पांडुरंगाच्या पोटातील पोट-भाडेकरू !

Submitted by SureshShinde on 3 June, 2019 - 10:24

“डॉक्टरसाहब, नमष्कार ! मैं निर्मला बोल रही हूँ. हमारे महाराज, पांडेजी अचानकसे बहुतही बिमार हो गये है.”
राठी म्हणजे एक उद्यमशील आणि सुसंस्कारित कुटुंब ! गेले अनेक वर्षांच्या व्यावसायिक संबंधातून निर्मलाभाभींनी मला नकळतच ‘बडे भाईसाहब’ बनवले होते. ‘महाराज’ म्हणजे घरातील स्वैपाकी पण त्यालादेखील सर्वजण आदराने ‘पांडेजी’ म्हणत असत. मी मात्र त्यांना ’पांडुरंग’ म्हणत असे.
“क्या हुवा है ?” मी
“अचानकसे पेटमे बहुतही दर्द हो रहा है. उनसे सहा नही जा रहा है. क्या करें कुछ समझ नही रहा है”
“भाभीजी, आप चिंता ना करें. मेरी ओपीडी खतम होही रही है. घर जाते जाते आपके घर होते जाऊंगा” मी.

घराचा दरवाजा उघडताच सुनबाई व नातवांनी नेहेमीप्रमाणेच पूर्ण वाकून अभिवादन केले. आत पांडेजी कोचावर झोपले होते, पोटदुखीने तळमळत होते. चाळीशीच्या आसपास असलेले पांडेजी तब्ब्येतीनी सुदृढ होते. मी तपासणीला सुरुवात केली. अंगात ताप नसला तरी तीव्र वेदनांमुळे त्यांच्या नाडीचे ठोके जलद पडत होते. बीपी ठीक होते. पोटाला हळुवार स्पर्श केल्यावर पोट मऊ लागत होते. जर आतील अवयवांना गंभीर असा आजार उद्भवला असेल तर पोट एकदम घट्ट होत असते. तसे दिसत नव्हते. पोटातील आजाराचे निदान करण्यासाठी एक वैद्यकीय पद्धत असते. दोन उभ्या आणि दोन आडव्या अश्या काल्पनिक समांतर रेषांनी पोटाचे नऊ भाग केले जातात. त्यातील जो चौकोन दाबल्यानंतर दुखत असेल त्यावरून पोटातील नेमका कोणता अवयव दुखावला असेल याची कल्पना येते. पांडुरंगाच्या पोटाच्यावरील भागातील उजवा आणि मधला भाग दाबला असताना त्याला वेदना जाणवत होत्या. म्हणजेच लिव्हर, पित्ताशय, जठर अथवा स्वादुपिंड यांचा आजार संभवत होता. पोटाला स्टेथोस्कोप लावून आतील आतड्यांच्या हालचालींचा कानोसा घेतला असता हालचाल व्यवस्थित चालू असल्याचे ऐकू आले. डोळ्यात पिवळेपणा म्हणजेच कावीळ नव्हती. पित्त म्हणजे ऍसिडिटीची हिस्टरी नव्हती. चुकूनही दारू पित नसल्याची ग्वाही देत होता. म्हणजेच आत्ता पुढील तपासणीशिवाय निदान होणार नव्हते.
भाभीजी आणि सुदर्शनजींना बाजूला नेवून त्यांना परिस्थितीची कल्पना देत मी म्हणालो,“यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागणार आहे. पोटामध्ये गंभीर प्रॉब्लेम दिसतोय. तेथे प्रथम यांना उभे करून पोटाचा एक्स-रे काढू. जर पोटातील आतड्यांना व्रण (Ulcer) होऊन छिद्र पडले असेल तर सुप्त उदर पोकळीमध्ये हवा भरल्याचे दिसेल व तसे असेल तर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल. तसे नसल्यास अल्ट्रा-साऊंड (USG ) सोनोग्राफी टेस्ट करू. सोनोग्राफी म्हणजे जणू आपला तिसरा डोळाच असतो. त्यातून खूपच महत्वाची माहिती मिळेल. रक्ताच्या काही चाचण्यादेखील करू ज्यामुळे लिव्हर, स्वादुपिंड याच्या आजाराची कल्पना येईल.
त्यांची परवानगी घेऊन मी हॉस्पिटल डॉक्टरांशी संपर्क साधला व ऑन ड्युटी डॉक्टरांना सूचना दिल्या. पोटातील वेदना थांबण्यासाठी वेदनाशामक इंजेक्शन, जंतूंचा अपेक्षित संसर्ग टाळण्यासाठी अँटीबायॉटिक व सलाईन सुरु करण्यास सांगितले व पांडुरंगास धीर देऊन मी घरी जाण्यास निघालो.

