पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ३३. आमने सामने (१९६७)

Submitted by स्वप्ना_राज on 19 May, 2019 - 07:18

aamne3.jpg

रात्रीची वेळ. एक गाडी एका बंगल्याबाहेर येऊन थांबते. आतून एक पुरुष उतरतो. बंगल्याच्या पायऱ्या चढताना थोडा थबकतो. आपल्याला त्याचे फक्त पायच दिसतात. बंगल्यात दिवा दिसत असतो. अचानक एका बाईची किंकाळी रात्रीची शांतता भेदून जाते. बंगल्यातले नोकरचाकर जागे होतात, बाहेर धावत येतात आणि एक पळून जाणारी व्यक्ती नेमकी त्यांच्या हाती लागते. इथे १९६७ सालच्या सुरज प्रकाश निर्मित आणि दिग्दर्शित ‘आमने सामने’ ह्या चित्रपटाची टायटल्स सुरु होतात.

टायटल्स संपतात तेव्हा एक कोर्टरूम दिसते. आरोपीच्या पिंजरयात ती व्यक्ती उभी असते. हा आहे दीपक वर्मा. त्याच्यावर त्याच्या श्रीमंत बायकोचा, विमलाचा, खून केल्याचा आरोप असतो पण संशयाचा फायदा मिळाल्याने कोर्ट त्याला ‘बाईज्जत बरी’ करतं. दीपक कोर्टाबाहेर पडतो तेव्हा आजूबाजूच्या वकिलांकडून मारल्या जाणारया टोमण्यांवरुन जाणवतं की न्यायालयाने त्याची सुटका केलेली असली तरी जग त्याला दोषीच मानतंय. बाहेर पडल्यावर त्याला त्याच्या बायकोचा भाऊ जीवन दिसतो. दीपक आपल्या परीने जीव तोडून जीवनाला ‘मी हा खून केलेला नाही’ असं सांगतो पण जीवनचा त्याच्यावर विश्वास बसत नाही. 'तुला एक ना एक दिवस ह्या गुन्ह्याची शिक्षा मिळेल' असं दीपकला सुनावून तो निघून जातो.

पुढच्याच सीनमध्ये आपल्याला दीपक विमानातून उतरताना दिसतो. त्याच्यावर एक व्यक्ती नजर ठेवून असते. पण दीपकला तो माणूस आपल्या पाळतीवर आहे ह्याची जाणीव असते कारण तो एयरपोर्टवरून बाहेर पडताच त्या माणसाला गुंगारा देऊन सटकतो आणि थेट ताज हॉटेलमध्ये दाखल होतो. रुममध्ये पोचताच तो आपली बॅग उघडतो तेव्हा त्यात नोटांच्या थप्प्यांसोबत एक पिस्तुलही असतं. बॅगमधली एक डायरी काढून तो कोण्या सुरज प्रकाश (!) ला फोन करून 'बंगला तयार आहे का' असं विचारतो. त्याला लवकरात लवकर त्या बंगल्यात शिफ्ट व्हायचं असतं. एक विशिष्ट कार सुध्दा तयार आहे का ह्याचीही चौकशी तो करतो. हे सगळं बोलणं करताना तो आपलं नाव मात्र ‘गोपाल मित्तल’ असं सांगतो. इतकंच काय तर ते नाव कोरलेल्या एका ब्रेसलेटची डिलिव्हरीसुध्दा घेतो.

दुसर्या दिवशी एका लाल रंगाच्या कारमधून गोपाल उर्फ दीपक आपल्या बंगल्यात पोचतो. बाहेर एक दाढीमिश्यावाला बुवा त्याच्या अंगावर धावून येतो. पण यथावकाश तो बंगल्याचा माळी असल्याचं त्याला कळतं. बहुधा हा माळी-कम-सिक्युरिटीवाला-ज्यादा असावा. माळीबुवा जेव्हा त्याला ‘एकटेच आलात का?’ असं विचारतात तेव्हा मात्र गोपाल आपलं लग्न अजून व्हायचं आहे असं सांगतो. 'लवकरच तुझी मालकीण घेऊन येईन' असं सूचक बोलायलाही विसरत नाही. एयरपोर्टवर त्याचा पाठलाग करणारा माणूस कसा कोण जाणे पण इथेही पोचलेला असतोच.

