मागील कैक वर्षांपासून बिरादरी मध्ये, रोज भल्या पहाटे ३ वाजता एका घरी अलार्म वाजतो आणि एक ८० वर्षाचा तरुण इसम जागा होतो. [८० वर्षाचा तरुण का म्हंटलं हे नंतर आपणा सर्वांना कळेलच.] एवढ्या पहाटे घरातील कुणालाही त्रास न देता स्वतःची सर्व कामे स्वतःच करतो. शेवटी मात्र प्रेमाने तयार केलेल्या आपल्या पत्नीच्या हातचा चहा पिऊन सकाळी ६ वाजता संस्थेच्या कामासाठी सज्ज होतो. लोक बिरादरी मधील अवॉर्ड रूमच्या खालच्या वॉर्ड मध्ये, रेडीओवरच्या बातम्या-गाणी ऐकत रुग्णांच्या जखमा पुसण्यासाठी “गौज पिस” तयार करतांना ही व्यक्ती तुम्हाला नक्कीच दिसणार.
“जगन्नाथ संभाजी बुरडकर” हे त्या इसमाचे नाव. सध्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात, जेना नावाच्या गावी स्वातंत्र्यपूर्व काळात १३ डिसेंबर १९३७ मध्ये एका शेतकरी कुटुंबात जगन काकांचा जन्म झाला. आपली जन्मतारीख आताही अचूक सांगणारे जगन काका ५ बहीण-भावांमध्ये सर्वात लहान होते. शिक्षणाची प्रचंड आवड. त्यांचे ४ थी पर्यंतचे शिक्षण जेना गावीच झाले. दहा वर्षाचे असतांना जगन काकांचे वडील संभाजी हे कॉलरा या संसर्गजन्य आजाराने मरण पावले. नंतर घरगुती कलहामुळे जगन काका, आई कासाबाई सोबत वेगळे राहू लागले. या दुःखातून सावरण्याआधीच व पुढील शिक्षण घेत असतांना जगनकाकांना कुष्ठरोग झाल्याचे कळले. त्यावेळी श्री. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी वरोरा येथे ‘आनंदवना’ ची सुरुवात केली होती. आनंदवनातील आरोग्य कार्यकर्ते भद्रावतीला येऊन कुष्ठरोगाचे औषध वाटायचे, ते जगन काका नियमित घ्यायला जायचे. शिक्षणाची साथ आणि आनंदवनच्या औषधींवर विश्वास यामुळे आपण नक्की बरे होऊ अशी पक्की खात्री काकांना होती. पुढे त्यांनी आपले शिक्षण सुरु ठेवले आणि १० वी ची परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे शिकण्याची जबर इच्छा पण घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे शिक्षणाला तेथेच पूर्ण विराम द्यावा लागला. दरम्यान त्यांचे जवळच्या नातेवाईकांसोबत लग्न झाले पण काकांच्या आजाराबद्दल कळल्यावर ती सात जन्माची साथ काही महिन्यातच सुटली. जगनकाकांनी बरीच वर्षे शेतमजुरी करून आपले घर चालवले. काही वर्षांनंतर वृद्धापकाळाने आईसुद्धा मरण पावली.
एकामागून एक जिव्हाळ्याची माणसं गेल्यामुळे जगन काका एकटे पडले. आता हा एकटेपणा त्यांना असहय्य होऊ लागला. आनंदवनाशिवाय कुठेही आश्रय मिळणे अशक्य होते. जगन काका आनंदवनाच्या कार्यात लगेच सामील झाले आणि तिथे त्यांना “नेम प्लेट” बनवण्याच काम मिळाले. त्यांना त्यांच्यासारखी बरीच मंडळी आनंदवनात मिळाली आणि एकाकीपणा कमी होऊ लागला. बाबांनी म्हटलंच आहे - “Joy in Anandwan is much more infectious than disease itself.”
