चक्राता - १

Submitted by साक्षी on 5 June, 2019 - 04:53

दोन वर्षांपूर्वी एका मैत्रिणीकडून किरण पुरंदरेंबद्दल समजले. लेकाला पुण्याजवळच्या एक दिवसाच्या कॅंपला पाठवले. त्याला कँप प्रचंड आवडला. पक्षी बघणे तर आनंददायी आहेच पण किरण पुरंदरेंबरोबर पक्षी बघणे खूपच रिफ्रेशिंग आहे. त्यांना सर वगैरे म्हणलेलं आवडत नाही आणि एकेरी किरण कसं म्हणणार त्यामुळे ते मुलांचे किरण काका आणि नंतर सगळ्यांचेच किका झाले. सगळे त्यांना किका म्हणूनच ओळखतात.
त्यानंतर लेकाने दिवेघाट, भिगवण, भीमाशंकर, सिंहगड पायथा असे ४-५ कँप केले. त्याच्याबरोबर मलाही आवड निर्माण होऊ लागली. चिमणी, कावळा, कबुतर सोडूनही १० प्रकारचे पक्षी आपल्या आजुबाजुला आवारातच सहज दिसतात, फक्त डोळे उघडे ठेऊन बघितलं पाहिजे हे जाणवायला लागलं. मी पण एक पाषाण लेकचा अर्धा दिवसाचा कँप केला.
काही ना काही कारणाने मागचं वर्षभर त्यांच्याबरोबर एकही कँप जमला नाही. २ जानेवारीला यावर्षी उन्हाळ्यात चक्राता कँप लावल्याची मेल लेकाला वाचून दाखवली. आपण जाऊ म्हणून तो मागे लागला होता, पण मी नंतर बघू असं सांगून त्याची बोळवण केली आणि साधारण आठवड्याभरात आपण जाऊच असं मी मनाशी ठरवलं. चक्क नवराही लगेच तयार झाला. २८ एप्रिल ते ३ मे देहरादून ते देहेरादून असं किकांच पॅकेज होतं.
त्यांना अ‍ॅडव्हान्स दिला. पुणे दिल्ली आणि येतानाची फ्लाइट्ची तिकिट्स बूक केली. दिल्ली देहरादून फ्लाइट महाग वाटत होते. आणि लेकाला अजुन एक अनुभव म्हणून दिल्ली-देहरादून आणि येतानाची देहरादून-दिल्ली नंदादेवी एक्सप्रेसची थ्री टायर एसी ट्रेन तिकिट्स बूक केली. आणि ह्यातलं काहीच लेकाला कळू दिलं नव्हतं. त्याला सरप्राइज द्यायचं होतं. (ते फार दिवस सरप्राइज रहिलंच नाही. त्याला लवकरच लक्षात आलं) लेकाची परीक्षा संपली की सुट्टीत बाकिची तयारी करू असं ठरवून रोजच्या कामात परत अडकलो.

या नंतरचा भाग इथे वाचा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users