ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना २२

Submitted by स्वप्ना_राज on 3 June, 2019 - 09:15


एक सवाल मै करू, एक सवाल तुम करो
हर सवालका सवालही जवाब हो

१९६१ सालच्या ‘ससुराल’ ह्या चित्रपटातल्या एका गाण्याच्या ह्या ओळी. आजकाल त्याची वारंवार आठवण व्हायचं कारण म्हणजे आयुष्य – ज्याला तुम्ही आम्ही नेहमीच्या भाषेत ‘जगणं’ असं म्हणतो. तर मी आणि माझं जगणं ह्यांच्यात हा सवाल-जवाबाचा कलगीतुरा आजकाल भलताच रंगात आलाय. फरक एव्हढाच की आयुष्याने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर असावं अशी त्याची अपेक्षा आहे. मी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला मात्र उत्तर म्हणून त्याच्याकडून एक नवा प्रश्न समोर ठेवला जातो.

ह्या प्रश्नांची मोठी गंमत असते नाही? एकीकडे काहीही प्रश्न पडू नयेत, आयुष्य धोपटमार्गाने चालू राहावं अशी आपली इच्छा असते. आणि दुसरीकडे असे प्रश्न पडलेच नाहीत तर कुठेतरी काहीतरी बिघडलंय अशीही भीती वाटते. दुसरयांना ते पडताहेत की नाही हे माहित करून घ्यायची सोय नसते. बरं त्यांना ते पडले तरी ते आपल्याला पडलेलेच असतील असंही नसणार. प्रश्न पडताहेत म्हणून कोणाकडे तक्रार करता येत नाही आणि पडत नाहीयेत म्हणूनही नाही. थोडक्यात काय तर ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ ठरलेला.

प्रश्नाचं हे असं तर उत्तरांची दुसरी तऱ्हा. आपण आटापिटा करून उत्तर मिळवतोही कधीकधी. कलियुगात देवाजीकडे थोडीफार दया शिल्लक आहे अजून. पण ह्या उत्तराने समाधान होईलच असं नाही. उत्तराच्या पोटात दुसरा प्रश्न दडलेला असल्याची शक्यताच अधिक. त्यातून एकदा का हे प्रश्न समोर आले की त्यांच्यापासून सुटका करून घेणं बाटलीतून बाहेर काढलेला राक्षस परत आत घालण्याइतकं कठीण.

मला आजकाल काय वाटतं माहित आहे का? ह्या अश्या प्रश्नांना ठराविक उत्तरं नसतातच मुळी. ती व्यक्तीसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष (आणि आणखी बरंच काही सापेक्ष!) असतात. अहो, म्हणून तर आपण सगळे पृथ्वीवर येताना जगण्याचं एक अधुरं User Manual सोबत घेऊन आलोय. त्यात प्रश्न तर आहेत पण उत्तरंच नाहीत. प्रश्नसुध्दा अदृश्य आहेत बरं का. दिसले तर दिसले. दिसले तर शोधत बसा उत्तरं. मिळाली तर करा तशी नोंद तुमच्या User Manual मध्ये. मृत्यूनंतर असलाच तो चित्रगुप्त वरती बसलेला तर तपाशील त्यातला मजकूर. नाही दिसले प्रश्न तर दाखवा कोरी पाटी. असलंच ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं’ तर करा खेळ नव्याने सुरु. नसलं तर सगळे प्रश्नच मिटले. उत्तरं शोधायलाच नकोत.

मग काय आहे माझ्या User Manual मध्ये? कोरं आहे हो बरंच. कदाचित शेवटपर्यंत कोरंच राहील. प्रश्न पडत नाहीयेत असं नाही. पण पूर्वीसारखा उत्तरं शोधायचा उत्साह नाही राहिला आता.
------

‘काल दिसला नाहीत कविताताई. येऊन गेले मी.’

'थोडं काम होतं घरी ताई. मग नाही येता येत. काय देऊ?’ ती मला ताई म्हणते आणि मी तिला. गंमतच आहे ही पण.