दुसऱ्या दिवशी पहाटेच फोन वाजला, “सर, मी आयसीयू मधून डॉक्टर मनीष बोलतोय. आपले जे पेशंट रात्री ऍडमिट झाले आहेत त्यांची तब्ब्येत आता बरी आहे. पोट दुखणे कमी आहे. पोटाच्या एक्सरेमध्ये ‘गॅस अंडर डायफ्रॅम‘ दिसत नसल्या मुळे सोनोग्राफी केली आहे. त्यात पित्ताला अडथळा आल्यामुळे पित्तनलिका, पित्ताशय, लिव्हर आणि स्वादुपिंड यांना सूज आल्यामुळे बिलीरुबीन, अमायलेज व लायपेज लेव्हल्स वाढलेल्या दिसताहेत. दोन तासानंतर MRCP ची अपॉइंटमेंट आहे.”

C74AACEB-50A4-498F-9EEB-BE52A242F19A.png
“पित्तनलिकांची शरीर रचना स्पष्ट करणारे चित्र “

आपल्या लिव्हर म्हणजेच यकृतामधून सतत पित्तरस म्हणजेच ’बाईल’ स्त्रवत असतो. या रसाचे काम म्हणजे आपण खाल्लेल्या चरबीयुक्त स्निग्ध पदार्थांचे पचन करणे हे असते. जेवणाची वेळ येईपर्यंत हा रस एका पिशवीमध्ये म्हणजेच पित्ताशयामध्ये साठवला जातो. आपण जेवल्यानंतर या पिशवीचे स्पंदन सुरु होते व हा साठवलेला रस एका नलिकेद्वारे आतड्यामध्ये सोडला जाऊन अन्नामध्ये मिसळतो. या नलिकेच्या वाटेमध्येच स्वादुपिंडाच्या रसाची नलिका जोडलेली असते त्यामुळे स्वादुपिंडाचे पाचक रसदेखील याच नलिकेद्वारे आतड्यांमध्ये अन्नात मिसळला जातो. ह्या दोन्ही रसांची मिश्रनलिका जेथे आतड्यामध्ये उघडते त्या जागेला अँपुल्ला असे नाव आहे. या अँपुल्लामध्ये अडथळा आल्यास स्वादुपिंड आणि यकृत यांचे स्त्राव तुंबून या अवयवांना सूज येते. दुखू लागते, जंतुसंसर्ग होतो व जीवाला धोका निर्माण होतो. पित्ताशय अथवा स्वादुपिंडामध्ये खडे तयार होऊन त्यातील एखादा खडा नलिकेवाटे पुढे सरकून अँपुल्लामध्ये अडकतो व मेडिकल इमर्जन्सी निर्माण करतो. असे होण्याची अनेक करणे संभवतात. नेमके निदान होण्यासाठी या संपूर्ण पित्तनलिकामार्गाचा अभ्यास करणे आवश्यक असते. हे कठीण काम नवीन MRCP या तंत्राने अगदी सोपे झाले आहे. पित्तनलिकेचा MRI फोटो काढल्यामुळे हा अडथळा नेमका कोठे आहे त्याचे स्पष्ट चित्र दिसू शकते.

