लग्न, लाडू खाणे आणि मार खाणे :)

Submitted by अतुल ठाकुर on 5 June, 2019 - 21:58

आमची वाडी खुप शांत झाली आहे असे म्हणतात. एक माणुस तर "वाडी शमशान हो गया" असंच म्हणत असतो. मला शांतता प्रिय असल्याने माझी याला काहीच तक्रार नसते. बाकी पूर्वी वाडीत सतत काहीन काही घडत राहायचे हे खरं आहे. एखादा दिवस शांततेत गेला की अगदीच अळणी वाटायचं. दारु पिऊन बायकांना मारझोड करणारी "अस्सल मर्द" मंडळी वाडीत होती. दंगलीत दुसर्‍यांची दुकाने लुटणे, सालस स्वभावाच्या मंडळींना सतत त्रास देऊन वाडी सोडून जाण्यास भाग पाडणे अशी मर्दुमकीची गाजवणारे वीर होते. आम्ही स्टेशनच्या अगेदी जवळ राहतो त्यामुळे रेल्वे रुळ घरामागुनच गेलेत. एखादी गोष्ट करता आली नाही तर नामुष्की पदरात घेण्यापेक्षा " डोळ्यावर पट्टी बांधून ट्रॅकमध्ये उभा राहा" असे स्वाभिमानी सल्ले दिले जात. जेलमध्ये जाऊन आलेल्यांना तर देशभक्तांसारखा मान दिला जाई. पण आता वादळं निवळत आलीत.

या जवानमर्दांच्या पिढीतील बहुतेक माणसं आता आजाराने ग्रस्त आहेत. काही देवाघरी बहुधा तेथे रंभा उर्वशींना पिडायला निघून गेलीत. नवीन पिढी मोबाईलवरच असते. त्यांना आपली मर्दुमकी गाजवायला आता अवघं विश्व उपलब्ध आहे. म्हणून असेल कदाचित पण त्यांची लफडी वाडीत फारशी होत नाहीत. त्यामुळे आता पुलंचं वाक्य उधार घेऊन म्हणायचं तर म्हणावसं वाटतं काय दिवस होते महाराजा..गेली ती मारझोड आणि गेली ती बायकांना त्रास देणारी मर्द माणसं. पण गेल्याच आठवड्यात चित्र पालटलं.

दुपारी काम करत बसलो होतो आणि एकदम गलका ऐकू आला. मी जमिनीवरच बसून काम करत असतो. आणि बाहेरचे काही दिसु नये म्हणून दरवाज्याला एक उंच फळीदेखिल लावली आहे. त्यामुळे जो कालवा झाला त्यावरून लक्षात आले की मारामारी झाली आहे. त्यात प्रामुख्याने बायकाच. एखाद दुसरा तरुण. वाडीतल्या मारामारीत पडायचं नाही हा माझ्या जगण्याच्या नियमांमधला एक प्रमुख नियम आहे. तो याही वेळी मी कसोशीने पाळला. फोनाफोनी झाली. लगेच पोलीस आले. ते ऐकून तर हृदयच भरून आलं. त्यांचं तर फार दिवसांनी इकडे येणं झालं होतं. एका संपूर्ण कुटुंबाला शाळेतल्या मुलासकट पोलिस गाडीत घालून पोलिसस्टेशनवर घेऊन गेले. तेथे फार रोमहर्षक हकीकती घडल्या त्याचे सांग्रसंगीत वर्णन रात्री झाले. त्या वर्णनात "कानाखाली आवाज" आणि "मांडवळी" अशासारखे शब्द होते. पुढे एकदोन दिवसांनी हे कुटुंब लग्नाला गावी जाणार होते.

ही माणसे गावी गेल्यावर इथून दुसर्‍या पार्टीने फोन केला. मंडळीने लग्नाचे लाडू खाल्ले आणि संध्याकाळी मारदेखिल खाल्ला. दुसर्‍या पार्टीने गावातल्या त्यांच्या खास माणसांकडून मार देववला होता. पण लग्नाला गेलेली माणसेही लेचीपेची नव्हती. या मारामारीत मार देणार्‍या काहींनाही भरपूर मार पडला. हा मार देण्याचा सोहळा नीट पार पडतो आहे की नाही हे जातीने पाहायला इथून एक बाई खास गावी गेली होती. तिने हे पाहिलं की आपल्या पार्टीलाही मार पडला आहे. लगेच पुन्हा फोन. मोबाईलने सारे कसे सोपे करून टाकले आहे. माणसे गावाहून परतली आणि मार देणार्‍यांना पुन्हा येथे पहिल्या पार्टीने चोपून काढले. या चोपाचोपीत पुन्हा पोलिस वगैरे भानगडी झाल्याच. मला तर एकदम नॉस्टाल्जीक फिल आला होता. बर्‍याच दिवसांनी सळसळत्या रक्ताचं दर्शन घडलं होतं. वाडीमें अभी जान बाकी है...:)

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप इंटरेस्टिंग आहे. संवाद दिले असते तर मजा आली असती. सगळं कसं इनडायरेक्ट स्पीच वाटलं. मार कोणी किती वेळा खाल्ला गोंधळ उडाला. वाडीसारख्या आपलेपण जपणाऱ्या वस्तीत इतकं वितुष्ट? बात हजम नही हुई.
पु.ले.शु.

भन्नाट वाडी......
अजुन जास्तीच वर्णन केल असत तर मज्जा आली असती.

आहे इंट्रेस्टिंग पण जरा अजुन वर्ण्न करुन संवाद वैगेरे हवे होते.
अशी भांडण मारामारी शिव्या असलेली एक मस्त कथा आहे इथे. मला वाटतं अ‍ॅस्ट्रॉनॉट विनयची आहे.

वाचून कसं अगदी अगदी झालं. तो एक काळ होता. मुलुख होता. माणसं तशी होती. अंगात रग असलेल्या शाळेत हाणामाऱ्या करणाऱ्या मुलाला प्रोत्साहन मिळायचे. "ह्यो मोठा वस्ताद हुणार बघा. खमक्या हुणार. गाजवणार. नाव काढणार आपल्या गावाचं". हेच एखादा अंगकाठी लेचीपेची पण सालस प्रामाणिक वगैरे असलेला अभ्यासात चांगला असला तरी चोहोबाजूंनी मिळमिळीत किंवा बिनकामाचा ठरवला जायचा. मोठा होऊन फारफारतर कुठेतरी मास्तर वगैरे होईल किंवा कुठेतरी नोकरी वगैरे करेल अशी माफक अपेक्षा केली जायची.

कोणी कोणाला कशासाठी मारले काही कळलं नाही पण असे किस्से ऐकले आहेत.
सगळे नातेवाईकच असतात एकमेकांचे आणि दोन गटात मारामारी चालू असते.