‘मेथी आहे का? मागच्या आठवड्यात आणते म्हणाला होतात’

‘संपली हो’ हे सांगताना तिचा चेहेरा पडला. जणू काय आज मी उशिरा आले ही तिचीच चूक होती.

‘माझ्या वाटणीची भाजी दुसऱ्यांना देऊन टाकता हं तुम्ही आजकाल’ मी मस्करीच्या सुरात बोलले.

झालं होतं हे की मागच्या महिन्यापासून तिने दुसऱ्या जागेवर बसायला सुरुवात केली होती. ती आधी बसायची तिथे मागे पोलिसांची छोटी चौकी होती. तिथे बसणारा पोलीस बदलला की नवा आलेला पोलीस हिला १-२ दिवस तिथे बसूच द्यायचा नाही. मग बिचारीला भाजीच्या मोठ्या पिशव्या घेऊन वाहत्या रस्त्यावरच्या गाड्यांतून मार्ग काढत दुसर्‍या बाजूच्या फुटपाथवर बसायला लागायचं. हे पोलीस फुकटात भाजी घ्यायचे ते वेगळंच. भ्रष्टाचार आपल्या हाडीमासी भिनलाय हेच खरं. कोणी किती घोषणा दिल्या तरी तो काही हटायचा नाही. असो. दोन-चार वेळा असं झालं. शेवटी एकदा एका पोलिसाने बराच तमाशा केला म्हणे. कंटाळून हिने जागा बदलली.

‘पण काही म्हणा. इथे तुमचा धंदा जास्त चालतो. कधी गर्दी नाही असं पाहिलेलं नाही. गर्दी नसेल तर मला कळतं की आज कविताताई आलेल्या नाहीत’ मी हसत म्हटलं.

‘धंदा चांगला चालतो ताई. पण इथे गिर्‍हाईक चांगलं नाही भेटत. शिव्या देतात काही बायका. भाव पाडून मागतात. कधीकधी जास्तीची भाजी उचलून घेऊन जातात.’ हे सांगताना चेहेर्‍यावर आठी नाही. एकही. वर ‘मुळा नेता? कवळा आहे’ हे त्याच दमात.

मी त्या दिवशी तिच्याकडे काय भाजी घेतली हे मला प्रयत्न करूनही आता आठवणार नाही. पण तिने माझ्या डोक्यात काय विचारचक्र सुरु करून दिलं ते पक्कं ध्यानात आहे. ही घरातून निघते तेव्हा आज भाजी विकायला बसायला मिळेल का, कुठे मिळेल, किती दिवस मिळेल, काय कमाई होईल ह्या कश्याचीही खात्री नसते तिला. तरी ती न चुकता येते. एक रविवार सोडून. प्रत्येक गिर्‍हाईकाशी हसून बोलते. ते हसू निदान मला तरी उसनं वाटत नाही.

आणि आपण? आपलं ऑफिस आज जिथे होतं तिथेच उद्या असणार असतं. आतली आपली जागा आपल्याला माहित असते. ऑफिस एसी असतं. तिथून आपल्याला हाकलायला, तमाशा करायला, आपल्या पगारातला हप्ता खायला पोलीस येणार नसतो. दर महिन्याला किती पगार जमा होणार आहे हे आपल्याला जवळपास ठाऊक असतं. तरी कुरकुर करायला आपल्याला कारणं असतात – अमका कलीग कटकटा आहे, तमक्याने तसं केलं, बॉस असं म्हणाला आणि क्लायंट तसं म्हणाला. आपल्या कपाळावरचं आठ्यांचं जाळं अक्षय असतं. दिवसागणिक मोठं होतं असतं. आलंच हसू ओठांवर तर उसनं असतं. मग ते घरच्यांसमोर असो नाही तर दारच्यांसमोर.

‘आयुष्य हे असंच असणार आहे. झगडूनच जगावं लागणार आहे.’ हे कविताताईचं तत्त्वज्ञान आहे की नाही मला माहित नाही. पण तसं काही असल्याखेरीज तिला ही रोजची कसरत कशी जमते ते काही मला कळत नाही.