ही गोष्ट असेल साधारणतः १९८० सालची. जगन काकांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण आणि मेहनती वृत्ती विकास भाऊंच्या [डॉ. विकास आमटे] नजरेतून चुकली नाही. त्यावेळी लोक बिरादरी आश्रमशाळेमध्ये शिक्षकाची गरज होती. विकास भाऊंनी जगन काकांना लोक बिरादरी येथे शाळेतील मुलांना शिकविण्यासाठी पाठवले. प्रकल्प सुरु होऊन आता ८-९ वर्षे झाली होती. जेव्हा जगन काका आले, तोपर्यंत दवाखान्यात रुग्णांची गर्दी बरीच वाढायला लागली होती. आणि म्हणून मंदा वहिनींनी [डॉ. मन्दाकिनी आमटे] जगन काकांना कायमचं हॉस्पिटल मध्येच ठेवून घेतले. त्यावेळी हॉस्पिटल प्रकाश भाऊ आणि मंदा वाहिनी सोबत अन्य तीन लोक बघायचे - मनोहर येम्पलवार काका, संध्या येम्पलवार काकू आणि बबन पांचाळ काका. जगन काका आल्याने कामामध्ये अधिक हातभार लागला. रोजची पेशंट्स ची जबाबदारी या सहा लोकांवर होती. आणि मग काय … सर्वांना सर्वच कामे करावी लागायची. जगन काका त्या वेळी रुग्णांचे केस पेपर काढणे, औषधी-गोळ्या वाटणे, सलाईन लावणे, ड्रेसिंग करणे, इंजेक्शन देणे, पॅड बनवणे, रुग्णांचे कपडे धुणे, वॉर्ड स्वच्छता इत्यादी सर्व कामे कुठलाही कंटाळा न करता अगदी मनापासून करायचे. “Experience is the best teacher” या उक्तीनुसार जगन काका अति उत्साहाने सर्व नवीन गोष्टी प्रकाश भाऊ, मंदा वहिनीं व इतर सहकाऱ्यांकडून शिकत गेले.
एकटेपणा आता कधीचाच गेला होता पण तरीही जीवनात अर्धांगिनीची साथ खूप महत्वाची म्हणून १९८६ साली जगन काकांचे जवळच्याच कोयनगुडा गावातील गीताशी लग्न झाले. अवघ्या ५०० रुपयात लोक बिरादरी मध्ये झालेल्या लग्नाचा इतिवृतांत काका मोठ्या उत्साहात सांगतात. गीता ताई सुद्धा तेव्हापासून लहान मुलांचे गोकुळ चालवणे, शेतीची कामे, स्वयंपाक गृहात मदत करणे इ. अनेक कामे करत आहे.
जगन काकांबद्दल प्रकाश भाऊ सांगतात ......"आमच्या कडे वीज नसल्यामुळे ऑटोक्लेव्हिंग शेगडीवर करावे लागायचे. कैक वर्ष न चुकता, जगन काकांनी ग्लास सिरींजेस, नीडल्स आणि शस्त्रक्रियेसाठी नियमित लागणारी साधने लाखडी कोळसाचा वापर करून शेगडीवर ऑटोक्लेव्हिंग केले आहे. आणि महत्वाचं म्हणजे सकाळी ५ वाजता वॉर्ड राऊंडच्या आधीचं हे सगळं तयार असायचं. कामाच्या प्रति असलेल्या प्रामाणिकपणाचं एक जिवंत उदाहरण म्हणजे जगन काका."
१९९३ मध्ये जेव्हा कॉलराची साथ आली तेव्हा तर दिवस रात्र एक करून, कंदीलाच्या प्रकाशात जगन काकांनी रुग्णांना औषधे आणि सलाइन दिल्या. अर्थात इतर कार्यकर्त्यांची साथ निश्चितच होती. जगन काकांसोबत काम करणारे त्यांचे जवळचे सहकारी मित्र आणि लोक बिरादरीच्या जुन्या मुख्य कार्यकर्त्यांपैकी एक - मनोहर काका [मनोहर एम्पलवार] एक किस्सा मोठ्या आठवणीने सांगतात. ते म्हणतात की, “जगन भाऊ त्याचं काम खूप आत्मीयतेने करायचे. जगन भाऊला एकदा पेशंटला पेनिसिलीन चं इंजेक्शन द्यायचे होते. पण वॉर्ड मध्ये जगन भाऊला पेशंट दिसलाच नाही. त्यांना कळलं की पेशंट निघून जात आहे. तेव्हा ते इंजेक्शन लोड करून धावत पेशंट कडे गेले. त्यावेळी पेशंट बस मध्ये बसला होता आणि आता बस सुटणारच तेव्हड्यात त्याला बस मधून जबरदस्तीने उतरवून तिथेच इंजेक्शन दिले. डोक्यात फक्त येव्हडच होते की 'प्रकाश भाऊ म्हटले आहेत डोस पूर्ण गेलाच पाहिजे ” अशा या जगन काकांच्या गोष्टी - कधी डोळ्यात पाणी आणणाऱ्या तर दुसऱ्या क्षणीच चेहऱ्यावर अलगद हसू आणणाऱ्या.
