाला.
"राम्या, केस पांढरी होऊनही तुला रीत कळली नाही येड्या. अरं, हे वाड्यावाले असंच कुठंतरी चीजवस्तू पुरून ठेवत आसायचे." नामदेव म्हणाला.
"म्हणजे इथंबी धन असलं?" रामरावाचे डोळे लकाकले.
"येडा की खुळा तू, ही घाण बघितली का? कोण या घाणीत हात घालल धनाच्या नावानं?" नामदेव चिडून म्हणाला.
माझ्या डोक्यात हळूहळू प्रकाश पडू लागला. काहीही झालं तरी मला या घाणीत, या दुर्गंधीत राहणं शक्य नव्हतं. काहीही करून ही घाण मला इथून काढायची होती.
"रामराव, नामदेवराव जरा माझं ऐका. मी तुम्हाला इथे का बोलवलं? तुम्हा दोघांनाच मला का बोलवावं वाटलं? कारण या अभद्रात काहीतरी दैवी योजना दिसतेय. हिम्मत आणि नशीब, दोघांची साथ लाभली, तर रंकाचा राजा बनतो."
मी क्षणभर थांबलो, दोघांच्याही मनावर माझ्या बोलण्याचा काही परिणाम होतोय का, ते मी बघत होतो. दोघांचही माझ्याकडेच पूर्ण लक्ष होतं.
"मी आहे एकटा, अजून ना बायको ना पोरं. तसंही यात जे काही सापडलं, त्याचा मला हव्यास नाही. पण त्या विधात्याने तुम्हाला इथवर आणलं, कारण तुमच्या नशिबाचा अंधार त्याला दूर करायचा होता.
यातून कितीही धन निघू दे, मला त्याची लालसा नाही. पण हे सगळं लवकर साफ करा. इथे काही सापडलं याचा पुरावाही राहता कामा नये, नाहीतर जे काही मिळेल ते सरकारजमा होईल."
रामरावाचे डोळे चमकतच होते, धनाची लालसा त्याच्या डोक्यावर स्वारच झाली होती. मात्र आता त्याला नामदेवही सामील झालेला.
"बघ नाम्या, साहेबांचं डोकं. एवढ्या कमी वयात एवढं शहाणपण, ही वृत्ती, देवमाणूस. अरे आयुष्यभर जरी या खेड्यात राबला ना, तरी मरताना लंगोटीशिवाय काही उरणार नाही. जरा तुबी डोकं चालवं."
"राम्या, लई मोठा माणूस आहे साहेब. साहेब, करतो आम्ही सगळं. देवाबरोबर तुमचीही कृपा झाली."
"लवकर, लवकर आटपा मग. मी जरा वर पडतो."
मला त्याजागी थांबण्याची अजिबात इच्छा नव्हती. मी वर गेलो, आणि कॉटवर पडलो.
मात्र त्या दोघांमध्ये माणसाच्या जागी आता राक्षस संचारला होता. एके क्षणापूर्वी त्या कामाला ठाम नकार असणारा नामदेव हे काम जोमाने करत होता.
...अक्षरश: हाताने त्यांनी ती घाण उपसली, आणि बाहेर नेऊन टाकली. भर पावसात ती घाणही अदृश्य झाली.
ही धनाची लालसा होती, की त्या अभद्राचा प्रभाव?
"साहेब, साहेब..." मोठ्याने आवाज आला.
मी अनिच्छेने उठलो आणि खाली आलो.
त्यांना खरोखर काहीतरी मिळालं होतं...
नाम्याचा अंदाज खोटा नव्हता...
सगळं उपसून काढल्यावर त्यांना एक अतिशय मोठ्या तलम वस्त्रात गुंडाळलेली गाठोडं मिळालं.
ते गाठोडं बघून दोघांनाही हर्षवायू व्हायचा बाकी होता.
दोघांच्याही डोळ्यात एक विचित्र झाक होती. एक वेडसरपणाची, वासनेची झाक...
गाठोडं प्रचंड जड होतं.
"नाम्या, लै ऐवज असलं..." रामराव म्हणाले.
नामदेव गाठोडं उघडू लागला, पण मीच त्याला अडवलं.
'इथे नको, मला लालसा व्हायची. तुम्ही हे बाहेर घेऊन जा. पण नामदेव, त्याआधी ही खाच नीट करा. पुरावा नको."
नामदेवाची आयुधे कायम त्याच्यासोबत राहत. अर्ध्या तासात त्याने सफाईदारपणे त्या खाचेत लाकूड बसवलं, आजूबाजूला कसलातरी गिलावा केला, आणि ती जागा पहिल्यासारखी केली.
...आणि दोघेही पाठीला पाय लावून पळाले.
अचानक हा वाडा प्रसन्न वाटू लागला. एक अदृश्य अरिष्ट या वाड्यावरून गेल्यासारखं वाटलं. पावसाची रिपरिप थांबली होती, वाऱ्याची साद बंद झाली होती.
...त्या अभद्राची छाया या वाड्यावरून दूर झाली होती.
------------------------------------
रामराव आणि नामदेव ते गाठोडं घेऊन पळाले. तळेगाव वाड्यापासून जरा दूर होतं.
"राम्या, थांब जरा, धाप लागलिया."
"नाम्या, आता तुझ्या घरीच जाऊन हे खोलू."
"आर येडा का तू, घरच्यांना काही कळलं तर त्यांच्या मागण्या आधी सुरू होतील. जरा आपली मजा करू आधी, मग सांगू तिकडं," नाम्या डोळा बारीक करत म्हणाला.
"मग कुठे खोलायच हे?"
"जरा इचार करावा लागलं." नामदेव विचारात पडला.
"जनार्दनाच्या म्हाताऱ्याची झोपडी?" रामराव हळूच म्हणाला.
"ये राम्या, येड्या, नालायक, बुद्धी भ्रष्ट झाली का तुझी. त्या चेटक्याच्या घरात जायला सांगतोस तू?"नामदेव जोरात ओरडला.
"हळू बोल, आता अशी वेळ आहे, की थोडा आवाज झाला, तर सगळं गाव बाहेर येईल. त्या आंधळ्या म्हाताऱ्याला काय दिसतय? सदानकदा खाटेवर कण्हत आसतो, दारही सताड उघड असतं. जरा डोक्याने काम घे." रामराव चिडून म्हणाला.
निरुत्तर होऊन नामदेवाने जरा नाखुषीनेच संमती दिली.
तळेगावातून करडी नदी वाहत होती. करडीवर छोटासा पूल होता. करडीने जुन तळेगाव आणि नवं तळेगाव असे दोन भाग केले होते.
नव्या तळेगावात बरीचशी लोकवस्ती होती. जुन्या तळेगावात मात्र वाडा आणि थोडी फार जुनी घरे सोडता काही वस्ती नव्हती. जनार्दनाची झोपडीही वाड्यापासून जवळजवळ अर्धा किलोमीटरवर होती.
जनार्दनाच्या बापाविषयी तळेगावात बऱ्याच आख्यायिका होत्या. छोट्या करणी, नजरबंदी अशा गोष्टींमध्ये तो प्रसिद्ध होता.
एकदा एका खविसाच्या डोळ्यात डोळे घातल्याने त्याचे डोळे कायमचे बंद झाले होते असे लोक म्हणत. कितीही प्रयत्न करून तो ते उघडू शकत नव्हता.
गाठोडं उचलून नामदेव आणि रामराव धापा टाकत झोपडीजवळ पोहोचले.
पुन्हा एकदा वादळी वारा सुटला होता.
हं...हं...हं हं हं...
वाऱ्याचा नाद विचित्र आवाज करत होता.
दोघेही जाम टरकले.
दोन्हीही झोपडीच्या दारासमोर आले.
रामराव झोपडीच दार लोटणार, तेवढ्यात...
...वादळी वाऱ्याने दार सताड उघडलं गेलं...
...आणि दोघेही भीतीने पांढरेफटक पडले!!!
जनार्दनाचा म्हातारा डोळे सताड उघडून उघडाबंब दारात उभा होता!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओए भारी... मला वाटलं तसं नाही हे आधी वाचलंय तसं...वेगळं आहे आणि मस्त पण...भाग थोडे मोठे टाकशील का प्लिज

