अंतर (कथा)

Submitted by रोहिणी निला on 18 May, 2019 - 21:35

अंतर

खरं तर काय कमी होतं संसारात? हां...लग्नानंतर दहा वर्षांनी सुद्धा फक्त राजा राणीचा संसार म्हणजे लौकिकार्थाने वेलीवर फुलांची कमतरता होती पण तो उर्वी आणि तेजसने मिळून आनंदाने घेतलेला निर्णय होता.

लग्न करताना आपण एकमेकांना किती परफेक्ट मॅच आहोत हे कळत गेल्यावर दोघांनाही खूपच ऑसम वगैरे वाटलं होतं. आणि मुलांच्या बाबतीतले एकमेकांचे विचार किती जुळतात हे बघून तर त्यांनी एकमेकांना मिठीच मारायची बाकी ठेवली होती कारण तेव्हा ते एका कॅफे मध्ये बसले होते आणि दोघांच्या मध्ये एका टेबलाचं अंतर होतं.

आज देखील त्यांनी एकमेकांना मिठीच मारायची बाकी ठेवली होती कारण ते कोर्टात बसले होते आणि दोघांच्या मध्ये एका टेबलाचं अंतर होतं.

एकमेकांना हळू हळू समजून घेत असताना आपल्या गत आयुष्यांबद्दल देखिल सांगितलं होतं. आशा, आकांक्षा, प्रेमभंग, नंतर आयुष्यात आलेली नाजूक पण अल्पकाळ टिकलेली नाती असं बरंच काही. त्यांना एकमेकांबद्दल एक प्रकारचा विश्वास वाटायला लागला होता. त्यांचे छंद, आवडी निवडी यात आश्चर्य वाटावं इतपत साम्य होतं. प्रवासाची आवड हा तर त्यांच्यातला सर्वात जिव्हाळ्याचा समान धागा होता.

त्यांच्या लग्नापूर्वीच्या कुठल्याच भेटीमध्ये कधी वाद विवाद, रुसवे फुगवे, तोचतोचपणा नसायचा. त्या दिवशी मात्र ती त्याला भेटायला आली ती थोडीशी गप्प गप्प वाटली त्याला. त्याने विचारलं तेव्हा तिला नाही म्हटलं तरी थोडं अवघडलेपण वाटत होतं. पण त्यानं तिला तिचा वेळ घेऊ दिला. अखेर तिनं एक मोठा श्वास घेतला आणि एका दमात त्याला सांगितलं की तिला लग्नानंतर मुलं नको होती.

इतके दिवस कधीच न झालेला विसंवाद आता कुठल्याही क्षणी सुरू होऊ शकेल याची वाट बघत ती त्याच्या टेबलवर विसावलेल्या हातांकडे पाहत राहिली. त्याचे हात शांतपणे तिच्या टेबलवर चुळबुळणाऱ्या हातांवर विसावले. त्याच्या हाताच्या आश्वासक स्पर्शातून आणि तिने वर पाहिल्यावर त्याच्या नजरेतूनच ओळखलं की इथेही त्यांचे विचार जुळत होते. आणि तिला त्याच क्षणी समजून गेलं की तिच्या कल्पनेतलं अनुभव समृद्ध रोमांचक आयुष्य ती त्याच्यासोबत जगणार होती.

ठरवल्याप्रमाणे त्यांनी लग्नानंतरची 5-6 वर्षं भरपूर प्रवास केला. एकमेकांच्या सोबतीचा कंटाळा कधी आला नाही. त्यांचे हे प्रवास म्हणजे नुसतच ट्रॅव्हल कंपनी बरोबर केलेलं भौगोलिक भ्रमण नसून निसर्ग, कला, संस्कृती, संगीत, थ्रिल, मन:शांती, आत्मशोध यांनी समृद्ध असे आसुसून जगलेले क्षण होते. त्यांनी लग्नापूर्वी पाहिलेली काही ठिकाणं पुन्हा एकमेकांबरोबर नव्यानं पाहिली आणि नव्यानं अनुभवली.