वर बेडरूममध्ये गेल्यावर गोपाल खिडकीतून जेव्हा समोरच्या बंगल्याच्या खिडकीत पाहतो तेव्हा त्याला आत बसलेल्या एका तरुणीचे पाय दिसतात. एव्हढ्यात टॅक्सीचा हॉर्न वाजतो तेव्हा ती तरुणी खिडकीत येऊन उभी राहते. टॅक्सीतून तिला न्यायला आलेल्या तरूणासोबत (ह्याचं नाव प्रेम असतं) ती निघून जाते तेव्हा गोपाल खिश्यातून एक फोटो काढून त्याकडे पाहतो. ते दोघे ज्या हॉटेलमध्ये गेलेले असतात तिथे तोही जाऊन पोचतो. तिच्याशी ओळख वाढवायचा प्रयत्न करतो. पण ती त्याच्या सलगीने जाम भडकते आणि प्रेमसोबत तिथून निघून जाते. अर्थात ती घराजवळ पोचते तेव्हा त्याच वेळेस तिथे आलेल्या गोपालला पाहून हा आपला ‘सख्खा सखा शेजारी’ आहे हे तिला कळतं. एव्हढंच काय, तर दोघांच्या गाड्याही एकसारख्या दिसणाऱ्या असतात. सपना फणकार्‍याने घरी निघून जाते.

aamne_saamne4.jpg

मग आपल्याला पुन्हा त्याच व्यक्तीचे पाय दिसतात जी पहिल्या खुनाच्या वेळी बंगल्याच्या पायऱ्या चढत गेलेली असते. खुर्चीत पुस्तक वाचता वाचता झोपलेल्या सपनाच्या दिशेने ती व्यक्ती जाऊ लागते. तिचे हात सपनाच्या गळ्यापर्यंत पोचतात आणि ‘आता हिचं काही खरं नाही’ असं आपल्याला वाटेपर्यंत ती जागी होते. आता आणखी एक दर्दनाक किंकाळी ऐकायला लागणार म्हणून आपण तयारीत असताना सपना ‘भैया’ म्हणून त्या व्यक्तीला मिठी मारते (हिरोईनचा भाऊ व्हायला लागणं हे गतजन्मीच्या पापाचं फलित होय!). हा तिचा भाऊ प्राण. ती लगेच त्याच्याजवळ गोपालची तक्रार करते. प्राण तिला प्रेमशी लग्न करण्याबद्दल विचारतो. प्रेम त्याचा मित्र असतो बरं का. पण ती काही ठोस उत्तर देत नाही. खोलीतून बाहेर जाता जाता प्राण खिडकीतून समोरच्या बंगल्याच्या खोलीत (न झोपता!) वाचत बसलेल्या गोपालकडे पाहून घ्यायला विसरत नाही.

गोपाल मात्र सपनाच्या मागे हात धुवून लागतो. ती आधी त्याला अजिबात घास घालत नाही. पण यथावकाश त्याच्या प्रेमात पडतेच. इकडे प्राणभाऊ ‘मला लवकरच फारिनला जायचंय तेव्हा प्रेमशी तुझा साखरपुडा उरकून टाकू’ असा तिच्यामागे धोशा लावतात. आता दोन्हीचा काय सम्बन्ध हे मला तरी कळलं नाही. हा तिथे कायमचा स्थायिक होण्याऱ्यातला आहे असं वाटत तर नाही त्याच्याकडे बघून. असो. ती गोपालबद्दल त्याला काही सांगायच्या आत प्रेम काडी लावतो. प्राण मग सपनाला खडसावून विचारतो तेव्हा ती खरं काय ते सांगून टाकते. प्राण भडकतो. तुला त्याच्याबद्दल काय माहित आहे, तो तुझ्या संपत्तीवर कब्जा करायच्या हेतूने तुझ्यावर प्रेम करायचं नाटक करतोय वगैरे काय काय तिला सुनावतो. सुदैवाने ‘खानदानकी इज्जत’ किंवा ‘मां-बाबूजीके स्वर्गवासके बाद मैने तुम्हे पालपोसकर बडा किया है उसका ये सिला दे रही हो’ वगैरे स्टँडर्ड डायलॉग्ज आपल्याला ऐकावे लागत नाहीत. ‘गोपालला भेटायचं बंद कर आणि मुकाट्याने प्रेमशी लग्न कर’ असा हुकुमच तो सोडतो. पण सपना चांगली खमकी असते. ‘तो श्रीमंत आहे आणि आमचं एकमेकांवर प्रेम आहे’ असं सांगून ती प्राणला उडवून लावते. तेव्हा तो पिस्तूल घेऊन ‘त्याच्याकडे बघतोच आता’ म्हणून निघतो. हे कमी की काय म्हणून प्रेमही गोपालला भेटून ‘सपनाचा नाद सोडून दे’ म्हणून धमकावतो. सपनालाही धमकी देतो.

