निनावी

Submitted by जयश्री साळुंके on 5 June, 2019 - 01:32

जन्म झाला तो एका श्रीमंताच्या घरी.
आई खुप सुंदर होती, अगदी स्वर्गातून उतरलेली अप्सरा. शैक्षणिक दर्जा जरा बरा, अगदी वर्गात पहिली नाही पण पहिल्या दहात असायची. वडील आईच्याच कॉलेज मध्ये शिक्षक. इतिहास शिकवायचे. त्यांचं दोन गोष्टींवर नितांत प्रेम होतं. एक म्हणजे इतिहास आणि दुसरं म्हणजे आई. पण म्हणतात न कि खर्या प्रेमाला कोणाची ना कोणाची नजर लागते. आई बाबांचं लग्न नव्हत न झालेलं. मग काय आजोबांना जेव्हा कळालं तेव्हा त्यांनी प्रेमाला मान्यता द्यायला नकार दिला.
आईचा आजोबांमध्ये पण खुप जीव होता, त्यामुळे पळून जाऊन लग्न करणं तिला मान्य नव्हतं. आजोबांना कळाल्यापासून आईचं कॉलेज बंद झालेलं, बाहेरच्या जगात काय चालू आहे याची तिला काहीच जाणीव नव्हती. आणि अश्यातच एक दिवस आईला उलट्या व्हायला लागल्यात. आईला नाही पण आजोबांना झाला प्रकार लक्षात आला. त्यांनी आईला लांबच्या गावी आणलं. आणि माझा जन्म झाला.
मी निनावी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि माझं नाव असं का ठेवलं? बरोबर ना..
तर झालं असं कि माझ्या जन्मानंतर आजोबा आईला परत त्यांच्यासोबत घेऊन गेले, त्यामुळे मला ते बिलकुल आवडत नाही. पण माझ्यासाठी माईला ते इथेच सोडुन गेले होते, माई मला खुप आवडते, ती कि नई माझा लाड पण करते आणि मी खोडी काढली कि माझ्यावर रागावते, पण मला माहितीय कि ती खोटं खोटं रागवते. मग मी पण थोडंस रडते, मी रडायला लागले कि तिला बिलकुल आवडत नाही, मग ती मला गोलवाल्या गोळ्या खायला देते.
अरे, मी तर विसरलेच, तर माझा जन्म झाला आणि दुसऱ्याच दिवशी आजोबा आईला घेऊन गेलेत. आणि ह्या सगळ्यात माझं नावाचं नाही ठेवलं कोणी. मग माईनेच मला नाव दिलं, “निनावी.”
माई म्हणते कि मी अगदी माझ्या आई सारखी सुंदर आहे. पण मला नाही आवडत ती असं म्हणते तेव्हा. मी मुळीच माझ्या आई सारखी नाही. असं स्वताच्या छोट्या, सुंदर, गोंडस, गोल-मटोल बाळाला सोडुन कोणी जातं होय?
मी नाही म्हणत कि मी सुंदर, गोंडस, गोल-मटोल आहे, माई म्हणते. ती तर अजुन खुप काही म्हणत असते पण मला कळतचं नाही त्यातलं बरचसं. मी लहान आहे ना. माई म्हणते कि मी थोडी मोठी झाले कि आई मला घ्यायला येणारय. पण बाबा नाही येणार. माई म्हणते कि बाबा मला आणि आईला सोडुन दूर निघून गेले. पण बाकी मुलांचे बाबा पण पण रोज सकाळी दूर जातात ना, संध्याकाळी परत येतात. पण हे माईला कोण सांगणार. मी सांगायला गेले एकदा तर देव जाने काय काय म्हणत होती, म्हणे बाबा देवा कडे गेलेत. असं कोणी देवाकडे थोडीच जातं? हि माई पण ना...
माई आज सांगत होती कि मी आज पाच वर्षाची झाले आहे, आई आता मला शाळेत जाव लागेल. पण आमच्या गावात तर शाळाच नाही म्हणुन आई मला घ्यायला येणार आहे. माझ्या मोनूला मी सांगितलं कि आज आई येणार आहे तर तो पण खुप जोरात उड्या मारायला लागला, त्याची शेपूट ना खुप मस्त आहे. मला खुप आवडते, तो कायम तिच्या भोवती गोल गोल फिरत असतो.
तर झालं असं कि सकाळी मला माईने सांगितलं कि आज आई येणार मला घ्यायला म्हणुन मी लवकर आवरून बसले. पण आई तर संध्याकाळी येणार होती, असं माईचं म्हणाली. मला कि नई प्रचंड राग आला माईचा तेव्हा, तिने मला आधीच नको का सांगायला कि आई संध्याकाळी येणार आहे. मी बिचाऱ्या मोनुला घेऊन बागेत गेले असते ना, पण आता बागेत पण नाही जातं येणार, बाहेर ऊन पडलं आता. आता बाहेर जायचं नाव काढलं तर त्या देवाला पण नाही सांगता येणार काय होईल ते आणि त्याच्या कडे गेलेले माझे बाबा ते पण नाही सांगू शकणार.