‘आयुष्य असं का आहे? हे सगळं माझ्याबाबतीतच का होतं? मी काय कोणाचं घोडं मारलंय? आजकाल भल्याची दुनिया नाही.’ हे मात्र तुम्हांआम्हां सर्वांचं तत्त्वज्ञान आहे हे नक्की. मी कोणाला त्रास देत नाही तर मला शांतपणे का जगता येऊ नये? दोन श्वासांतलं अंतर कायम राखण्यासाठी एव्हढी दमछाक का करायला लागावी? जे आयुष्य मी कधी मागितलंच नाही ते जगताना एव्हढी कटकट का व्हावी? हे रोकडे सवाल आपल्या जागी योग्यच आहेत. पण ते जगण्याची कसरत अवघड करून ठेवतात ना.

आयुष्य आहे तसं स्वीकारलं तर प्रगती होणार कशी? पण ते हवं तसं नाही म्हणून कुरकुरत राहिलं तर जगायचं कसं? जे आहे ते स्वीकारून ते अधिक चांगलं कसं करता येईल ह्यासाठी प्रयत्न करायचे तर भगीरथाच्या कुळात जन्माला यायला नको का? सुवर्णमध्य कधी गाठता येतो? का गाठता येत नाही म्हणूनच तो मध्यावर असतो?
---

‘....आणि शिवम अगरबत्ती द्या तीन’

‘अगरबत्ती नाहीयेत’

‘सोमवारपर्यंत आणून ठेवता का? मी घेऊन जाईन’

‘आता नवा माल नाही आणणार. ह्या महिन्याच्या शेवटी दुकान बंद करतोय’

‘ओह.....मग मुंबई पण सोडताय का?’

‘नाही, रहाणार मुंबईतच. फक्त दुकान बंद करतोय’

पैसे चुकते करून मी सामान उचललं.

नेचर्स बास्केट, रिलायंस स्मार्ट, बिग बझार जिथेतिथे दिसायला लागली, बिग बास्केटने घरबसल्या सामान आणून द्यायची सोय केली तेव्हा नाक्यानाक्यांवर दिसणाऱ्या ह्या वाण्याच्या दुकानांचं काय होणार हा सार्वत्रिक सूर होता. पण काहीतरी जुगाड करून ती टिकतील असंही वाटत होतं. काही दुकानं लगेच बंद पडली. काहींनी बरीच वर्षं तग धरला. आमचा वाणी दुसरया गटातला. आता तिथे पूर्वीसारखं सामान घेत नसलो तरी एखाद-दुसरी वस्तू लागली तर सुपरमार्केटमध्ये जायच्या ऐवजी पाय त्याच्या दुकानाकडेच वळायचे. आताशा तिथे पूर्वीसारखी वर्दळ नाही हे जाणवायचं. कधी नव्हे ते मालकाच्या कपाळावर आठ्यांचं जाळं दिसायचं. इंग्रजीमध्ये म्हणतात तसं it was not a matter of ‘if’ but ‘when’.

ह्याच्याआधी ह्याचे वडील दुकानात बसायचे. दुकानाच्या मागेच त्यांचं घर होतं. दुपारच्या वेळेस ह्याची आई असायची गल्ल्यावर. आधी तेव्हा लग्न न झालेल्या ह्याच्या बहिणीही दिसायच्या असं आई सांगते. वडील थकल्यावर दुकानाची जबाबदारी ह्याने घेतली. आईने चण्याची डाळ घेतली की एक संवाद हमखास ठरलेला असायचा. तो हसून विचारायचा ‘काय पुरणपोळी करणार काय?’ मग आई म्हणायची ‘चण्याची डाळ काय पुरणपोळीसाठीच वापरतात का?’. कधीमधी आई एखादी गोष्ट विसरायची. मग हा आठवण करून द्यायचा ‘तिखट हवंय? जिरं आहे का? चिंच?’ आईने सुकं खोबरं घेतलं की लसणाची चटणी करणार हे लक्षात ठेवून विचारायचा ‘डाळया देऊ?’. कॉलेजमधून किंवा ऑफिसातून येताना आई काही सामान सांगायची. मी म्हणायची ‘लसूण द्या’. तो विचारायचा ‘किती देऊ?’. ह्यावर माझा प्रश्न ‘आई किती नेते?’. उत्तरादाखल पुडी बांधून मिळायची. किती ग्रॅम असायची ते कधीच कळलं नाही.