शेवटी ह्या सगळ्या प्रकाराने वैतागून सपना आणि गोपाल कोर्ट मेरेज करतात. लग्नानंतर नेक्स्ट स्टॉप अर्थात हनिमून. आणि तो अर्थातच काश्मीरला. ते निघून जातात आणि भडकलेला प्रेम प्राणला सांगतो की मी सपनाला मारून टाकणार. इथे काश्मिरात सपना आणि गोपाल फिरायला निघालेले असताना गाडी बंद पडते. अनेक चित्रपटांत हा सीन पाहून झाला असल्याने आपण रेडीएटरमधलं पाणी संपुष्टात आलेलं असून आता हा बाबा ह्या बाबीला इथे सोडून एक डबडं घेऊन कुठेतरी पाण्याच्या शोधात जाणार हे लगेच ओळखतो. होतंही तसंच. आता तिला बरोबर घेऊन गेलं तर काय आभाळ कोसळणार असतं हे मला आजतागायत समजलेलं नाहीये. बंद पडलेली गाडी ढकलत कोणी चोरून नेणार आहे का? Uhoh तर असो. गाडीत गपगुमान बसायचं सोडून सपनाबाई फिरायला निघतात, एका कड्याजवळ मोक्याच्या ठिकाणी उभ्या राहतात आणि नेमके पांढरे मोजे घातलेले दोन हात येऊन तिला तिथून ढकलून देतात. पण एव्हढ्या उंचीवरून पाण्यात पडूनही ती वाचते. चौकशी करायला आलेला पोलीस ‘आपकी किसीसे दुष्मनी है?’ हा नेहमीचा प्रश्न विचारतो. सपना काही बोलत नाही पण गोपाल मात्र प्राण आणि प्रेम दोघांनी धमकी दिल्याचं सांगून टाकतो. दुसर्‍या दिवशी तो इन्स्पेक्टर येऊन त्यांना सांगतो की सपना निघून गेल्यापासून तिचा भाऊ आजारी आहे, तिच्यावर हल्ला झाला त्या दिवशी त्याला हार्ट अ‍ॅटॅक आल्यामुळे प्रेम त्याच्यासोबत आहे आणि ते दोघेही मुंबई सोडून कुठे गेलेले नाहीत. ह्या इन्स्पेक्टरला ‘सुपारी’ ह्या शब्दाचा ‘पानात घालून खायची गोष्ट’ एव्हढाच अर्थ माहित असावा. आता तो गोपालकडे संशयाने पाहू लागतो. पण मुंबईत प्रेम आणि प्राण ह्यांच्यात झालेल्या संवादावरून आपल्याला हेही कळतं की प्रेम काही काळ प्राणसोबत नव्हता.

सपना आणि गोपाल (पुन्हा!) फिरायला गेलेले असताना अचानक एक माणूस त्यांच्यासमोर येतो. त्याला पाहून गोपाल जवळपास धावत सुटतो, घाईघाईने सपनाला तिथून दूर नेऊ पाहतो. एव्हढ्यात तो माणूस त्याला ‘दीपक’ अशी हाक मारतो. गोपाल त्याला ‘तुमची ओळखण्यात काहीतरी चूक होतेय’ असं सांगतो. तो माणूस सॉरी म्हणून निघून जातो खरा पण गोपालला नंतर बंगल्याबाहेर त्याच्याशी बोलताना सपना पहाते. ते दुसरीकडे कुठेतरी भेटायचं ठरवत असतात. ती गोपालचा पाठलाग करते आणि त्यांच्या बोलण्यातून तिला गोपालचं नाव दीपकच आहे हे कळतं. इतकंच काय तर दीपकच्या पहिल्या श्रीमंत पत्नीबद्दल, तिच्या खुनाबद्दल आणि दीपकवरच्या खटल्याबद्दलही समजतं. तो माणूस इन्स्पेक्टर असतो. दीपकनेच आपल्या पहिल्या बायकोचा खून केलाय आणि आता दुसरीचाही करणार आहे अशी त्याची ठाम समजूत असते. गोपाल त्याला ‘मी खून केला नाही’ असं सांगतो पण तो काहीच ऐकून घेत नाही. मी तुझ्या आसपासच आहे, दुसरा खून होऊ देणार नाही, तू निर्दोष सुटू शकणार नाहीस असं तो निक्षून सांगतो.

