हा खेळ बाहुल्यांचा! - भाग १

Submitted by अज्ञातवासी on 2 June, 2019 - 04:00

IMG_20190602_131626.jpg

तसं बघायला गेलं तर त्या गावात माझं काय होणार होतं, असं मला अजूनही वाटतं. तळेगाव... मी या गावाला टाळू शकत होतो. मला कुणीच विचारणार नव्हतं की मला कोणी अडवणार नव्हतं. पण शेवटी विधात्याच्या मनात जे असतं तेच घडतं.
सुरुवात तशी त्यादिवशी जोरदर झाली. पावसाची प्रचंड रिपरिप मला त्या गावात जाऊ नकोस असंच बजावत होती बहुतेक! पण जर ती बस सोडली, तर पुन्हा दोन दिवस गावात जाणारी बस मिळेल का नाही याची शाश्वती नव्हती. सहा तासांचा प्रवास होता. एसटी महामंडळाच्या बसने सहा तासाचा प्रवास करणे म्हणजे कसरतच.
खुळखुळा झालेली बॉडी आणि जुनाट रस्ते यांच्या जीवावर गाडी धावत होती, आणि माझ्याही अंगाचा खुळखुळा करत होती.
दोन तासानंतर कुठल्याशा जुना टपरीवजा हॉटेल गाडीच्या चहापाण्यासाठी थांबली मी धरून गाडीत सहा सहप्रवासी होते. चहा घेता घेता मी आसमंत बघत होतो. दुपारचे दोन वाजले तरी प्रचंड काळाकुट्ट अंधार असावा असं पावसाने वातावरण बनवून टाकलं होतं. मधेच एखादी वीज चमकून जात होती.
"अवकाळी पावसाची हीच तर कमाल आहे, ना धड मरवतो, ना धड जगवतो." एक प्रवासी मला म्हणाला.
पुढच्या प्रवासात असं कोणीतरी गप्पा मारायला मिळणं म्हणजे भाग्याची गोष्ट होती.
मी चाललो होतो त्याच्या दोन गाव आधीच ते उतरणार होते. डांगच्या सगळ्या भागाची त्यांना माहिती होती. त्यांच्याकडे रसरशीत कथा होत्या, जिवंत अनुभव होते.
मला थोड्या वेळानंतर डुलकी लागली, की मी ग्लानीत होतो, की झोप येतेय, की मला भास होतो, की मला स्वप्न पडतंय, मला काहीच कळत नव्हतं. पण स्वप्नात हळूच एक बाहुली माझ्या दिशेने सरकत होती...
"ओ साहेब, गाव आलं तुमचं." कंडक्टर मला गदागदा हलवत होता.
मी खाली उतरलो छत्री उघडली आणि चालू लागलो. माझं सामान मी आधीच पोहोचत करून दिलं होतं.
संध्याकाळचे सहा वाजले होते तरी ऑफिस चालू राहणार होतं, फक्त मी येणार म्हणून...
मी ऑफिसला गेलो. ऑफिसात असे चार-पाच लोकच होती, मात्र 50 लोक मावतील एवढे प्रचंड मोठे ऑफिस होते.
इंग्रज गेले पण प्रचंड प्रचंड वास्तुकलेचा वारसा सोडून गेले. ही वास्तू त्याचाच एक नमुना.
मला बघताच सगळे उठून उभे राहिले. शेवटी ब्रँच मॅनेजर होतो मी.
तसंही या गावात यायला कुणी इच्छूक नव्हतं. शेवटी प्रमोशनवर बँकेने माझी वर्णी लावली.
एकटा जीव सदाशिव... दुसरं काय!
जुजबी बोलणी सुरू झाली. मी प्रचंड दमलो होतो. शेवटी सगळ्यांची ओळख झाली.माणसे स्वभावावरून तरी चांगली वाटत होती.
जास्त वेळ न घेता, मी कागदोपत्री सोपस्कार पार पाडले, आणि शिपायाकडे मोर्चा वळवला.
"रामराव, राहण्याची सोय कुठेय?"
"साहेब तेच म्हणणार होतो. हंसराजच्या वाड्यावर सोय आहे, पण..."
"पण काय?"
"काही नाही, तसा वाडा चांगलाच आहे. दगडी बांधकाम, आणि सगळ्या सोयीही बँकेने केल्या आहेत. पण वाडा फार जुना आहे, रात्री अपरात्री भीती वाटली तर?"
मी आणि रामराव चालू लागलो.
"रामराव, बाकी ब्रँच कशी आहे."
"साहेब, अशी ब्रँच शोधूनही मिळणार नाही. ना ठेवी, ना कर्ज. लोक फक्त सरकारी योजनासाठी अकौंट उघडतात."
बरीच सुधारणा व्हायला हवी होती तर...
पुन्हा आभाळ भरून आलं होतं, मात्र पाऊस कोसळत नव्हता.
"साहेब हे गावच असं, कायम अंधारलेल... तो कातळ्या डोंगर दिसतोय ना, कायम सूर्य अडवून धरतो."
मी डोंगराकडे बघितलं. सरळ उभा कातळ उभा होता. एक अभेद्य भिंतीसारखा...
साहेब, वाडा आला बघा.
माझी आवाजाने तंद्री भंगली.
मी वाड्याकडे निरखून बघत होतो. चांगला दुमजली वाडा होता. दहा-बारा वन बी एच के सहज बसतील इतका मोठा त्याचा आवार होता. प्रचंड काळ्याकुट्ट दगडात बनवलेला.
"साहेब म्हणूनच सांगत होतो वाड्यात राहायचं का नाही ते ठरवा," रामरावाने बहुतेक माझी मनस्थिती ओळखली असावी.
मी गेट उघडून आत शिरलो. आजूबाजूला प्रचंड पालापाचोळा पसरलेला होता
"उद्या माणसे लावून साफसफाई करून घ्या, मी रामरावाला म्हणालो."
"जसं तुम्ही सांगाल. चला आता मी निघतो..." रामरावानी लाईट लावण्यासाठी खटका ओढला, आणि तो दिसेनासा झाला.
या भयानक गडद वातावरणात आता मी एकटाच वाड्याचा दरवाजासमोर उभा होतो.
चार-पाच वेळा चावी आणि कुलूपाची खटपट करून झाल्यावर एकदाच ते कुलूप उघडलं.
मी ताकद पणाला लावून तो अवाढव्य दरवाजा उघडला, आणि आतून बरीच वटवाघळे माझ्या स्वागतासाठी बाहेर आली!!!
क्षणभर माझी छाती फडफडली, आणि मी एक खोल श्वास घेत आत प्रवेश केला.
धुळीच प्रचंड साम्राज्य या वाड्यावर पसरलेला होतं. मात्र वाड्याची आतील बाजू संपूर्णपणे एकेकाळच्या श्रीमंतीच्या खुणा दाखवत दिमाखाने उभी होती.
वाड्यात प्रवेश करतानाच नजरेत भरणारी एक बाब म्हणजे या वाड्यात प्रचंड काचेची
कपाटे होती. सगळ्या भिंती या कपाटानी झाकल्या होत्या. मात्र सगळी कपाटे रिकामी होती.
ही कपाटे वगळता वाड्यात जुजबीच सामानसुमान होतं. खोल्या मात्र बऱ्याच दिसत होत्या.
दिवाणखान्यात असलेल्या सोफ्यावर आच्छादन असल्याने त्यावर धुळीचा थर नव्हता.
वरच्या एका खोलीत बल्ब पेटला होता. मी माझा मोर्चा तिकडे वळवला.
या खोलीत एक प्रचंड मोठा पलंग होता. स्वच्छ. बाजूलाच आधुनिक बाथरूम होतं. आधुनिकतेची हीच एक खूण. आणि माझं सामानही याच खोलीत आणून पडलं होतं.
जास्त काहीही विचार न करता मी झोपण्याचा प्रयत्न केला.
मला केव्हा झोप लागली कळलंच नाही.
.
.
.
.
.
मला काहीतरी ऐकू येतंय.
कुणातरी स्त्रीचा आवाज...
प्रचंड खोल, डोहासारखा...
मला प्रचंड करूण स्वर ऐकू येत होते...मला रडण्याचे भेसूर स्वर ऐकू येत होते...
आणि मला त्या दिसल्या...
...अनेक स्त्रिया फेर धरून नाचू लागल्या. त्यांच्या मधोमध एक बाहुला होता.
'तू माझा बाहुला, मी तुझी बाहुली...'
आवाज टिपेला पोहोचला...
'तू माझा बाहुला, मी तुझी बाहुली...'
.......
मी दचकून जागा झालो. हे स्वप्न होतं, की भास, की अजून काही???
मी घटघट पाणी पिलो...
धडधडधडधडधड.........
खालून आवाज येत होता...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अज्ञा! वर्णन अगदी डोळयासमोर उभं राहतंय.
पु.भा.प्र! Happy