आपल्या पेशंटचा एमआरसीपीचा रिपोर्ट सांगत होता कि पांडुरंगाचा अँपुल्ला बंद झाला आहे पण कशामुळे ते कारण दिसत नव्हते पण छोटासा खडा असण्याची शक्यता दिसत होती.
हा अडथळा तातडीने दूर करणे आवश्यक होते. उशीर झाल्यास स्वादुपिंडाची सूज वाढून त्यातील रस बाहेर येऊन पोटातील चरबीचे पचन करून प्राणघातक परिस्थिती तयार करू शकतो. पित्ताशयाचे पिशवी आणि पित्तनलिका यांना सूज येऊन संसर्ग झाल्यानेही अशीच स्थिती उद्भवते. पूर्वी अशा तपासण्या उपलब्ध नसल्यामुळे लवकर निदान होत नव्हते व झालेच तर पोट उघडून केली जाणारी शस्त्रक्रिया क्लिष्ट व कठीण असे. आत्ता ERCP नावाचे तंत्र उपलब्ध आहे. त्यात आपल्या करंगळी एवढ्या जाडीची लवचिक दुर्बीण पेशंटच्या तोंडातून अन्ननलिका व जठराद्वारे आतड्यामध्ये सरकवली जाते. या दुर्बिणीमध्ये सोनोग्राफी सेन्सॉर व शत्रक्रियेला आवश्यक अशी अनेक सूक्ष्म हत्यारे असतात. या दुर्बिणीद्वारे अँपुल्ला दिसू शकतो व त्यातील खडा काढता येतो. जर कॅन्सरमुळे अडथळा आला असेल तर त्याचा तुकडा काढून तेथे एक स्प्रिंग म्हणजे स्टेण्ट बसवून पित्तप्रवाह पुन्हा चालू करता येतो.

“मनीष, या पेशंटची ERCP करणे आवश्यक आहे. ताबडतोब डॉक्टर नचिकेत यांना सांगून सकाळीच प्लॅन करण्यास सांगा.”
मी राठींना सर्व कल्पना दिली. ईआरसीपी खर्चिक टेस्ट होती पण राठी कुटुंब शहरात दानशूर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी सर्व खर्चाला लागलीच होकार दिला.
माझा सकाळचा राऊंड चालू असतानाच डॉक्टर नचिकेत यांचा फोन आला,“सर, आपल्या पेशंटची ईआरसीपी केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अँपुल्लामध्ये स्टोन नव्हता.”
“अरेच्चा, अडथळा तर दिसत होता, मग असे कसे?“ मी.
“खरी गम्मत तर पुढेच आहे. मी स्कोप जठरामधुन पुढे सरकवला आणि पाहतो तर काय, एक अस्कारीस राऊंड वर्म अँपुल्ला मध्ये डोके अडकवून लटकला होता. तो जंत स्टिलेटच्या सहाय्याने पकडून ओढून काढताच भरभर पित्तस्राव सुरु झाला. फारच नयनरम्य चित्र होते ते ! मला तर ट्रॉपिकल मेडिसिनच्या टेक्स्ट बुक मधील चित्राचीच आठवण झाली. बट धिस पेशंट इज गोइंग टू बी ऑलराइट इमीजिएटली !” डॉक्टर नचिकेत यांच्या आवाज वैद्यकीय शास्त्रातील प्रगतीमुळे आपण या रुग्णाला किती उपयोगी पडू शकलो याची जाणीव झाल्यामुळे अतिउन्मादीत झाला होता. मित्रहो, कालिदासांचे शाकुंतल वाचल्यानंतर गटे यांच्या मनाची झालेली अवस्था यापेक्षा वेगळी असेल काय ?

B9EA72D5-D6E8-4C2B-9741-0B25EA1503A2.jpeg
“राऊंड वर्मचे चित्र”

D742CFA2-E236-417A-8D4B-45DFB0818BB1.jpeg
“राऊंड वर्मचे चित्र”

C366E599-6E21-47A1-84FD-B535AC1D123E.png

“राऊंड वर्मचे लाईफ सायकल”