गोपाल बंगल्यावर परत येतो तेव्हा सपना प्रचंड घाबरलेली असते. गोपालच्या उशीखाली दडवलेलं पिस्तुल बघून तर ती आणखी भेदरते. तिच्या ‘मुंबईला परत जाऊ या’ च्या धोश्याने कंटाळून गोपाल तिला परत घेऊन येतो. ती प्राणला भेटायला जाते तर प्रेम तिला भेटू देत नाही. गोपाल नसताना ती बंगल्याबाहेर पळून जाऊ पहाते तर त्यांचा माळी तिला अडवतो. गोपालला काश्मीरला भेटलेल्या त्या इन्स्पेक्टरने तिला बंगल्याबाहेर पडू देऊ नको असं माळ्याला बजावलेलं असतं. ती इन्स्पेक्टरला सांगते की ‘मी तुमचं बोलणं ऐकलं होतं, मला सारं माहित आहे’. तेव्हा तो तिला सांगतो की तुला हे सारं माहित आहे हे गोपालला कळू देऊ नकोस.

तश्यात एक दिवस गोपाल उर्फ दीपकच्या पहिल्या बायकोचा, विमलाचा, भाऊ जीवन त्यांच्या घरी येतो. विमलाच्या मृत्यूनंतर सारी संपत्ती दीपकला मिळालेली असते पण जीवनकडे लॉकरमध्ये काही हिरे असतात ज्यांची त्याला आता गरज नसते. तो ते दीपकला द्यायला आलेला असतो. तिथे आलेली सपना हे सगळं ऐकते. दीपक तिची ओळख आपली पत्नी अशी करून देतो तेव्हा जीवन ते हिरे तिला देऊन निघून जातो. हवालदिल झालेला दीपक तिला काही सांगू पाहतो पण ती काही ऐकून घ्यायच्या मन:स्थितीत नसते. आता तिच्या मनात त्याच्याबद्दल फक्त संशय असतो.....

दीपकने विमलाचा खून केलेला असतो का? सपनाला मारायचा प्रयत्न कोण करत असतं? दीपक? प्राण? प्रेम? का तिसरंच कोणी? दीपकचा पाठलाग करणारी व्यक्ती कोण असते? दीपकचा नोकर त्या व्यक्तीच्या संपर्कात का असतो? दीपकच्या बंगल्यातला तो गूढ माळी कोण असतो? यातला बराचसा सस्पेन्स जवळपास शेवटपर्यंत कायम ठेवण्यात चित्रपट बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. त्यामुळे शेवट थोडा फसल्यासारखा वाटला तरी मर्डर मिस्टरी आवडणाऱ्यानी पाहायला हरकत नाही ऐसा आपुनको लगता हय. Happy तो पाहणार असाल तर उरलेला लेख वाचू नये ही विनंती. कारण शेवटच्या काही परिच्छेदात चित्रपटाच्या त्रुटीबद्दल लिहिलं असल्याने रहस्यभेद अपरिहार्य आहे. आणि हो, आणखी एक सांगायचं म्हणजे युट्युबवरून मी डाऊनलोड केलेल्या कॉपीत दृश्य आणि आवाज प्रचंड out of sync होते. म्हणजे आधी कशी वीज चमकते आणि मग काही वेळाने त्याचा आवाज ऐकू येतो तसं आधी दृश्य दिसायचं आणि नंतर संवाद ऐकू यायचे. तेव्हढ तपासून घ्या म्हणजे झालं.

