नीलांगी ( ना. धों. ताम्हनकर ) वाचनाच्या निमित्ताने

Submitted by दत्तात्रय साळुंके on 8 June, 2019 - 10:33

नीलांगी वाचनाच्या निमित्ताने

दूरदर्शनवर तीसेक वर्षांपूर्वी गाजलेल्या गोटया मालिकेचे गारुड माझ्या मनावर अजून तसेच आहे. अगदी तो गारोडी रस्त्यात स्वतःची पोटली उघडून बसतो आणि बासरी, डमरू वाजवत, साप दाखवत भोवताली जमलेल्यांना खिळवून ठेवतो तसेच अद्यापही या मालिकेने मला खिळवून ठेवले आहे. युट्युब वर हे सगळे भाग मी पुन्हा पुन्हा पाहत असतो. प्रत्येक वेळी एक नवी अनुभूती असते. किती छान कथा आहे ना. धो. ताम्हनकरांची. किती निरागस भावविश्व गोटया आणि सुमीचे. खट्याळ गोटया, अडीअडचणीला मदत करणारा गोटया, मित्र-मैत्रिणींना जीव लावणारा, शिक्षणासाठी तळमळणारा गोटया, बेरकी उपहारगृह मालक आणि उपहारगृहातील पोरे , बेरकी पण नंतर गोट्याला जीव लावणाऱ्या म्हाता-या, प्रांजलपणाने काही करु पहाता फसलेला वेंधळा गोट्या, माई अण्णा सुमी म्हणजे जीव की प्राण असणारा, सुमीचा खोडकरपणा, बालीश पोक्तपणा, माई अण्णा यांचे मुलांना समजावून घेणे आणि शेवटी स्कॉलरशिप परीक्षेत जिल्ह्यात पहिला आल्यावर प्रौढत्व आलेला समाजसुधारक गोट्या. ही कथा माणसाच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे एक सुंदर इंद्रधनू आपल्यासमोर उभे करते. कथेला लाभलेली ‌कोकणची निसर्गसुंदर पार्श्वभूमी तुम्हाला कथेच्या अधिकच प्रेमात पाडते. यामुळे ना धों ताम्हनकरांचे लिखाण वाचावे असे कोणाला वाटले तर नवल नाही.

बुकगंगा वरून काही पुस्तके मागवली. नीलांगी पुस्तक हातात पडले पाहिले तर चक्क अगदी जून पुस्तक. त्याचा विशिष्ट उग्र वास प्रथम जरा आवडला नाही पण जसजसं पुस्तक वाचू लागलो तेव्हापासून हा वास हवाहवासा वाटला. या वासाला कारणही तसेच होते 1960 साली नीलांगी लिहिली. लेखकाला एक संस्कृत पोथीच खूप वर्षापूर्वीचे हस्तलिखित योगायोगाने हाताशी लागले. पोथीच्या बऱ्याच पानांची कसरीने चाळण केली होती. दहा-बारा पाने सलग मिळाली आणि त्यात नीलांगीचे अख्यान मिळाले पण तेही संपूर्ण नव्हते. मागचे पुढचे वाचून कथा जुळवली. कथाबीज तत्कालीन वर्णव्यवस्था. पोथीच्या एका अध्यायाच्या अखेरीस “इति कल्पनापुराणे” लिहिले होते त्यावरून कल्पनापुराणाची नक्कल असावी असे अनुमान लेखकाने काढले आहे. सुरुवातीला मानसिक उवाच आणि एके ठिकाणी मुनीमानसीSSको वदत असे शब्द आढळले यावरून मानसिक मुनींनी कल्पनापुराण सांगितले असावे असा निष्कर्ष लेखकाने काढला.