मानवी शरीरात अनेक प्रकारचे जंत शिरून वास्तव्य करून आजार निर्माण करू शकतात. राऊंड वर्म ह्या नावाने परिचित असलेल्या जंताचे शास्त्रीय परिभाषेतील नाव आहे ‘आसक्यारीस लुम्बरीकोईड्स’! हा जंत मानवाच्या पोटात वास्तव्य करतो व प्रजनन करतो. जगातील सुमारे पंधरा टक्के व्यक्तींना याने ग्रासलेले आहे व विषुववृत्तीय भागामध्ये, गरीब देशांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. साहजिकच आपल्या देशात हे जंत घरोघरी आढळतात. नर व मादी जंत पोटात राहून रोज अब्जावधी अंडी शौचावाटे बाहेर सोडतात. हि अंडी जमिनीमध्ये उबतात आणि भाजीपाला, धूळ इत्यादीमार्गे मानवापर्यंत पसरतात. आरोग्याच्या सवयीचा अभाव असल्यास अंडी पोटात जाऊन उबतात. लिव्हर,फुफ्फुस, श्वासनलिका, अन्ननलिका असा प्रवास करीत ते शेवटी आतड्यात मुक्काम करतात. ३ mm रुंद व १४ इंचापर्यंत लांब असे अनेक जंत पोटात सुमारे दहा वर्षांपर्यंत मुक्काम करतात. त्याची संख्या कधीकधी इतकी वाढते कि आतड्यांमध्ये अन्नाच्या प्रवाहाला अडथळा करतात आणि पोट फुगल्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करावी लागते.

267977A5-535B-4536-9A9F-99F8018A0982.jpeg
“राऊंड वर्ममुळे आतड्यांना झालेला अडथळा : शस्त्रक्रियेच्या वेळीचे चित्र.”

हे जंत फुफ्फुसातून जात असताना तीव्र ऍलर्जी तयार करतात. काही विशिष्ठ औषधामुळे हे जंत शौचावटे शरीरातून बाहेर काढता येतात. albendazole हे औषध नेहेमीच वापरले जाते. हे औषध स्वस्त आणि परिणामकारक आहे.
अर्थात आजार होऊच नये याची काळजी घेणे हे जास्त महत्वाचे आहे. आरोग्यवर्धक सवयी म्हणजे जणू आपली कवच कुंडलेच असतात. आपल्या पूर्वजांना अनुभवामुळे हे ज्ञान असावे असे दिसते, म्हणूनच ’वदनी कवळ घेता ..... अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म !’ अशी प्रार्थना शिकवली जाते. स्वच्छता आणि आरोग्यशुचिता यांचे महत्व सर्वांनी जाणले तर निरामय आरोग्य प्रत्यक्षात येणे कठीण नाही.
शुभम् भवतु !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमी प्रमाणेच रोचक लेख
तुमच्या सर्व लेख असलेल्या पुस्तकाची वाट पाहत आहे.
आलं का यायचं आहे?

खुप छान माहीती.

तुमच्या सर्व लेख असलेल्या पुस्तकाची वाट पाहत आहे.
आलं का यायचं आहे?
>>>> १ पुस्तक प्रकाशीत झालयं. त्यावेळी डॉक्टरांनी काही प्रति माबोकरांना भेटही दिल्या होत्या.

पुस्तकाबद्दल माहीती खालील लिंकवर मिळेल. Happy

https://www.maayboli.com/node/58169

खूप उपयुक्त माहिती..धन्यवाद डॉक्टर.. हा जंत पोटात झाल्याची काय लक्षणं असतात...लहान मूलाना जंत झाले म्हणतात तो प्रमुख्याने हाच का?

बापरे !! डॉक्टर , शंकांना वेगळीच दिशा मिळाली की. साधारणपणे पोट दुखले की माणुस अपचन, गॅसेस, अपेंडीक्स अशा गोष्टींचा विचार करतो. पण हे भयानक आहे. पण वैद्यक शास्त्राला जी आधुनीक दूरदृष्टी मिळालीय ना त्याला खरच दंडवत. या नवीन माहितीबद्दल अनेक धन्यवाद.

डॉक्टरसाहेब, खूप छान माहितीपूर्ण लेख. मनःपूर्वक धन्यवाद!
albendazole निरोगी व्यक्तीने कसे घ्यावे ?? दरमहा का सहा महिन्यांनी एकदा का दरवर्षी एकदा ? कृृृृपया, मार्गदर्शन करावे.