तर आता नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आधी चित्रपटातली कलाकारमंडळी पाहू यात. प्रेम आणि प्राण ही दोन खलनायकी थाटाची नावं वाचल्यावर ह्या चित्रपटात प्राण आणि प्रेम चोप्रा आहेत की काय असं तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही ५०% बरोबर आहात. बिचार्‍या प्रेम चोप्राला बर्‍याच चित्रपटांप्रमाणेच इथेही आपल्याच नावाने वावरायला लागलेलं आहे. पण सपनाच्या भावाच्या, प्राणच्या, भूमिकेत मात्र मदन पुरी आहे. दोघांनीही आपापल्या वाट्याची खलनायकी यथास्थित निभावलेली आहे. मदन पुरीच्या नशिबात तर चित्रपटाच्या शेवटी नायिकेकडून डोक्यावरून हात फिरवून घ्यायचं सौख्य लिहिलेलं आहे. नेहमी खलनायकी भूमिका करणारा आणखी एक अभिनेता ह्या चित्रपटात आहे - कमल कपूर. दीपकनेच आपल्या आधीच्या बायकोचा खून केलाय अशी ठाम समजूत असलेला इन्स्पेक्टर त्याने रंगवलाय. ह्या चित्रपटात तो जितका तरुण दिसतो तितका तरुण मी त्याला आधीच्या कुठल्याच चित्रपटांत पाहिलेला नाही हेही आवर्जून नमूद करावंसं वाटतं.

aamne1.jpg

दीपकच्या भूमिकेत शशी कपूर आहे. आपलं निरपराधित्त्व सिद्ध करता येत नाही म्हणून हताश झालेला दीपक आणि सपनावर प्रेम करणारा, तिला काही अपाय होऊ नये ह्याची दक्षता बाळगणारा गोपाल ह्या दोन्ही भूमिका त्याने नीट केल्यात. चित्रपटात तो क्युटही दिसलाय. मला त्याचं हास्य नेहमीच लोभसवाणं वाटत आलंय. शर्मिला टागोरने सपना माथुरचा रोल केलाय. तिच्या अभिनयकौशल्याबद्दल (!) आधीच्या लेखात लिहून झालंय. इथेही पहिले पाढे पंचावन्नच आहेत. विशेषत: तिच्या त्या भयानक विगच्या बटा कुरवाळताना तर ती अगदी डोक्यात जाते. बिचाऱ्या शशी कपूरच्या प्राक्तनात लाडात येऊन त्या नकली बटांचा वास हुंगण्याचा भोग लिहिलाय. Proud त्यावर आपली ‘ई’ एव्हढीच प्रतिक्रिया संभवते.

aamne2.jpg

दीपकच्या नोकराच्या भूमिकेत राजेंद्रनाथ आणि त्याच्या बायकोच्या भूमिकेत शम्मी नटी आहेत. एका गाण्यात लक्ष्मीछाया दिसते. श्रेयनामावलीत करण दिवाण हेही नाव दिसतं. तो बहूतेक विमलाच्या भावाची भूमिका करणारा नट असावा. ह्याच नावाचा एक नट जुन्या काळाच्या चित्रपटात नायक म्हणून असायचा. तो हाच का ते मात्र मला माहित नाही.

गाणी आनंद बक्षी ह्यांनी लिहिली आहेत. संगीत कल्याणजी आनंदजी ह्यांचं. पैकी रफीची ‘नैन मिलाके चैन चुराना’ आणि ‘आजकल हमसे रुठे हुये है सनम’ आधी ऐकली होती. पण खास आवडतं म्हणजे त्याने लतासोबत गायलेलं ‘कभी रात दिन हम दूर थे’. बाकी २ मला काही खास वाटली नाहीत. ह्यातल्याच एका गाण्यात १९६७ सालच्याच ‘अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरीस’ मधल्या गाण्यासारखी शर्मिलाला बिकिनी (का बिकिनीसदृश काहीतरी?) घालून बोटीच्या मागे लटकवलेली पाहून दिग्दर्शकाची कीव येते. कुठला चित्रपट आधी प्रदर्शित झाला होता देव जाणे.