मला कि नई हसूचं येत, बाबा देवाकडे गेले हे ऐकलं कि. म्हणजे माई म्हणते कि ते परत कधीच येणार नाही पण शेजारच्या अरुण चे बाबा तर रोज देवाकडे जातात, आरती करून परत येतात. मी पण तर किती वेळा देवाकडे जाते. पण मी तर दर वेळी परत आलेय. हम्म्म्म, काही तरी गोंधळ नक्कीच आहे. शोध मोहीम राबवावी लागेल.
पण आजची दुपार कशी घालवावी हा सध्याचा मोठ्ठा प्रश्नय. आता तर मोनू पण शांत बसला एका जागेवर. मी कि नई पियानो वाजवायला घेते आता, पण त्याच्या आवाजाने माईचं डोक दुखायला लागलं तर?? सध्या असचं होतयं, मी थोडा कसला आवाज केला कि माईचं डोक दुखतं. मग आता काय करायचं? चित्र काढायला घेऊ? पण मी चित्र काढायला घेतलं कि पुर्ण रंगाने माखते, आणि मी अशी माखलेली असतांना आई आली तर ती म्हणेल अशी घाणेरडी निनावी नको. मग आता काय..??
जेवण पण बाकीय आज. माई पण ना आमची अगदी विसरभोळी झालीय सध्या, मला जेवण द्यायचंच विसरून गेली. आत्ता आधी जेवण. मग ठरवू पुढचं पुढे.
एक काम करते मी ना शांत झोप काढते. माई म्हणते मी झोपलेली असले कि खुप छान दिसते अगदी परी कथेतल्या परी सारखी. म्हणजे मी जर इतकी छान दिसले तर आई मला नक्की घेऊन जाईल. ठरलं तर मग, आता युद्ध झोपेसोबत.
अरे देवा... किती वेळ झाला झोपायचा प्रयत्न करतेय पण मेली झोप काही येईना. किती वाजले बर.. छोटा काटा ४ वर मोठा काटा ३ आणि ४ च्या मध्ये, म्हणजे ४ वाजून गेले. आता थोड्या वेळात तर संध्याकाळ होईल. मी उठुन तयारी करते. म्हणजे आई आली कि लगेच निघता येईल. माई ला सांगायला पाहिजे कि माझी तयारी करून दे मस्तपैकी.
आता तर तयारी पण झाली. किती वाजले बरं. छोटा काटा ५ वर मोठा काटा ६, म्हणजे साडे पाच का? माई ला विचारते. पण माई तर दवाखान्यात गेलीय. मग आता कोणाला विचारू? जाऊदे वाजले तितके वाजले. आई गं येना लवकर. मी किती वाट बघतेय तुझी. मला खुप आठवण येते तुझी, बाबांची, आजोबांची. माई कि नई मला तुमच्या सगळ्यांबद्दल खुप छान छान सांगत असते.
गाडीचा आवाज आला. आई आली वाटत.. बाहेर जाऊयात आधी, पळा पळा... अरे हे काय आई तर नाही पण गाडीतून माई आणि हे कोण उतरलेत?? माईलाच विचारू.
माई म्हणतेय हे काका म्हणजे माझ्या बाबांचे मित्र आहेत आणि मी आता त्यांच्याकडे जाऊन राहायचंय. पण का? मला घ्यायला तर आई येणार होती ना? आणि मी त्यांच्याकडे जाऊन राहायचं म्हणजे एकटीने? मी तर आज पर्यंत माई ला सोडुन कुठेच नाही गेले.
अग माई नको ना असं करू.. मी नाही तुला सोडुन जाऊ शकत. मला तुझ्या सोबतच राहायचं आहे. मला नाही जायचं आई कडे सुद्धा. मला बाबा पण नको. मी तुला कोणतेच प्रश्न पण नाही विचारणार. मला खाऊ पण नको, आणि नवी खेळणी पण नको. मला फक्त तूच पाहिजे. मी नाही ह्या काकांसोबत जाणार ते कितीही चांगले असले तरी नको मला.
काय करू मी? मी केव्हापासुन रडतेय पण माईला बिलकुल माझी दया नाही येत. ती माझं सगळ सामान बांधतेय. आता तर माझ्या डोळ्यातून पाणी येणं पण बंद झालं. मला बोलता येत नाही म्हणुन असं मला सोडतेय हि माई. कट्टी माईसोबत, तिला काहीच कळत नाही. आता काकांसोबत जाणार मी.
समाप्त.