आईला दुकान बंद होतंय म्हणून सांगितलं. ‘अगबाई, आता गूळ कुठून आणायचा? कसला केशरी गूळ मिळायचा त्याच्याकडे’. मग तिने चांगला दोन किलो गूळ आणून ठेवला. त्या दुकानातला बहुतेक तो शेवटचा उरलेला गूळ असावा.

महिनाअखेर येईपर्यंत कधी त्या दुकानासमोरून जायची वेळ आली तर तिथे बघायला नको वाटायचं. आतले शेल्फ्स कधीच एव्हढे ओकेबोके पाहिले नव्हते - एका शेल्फवर लक्सच्या दोन वड्या, कुठल्या शेल्फवर कोलगेटची एक पेस्ट, आणि कुठेतरी एखादी वाटिकाची बाटली.
दुकान बंद व्हायच्या आत एकदा त्याला भेटून ये म्हटलं होतं मी आईला. ती जाणारही होती पण नाही जमलं. महिना संपायच्या आधी आम्ही चार दिवस बाहेर गेलो. परत आलो तेव्हा दुकान बंद झालं होतं.

कधी विचार केला तर वाटतं ह्या सुपरमार्केटसमध्ये किती सुविधा आहेत. सामानाची किती व्हरायटी असते. चहात बुडवून खायचं साधं बिस्कीट पण एक अख्खी भिंत अडवून अनेक ब्रँडस बसलेले असतात. एमआरपी वर सूट मिळते. एकावर एक फ्री सारख्या अनेक सवलती असतात. १०००-१५०० च्या वर बिल झालं तर घरपोच सामान आणून देतात. क्रेडीट कार्डने बिल भरता येतं.

पण मग फोनवर सेव्ह केलेल्या यादीत लिहिलं नाही म्हणून तिखट घ्यायचं राहून गेलं तर मात्र कोणी आठवण करून देत नाही म्हणून का खंत वाटत राहते?
-----

‘कश्या चालतात ह्या बायका. काय एव्हढं फोनवर बघतात काय माहित’. मी करवादले.

फुटपाथवरून चालणं ही तारेवरच्या कसरतीपेक्षाही कठीण गोष्ट झालेय आजकाल. एक तर फुटपाथ नसतो. असलाच तर त्याच्या फरश्या उखडलेल्या असतात किंवा एखादी ऐसपैस गटारगंगा त्याला ओलांडून गेलेली असते. ह्या दोहोंच्या कचाट्यातून सुटलेला असला तर त्यावर फेरीवाले किंवा भिकारी ह्या दोघांपैकी कोणीतरी (किंवा दोघांनी!) आपलं साम्राज्य प्रस्थापित केलेलं असतं. उरलेल्या चोरवाटेतून आपण अंग चोरून कसबसं जायचं. मग त्यात समोरून बैलासारखे मुसंडी मारून येणारे महाभाग, ‘मोस्ट स्लोली मुव्हिंग’ एव्हढ्याच शब्दात वर्णन करता येईल असा नानाविध प्रकारचा पादचारीवर्ग आणि हे मोबाईलवाले आधुनिक धृतराष्ट्र आपलं बीपी वाढवायला टपलेले असतात. आत्ताची मुंबई पाहिली असती तर ‘एकला चालो रे’ हे शब्द रविंद्रनाथांनी मुकाट्याने खोडले असते.