दीपकला सपनाच्या बंगल्यासमोर असलेला बंगलाच हवा असतो. तिच्या गाडीसारखी दिसणारी गाडीच हवी असते. तिला खिडकीत बघून तो एक फोटो समोर धरून पहात असतो. ह्या सगळ्यावरून प्रेक्षकांची अशी समजूत होते की सपनाचा विमलाच्या खुन्याशी काहीतरी संबंध असावा. तशी त्यांची समजूत करून देण्यात काही गैर नाही. पण चित्रपटाच्या शेवटी दीपक जीवनला सांगतो की मी त्या खुन्याला एकदाच खून झाल्याच्या रात्री पाहिलं तेव्हापासून त्याचा शोध घेतोय. एव्हढ्यात त्याला समोर मदन पुरी दिसतो, हाच तो खुनी आहे हे लक्षात येतं, तो प्राण म्हणजे सपनाचा भाऊ आहे हे कळतं आणि तो अवाक होतो. तेव्हा बापड्या प्रेक्षकांना आपली समजूत चुकीची होती हे कळतं. पण मग दीपकच्या सुरुवातीच्या वागण्याचं काहीच स्पष्टीकरण मिळत नाही. माझ्या मते हा चित्रपटातला सर्वात महत्त्वाचा कच्चा दुवा आहे. बनवा की राव प्रेक्षकांना उल्लू. पण त्या उल्लू बनण्याची त्यांना मजा वाटायला हवी. त्याचा राग येता कामा नये. प्राणला खुनी बनवणं म्हणजे ओढूनताणून reverse twist दिल्यासारखं वाटतं. त्यापेक्षा विमलाच्या भावाने, जीवनने, पैश्यासाठी तिचा खून केला असा प्लॉट परवडला असता. ह्या त्रुटीपुढे इतर त्रुटी - उदा. प्रेम आणि सपना हॉटेलमध्ये जातात टॅक्सीने आणि येतात मात्र तिच्या कारने – किरकोळ वाटतात.

बाकी काही म्हणा....पण मदन पुरीसोबत रोमान्स केल्यावर शशी कपूरसोबत लग्न म्हणजे विमलाला लॉटरीच लागली असं माझं मत चित्रपट पाहिल्यावर झालं Wink

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय.. आता हा सिनेमा पाहणे आले
कथा ज्या पद्धतीने तू उलगडून सांगतेस ती शैली आवडते Happy
आणि हो, १०१ चाहते झालेत माबोवर, त्याबद्दल हार्दिक अभिनंदन Happy

या चित्रपटाबद्दल ऐकलं किंवा वाचलं नव्हतं.
कभी रात दिन हम दूर थे हे गाणं नेमकं अजिबात आवडत नाही. अगदीच रडतखडत म्हटल्यासारखी चाल आहे. तेवढंच ऐकलंय.
करण दिवाण कोण हे पाहायला चित्रपटाची सुरुवात पाहिली. तोच जुना नट वाटतोय.
पहिल्या बायकोच्या एक्सच्या बहिणीसोबत लग्न अशी गुंतागुंत आहे का?
स्पॉयलर
.
.
.
.
.
खुन्याला शोधायला त्याच्या आमनेसामने घर घेतलं की योगायोगाने समोरचं घर खुन्याचं निघालं ते कळलं नाही.

भारीच!
आता बाकीचे लेख नजरेखालून घालने आले.

नेहमीप्रमाणेच छान लिहले आहे. या चित्रपटाबद्दल काहीच माहित नव्हतं, नावदेखील ऐकलं नाही. गूढ-खून-रहस्य कथा बऱ्यापैकी चांगली वाटतेय.
===

> बिचाऱ्या शशी कपूरच्या प्राक्तनात लाडात येऊन त्या नकली बटांचा वास हुंगण्याचा भोग लिहिलाय. Proud त्यावर आपली ‘ई’ एव्हढीच प्रतिक्रिया संभवते. >
Lol Lol

> दीपकला सपनाच्या बंगल्यासमोर असलेला बंगलाच हवा असतो. तिच्या गाडीसारखी दिसणारी गाडीच हवी असते. तिला खिडकीत बघून तो एक फोटो समोर धरून पहात असतो. ह्या सगळ्यावरून प्रेक्षकांची अशी समजूत होते की सपनाचा विमलाच्या खुन्याशी काहीतरी संबंध असावा. तशी त्यांची समजूत करून देण्यात काही गैर नाही. पण चित्रपटाच्या शेवटी दीपक जीवनला सांगतो की मी त्या खुन्याला एकदाच खून झाल्याच्या रात्री पाहिलं तेव्हापासून त्याचा शोध घेतोय. एव्हढ्यात त्याला समोर मदन पुरी दिसतो, हाच तो खुनी आहे हे लक्षात येतं, तो प्राण म्हणजे सपनाचा भाऊ आहे हे कळतं आणि तो अवाक होतो. तेव्हा बापड्या प्रेक्षकांना आपली समजूत चुकीची होती हे कळतं. पण मग दीपकच्या सुरुवातीच्या वागण्याचं काहीच स्पष्टीकरण मिळत नाही. माझ्या मते हा चित्रपटातला सर्वात महत्त्वाचा कच्चा दुवा आहे. बनवा की राव प्रेक्षकांना उल्लू. पण त्या उल्लू बनण्याची त्यांना मजा वाटायला हवी. त्याचा राग येता कामा नये. प्राणला खुनी बनवणं म्हणजे ओढूनताणून reverse twist दिल्यासारखं वाटतं. > दीपकने खुनीला पकडायचा प्रयत्न केला (किंवा खुनी पळून जात होता) तेव्हा खुनीच्या खिशातून बांगला, गाडी, शर्मिला यांचा फोटो पडला असेल.