तुमची हांजी हांजी करणारे ते चार पाच आयडी तुमच्या प्रत्येक साहित्याला क्या बात है, मस्त लिहिलंय वगैरे लिहीत राहतील, चांगले फीडबॅक देणारे लोक तुम्हाला प्रतिसाद देणे बंद करतील हळू हळू।Submitted by कटप्पा on 10 June, 2019 - 17:45
Kya bat hai... Jabardast
Submitted by Urmila Mhatre on 9 June, 2019 - 23:13
Mr. Kattppa maza pratisadha bddl kahihi bhasya kranyacha adhikar mi TumhLa dilela nahi aahe.... Mi kahi tumhala bolale ahe ka kadhi.... Maz tumch ts kahi vad nahi ahet Ani te odhvun ghevu nka... Be in your limit... Dont put your opinion every time ... I m not interested at all...

"जनार्दनाचा म्हातारा डोळे सताड उघडून उघडाबंब दारात उभा होता!!!"
या वळणावर कथा सोडून पुढील भागासाठी जास्त प्रतीक्षा करायला लावू नका please. आतापर्यंत छान उत्सुकता ताणल्या गेलीय...

Mr. Kattppa maza pratisadha bddl kahihi bhasya kranyacha adhikar mi TumhLa dilela nahi aahe.... Mi kahi tumhala bolale ahe ka kadhi.... Maz tumch ts kahi vad nahi ahet Ani te odhvun ghevu nka... Be in your limit...

----> ओके।

Pages