चडफडत मी पुढे निघणार एव्हढ्यात माझं समोर लक्ष गेलं. डावीकडेच काही अंतरावर एक सोसायटी असल्याने फुटपाथ संपत होता. सोसायटीच्या गाड्यांना बाहेर पडायला ठेवलेली जागा संपते तिथून पुन्हा सुरु होत होता. त्या मधल्या जागेत उभ्या राहून एक सिनियर सिटीझन बाई फुटपाथवर चढायचा निष्फळ प्रयत्न करत होत्या. मी त्यांना ओळखलं. आमच्या सोसायटीतल्या एका घरात त्या मुलगा आणि सुनेसोबत राहतात. आठवड्यातल्या काही संध्याकाळी हनुमान मंदिरात जातात. मघाशीच मी मंदिरात बेसूर आवाजात गाऊन बिचाऱ्या वायुपुत्र मारुतीरायाला वात आणणाऱ्या बाया पाहिल्या होत्या. ह्या बहुतेक तिथेच चालल्या असाव्यात. मी उरलेलं अंतर पार करून त्यांच्यासमोर हात पुढे केला. त्यांनी वर पाहिलं. मला बघतच हसल्या.

‘तू आहेस होय. नेहमी ह्या सोसायटीचा वॉचमन मदत करतो ग मला. आज दिसत नाही कुठे’ माझा हात धरून वर चढत म्हणाल्या.

‘देवळात चाललात?’

‘हो ग. भजन ऐकते. तेव्हढंच देवाचं नाव जातं कानावरून’. देवळात जे गायन चालू होतं त्याला' भजन' म्हणणं म्हणजे पु.लं. म्हणतात तसं टांग्याच्या घोड्याला वारू म्हणण्यापैकी होतं. त्या बाया जमताक्षणी मारुतीरायाने ‘मनोजवं मारुततुल्य वेगा’ पेक्षाही भरधाव वेगाने तिथून उड्डाण केलं असणार ह्याची मला खात्री होती. असो.

‘मंदिरापर्यत येऊ का सोडायला?’

‘नको.....जाईन मी. हे इथेच तर आहे.’ पुन्हा हसल्या. ह्या काकू खूप गोड हसतात. आयुष्यात खूप काही सोसून ते सोसणं पचवलेली माणसं असं गोड हसतात असं मला नेहमी वाटतं. त्यांना त्याचं मोल ठाऊक असतं.

त्या सावकाश निघून गेल्या. मी माझ्या वाटेने निघाले. आमच्या सोसायटीच्या दारातून आत शिरले आणि एकदम चमकले. अरे बाप रे! माझा पिरीयड चालू होता, त्या मंदिरात चालल्या होत्या आणि हे लक्षात न राहून मी त्यांना शिवले होते. ह्या शिवाशिवीबद्दल (!) खूप काही लिहिण्यासारखं आहे. त्यातलं बरंचसं सध्याच्या वातावरणात पॉलिटिकली करेक्ट ठरणार नाही. एव्हढंच म्हणते की ह्याबाबतीत माझी गत कळतंय पण वळत नाही अशी आहे.

त्या काकूंना फुटपाथवर चढायला हात देऊन मी त्यांना मदत केली? का त्यांना अपवित्र केलं? मुळात हा प्रश्न पडावा म्हणजे माझं सायन्सचं शिक्षण चुलीत गेलं? का एक पाय संस्कारांच्या आणि दुसरा विज्ञानाच्या अंगणात अशी दुहेरी कसरत मला जमली नाही?

देव कुठे असलाच तर त्याच्या दरबारात काय चूक आणि काय बरोबर हे सांगायला आजकाल समस्त धार्मिक (!) समाज मौजूद असताना माझं मन जे सांगेल तेच ऐकायचा माझा हट्ट बरोबर का चूक?
------

मला नेमकं काय म्हणायचंय ते ह्यावेळी नीट नाही मांडता आलं. कदाचित तुम्ही सगळे समोर असतात तर व्यवस्थित समजावून देता आलं असतं. शब्दांना काही मर्यादा असतात. बाकी मर्यादा माझ्या स्वत:च्या. खूप सारा गुंता होतोय. जशी वर्ष जातात तसा तो कमी व्हायला हवा नाही का? पण तो तर वाढतोच आहे. जितकं हे आजूबाजूचं जग समजतंय तितकंच ते अशक्य अवघड होत चाललंय. डोक्यातला हा गोंधळ कागदावर उतरवावा तरी कसा? आणि कुठपर्यंत?