जातीपातीने पोखरलेल्या सद्य समाजाला वर्णव्यवस्थेकडे पाहण्याचा तेव्हाचा दृष्टिकोण कसा होता हे कळावे म्हणून ना धों. ताम्हनकरानी नीलांगी लिहिली. नीलांगी ची शेवटची आवृत्ती १९६८ ला निघाली यापुढे निघेल असे वाटत नाही. माझ्या हातात पडलेली 1968 शेवटची आवृत्ती. वर्णव्यवस्थेवर वेळोवेळी अनेकांनी लिहिले पण त्याने किती प्रबोधन झाले ? आपले मानस अजूनही जातीपातीच्या दलदलीत खोलवर रुतलेले आहे. दुर्दैवाने जी काही केल्या जात नाही ती जात अशीच आपली धारणा झालीय. माणूसच माणसाला माणसासारखे वागवत नाही. परिणामी आजही खैरलांजी सारखी घटना होते. ऑनर किलींग होते. अजून किती तरी गोष्टी कार्यालय, घर, समाजात जातीच्या आधारावर होतात. महर्षी वेदव्यास( धिवर समाज) , महात्मा विदुर (दासीपुत्र) , चंद्रगुप्त मौर्य अशा अनेक नायकांची उदाहरणे देता येतील ज्यात त्यांनी केलेल्या कर्तुत्वाने लोकांना त्यांची जात/कुळी विसरायला लावली. श्रीकृष्ण देखील विदुरा घरी कण्या भुरकतात. एवढे सुंदर दाखले भारतीय समाज मनावर अद्याप बिंबले नाहीत ही खरी शोकांतिका आहे.

कदाचित काही मायबोलीकरांनी ही कथा वाचलीही असेल पण ज्यांच्या वाचनात हे पुस्तक आले नाही त्यांच्यासाठी हा लेखन प्रपंच. पुस्तक वाचायला मिळेल की नाही हे सांगू शकत नाही पण या लेखाद्वारे त्यातील विचार तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो.

कथा साधारण भारतीय युद्धाच्या ( महाभारत) नंतरच्या काळातील. नीलांबरीची कथा एक संस्कृत हस्तलिखितावर बेतलेली आहे पण ती शब्दशः अनुवाद नाही त्यामुळे वाचक अगदी तदृप होऊन वाचतो.

कलीयुगात जसे काही उच्चवर्णीय देखील सारी माणसं ईश्र्वर निर्मित आहेत त्यात कोणी उच्च नीच नाही असे मानतात. तद्ववत एक महान ऋषी ऋतिसार आणि त्यांची सुविद्य पत्नी कारुणिका मानत होती. त्यांच्या लेखी चांडाळ देखील अस्पृश्य नव्हते. वास्तविक तेव्हाही चांडाळ हे क्षुद्र आणि घृणास्पद मानणारा उच्चवर्णीय समाज होता. रंजल्या गांजलेल्यांना मदत करणारे हे कुटुंब तितक्याच सहज उन्मत राज‌आज्ञा मानत नाही. ताम्हनकरांनी अत्यंत चित्रदर्शी लिखाण केले आहे. नीलांगी एक चांडाळाची मुलगी. सुर्यग्रहणाच्या वेळी जपजाप्य करायला गेलेल्या ऋषी ऋतिसार यांना मिळते . ती त्यांच्या आऋमात उच्चवर्णीय म्हणून वाढते. आश्रमात शिकण्यासाठी आलेली एक स्त्री तिच्या वर्णा विषयी संशय घेते. पण
श्रुतिसारांना वाटते बालक कोणाच्या पोटी जन्माला आले तरी तो देवाचा अंश. अनार्याच्या घरी जन्मले असते तर अनार्य झाले असते आर्याच्या घरी जन्मले असते तर आर्य झाले असते या गोष्टीमुळे आश्रमाला काही फरक पडायला नको. बाल्यावस्थेत त्याच्यावर आर्य-अनार्य असे संस्कार झालेले नसतात. ऋषिवर म्हणतात इच्छा असेल तोपर्यंत ती येथेच राहील आणि आर्य म्हणूनच राहील.

ते पत्नीला सांगतात तुम्हाला देवपुजेसाठी एक सुंदर मुर्ती आणली आहे असे सांगतात.

कथेचा शेवट नाट्यमय आहे. नीलांगी आर्य म्हणून वाढल्यावर अचानक तिच्या समोर तिची मरणासक्त चांडाळ आई येते आणि आश्रमवासीयां समोर नीलांगी जन्माने चांडाळ आहे हे त्यय येते. त्या मरणासक्त आईला आपली मुलगी सुसंस्कृत झालेली पाहून खूप आनंद होतो . तिला बरोबर घेऊन जावे असे देखील तिला वाटत नाही. कारुणिकेला नीलांगी तिची मुलगी आहे हे पटत नाही. तेव्हा ती तिला सांगते ग्रहणाच्या वेळी मीच तिला झाडाच्या ढोलीत झोपवले होते आणि माझे यजमान आणि मी अन्न शोधण्यासाठी गेलो होतो. मुलीच्या जन्मानंतर तिच्या डोळ्यावर आम्ही दागिने म्हणून चंद्रसूर्य गोंदले होते. ते गोंदनही तसेच आहे. शेवटी नीलांगी त्या वनचरीची मुलगी आहे हे सारे मान्य करतात. नीलांगीला या साऱ्याचा धक्का बसतो आणि ती स्वत:ला चांडाळ समजू लागते. तिचे मानस वडील ऋषी श्रुतिसार तिला सांगतात ब्राह्मणांचा तपोभूमीत चांडालत्व शिल्लक राहत नाही आणि येथे चांडालही ब्राह्मण होतात. ती ब्राह्मणच आहे . तिची आईसुद्धा आश्रमात तिच्याबरोबर राहील आणि तीदेखील ब्राह्मणी होईल.

हा वर्ण व्यवस्थेविषयी मांडलेला थोर विचार आपल्याला एक सुखद धक्का देतो. कोण कुठल्या जातीत जन्मला यावरून त्याचा वर्ण ठरत नाही तर तो सर्वस्वी गुणकर्मावर आधारित आहे. म्हणजे नीच कुळात जन्मलेला मनुष्य देखील गुणकर्माने उच्चवर्णीय होऊ शकतो. मूलतः ईश्वराने सगळ्यांना समान निर्मिले आहे. कथेतली नीलांगी ही एका चांडाळाची मुलगी पण ती ऋषी कुळात वाढल्याने सामवेद गायन खूप सुरेख करते. तिच्यावर कारुणिकामाता आणि श्रुतिसार ऋषी यांचे संस्कार झाले आहेत. त्यामुळे ती देखील सर्व विकारांपासून मुक्त आहे. तिला वेदपठण नृत्य देखील देखील अवगत आहे थोडक्यात तिची गुणकर्मे सात्विक प्रकारात मोडतात. चांडाळ मुलीला आश्रमात आश्रय दिल्याने नीलांगी वर आणि श्रुतिसारांवर आश्रम भ्रष्ट केल्याचा आरोप तीव्रबुद्धि नावाचा श्रुतिसारांचा शिष्य करतो. तो ब्राह्मण कुळातला आहे पण त्याला चांडाळ कन्या नीलांगी आवडते. तो हे सारे नीलांगी आणि शुद्ध बुद्धी यांचे स्वभाव जुळतात हे सहन न झाल्याने करतो. नीलांगी आणि श्रुतिसार या सगळ्यां आरोपांना संयमाने आणि खुल्या मनाने तर्कनिष्ठ उत्तरे देतात. हे प्रकरण हाताळताना त्यांची लीनता वाखाणण्यासारखी आहे. शेवट अर्थातच तीव्रबुद्धि हार मानतो आणि नीलांगीला ब्राह्मण भगिनी म्हणून मान्यता देतो देतो.