सर्व काही सुरळीत चालू असतांना आणि आपल्या कामामध्ये मग्न असतांना जगन काकांना त्यांच्या उजव्या पायाला झालेली जखम दिसलीच नाही, कुष्ठरोगामुळे वेदनाही झाल्या नाही. नंतर लहानशा जखमेचे रूपांतर भयावह गॅंगरीनमधे झाले आणि जीव वाचवण्यासाठी पाय कापण्यावाचून दुसरा पर्यायच उरला नव्हता. २००९ साली बिरादरीतच शस्त्रक्रिया शिबिरामध्ये उजवा पाय एम्प्यूट केला गेला. पण जयपुर फूटने (कृत्रिम पाय) आता पर्यंत साथ दिली आणि कामसुद्धा अविरत चालू आहे.
जगन काकांचा मुलगा जगदीश आपल्या बाबांच्या पावलावर पाऊल ठेवत २००८ पासून लोक बिरादरी दवाखान्यात रुजू झाला आहे. त्यानेसुद्धा लोक बिरदरी रुग्णालयाच्या मदतीने ऑप्टोमेट्री मध्ये ट्रेनिंग घेतले आहे आणि आता हॉस्पिटलचे ऑपथैल्मोलॉजी यूनिट उत्तमपणे सांभाळतो. काम करण्याचा वारसा त्याला नक्कीच जगन काकांकडून मिळाला असेल असे म्हणण्यात काहीही गैर नाही.
काम करतेवेळी जगन काका नेहमीच रेडिओवरच्या बातम्या, जुनी गाणी ऐकत काम करतात. आता रेडिओ तर त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटकच बनला आहे. वयाच्या ८० व्या वर्षी सुद्धा ८ तास काम करणारे जगन काका म्हणतात “कोणतेही काम आपले समजून आवडीने करायचे.” खरच आपल्या सर्वांसाठी खूप मोठा संदेश आहे. लोक बिरादरी मधील अन्य सहकारी मित्र सुद्धा जगन काकांच्या कामाची आवर्जून तारीफ करतात.
जगनकाकांचं आयुष्य निश्चितच खडतर आहे पण त्यांचं काम तेवढेच प्रेरणादायी आहे. लोक बिरादरी दवाखान्याचे काम सुरळीत चालू ठेवण्यात इतर सहकाऱ्यांप्रमाणे जगन काकांचा मोठा वाटा आहे. आजच्या तरुणाईलाही विचार करायला भाग पडेल असे काकांचे अबोल…निरपेक्ष…अविरत कार्य…!! आणि म्हणूनच या ८० वर्षाच्या तरुण जगन काकांना आणि त्यांच्या अविरत कार्याला लोक बिरादरीचा सलाम…!!!
[जगन काकांचे नुकतेच २७ एप्रिल २०१९ ला निधन झाले.]
शब्दांकन:
डॉ. लोकेश व डॉ. सोनू,
सामुदायिक आरोग्य विभाग,
लोक बिरादरी प्रकल्प,
हेमलकसा.
Jagan Kaka na namaskar .
Jagan Kaka na namaskar . Atishay preranadayi karya.
प्रेरणादायी व्यक्तिमत्व.
प्रेरणादायी व्यक्तिमत्व. जगनकाकांच्या स्मृतिस सादर वंदन.
खरेच प्रेरणादायी.
खरेच प्रेरणादायी.
कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्या ह्या खऱ्या नायकांना प्रकाशात आणायचे काम करणाऱ्या ह्या मालिकेबद्दल मनापासून आभार.
