बहिणाबाईंचा पोवाडा

Submitted by Asu on 2 June, 2019 - 02:20

निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या चिरंतन स्मृतीला वंदन करून सादर-

बहिणाबाईंचा पोवाडा

तुझ्या स्मृतीला वंदन करुनि, शाहीर गातो तुझे गुणगान
निसर्गकन्या बहिणाबाई, झाली साऱ्या जगताची तू शान जीऽऽजी जी जी
बहिणाई जगताची तू शान जीऽऽजी जी जी
||धृ||

अठराशे ऐंशी सालात नागपंचमीला, बहिणाचा जन्म झाला
बालपणी तेराव्या वर्षात, पती नथूजी ठरला चौधरीवाड्यात
झालं दूर असोदं माहेर, जवळ झालं जळगाव आता सासर
घरी माय भिमाई महाजन, गावी बाप उखाजीले लई मान ||१||

तिशीतच गेलं कुंकू स्मशानात, त्यात पोरं तीन पदरात
जगणं शेतकरी कुटुंबात, दिस खडी फोडण्या दुष्काळात
काबाडकष्टांचा देव गाभाऱ्यात, मंदिर होतं हिरव्या शेतात
पोर बांधून पाठीवर लहान, घामावर ती भागवी तहान ||२||

निसर्गकन्या तू निसर्ग जगली, निसर्गाचीच गाणी लिहिली
अक्षर गाणी अशी बहिणाईची, रीत सांगे सर्वां जगण्याची
साधी मधाळ लेवा गणबोली, प्रतिमा अलंकार लेवून आली
पाटी पुस्तक ना शाळेचे ज्ञान, जगा सांगे तरी तत्वज्ञान ||३||

माय काळी आई पिता निसर्ग, शेतामध्ये वसे तिचा स्वर्ग
निसर्गाची गेयता, लय ठेका, शब्दकळेला भाषेचा झोका
लेवांची लेवा गणबोली, बहिणाईच्या मुखे गोड गोड झाली
बहिणाई तुझ्यासम तूच महान, शाहीर सांगतो घेऊन आन ||४||

कल्पनेची अशी उत्तुंग भरारी, घरी प्रतिभा पाणी भरी
पोळ्यातून मध जसे पडते, तुझ्या गळ्यातून गाणे गळते
सरसोतीची लेक शब्द दळती, घरोटातून ओव्या पडती
ओव्या लिहिण्याचे तुला न भान, उतरून घेई पुत्र सोपान ||५||

लेवा गणबोलीची गोड वाणी, बोले बहिणाईची निसर्ग गाणी
कस्तुरीमृगासम हिची कहाणी, सुगंध शोधती दूर वेड्यावाणी
पहिली दुसरी शिकली नाही, सरळ विद्यापीठात गेली बहिणाई
विद्यापीठावर वाचून तुझे नाम, उंच उंच होते आमुची मान ||६||

तीन डिसेंबर १९५१ साली, निसर्गकन्या निसर्गमय झाली
गणबोली क्षणभर जरी रुसली, मग खुदकन गाली हसली
बहिणाईची सुंदर जनगाणी, झाली घरघरची हो अमृतवाणी
खान्देशची निसर्गकन्या महान, बहिणाई असे आमुची शान ||७||

प्रा. अरूण सु. पाटील (असु)
(दि.29.05.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults

बहिणाबाईंच्या ओव्या वाचल्या आहेत पण बहिणाबाईंचा पोवाडा First tym वाचते.....
मस्तच लिहिलंय.
माझ्यासाठी विशेष म्हणजे माझी पण जन्म तिथि नागपंचमीच आहे.

सिद्धि,
तुम्ही म्हणता त्या 'बहिणाबाईंच्या ओव्या' ह्या बहिणाबाईंच्या रचना आहेत. प्रस्तुत 'बहिणाबाईंचा पोवाडा' हा मी बहिणाबाईंच्या जीवनावर स्वतः रचलेला पोवाडा आहे.
- असु

मस्तच लिहलंय पोवाडा, पहिला जात्यावर हमखास बहिणाबाईंच्या ओव्या ऐकायला मिळायच्या..आता जात्यावर दळणारे कमीच त्यामुळे ओव्या कुठून ऐकायला मिळणार हीच खंत आहे..