नावडती

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 22 May, 2019 - 12:55

नावडती
*******

काय नावडती
म्हणूनिया दत्त
मज न पाहत
वळूनिया॥

लावूनिया टक
पाहते लोचना
घेईची ना मना
काही केल्या॥

जाता जवळी तो
लागू दे ना वारा
क्षणात भरारा
जाई दूर॥

ऐसिया देहाचे
करू तरी काय
सरता उपाय
भेटायचे॥

व्याकूळ हे मन
जळे कणकण
भिजती नयन
रात्रंदिन॥

जन्मोजन्मी तुझ्या
राहीन दाराला
घेऊन व्यथेला
भक्तीचिया॥

विक्रांत युगाचा
पुतळा तमाचा
श्री दत्त नामाचा
टाहो फोडी ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

__/\__

विक्रांत युगाचा
पुतळा तमाचा
श्री दत्त नामाचा
टाहो फोडी ॥>> सुरेख!

जन्मोजन्मी तुझ्या
राहीन दाराला
घेऊन व्यथेला
भक्तीचिया॥>>> नाही समजले.

जन्मोजन्मी तुझ्या
राहीन दाराला
घेऊन व्यथेला
भक्तीचिया॥>>> नाही समजले.

नावडती ,मुळात विरह भक्ती गीत आहे . इथे पूर्णता झालेली नाही ही व्यथा आहे . पण तरीही ती कुठेही जाणार नाही ,ती सदैव त्या प्रियतमच्या दारावर उभी राहून त्याचे आराधन करणार आहे . भक्तीलीन राहणार आहे