लाल परी...

Submitted by झुलेलाल on 3 June, 2019 - 13:56

दादरच्या रस्त्यावरून संध्याकाळनंतर मुंबईबाहेर जाणाऱ्या एसटीच्या लालपरी रातराण्या पाहिल्या की मला आजही, इतक्या वर्षांनंतरही गावाकडची आठवण येते, आणि मी उत्सुकतेने गाडीचा बोर्ड पाहू लागतो. कधीकधी तो वाचता येत नाही. मग गाडीच्या मागे नंबरखालची अक्षरे शोधतो, आणि देवरूख डेपोची गाडी दिसली की मनानेच गावाकडच्या आठवणींचा, भूतकाळाचा प्रवास सुरू होतो...
... आजही तसेच झाले. देवरूख डेपोची ‘मुंबई-देवळे मार्गे -पाली’ गाडी दिसली, आणि आठवणींचे सारे झरे जिवंत झाले.
या गाडीने मी पूर्वी मुंबईहून देवरूखला, देवरूखहून साखरप्याला, पालीहून देवळ्याला, अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर असंख्य वेळा प्रवास केला आहे. या गाडीचा जिव्हाळा वाटण्याचे ते एक कारण आहेच, पण माझ्या दृष्टीने या गाडीचे एका अविस्मरणीय इतिहासाशी नाते आहे. माझ्या आठवणींत ते नाते आजही ताजे आहेच, पण एका हरवलेल्या काळाची ती हळवी आठवणही आहे!
... आज ही गाडी दिसली, आणि मला खूप जुना, बहुधा १९६५-७० च्या काळातला तो प्रसग आठवला. मी तो पाहिलेला नाही. पण तो जसा ऐकला, तसाच्या तसा घडलेला असणार याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही.
**
मुंबई सेंट्रलवर या गाडीची वाट पाहात एक गृहस्थ उभे होते. खाकी शर्ट, खाकी हाफ पॅन्ट, किंचित वाढलेले दाढीचे खुंट डोक्यावरचे तुरळक बारीक केस आणि पाच फुटांहून कमी उंचीचे हे गृहस्थ फलाटावर बाकड्यावर बसले होते. गळ्यातल्या पट्ट्याच्या पिशवीत भरलेले कपडे एवढेच सोबतचे सामान!... गाड्या फलाटावर लागत होत्या आणि प्रवाशांची धावाधाव सुरू होती. हे गृहस्थ शांतपणे ते सारे मनात जणू टिपून घेण्यासाठी निरीक्षण करत बसले होते.
... अचानक कुणीतरी खुणेनंच त्यांना बोलावलं. एक उंची कपड्यातला, बूट घातलेला माणूस आपली बायको व मुलांसोबत उभा होता. बाजूला एक मोठी बॅग होती. त्या माणसाने खुणेनेच या गृहस्थास बोलावले, आणि हे शांतपणे उठून खांद्यावरची आपली पिशवी सावरत त्याच्यासमोर उभे राहिले.
‘ही बॅग गाडीवर टाक!’... त्याने हुकमी आवाजात या गृहस्थास फर्मावले.
क्षणभर नजर चमकली. चेहऱ्यावर एक मिश्किल हास्यरेषाही उमटली, आणि काहीच न बोलता या गृहस्थांनी वाकून ती बोजड बॅग डोक्यावर घेतली व बघता बघता बसगाडीची शिडी चढून बॅग गाडीच्या टपावर ठेवून ते खाली उतरले...
खांद्यावरच्या चतकोर रुमालाने चेहरा पुसत त्यांनी त्या पॅन्टबूटवाल्याकडे पाहिले. पुन्हा डोळ्यात तीच चमक, अन् चेहऱ्यावर तेच मिश्किल हास्य...
त्या पॅन्टबूटवाल्याने खिशात हात घातला, अन् रुपयाची नोट या गृहस्थासमोर धरली.
हमाली म्हणून!
हे गृहस्थ मंद हसले...
त्यांनी मानेनेच रुपया घेण्यास नकार दिला, आणि म्हणाले, ‘सुदैवाने मी आमदार असल्याने पुरेसे मानधन मला मिळते. मी तर तुम्हाला केवळ मदत केली आहे!’
पॅन्टबूटवाल्याचा खजिल चेहरा न पाहाताच ते बाजूला फलाटावर लागलेल्या मुंबई देवळे मार्गे पाली गाडीत चढले!
**
त्यांचे नाव होते, आमदार शशिशेखर काशिनाथ आठल्ये. तेव्हाच्या लांजा मतदार संघात त्यांना लहानथोर माणसे ‘आठल्ये गुरुजी’ म्हणूनच ओळखत. समाजवादी विचारांचे आठल्ये गुरुजी १९५७, ६२, व ६७ अशा तीन टर्ममध्ये आमदार होते. पण आयुष्याच्या अखेरीस, सन २०११ मध्ये, वयाच्या ९९ व्या वर्षी, अखेरचा श्वास घेतला तेव्हा उपचाराचे पैसे देण्यासाठी त्यांच्या कुटुंबास जमवाजमवच करावी लागली होती!!
... म्हणून या गाडीचे एका इतिहासाशी नाते आहे, असे मी मानतो!!

Group content visibility: 
Use group defaults

आठवण ऐकूनच भारावून गेल्यासारखं वाटलं...
शेवट ऐकून तर वाईट वाटलं.
कालाय तस्मै नमः

Thanks 4 sharing..
Such ppl need to be remembered , cherished , celebrated!

छोटीशी आठवण ठीक आहे. पण
> आमदार शशिशेखर काशिनाथ आठल्ये. तेव्हाच्या लांजा मतदार संघात त्यांना लहानथोर माणसे ‘आठल्ये गुरुजी’ म्हणूनच ओळखत. समाजवादी विचारांचे आठल्ये गुरुजी १९५७, ६२, व ६७ अशा तीन टर्ममध्ये आमदार होते. > आमदार असताना त्यांनी कायकाय चांगले काम केले. त्याआधी भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी काही योगदान केले होते का वगैरे अधिक वाचायला आवडेल.