श्रुतिसार आश्रमात नीलांगीला जंगलातून कशी आणतात. आश्रमवासीय कसे आनंदतात. तिचे कसे कोडकौतुक होते. ती दिसामाजी कशी वाढते. आश्रमातील वेगवेगळळे विभाग, शिक्षण रचना, जंगल यांचे चित्रदर्शी वर्णण. यज्ञोपवीत विधीला वर्ण माहीत नाही म्हणून झालेला किरकोळ विरोध दृढ ऋषींनी कसा मोडला. नीलांगीचे धनुर्विद्येत, कलागुणात नैपुण्य, दुस-या एका र्ऋषी आश्रमात महायज्ञ, त्यासाठी जंगलातला प्रवास, राजाने केलेला श्रुतिसारांचा सत्कार, महायज्ञ, श्रुतिसारांना महायज्ञ दिर्घकाळ करण्याची विनंती, ही विनंती श्रुतिसार स्वत:च्या आश्रमात यज्ञयाग असल्याने निर्भिडपणे धुडकावतात. शिष्यांनी राजपुरोहित बनावे अथवा नाही यांचे निर्णय स्वांत्र्य शिष्यांना देतात. आपण ऋषी म्हणजे शिघ्रकोपी , एकांगी असे काहीसे समजतो पण खरा ज्ञानमहर्षी बुध्दा सारखा सम्यक संबुध्द कसा असतो याचे यथार्थ दर्शन म्हणजे श्रुतिसार.

कथेतली दुय्यम पात्र सुध्दा मुख्य पात्रांची स्वभाववैशिष्ठय दाखवतात. पात्रांना त्यांच्या स्वभाववैशिष्टया नुसार दिलेली ( श्रुतिसार, नीलांगी, कारुणिका, शुध्दमती, तीव्रबूध्दी, कलानिधी रंगराज , तीव्रबूध्दीच्या ठिकाणी अहंकार, तुसडेपण असते ) कथा किती बारकाईने बेतली हे दाखवते.
कुठल्याही तत्कालीन आश्रमात आजूबाजूचा परिसर कसा होता याचे चित्रदर्शी वर्णन ना धो ताम्हनकरांनी केले आहे. हा आश्रम स्वयंभू आहे. त्यांना लागणारे अन्नधान्य ते स्वत: पिकवतात. त्यामुळे ते राजाज्ञाही अव्हेरु शकतात. एखाद्या कथेतली प्रसंग जिवंत होणं जेवढं कथाबिजाच्या , पात्रांच्या जडणघडणीत, कथणशैलीच्या सामर्थ्यावर अवलंबून असावे तेवढेच आजूबाजूचे उभे केलेले वातावरणही महत्त्वाचे असते. या दोन्हीचा सुरेख ताळमेळ जुळला की कथा आपल्या डोळ्यापुढे घडते असे वाटत राहते आणि हेच कौशल्य ना धो ताम्हनकरांच्या लेखणीचे आहे. मग तो गोटया असो अथवा नीलांगी. पात्रांचे संवाद जेवढे व्यक्तिरेखेला साजेसे, तेवढीच वातावरण निर्मिती. नुसतीच वातावरण निर्मिती आणि व्यक्तिरेखा पोकळ असेल तर दोन्ही कुचकामी.

त्यामुळे नीलांगी मिळाली तर जरुर वाचा. मला आवडली तुम्हालाही आवडेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. एका निर्मळ विचाराबरोबरच प्रभावी कथा लेखन कसे असते हे देखील या पुस्तकातून शिकण्यासारखे आहे.

© दत्तात्रय साळुंके

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुस्तक परिचय व आपली तळमळ ही आवडली. मनुष्याने विज्ञानाच्या सहाय्याने भौतिक प्रगती भरपूर साधली पण जातीभेदाच्या विषवल्लीला संपवण्याऐवजी अजून खतपाणी घालून माणूस माणसापासून दूर जातो आहे.