आजच एका मित्राने हा शेर फॉरवर्ड केला. ह्या अनाम शायराला माझी स्थिती कशी कळली काय माहित.....

कोई सुलह करा दे अब जिंदगीकी उलझनोसे
बहुत तलब लगी है आज मुस्कुरानेकी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाही पन्ना छानच!
याला मी मास्टरपीस इन पिसेस, असं नाव देईन...

वाह स्वप्ना, खूप सुंदर..
तुझा पन्ना वाचला आणि आजचा दिवस सार्थकी लागला बघ. खूप खूप शुभेच्छा..
लिहीत राहा

खूप छान लिहिले आहेसच पण तू आयुष्याकडे खूपच गंभीरपणे आणि अपेक्षेने बघतेयस असे वाचून वाटले.

जास्त आणि इतका विचार करू नका हो ताई...... मनाचा गुंता जितका सोडवायचा प्रयत्न करू तितका तो अजून गुंतत जातो. असे प्रश्न पाडून उत्तरे शोधायला लागल्यावर खोल गर्द निराशेने मन भरून जाते. हातातून रेतीसारखे आयुष्य सुटतेय असे वाटायला लागते आणि एक विचित्र अस्वस्थता आयुष्य व्यापून टाकते. बाकी हाती बाकी काहीच लागत नाही.

म्हणून मग प्रश्नांचे फुटबॉल करायचे आणि किक मारायची. उत्तरे स्वतःला बसतील शोधत, माझी जबाबदारी नाही. तसेही कुठलेच प्रश्न जर सुटत नसतील तर पाठ फिरवायची त्यांच्याकडे. आणि वाढणारी झाडे पाहावीत, निळे आकाश पाहावे, शांत झोपलेले कुत्रे पाहावेत. सर्व विसरून आजूबाजूचे निरीक्षण करण्यात वेळ घालवण्यासारखे सुख दुसरे नाही.

वाह! मस्तच!
कितीदातरी अगदी अगदी झाले.

आयुष्यात खूप काही सोसायला लागलेली माणसं असं गोड हसतात असं मला नेहमी वाटतं.>>या सारखी साधी वाक्यं भारी वाटून गेली.

हाही पन्ना छानच!
याला मी मास्टरपीस इन पिसेस, असं नाव देईन... >> +११११११

अतिशय अप्रतिम लिखाण आहे. डायरेक्ट दिलसे फील आहे त्यात. गुलज़ारांची एखादी गर्द गहिरी कविता वाचतिये असे वाटले.

सुंदर! नेहमीच मनाला भावतं.

———
काहीश्या आठवणी जागा झाल्या. माझ्या लहानपणी कोपर्‍यावरचं वाण्याचं दुकान आठवलं. साबणापासून, काचेच्या बरणीत भरलेले वेफर्स उर्फ चीप्स असत. मला ते शाळेतून घरी येताना खावेसे वाटत. पण हा वाणी पडला ओळ्खीचा, भिती वाटायची की आईला सांगेल. आईला जेवणाआधी वेफर्स ते ही बाहेरचे खालेले चालत नसत. लेज वेफर्स वगैरे नंतर आलेच पण घरी केलेया वेफर पेक्षा हेच आवडत. ह्या वाण्याचे दुकान बंद पडले तेव्हा असाच आमचा नवीन घराचा पत्ता शोधत आला होता भेटायला. आता इथे काय मिळकत नाही राहिली, गावी जातोय.
ह्या शहराने माझ्या मुलांना ईंग्लिश बोलायला शिकवले साहेब पण, हिच त्याची खुस्शी होती. जेव्हा बाबांनी विचारले, तेव्हा असे बोलला.

———
>>>>त्या सावकाश निघून गेल्या. मी माझ्या वाटेने निघाले. आमच्या सोसायटीच्या दारातून आत शिरले आणि एकदम चमकले. अरे बाप रे! माझा पिरीयड चालू होता, त्या मंदिरात चालल्या होत्या आणि हे लक्षात न राहून मी त्यांना शिवले होते. ह्या शिवाशिवीबद्दल (!) खूप काही लिहिण्यासारखं आहे. त्यातलं बरंचसं सध्याच्या वातावरणात पॉलिटिकली करेक्ट ठरणार नाही. एव्हढंच म्हणते की ह्याबाबतीत माझी गत कळतंय पण वळत नाही अशी आहे.
त्या काकूंना फुटपाथवर चढायला हात देऊन मी त्यांना मदत केली? का त्यांना अपवित्र केलं? मुळात हा प्रश्न पडावा म्हणजे माझं सायन्सचं शिक्षण चुलीत गेलं? का एक पाय संस्कारांच्या आणि दुसरा विज्ञानाच्या अंगणात अशी दुहेरी कसरत मला जमली नाही?<<<<<<<<

ह्या बाबतीत, आम्ही तळ्यात आणि मळ्यात. म्हणजे, दुसरे पाळतात म्हणून आपण कसे काय करायचे असा प्रश्ण पडतोच. सोवळं पाळणार्‍या घरी आपण जायचं का की डिक्लेअर करायचं की, मी नाही येवु शकत.. पाळी आहे म्हणून...? देवळात जात नाही ?
सगळाच गोंधळ?? आपण करतोय आपल्या मनासारखं आपल्या घरात, मग दुसर्‍यांना करु द्यावं की हाही विचार असतो. मग उगीच देवळात जावुन काय प्रूव करायचं? कशाला कोणाच्या भावना दुखवायच्या? प्रश्णाच प्रश्ण......

नेहमी प्रमाणे मस्तच. वाण्याची गोष्ट वाचतांना गळ्यात आवंढा आला.
>>it was not a matter of ‘if’ but ‘when’. >> बरोबर आहे अगदी.

अज्ञातवासी, किल्ली, rmd, स्वाती२, पल्वली, झंपी, पुरंदरे शशांक, चैत्रगंधा, सस्मित, sayali. धन्यवाद Happy
साधना....तू म्हणतेस तशी स्थिती येईल काही वर्षांत. सध्या साडेसाती चालू आहे म्हणून जास्त विचार करतेय बहुतेक.
शाली....ते वाक्य मी एडिट केलं होतं पण सेव्ह झालं नव्हतं. आता झालंय. सोसून ते सोसणं पचवलेली माणसं गोड हसतात असं मला म्हणायचं होतं. ज्यंना हे जमत नाही ती कडवट होतात. Sad

खूप छान लिहिले आहेसच पण तू आयुष्याकडे खूपच गंभीरपणे आणि अपेक्षेने बघतेयस असे वाचून वाटले.
जास्त आणि इतका विचार करू नका हो ताई......
>>> ह्याला +१

साडेसाती असली तरीही

हेपण खूपच सुंदर. नेहमीच तुझे पन्ने विचारात पाडतात. बर्‍याचदा जरी आधी कधी विचार केला असला तरी इतकं सुरेख शब्दात लिहिता नाही येत.

शिवाशिवीच्या बाबतीत, मी अज्जिबात मानत नाही. पण कुणाच्या घरी पूजेसाठी जायचे असेल तर सांगून जाते. त्यांचे घर, त्यांचे नियम. माझ्या घरी माझे नियम. पब्लिक ठिकाणी आपापले नियम. तिथे उगीच कोणाच्या भावना दुखावल्या इ. विचार नाही करत. बाकीचे पाळून माझ्या भावना दुखावतात त्याचं काय? Happy

chioo - शिवाशिवीच्या बाबतीत, मी अज्जिबात मानत नाही. पण कुणाच्या घरी पूजेसाठी जायचे असेल तर सांगून जाते. त्यांचे घर, त्यांचे नियम. माझ्या घरी माझे नियम. पब्लिक ठिकाणी आपापले नियम. तिथे उगीच कोणाच्या भावना दुखावल्या इ. विचार नाही करत. बाकीचे पाळून माझ्या भावना दुखावतात त्याचं काय?+ +१
- खर आहे नेमका हाच मुद्दा वाचला आणि चटका लावुन गेला जिवाला...

