रोमँटिक :- नजारे हम क्या देखे

Submitted by प्रतिक सोमवंशी on 7 June, 2019 - 13:18

सुधीररराव खिडकीत वृत्तपत्र वाचत बसले होते. समोर टेबलावर वाफाळत्या चहाचा कप थंड होत होता. खिडकीबाहेर पावसाला उधाण आलेल. रेडिओवरील किशोर कुमारांच्या मधुर आवाजात आणखी एका आवाजाची भर पडली. “अहो ऐकता का ss, आपल घर गळतय, तुम्हाला दरवर्षी सांगत असते, एकदाचा गच्चीला गिलावा करून घ्या...पण तुमच आपल बाई, कश्या कश्यात लक्ष नसत.” वृत्तपत्र वाचण्यात मग्न झालेल्या 'सुधी'च्या कानावर जेंव्हा जयश्री बाईंचे पस्तीस पावसाळे एकासुरात बरसले तेंव्हा सुधीला भान आल. “अगं हो जयु यंदा कर्तव्य होत, त्या नादात राहूनच गेल, पुढल्या वर्षी नक्की करू, तुझी शपथ” आता जयुला समजावण्याचा सुरात सुधीरराव वृत्तपत्राची घडी घालून टेबलावर ठेवू लागले तेवढ्यात बाहेर कुठेतरी वीज कोसळली आणि जयश्रीबाई धावतच येऊन सुधीररावांच्या मिठीत शिरल्या.
तिला मिठीत आवळत सुधीरराव गालातल्या गालात हसत म्हटले, “काय ग जयु, आता एका नातवाची आजी झालीस आणि अजूनही विजेला घाबरतेस. मी नसल्यावर कस होणार तुझ?” तेवढ्यात 'सुधी' च्या मिठीतुन विलग होऊन त्याच्या ओठांवर बोट ठेवत जयु बोलू लागली, “तुमच आपल काहीही, उगा तिन्हीसांजेला असल अभद्र बोलू नका बरं”
जयश्रीबाईंच्या डोळ्यात दाटून आलेल्या आसवांकडे लक्ष जाताच विषय बदलायचा म्हणून सुधीरराव बोलले,“आठवतय का आपण पहिल्यांदा जेंव्हा भेटलो होतो तेंव्हा अशीच वीज चमकलेली, आणि तू पहिल्याच भेटीत अनावधानाने का होईना माझ्या मिठीत शिरलेली. आज छत्तीस वर्ष होतील त्या घटनेला पण असं भासत की अगदी काल-पर्वाचीच गोष्ट आहे. ती पहिली भेट, तो पाऊस, चिंब भिजलेल्या अवस्थेत त्या बस स्टॉप चा घेतलेला आसरा, तुझा तो भिजलेला गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, तुझ्या केसांवरून पडणारं पावसाच पाणी, आणि माझ्या मिठीतुन विलग होऊन केसांची बट मागे करत लाजेने चुर होऊन माझ्यावर टाकलेला तुझ्या डोळ्यांचा कटाक्ष आठवला की मी पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडतो.” पहिली भेट डोळ्यासमोर उभी राहिल्याने लाजतच जयश्रीबाई म्हटल्या, “हो ना, त्या चिंब भिजलेल्या अवस्थेत कुडकुडताना जेंव्हा तुमच्या मिठीची ऊब मिळाली ना तेंव्हा कुठे जीवाला हायस झालं! त्या काही क्षणांच्या मिठीत तुमचे ते वाढलेले हृदयाचे ठोके, माझ्या कानावर पडणारे तुमचे उष्म श्वास, तुमच शहारून आलेल अंग, तुमच्या मिठीची ती घट्ट पकड आठवली की मीही पुन्हा पुन्हा तुमच्या प्रेमात पडते”
सुधीरराव तिच्या डोळ्यांत बघत, “आज इतके वर्ष झाले, आपल लग्न झाल, पोर झाले, त्यांचे लग्न झाले, नोकरी आणि जबाबदारीच्या दलदलीत अडकून पडलो, त्यामुळे असे क्षण पुन्हा जगायला मिळालेच नाहीत बघ. मला माफ करशील, तुला द्यायला मला तुझ्या वाटेचा वेळ देताच आला नाही ग, खूप काही मिस केल मी, पण आता तुला हवा तेवढा वेळ घे, शरीर म्हतारपणाकडे झुकत असेल पण मनाने मी आजही तितकाच तरुण आहे बघ” हे ऐकून जयश्रीबाईंना अजूनच ओशाळल्यागत झाल, त्यांचे लाजेने लाल झालेले गाल पाहून सुधीरराव तिला म्हणाले, “अगं माझा चहा थंड झालाय तेवढा गरम करशील का प्लिज?” तो कप उचलायला जाणार तेवढ्यात विजेने पुन्हा पराक्रम दाखवला आणि जयु पुन्हा सुधी च्या मिठीत शिरली. “बघा ना आज या विजा आपल्याला काय दूर होऊ देत नाहीत वाटतं!” या क्षणाची गोडी वाढवत मागे रेडिओही त्यांना साथ देत गाऊ लागला
“तेरे चेहरे से नज़र नहीं हटती
नज़ारे हम क्या देखें”
©प्रतिक सोमवंशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिकल्या पानाचा देठ हिरवाच असतो अर्थात पुरुषांचा. स्त्री ला मुलं झाली की तिच्या रोमान्स च्या कल्पना बदलतात. हे झाले जुन्या पिढीचे.
अशी एकमेकांना साथ देणारी व निभावणारी जोडपी येत्या काळात असतील का अशी शंका येते. फार झपाट्याने विवाह संस्थेत बदल होत आहेत.

