घ्यावे तेवढे परत करावे

Submitted by Asu on 5 June, 2019 - 05:36

आजच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना आवाहन - 'वाचवाल तर वाचाल!'

घ्यावे तेवढे परत करावे

झाडे फुले पक्षी प्राणी
ऊन वारा पाऊस पाणी
निसर्ग पिता, धरणी माता
पर्यावरण हे जीवन जगता

घटकांमध्ये नको भांडण
असो सुखी सहजीवन
मिळून देऊ तनमनधन
वसुंधरेचे करू नंदनवन

वसुधैव कुटुंबकम् निती
सर्व मानव एक जगती
एकमेकांचा हात धरू
वसुंधरेचा उद्धार करू

घ्यावे तेवढे परत करावे
निसर्गाप्रती कृतज्ञ रहावे
सदा त्याचा संग घडावा
निसर्गाचा समतोल राखावा

विकासाचा ध्यास धरावा
निसर्गाचा नास न व्हावा
समृद्धीचा सहवास असावा
प्रगतीचा हव्यास नसावा

मृगजळासम सुख असे
क्षणात दिसे क्षणात नसे
क्षणैक सुखाच्या लोभापोटी
ना धरावी जगण्या वाट खोटी

ढेकर देऊन भरल्या पोटी
काय ठेवता वारसांसाठी
जिवती लिहिल काय भाळी
निसर्ग ना असे अक्षय थाळी

थेंब एक जरी पाण्याचा
अमृताहुनि बहुमोलाचा
बांध बांधवा तळी खोदवा
पाणी अडवा पाणी जिरवा

वृक्षांची करू नित्य सेवा
जतन करु अमूल्य ठेवा
वारसा देण्या शुद्ध हवा
झाडे लावा झाडे जगवा

पर्यावरण करण्या रक्षण
प्रत्येकाने घ्यावे शिक्षण
विचार हाच मनात ठेवा
विश्वकल्याणा श्वास घ्यावा

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults