मला काहीच आठवत नाहीये भाग ७ - मानसी गजानन इनामदार!

Submitted by अज्ञातवासी on 2 June, 2019 - 14:24

भाग ६

https://www.maayboli.com/node/69648

"उठा मानसीताई."
"काकू झोपू द्या ना."
"उठा, आज काहीतरी मोठी मिटिंग आहे, साहेबांनी लवकर तयारी करायला लावलीय."
मानसी आळस देत उठली. समोरच्या आईच्या फोटोला नमस्कार केला.
मानसीने पटकन तयारी केली, आणि ती खाली आली.
"सीताराम, बाबा?" मानसीने सीतारामला विचारले.
"ते सकाळी लवकर बाहेर गेलेत. अरुंधती मॅडमने तुम्हाला भेटायला बोलावलंय."
अरुंधतीच नाव ऐकताच तिच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"नाश्त्याला काय बनवलंय?"
"ब्रेड बटर."
"सीताराम, कधीतरी काहीतरी भरपेट खाण्यासारखं बनवत जा."
"फॅट परसेन्ट बघितलेस का तू? हं? यू शुड इट लेस अँड रन मोर." अरुंधती तिच्यासमोर बसत म्हणाली.
मानसीने 'तुझा काय संबंध?' असा जळजळीत कटाक्ष तिच्यावर टाकला.
"लिसन, आज वार्षिक मिटिंग आहे, जरा नीट अवतारात ये. नेहमीसारखी फालतू सलवार कमीज घालून येऊ नको."
"सीताराम, मला पोहे हवेत. आताच्या आता..."
"रबिश..." म्हणत अरुंधती बाहेर पडली.
"ताईसाहेब, स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, तुमच्या डायट चार्टशिवाय दुसरं काहीही द्यायचं नाही."
"कुणी डाएट चार्ट, कुणी बनवला? या घरात मीही राहते, माझं स्वतःच मत आहे कळलं?"
मानसीला प्रचंड दम लागला, तिची छाती फुलून आली.
"मानसीताई, शांत व्हा. सीताराम, आताच्या आता पोहे बनव. आत्ताच."
सीताराम घाईत किचनमध्ये पळाला.
"आजकाल त्रास जास्त वाढलाय ताई. तुम्ही काळजी घ्यायला हवी."
"माझी काळजी मीच घ्यायला हवी. बरोबर आहे काकू तुमचं!"
अर्ध्या तासात इनामदारांचे पाच मिस कॉल होते, मात्र मानसीने एकदाही फोन उचलला नाही.
पोहे खाऊन मानसी बाहेर पडली. अर्ध्या तासात ती कंपनीत पोहीचली.
"ताईसाहेब, वर पळा, साहेबांनी चार वेळा चक्कर टाकलीय खाली."
मानसी लिफ्टमधून वर गेली, आणि दार उघडून मिटिंग रूममध्ये शिरली.
मिटिंग रूममध्ये गजाननराव, अरुंधती आणि मानसी धरून दहा डिरेक्टर होते.
"मानसी, आम्ही तुझीच वाट बघत होतो." गजाननराव म्हणाले, मात्र त्यांची नाराजी लपत नव्हती.
"गेल्या बावीस वर्षांपासून मी इनामदार इंडस्ट्रीज हेड करतोय, मात्र कधीतरी थांबवस वाटतंय. गेल्या दोन तीन वर्षांपासून हळूहळू अरुंधतीकडे मी कारभार सोपवला... मात्र, आता वेळ आलीये, सगळं सोपवण्याची.
तुम्हा सगळ्या डिरेक्टरच मत त्यासाठी आवश्यक आहेच, पण माझी फॅमिलीसुद्धा त्यासाठी मला हविये."
मानसीच्या डोक्याची शीर ताडताड उडत होती.
"सर्व डिरेक्टरच्या संमतीने मी हा निर्णय जाहीर करतोय..."
"बाबा, मला काहीतरी बोलायचंय."
"बोल ना मानसी."
"बावीस वर्षांपूर्वी, माझी आई, सौदामिनी इनामदार हिने तुमच्या साथीने या कंपनीची स्थापना केली. तुम्ही बाहेर मार्केटिंग सांभाळत असताना स्वतः वेल्डिंग पासून सगळी कामे तिने केलीत. या इंडस्ट्रीमधल्याच एका अपघातात ती गेली."
मानसीचे डोळे अचानक कोरडे झाले.
"मी या निर्णयाच्या विरोधात आहे, पूर्णपणे."
"मानसी डार्लिंग, पण आम्ही तुला निर्णय घ्यायला नाही, सांगायला बोलावलंय."
"मग हा निर्णय मी कधीही मान्य करणार नाही, कळलं?"
मानसी ताड ताड पावले टाकत बाहेर पडली.
अचानक तिला प्रचंड थकवा जाणवू लागला.
ती घरी गेली, आणि बेडवर जाऊन पडली.
बऱ्याच वेळानंतर तिला जाग आली.
सीताराम तिच्यासमोर उभा होता.
"तू माझ्यावरच लक्ष ठेवून उभा राहणार आहेस का?"
"नाही पण अरुंधती मॅडमने तुम्हाला खाली यायला नाही सांगितलंय."
"काय?" मानसी मोठ्याने ओरडली, आणि ती बेडवरून उठून खाली जायला निघाली.
सीताराम दरवाजाजवळ आडवा उभा राहिला.
मानसीचा पारा प्रचंड चढला, आणि ती सीतारामला ढकलून बाहेर आली.
खाली पार्टीची जोरदार तयारी चालू होती.
"यु नो अरुण, शीज सो जेलस," अरुंधती तिच्या भावाला सांगत होती.
"येस आय एम," मानसीने वरूनच आवाज दिला.
"आय एम जेलस, कारण माझ्या आईने एवढ्या कष्टाने कमावलेली कंपनी माझ्या बाबांना फसवणा-या एका एका साध्या सेक्रेटरीच्या घशात जाताना बघतेय मी."
"मी आता सेक्रेटरी नाहीये मानसी, मी मालक आहे आता..."
"मी जिवंत असेपर्यंत तरी नाही."
मानसी तिथून जायला निघाली, तेवढ्यात तिच्या कानावर छद्मी आवाज ऐकू आला.
"लवकरच ही जिवंतही असणार नाही," अरुण हळुवारपणे अरुंधतीला सांगत होता.
... आणि मानसीने शेजारचा फ्लॉवरपॉट उचलला, आणि त्याच्या डोक्यात फोडला.
तो कोसळला....
ती त्याच्या छातीवर बसली, आणि त्याला दणादण ठोसे लगावू लागली.
तिचा बीपी प्रचंड हाय झाला होता... तिला धाप लागत होती... तिला कशाचही भान नव्हतं...
आणि अचानक ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली...
...ती कोमात गेली होती....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झालाय

खूप छान कथा .. आवडली.. आतातर उत्सुकता अजून वाढलीये. कथेमध्ये पुढे काय होणार हे कळायला नको नाहीतर सगळी मजा जाते. पण तुम्ही ती मजा घालवली नाहीत Happy

छान जमून आलाय हा भागही. Happy
कथानक वेगवान पद्धतीनं चाललंय. वाचायला मजा येते. प्रत्येक वाक्यानंतर 'पुढे काय होईल' वाटत असतं. पुभाप्र Happy

@अज्ञातवासी - केव्हा टाकणार आहेस पुढचा भाग? आणि आता सगळ्या जुन्या कथा पूर्ण केल्याशिवाय पुढची नवीन (लिहीत असशील तर) कथा टाकू नकोस.
आणि या कथेचा पुढच्या चार दिवसात भाग नाही आला, तर मी बहिष्कार टाकेन तुझ्या लेखनावर!!!!