स्वप्ना-का एक पाय संस्कारांच्या आणि दुसरा विज्ञानाच्या अंगणात अशी दुहेरी कसरत मला जमली नाही?
- नाही जमली तेच योग्य.मी ही अजिबात जुमानत नाही हे.
- २१ व्या शतकात आलो आपण तरीही स्त्रियांसाठी किती ते नियम आणी फालतुचेच काहीही तथ्य नसलेले.
- कोणि बाजुला बसलेल पाहुन नको तेवढि चिड येते. जाऊन सांगावस वाटत "स्वतःच स्वतःला या पाळापाळीच्या जाळ्यात अडकवून ठेवु नका"
जाऊदे इथे जास्त काही बोलत नाही.

-अगदी जीवाला चटका लावणार लिहिलय स्वप्ना.

वाह मस्त वाटलं नवा पन्ना वाचून

भाजीवली आणि वाणी याबद्दल वाटलेलं फिलिंग तंतोतंत शब्दात उतरलं आहे

कसं काय जमत तुला असं लिहायला

सध्या कुठल्या लेखकाला भेटायला आवडेल म्हणून माबोवर धागा आलाय
त्यात मला तुला भेटायला नक्की आवडेल

छान लिहिलं आहेस स्वप्ना.विचार करायला लागले.
काकू आणि शिवाशिव बद्दल काही अपराधी वाटलं नाही.
अगदी शिवाशिव पाळणारा मनुष्यही बाहेर निघाल्यावर, चार माणसांशी संपर्क आल्यावर, गर्दीत धक्के लागल्यावर सर्व शिवाशिव क्रायटेरिया विसरून देवापाशी गेल्यावर 'बाप्पा ऍडजस्ट करून घ्या थोडं' म्हणून भक्ती रिझ्युम करत असेल.
आमच्या इथे एक दुकान असंच बंद झालं.त्या दुकानाशेजारी एक मोठं राजस्थानी 2 गाळे वालां दुकान आहे.सगळं म्हणजे सगळं असतं तिथे.पण थोडा उन्मत्तपणा.हे मराठी माणसाचं दुकान आल्यावर आता पर्याय बनतील असं वाटलं होतं.पण आत रिकामी शेल्फ, भाजी फक्त 3।दिवस भेंडी, सामान द्यायला सर्व विसरणारे स्लो काका, धूळ बसलेली वेफर्स ची पाकिटं यामुळे या मराठी माणसाला प्रमोट करायला रोज लागणाऱ्या 5 वस्तू न घेणं ऍडजस्ट करायचं का हा प्रश्न होता
दुकान अलीकडेच बंद पडलं,त्यांची हायवेवर बाहेर ताक लस्सी ची चांगली रंगवलेली स्वच्छ गाडी आहे ती बहुधा चांगली चालू असावी.बाहेर लस्सी ताक कधी प्यायले नाहीय अजून.

हर्पेन, A आदि, mani१२३४५६, svalekar,'सिद्धि', आसा., ॲमी, वावे , जिज्ञासा, देवकी, अनघा., mi_anu, माधव , केशर मनापासून आभार Happy

>>शिवाशिवीच्या बाबतीत, मी अज्जिबात मानत नाही. पण कुणाच्या घरी पूजेसाठी जायचे असेल तर सांगून जाते. त्यांचे घर, त्यांचे नियम. माझ्या घरी माझे नियम. पब्लिक ठिकाणी आपापले नियम. तिथे उगीच कोणाच्या भावना दुखावल्या इ. विचार नाही करत. बाकीचे पाळून माझ्या भावना दुखावतात त्याचं काय?

हे मात्र १००% पटलं.

>>सध्या कुठल्या लेखकाला भेटायला आवडेल म्हणून माबोवर धागा आलाय
त्यात मला तुला भेटायला नक्की आवडेल

नको, तुझ्यावर पश्चात्तापाची पाळी येईल. Happy मी एक अत्यंत आगाऊ, तुसडी आणि हट्टी बाई आहे Sad

Pages