अजून खूप काही चांगले वाचायच्या अपेक्षेत.
प्रेरणादायी व्यक्तिमत्व.
प्रेरणादायी व्यक्तिमत्व. जगनकाकांच्या स्मृतिस सादर वंदन. +१
खरेच प्रेरणादायी.
खरेच प्रेरणादायी.
कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्या ह्या खऱ्या नायकांना प्रकाशात आणायचे काम करणाऱ्या ह्या मालिकेबद्दल मनापासून आभार.
अजून खूप काही चांगले वाचायच्या अपेक्षेत. >>>+१
__/\__
__/\__
प्रेरणादायी व्यक्तिमत्व.
प्रेरणादायी व्यक्तिमत्व. जगनकाकांच्या स्मृतिस सादर वंदन. +१
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
खरेच प्रेरणादायी.
खरेच प्रेरणादायी.
कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्या ह्या खऱ्या नायकांना प्रकाशात आणायचे काम करणाऱ्या ह्या मालिकेबद्दल मनापासून आभार.
अजून खूप काही चांगले वाचायच्या अपेक्षेत. +१११
अरे कुठल्या जगातील माणसे आहेत
अरे कुठल्या जगातील माणसे आहेत ही सर्व!
बिरादरीतील सर्व माणसांना दंडवत.
खूपच प्रेरणादायी.
खूपच प्रेरणादायी.
कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्या ह्या खऱ्या नायकांना प्रकाशात आणायचे काम करणाऱ्या ह्या मालिकेबद्दल मनापासून आभार. +११
अशा माणसांना एकच संबोधन...
अशा माणसांना एकच संबोधन...
देवमाणूस...
सादर प्रणाम...
मुळातच यथा राजा तथा प्रजा या
मुळातच यथा राजा तथा प्रजा या न्यायाने उदात्त अंत:करणाच्या बाबा आमटे, प्रकाशभाऊ विकास भाऊ यांच्या सेवेसाठी समर्पित जीवनाने हे घडविले आहे. चोराजवळ चोरच जमतात व साधुभोवती सज्जनच गोळा होतात. मदर टेरेसांनी देखील समाजाने झिडकारलेल्या लोकांना आपलं मानलं. जगन काकांसारखी माणसे फक्त प्रेम व सेवा देण्यासाठी जगतात. दुसऱ्यांचे सुख हे त्यांच्यासाठी अन्नपाणी असते. सलाम अशा खऱ्या मानवांना.
आदर आहे _/\_
आदर आहे _/\_
> पुढे त्यांनी आपले शिक्षण सुरु ठेवले आणि १० वी ची परीक्षा उत्तीर्ण केली. > इथेदेखील १० वी ऐवजी मॅट्रिक शब्द वापरला तर योग्य राहील ना? <१९५५ साली कितवी म्हणजे मॅट्रिक होतं? किंवा ११ वी मॅट्रिक कधी बंद झालं?
प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे
प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे धन्यवाद.
आपल्या सर्वांच्या प्रतिसादांमुळॆ मला पण लिहण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
अतिशय सकारात्मक आणि मन
अतिशय सकारात्मक आणि मन समाधानी करणारं लेखन.
__/\__
__/\__
Preranadayi!
Lihit raha! Some reason to still visit maayboli!
@महाश्वेता: प्रेरणादायी
@महाश्वेता: प्रेरणादायी प्रतिसाद !! आभार...!
@ नानबा : धन्यवाद !! खूप छान वाटलं !
Even I am enjoying writing on these motivating people.
कुठलीही अपेक्षा न ठेवता काम
कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्या ह्या खऱ्या नायकांना प्रकाशात आणायचे काम करणाऱ्या ह्या मालिकेबद्दल मनापासून आभार.+१११११
@ निल्सन : धन्यवाद...!!
@ निल्सन : धन्यवाद...!!
छान लिहिलंय.. मुळात हे
छान लिहिलंय.. मुळात हे व्यक्तिमत्व महान आहे
कार्याला सलाम
@किल्ली: प्रेरणादायी प्रतिसाद
@किल्ली: प्रेरणादायी प्रतिसाद !! धन्यवाद...!