मस्त सुरुवात..

बाकी - पहिल्या कथा पुर्ण कधी करणार?

खूप छान आहे कथा.. एकतर horror कथा म्हणजे माझ्या आवडीचा प्रकार आणि त्यातल्या त्यात तुम्ही लिहिताय म्हटल्यावर दुधात साखर.. थोडक्यात काय खूप मजा येणार आहे वाचायला..
वातावरण निर्मिती अगदी छान केलीत..भयकथेमध्ये वातावरण निर्मिती कारण हे खूप महत्त्वाचं असत. तुम्हाला ते जमलं. पुढे काय होणार याची उत्सुकता लागून आहे.. "मला काहीच आठवत नाहीये" या कथेचा पुढील भागपण लवकर टाकालं Happy

जमलाय पहिला भाग. पुर्ण करा ही कथा.
मला मिरिंडांची कथा आठावली.
<<<<मी धरून गणित सहा सहप्रवासी होते>>>इथे गाडीत हवंय ना

सुरुवात मस्त !! माझ्या मनात उगाच्च पावसाळी वातावरणात घोंघावणारा वारा, आपटणारी खिडक्यांची दारे असे काही बाही येऊन गेले. Proud

@ शालिदा - धन्यवाद.
@ मन्या - थांकू.
@सिद्धी - जेव्हा ही बाहुली की रात्रीस खेक चालेच्या टायटल सॉंग मध्ये बघितली ना, तेव्हाच अतिशय आवडली होती. अशाच प्रकारच्या बाहुलीचा कोणाकडे फोटो असेल तर प्लीज टाका!
@ शालिदा - हो
@ आनंदा - धन्यवाद, आणि लवकरच
@अक्की - धन्यवाद
@दिपू भाऊ - धन्यवाद.
@मेघा - धन्यवाद
@गूढ शुभांगी - धन्यवाद, आणि त्या कथेचा पुढचा भाग टाकला आहे.
@कटप्पा - ओके Happy
@उर्मिला - लवकरच टाकतो Happy
@सस्मित - धन्यवाद! बदल केला आहे.
@रश्मी - Lol
@अनघा - धन्यवाद....

मिरींडा यांच्या चिरूमाला कथेची आठवण झाली +१११
आणि सोबत अजुन इतर दोघांच्या कथा आठवल्या इकडच्याच