छान लेख. पण त्या पेशंटला हा जंतुसंसर्ग झाला कश्यापासून ? कारण हे मारवाडी घरातले शेफ एकदम स्वच्छ असतात व घर प्युअर व्हेजिटेरिअन असते. हा जंतु संसर्ग कसा टाळावा? काय काळजी घ्यावी?

नेहमीप्रमाणे सुंदर लेख व माहिती.
सर्वसाधारण पणे प्रत्येक जंताची लाईफसायकल ही अशी १० वर्षे असते का ????

डॉक्टरांनी एकदा सांगितले होते जतांची औषधे दोन टप्प्यात घ्यावी. एकदा घेतले की जिवंत जंत मरतात पण त्यांनी आधीच घातलेली अंडी मरत नाहीत. साधारणपणे पंधरा दिवसांत सर्वच अंड्यांतून जंतांची पिल्ले बाहेर येऊन ती पुन्हा अंडी घालू शकतात. म्हणून पंधरा दिवसांनी पुन्हा औषध घ्यावे. म्हणजे नवे प्रजननशील जंतही मरतात. अंडीही राहात नाहीत. तीन दिवसांचा एक कोर्सही एका डॉक्टरांनी दिला होता. मला वाटते मेबेंडेझॉल किंवा मेबेक्स असावे.
ही फार जुनी गोष्ट आहे. तेव्हा वॉटर फिल्टर्स नव्हते आणि पाणी उकळूनच प्यावे लागे.
आता कदाचित उपायांची पद्धत आणि औषधे बदललेली असू शकतात.

हो पुस्तक वाली पोस्ट वाचली होती मागेच.घेते आता

जंत खूप गोड खाणे, भाज्या धुवून न खाणे, वाढलेल्या नखात माती आणि त्यातून अंडी पोटात जाणे अश्या बर्याच कारणाने होतात.काही जणांना पायका म्हणजे माती किंवा न खाणेबल गोष्टी खायचा आजार व्हिटामिन कमी मुळे असतो.यात मातीत अंडी असतात ती पोटात जातात.
हात जेवणापूर्वी स्वच्छ धुणे, भाज्या धुवून शिजवून खाणे,नको त्या ठिकाणी न खाजवणे असे काही उपाय लहानपणी पुस्तकात वाचले होते.

उपयुक्त माहिती. पण मला चित्रे पाहून किळस वाटली. मानव कितीही प्रगत असला तरी तो भक्ष्य, भक्षक व शोषक यांच्या अन्नसाखळीतील एक दुवा आहे हे सत्य आहे. आपल्या देशात फीचे पैसे वाचवण्यासाठी डॉक्टर लोकांचा सल्ला घेणे टाळले जाते व थातुरमातुर उपाय केले जातात. अतिअल्प उत्पन्न असलेल्या लोकांना साबण ही चैनीची गोष्ट वाटते.
अवांतर -- सुक्ष्मजीवांचा शोध लावणारे लुई पाश्चर हे स्वत: इतकी काळजी घेत की केळंसुध्दा गरम पाण्यात बुडवून खात. सुक्ष्मजीवांपासून जीवघेणा आजार होईल अशी सतत शंका घेत व या विचारांनी लवकर मृत्यू पावले असे वाचले आहे.

बापरे स्तंभित करणारा लेख! तुमची लेखनशैली विशेष आवडली Happy

Ascaris मस्त दिसतोय.. काॅलेजात प्रिजर्व केलेला कायतरीच काळवंडलेला आहे.

हे सगळं माहीत असून पण गोष्ट स्वरूपात लेख असल्याने वाचताना खूप रंजक वाटले.
शालेय जीवनात अश्या प्रकारे समजावले तर खरंच वैज्ञानिक आणि शास्त्रीय ज्ञान देण्याचा उद्देश साध्य होईल.

अशी वैज्ञानिक माहिती सांगून नंतर जे सुविचार, संस्कृत वचने देता दे खूप relavant असतात. त्याबद्दल मनापासून दाद आणि धन्यवाद.