कभी रात दिन हम दूर थे हे गाणं नेमकं अजिबात आवडत नाही. अगदीच रडतखडत म्हटल्यासारखी चाल आहे. >>>>>>>> मला ते विरह गीत वाटत.

मस्त परीक्षण!!

मी टीव्हीवर खूप वर्षांपूर्वी पाहिलेला, पण शशीबाबा गेल्यावर यु ट्यूबवर परत पाहिला होता. अलीकडेच पाहिलेला हे डोक्यातून पार निघून गेले त्यामुळे वरचे वाचताना सतत देजावू व्हायला लागले Happy

शर्मिलाने यात तिच्या मानाने ठिकठाक काम केलंय. नवरा मारणार म्हणून घाबरून राहणारी बायको बरी साकारलीय. तसेही एकदा हनुवटी थरथरवत चार ओळी बोलल्या की तिच्या अभिनयाचे घोडे गंगेत न्हाते.

चित्रपटाच्या सुरवातीचे शशीचे वागणे पटत नाही. कदाचित यु ट्यूबवर नंतरचे स्पष्टीकरण उडाले असावे.

ह्या नावाचा सिनेमा होता हेच तुझ्या परीक्षणावरून कळले. परीक्षण इतकं खुमासदार असते कि मूळ सिनेमा नाही पहिला तरी चालतो Wink

सुरेख लिहीलं आहे, वाचुन सिनेमा पाहिल्याच फिल आलं.
पण शेवट बघण्यासाठी सिनेमा बघावा लागेल असं वाटतंय.

किल्ली, भरत, शाली, अ‍ॅमी, बोकलत, सूलू_८२, अनघा, साधना, सरि,'सिद्धि' धन्यवाद Happy

/** पिक्चर पहायचा असल्यास ही पोस्ट पुढे वाचू नये. */

/** पिक्चर पहायचा असल्यास ही पोस्ट पुढे वाचू नये. */

/** पिक्चर पहायचा असल्यास ही पोस्ट पुढे वाचू नये. */

>>पहिल्या बायकोच्या एक्सच्या बहिणीसोबत लग्न अशी गुंतागुंत आहे का?
हो तसंच आहे.

>>दीपकने खुनीला पकडायचा प्रयत्न केला (किंवा खुनी पळून जात होता) तेव्हा खुनीच्या खिशातून बांगला, गाडी, शर्मिला यांचा फोटो पडला असेल.
नाही गं. मी लेखाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे दीपकने फक्त त्याचा चेहेरा पाहिलेला असतो. बाकी त्याला काही माहित नसतं.

>>शेवट पण टाकत जा ना एंडला.तो पिक्चर पाहण्यापेक्षा तुम्ही लिहिलेलं वाचायला आवडेल.

प्राणचे आणि दीपकच्या पहिल्या बायकोचे प्रेमसंबंध असतात. पण ती दीपकशी लग्न करते. आधी प्राण तिला विसरायचा प्रयत्न करतो. पण ते शक्य होत नाही. म्हणून तिला जाब विचारायला जातो. बाचाबाची होते. आणि तो रागाच्या भरात तिचा खून करतो. त्याला पळून जाताना दीपक पहातो. प्रेम प्राणचा मित्र असतो पण तो ह्या खुनाचं रहस्य माहित असल्याने त्यला ब्लॅकमेल करून सपनाशी लग्न करू पहातो. दीपकच्या घरचा माळी म्हणजे त्याच्या पहिल्या बायकोचा भाऊ जीवन असतो. तिचा खून दीपकनेच केलाय अशी त्याची समजूत असते. त्यने तो पाठलाग करणारा माणूस आणि दीपकचा नोकर असे दोघे तयाच्या मागावर लावलेले असतात. तो सपनाचा खून करून त्याचा आळ दीपकवर घालणार असतो. म्हणून त्याने सपनाला कड्यावरून ढकललेलं असतं.