दत्तात्रय साळुंके तुमचं लेखन म्हणजे मायबोली वर तप्त उन्हाळ्यात गार झुळुकीसारखं वाटत. नेहमी वाट बघतो.
लिहीत राहा!!!!
नेहमीप्रमाणेच लेख खूप आवडला...

त्यामुळे नीलांगी मिळाली तर जरुर वाचा.

- नक्कीच वाचणार आहे.
तुम्ही जे लिहील आहे ते वाचून तरी नीलंगी वाचण्याची इच्छा स्वस्थ बसू देणार नाही.

@ हर्पेन अनेक धन्यवाद चोखंदळ प्रतिसादाबद्दल...
@ शक्तीदा तुमचे निरीक्षण अगदी बरोबर ... विज्ञान भौतिक प्रगती साधते पण माणसाला माणूस कळण्यासाठी आत्मोन्नतीची गरज आहे असे मला वाटते. सुरेख प्रतिसाद. धन्यवाद...
@ अज्ञातवासी मला माहित नाही मी किती चांगले लिहितो पण आपले लिखाण कोणाला आनंद देते ही भावनाच माझ्यासाठी खूप सुखावह आहे. तुमच्यासारख्या अनेक विषयांवर लिखाण करणा-या लेखकाची ही प्रतिक्रिया बहुमोल आहे. खूप धन्यवाद...
@ सिध्दी तुम्हालाही हे पुस्तक आवडेल. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

अरे असं काही पुस्तक आहे हे माहीतच नाही.
लिहिलय तर नेहमीप्रमाणे भारीच.
लिंकवरुन मी काही हे पुस्तक मागवणार नाही. तुम्हाला भेटायला येईल तेंव्हा तुमची प्रत मागुन घेईन तुमच्याकडून. Happy

अति अवांतर माफी असावी :

एका महान लेखकाकडून मला तुंबाड घ्यायचीय. त्यांच्या घरी जाण्याचा कधी मुहूर्त येतोय वाट बघतोय...
Wink

दादा पुस्तके मागवलीत. सहा पुस्तकांचा संच आहे. मी एकही वाचलेले नाही यातले. लिंकसाठी खुप धन्यवाद!
सगळ्या पुस्तकांची मुखपृष्टे दिनानाथ दलालांची आहेत का?

@ शाली
अहो कशाला मागवले. मी दिले असते. सहा पुस्तकांचा संच मी घेतला नाही. मी फक्त नीलांगी बुकगंगा कडून मागवले इतर पुस्तकं दुस-या लेखकांची होती.

परिचय आवडला!
@अज्ञातवासी - तुला तुंबाड हवी असेल तर आहे माझ्याकडे, देते मी.

मला तुंबाड नकोय तुझ्याकडून, पण तू भेटणार असशील तर नक्की हविये.
एकवेळ PM सापडतील पण तू नाही.
@दत्तात्रेयसर, पुन्हा एकदा माफी असावी अवांतराबद्दल...

इयत्ता ५ वी ६ वीतअसाताना नीलांगी वाचलेल आठ्वतय. खूप आवडलेल तेव्हा. तुम्ही खूपच सुन्दर आठ्वणी जगवल्यात.
धन्यवाद
आसच एक योगमाया नावाच पुस्तक पण खूप वर्शा पासून शोधते आहे Happy

चांगलं लिहिलं आहे. ताम्हनकरांची गोट्या, चिंगी, खडकावरचा अंकुर ही पुस्तके वाचली आहेत. गोट्यावर सानेगुरुजींच्या लिखाणाचा प्रभाव खूप जाणवतो (गरीब पण चांगली, प्रेमळ, मानी माणसे, पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती महत्वाची वगैरे)

@ शिरीन, चीकू खूप धन्यवाद लेख आवडल्याचे आवर्जून कळविले.
@ शक्तीदा, जाई खूप आभार प्रतिसादाबद्दल.