आलो गिरनारी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 20 May, 2019 - 09:59

आलो गिरनारी देवा
हाक ऐकून आतली
धाव धावून प्रेमाने
जिवलग म्या पाहिली

आधी भेटलो शिवाला
भवनाथांच्या रूपाला
धूळ संतांच्या वाटेची
मग लावली भाळाला

असे पायथ्याला बळी
बाहू उभारून प्रेमे
उभ्या उभ्याने हसत
भेटे मारुती सुखाने

गात अलख अलख
गेलो गुहेमध्ये खोल
गोपीचंद भृतहरी
देती जीवास या ओल

आई नमिली अंबाजी
शक्ति पीठ ते थोरले
तिचे शक्ती कृपेमुळे
बळ पावुलात आले

जैन सिद्धनाथ थोर
भेटे अरिष्टनेमी ही
तया संनिधी लागली
ज्योत शांतीची ह्रदयी

उंच शिखरी गोरक्ष
प्रिय सखा तो दिसला
त्याच्या मिठीत नयनी
पूर आनंदाचा आला

मग दिसले शिखर
भाव झाले अनावर
देव दत्तात्रेय माझा
माझ्या जीवाचे जिव्हार

झाले चरण दर्शन
गेलो सुखे वेटाळून
गुरू सानिध्य क्षणाचे
यात्रा विक्रांत संपूर्ण

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

Group content visibility: 
Public - accessible to all site users