>>तसेही एकदा हनुवटी थरथरवत चार ओळी बोलल्या की तिच्या अभिनयाचे घोडे गंगेत न्हाते.
बरोबर Proud

>>चित्रपटाच्या सुरवातीचे शशीचे वागणे पटत नाही. कदाचित यु ट्यूबवर नंतरचे स्पष्टीकरण उडाले असावे.
असेल कदाचित. पिक्चर संपायच्या आधीच यूट्यूबवरची फाईल संपते.

>>ह्या नावाचा सिनेमा होता हेच तुझ्या परीक्षणावरून कळले.
ह्यचं श्रेय साधनाला. तिने मला ह्या पिक्चरबद्दल सांगितलं होतं Happy

चांगलं लिहिलं आहे. सिनेमा पाहिला नाही. गाणीही विशेष माहितीची नाहीत.
काही चित्रपट सुचवत आहे. त्यांच्याविषयी तुमचे परीक्षण वाचायला आवडेल, जर शक्य झालं तर.
इश्क पर जोर नही - साधना, धर्मेंद्र, विश्वजित
देवर - शर्मिला, धर्मेंद्र, शशिकला, देवेन वर्मा
घुंघट - बीना राय, प्रदीप कुमार, भारत भूषण, आशा पारेख
कन्यादान - शशी कपूर, आशा पारेख

चीकू, तुम्ही देवर आधीही सुचवला होता. पण स्टोरीवरून बराच रडका वाटल्याने फिलहाल हिंमत नही जुटा पा रही हू. Happy घुंघट आईनेही सुचवलाय. पण भाभू आणि प्रकु असल्याने थोडा लांबणीवर टाकलाय. पाहणार आहे पुढे कधीतरी. कन्यादान नक्की पाहेन. इश्क पर जोर नही ची स्टोरी काय आहे चेक करते. सूचनांबद्दल खूप खूप आभार. Happy

पिक्चर अभी बाकी....
एव्हढ वाचूनच आनंद झाला, मग चित्रपट कुठला का असेना.

उत्तम.

पुर्वी दुरदर्शनवर पाहिला होता. अजिबात आठवत नव्हता. त्याच सुमारास मिथुनचा याच नावाचा चित्रपट आला होता.

इशक पर जोर नही भयंकर आहे... साधनाचे सुजट डोळे बघवत नाही. बघावा तर फक्त धर्मेंद्रसाठीच.

कन्यादान मस्तच आहे, शशीबाबा आहे त्यात Happy विषय अतिशय चांगला आहे. नक्की बघ.

तुरू, मला माहित आहे तेव्हढी लिस्ट इथे देते.

जुने हिंदी रहस्यमय - गुमनाम, मेरा साया, वो कौन थी, कोहरा, बीस साल बाद, नीलकमल, एक पहेली, धुंद, तिसरी मंजिल, द ट्रेन, इत्तेफाक, कानून, ये रात फिर ना आयेगी, बिन बादल बरसात, बात एक रातकी, बुढ्ढा मिल गया

मराठी रहस्यमय - पाठलाग, हा खेळ सावल्यांचा, एक रात्र मंतरलेली

>>साधनाचे सुजट डोळे बघवत नाही
हो ग, स्टोरी चेक केली तेव्हा पाहिलं.

>>त्याच सुमारास मिथुनचा याच नावाचा चित्रपट आला होता.
हरे रामा! मला तो कायम असह्य वाटत आलाय.

छान लिहिलंय स्वप्ना.
हा सिनेमा पाहिला/ऐकला नव्हता.
कन्यादान पाहिलाय. छान आहे. तु ही बघ आणि लिहि.

Thank you स्वप्ना_राज लीस्ट साठी.. काही बघितले आहेत ..काही बघायचे आहेत.. आजच्या काळातल्या वेबसिरिज आणि चित्रपटांच्या मानाने तेव्हाची मांडणी काही प्रमाणात बाळबोध वाटते

https://youtu.be/7sX2To6mFZU

चार दरवेस

हॅरी पॉटर , ममी , हातीमताई व बाहुबली ह्यांचे तिलीसमी मिश्रण !!!!

ह्याचे रस ग्रहण कोण करेल ?