Group content visibility: 
Use group defaults

कथा चांगली आहे.
मला वाटतं माई आजारी असावी.
म्हणून निनावीची सोय एखाद्या अनाथालयात केली असावी.

हे सगळं आत्मकथन आहे ना? मग सुरवातीला एखादी जाणती मुलगी बोलत आहे असं वाटलं आणि शेवटी तर बोलताही येत नाही एवढी लहान झाली, असं कसं?
बहुतेक मला हा कथाप्रकार समजला नसावा.

धन्यवाद सर्वांना
सस्मित आणि वीक्ष्य अगदी बरोबर. माई आजारी आहे आणि निनावी मुकी
हे आत्मकथन आहे, पण पाच वर्षाच्या मुलीचं. आणि तसं कथेत सांगितलं सुध्दा आहे, "आज मी पाच वर्षाचे झाले"..
आणि जोरात बोलून स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नसल्या तरी मनात आपण सर्वच जण बोलतो, तसं ती पण बोलतेय.

ओके!
तेथेच माझा जरा गोंधळ झाला. कथा छानच आहे.
विदारक विषय.

Asl kahi vachl ki blank hote mi.... Ky reply deu klt nahi... as mulana sodtat aai vadil...Bhavna klali tumchi... Keep it up

धन्यवाद सर्वांना प्रतिक्रिया देण्यासाठी.
@ Urmila Mhatre मुळात सध्या हे खुप मोठ्या प्रमाणवर होतय. कथेत कमीत कमी मुलीची नीट व्यवस्था तरी लावली आहे, बऱ्याच वेळी तर ते बाळ कचऱ्याच्या ढिगात, गटारीत, हायवे वर साईड ला, आणि दवाखान्यात जन्म झाला असेल तर तिथेच सोडुन दिलं जातं. माणुसकी जिवंत असलेल्या कोणाला सापडलं तर ते बाळ जगत नाही तर जनावरांच खाद्य बनत. कधी कधी काही जनावरं माणसापेक्षा समजदार निघतात आणि त्या बाळाचे प्राण वाचतात.

> मुळात सध्या हे खुप मोठ्या प्रमाणवर होतय. > Infant exposure हे भूतकाळात नेहमीच होत आले आहे आणि जोपर्यंत unplanned && unwanted मुलं जन्माला येत राहतील तोपर्यंत हे होत राहणार आहे.

@ॲमी जर unplanned and unwanted child असेल तर सध्या according to government rules त्या बाळाला जन्माला येण्या आधी सुध्दा काहीच करता येत नाही आणि त्यामुळे मग हे बाकी प्रकार घडतात. मुळात बाळाला जन्म द्यायचा की नाही हे त्या आईला जर ठरवू दिलं तर she might take the option of abortion. But its highly expensive and sometimes illegal if the girl is unmarried..
आता हे खरं आहे की नाही ते मला नाही माहित पण एका मैत्रिणी चा अनुभव आहे. तिला नंतर झालेला मानसिक त्रास हा खूप जास्त होता हा भाग वेगळा.

> तर सध्या according to government rules त्या बाळाला जन्माला येण्या आधी सुध्दा काहीच करता येत नाही आणि त्यामुळे मग हे बाकी प्रकार घडतात. मुळात बाळाला जन्म द्यायचा की नाही हे त्या आईला जर ठरवू दिलं तर she might take the option of abortion. But its highly expensive and sometimes illegal if the girl is unmarried..
आता हे खरं आहे की नाही ते मला नाही माहित >

खर्चाबद्दल मला माहीत नाही पण कायद्यानुसार:
३ महिने/ १२ आठवडेपर्यंत गर्भपात कुठल्याही खाजगी, सरकारी दवाखान्यातून करता येतो. विवाहीत आहे की नाही याने काही फरक पडत नाही.
त्यानंतरही ५ महिन्यापर्यंत/ २० आठवडे काही ठराविक सरकारी दवाखान्यातच जाऊन गर्भपात करता येतो.

पण मुळात गर्भधारणाच होणार नाही यासाठी गर्भनिरोधक साधनांची उपलब्धता आणि वापराबद्दल प्रशिक्षण याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. आणि त्यानंतर स्वच्छ, सुरक्षीत गर्भपातकेंद्रची उपलब्धता आणि त्याच्याशी सलग्न टॅबू जनमानसातुन नाहीसा करणे...

मुलं टाकून देणारा जो वर्ग आहे त्यांच्यापर्यंत हे जायला हवे...

पण मुळात गर्भधारणाच होणार नाही यासाठी गर्भनिरोधक साधनांची उपलब्धता आणि वापराबद्दल प्रशिक्षण याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. आणि त्यानंतर स्वच्छ, सुरक्षीत गर्भपातकेंद्रची उपलब्धता आणि त्याच्याशी सलग्न टॅबू जनमानसातुन नाहीसा करणे...

मुलं टाकून देणारा जो वर्ग आहे त्यांच्यापर्यंत हे जायला हवे...-******+1111111111

धन्यवाद...
३ महिने/ १२ आठवडेपर्यंत गर्भपात कुठल्याही खाजगी, सरकारी दवाखान्यातून करता येतो. विवाहीत आहे की नाही याने काही फरक पडत नाही.
त्यानंतरही ५ महिन्यापर्यंत/ २० आठवडे काही ठराविक सरकारी दवाखान्यातच जाऊन गर्भपात करता येतो. >>> हे नव्हत मला माहित...
आणि गर्भनिरोधक बरेच साधनं सरकारी दवाखान्यात मोफत मिळतात... पण काही लोकं अशी आहेत की त्यांना ते वापरण आवडत नाही,, कारण "माहिती नाही" असं आपण म्हणू शकत नाही. सध्या अगदी लहान मुलांना सुध्दा याबद्दल पूर्ण माहिती असते.