छान आहे कथा,

पण हे असे सिन वाचताना अन बघताना मला नेहमी प्रश्न पडतो की प्रत्यक्षात खरेच असे अनोळखी माणसाच्या कुशीत/मिठीत शिरत असेल कोणी की फक्त कवी कल्पना. बालिश आहे विचार पण खरेच असा प्रश्न येतो मनात

एखाद्या सो कॉल्ड रोमॅन्टीक सिरीयलीचा सीन वाटतोय. तद्दन फिल्मी.
(आजकाल मला बर्याच कथा गोगोड फिल्मी सीन वाटताहेत. वय झालं वाटतं Happy )

प्रत्यक्षात खरेच असे अनोळखी माणसाच्या कुशीत/मिठीत शिरत असेल कोणी >>> हो. असं होतं. फक्त सिनेमांत.

VB आणि सस्मित Lol Lol

मराठी माणसाच्या रोमान्सकथा एवढ्या साचेग्रस्त का असतात कळत नाही. तोचतो पाऊस, तीचती वीज, तोचतो वाफाळलेला चहा/कॉफी....

मराठी माणसाच्या रोमान्स कथा वाफाळता चहा, पाऊस, मिठी यातच सिमीत आहेत कारण आपण आजही आपली संस्कृती सोडलेली नाही. जे प्रशंसनीय आहे.
राहिली गोष्ट कुण्या अनोळखी माणसाच्या मिठीत शिरायची...जेंव्हा एखाद्या गोष्टीची भीती वाटते न ती गोष्ट अचानक घडते तेंव्हा फाटून हातात आलेली असते त्यामुळे समोर जो कुणी असेल त्याचा आधार घ्यावा लागतो. हा माणसाचा स्वभाव आहे कुणीही नाही बदलु शकत.

जर कुणाला ही कथा फिल्मी वगैरे वाटली असेल तर इट्स ओके, पण असल्या बोरिंग कथा जर आता फिल्ममध्ये टाकल्या, तर सुपरफ्लॉप होईल चित्रपट.
तोच तोच असलेला प्लॉट, शिळ्या कढीला आणलेला उत, म्हाताऱ्याच्या सो कॉल्ड रोमान्सच्या कल्पना, आणि सुपरफिशीयल सिनॉप्सीस!

अशा कुठे असतात हो मुली ज्या विजेला घाबरतात आणि दिसेल त्या पुरषाच्या मिठीत शिरतात अधारा साठी? ८/१० वर्षा च्या पोरी सुद्धा घाबरत नाहीत अशा.
बहुतेक हा fantacy चा प्रकार आहे. किन्वा bollywood च्या movies जास्त बघितल्याचा परीणाम.

क्युट आहे कथा
विजेचं निमित्त करून ज्यांना मिठीत शिरायची इच्छा असेल त्या शिरत असतील ☺️☺️
विजेऐवजी छतावर पाल असेल तर मिठीत शिरायचे चान्स अजून वाढतील.

वरील गोष्ट काल्पनिक असून त्याचा कोणत्याही व्यक्तीशी संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. या गोष्टीला रिअल आणि रील लाईफ शी जोडून आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये
जनहितार्थ जारी

आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये
>> मग मायबोलीवर करायचे काय?

तुम्ही छान गोष्ट लिवलीय, प्रतिसाद इग्नोर मारा.

मराठी माणसाच्या रोमान्स कथा वाफाळता चहा, पाऊस, मिठी यातच सिमीत आहेत कारण आपण आजही आपली संस्कृती सोडलेली नाही. जे प्रशंसनीय आहे.
राहिली गोष्ट कुण्या अनोळखी माणसाच्या मिठीत शिरायची...जेंव्हा एखाद्या गोष्टीची भीती वाटते न ती गोष्ट अचानक घडते तेंव्हा फाटून हातात आलेली असते त्यामुळे समोर जो कुणी असेल त्याचा आधार घ्यावा लागतो. हा माणसाचा स्वभाव आहे कुणीही नाही बदलु शकत. +11111