प्रवासच काय, रोजचा साधा चहा, नाश्ता सुद्धा न चुकता एकत्रच घेणाऱ्या त्यांना मित्र विचारायचे की असं सारखं सारखं एकमेकांना चिकटून बसायला बोअर नाही का होत. पण त्यांना मात्र एकमेकांची कंपनी प्रचंड आवडायची.

अलीकडं मात्र खूप काही बदललेलं वाटत होतं. पूर्वी बोलण्याच्या ओघात दोघांची कॉफी थंड होऊन जायची. पण आता बरेचदा कॉफी संपली तरी २-४ वाक्यांपर्यंतच गाडी पुढं जायची. तीही एकमेकांच्या कामाच्या बाबतीतल्या चौकश्या करण्यापुरती.

त्यांची ती नेपाळ ट्रिप झाल्यापासून गोष्टी खूप बदलल्या होत्या. प्रत्येक गोष्टीला पूर्वपदावर यायला जितका वेळ द्यावा लागतो तितका वेळ तर कधीच निघून गेला होता. तरीही त्यांची आयुष्यं पूर्वपदावर आलीच नव्हती. एकाच खोलीत दोघेही शक्यतो असू नयेत याचा दोघेही आटोकाट प्रयत्न करीत होते.

खरं तर परत एकदा त्याच्यासोबत नेपाळला जायचा निर्णय तिचा जास्त होता. नेहेमीप्रमाणेच जिथं जायचं तिथल्या जीवनाचा शक्य तितक्या जवळून अनुभव घ्यायचा ह्या त्यांच्या आग्रहानुसार त्या सकाळी लवकर जाग आल्यावर ती एकटीच पायी फिरत निघाली. राजधानी च्या शहरात न राहता एका छोट्याशा सुंदर गावातल्या टुमदार हॉटेल वजा घरामध्ये ते उतरले होते.

स्फटिकासारख्या नितळ पाण्याचे ओढे, अल्लड मुलीचे एका परीपक्व स्त्री मध्ये रूपांतर होत असावे तश्या भासणाऱ्या टेकड्या .... खूप लहानही नाहीत किंवा त्या महान पर्वत रांगाइतकं भव्य होण्याची महत्वाकांक्षाही नाही. पण स्वतःचं असं काही तरी खासपण असणाऱ्या. मध्येच एखादे पाहणाऱ्याच्या मनात उबदार जाणीव निर्माण करणारे टुमदार नेपाळी घर. काय काय आणि किती किती साठवायचं डोळ्यांत.

आणि तेव्हाच तिला तो दिसला. त्या छोट्याश्या तळ्यात मासे पकडत बसलेला, जुन्या झालेल्या कपड्यात पण गोजिरवाणा दिसणारा. साधारण बारा तेरा वर्षांचा असावा. एखादे चित्र वेगवेगळ्या अंगल्स मधून पहावे तसे उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत पाहत ती त्याच्या जवळ पोहोचली. तिच्या चाहुलीने त्याची तल्लीनता भंग पावली आणि त्याने तिच्याकडे पाहिले. तिच्या काळजात एक सूक्ष्म कळ उठली. तोच चेहेरा. अगदी त्याच्यासारखाच. ती क्षणभर खालीच बसली.

तो तिथून पळून गेल्याचं तिला समजलंच नाही. काही क्षणानंतर भानावर येऊन तिनं इकडे तिकडे पाहिलं पण तो नाहीच दिसला.

कसं शक्य आहे हे? इतकं साम्य कसं असू शकेल दोघांच्यात. त्याचा मुलगा असेल का? पण नाही... तो तर आयुष्यात एका वेगळ्याच वाटेने गेला होता.

ती तेव्हा कॉलेज मध्ये होती. दुसऱ्या वर्षाला. सुट्टीत एकटीच गेली होती नेपाळ बघायला. तेव्हा याच गावात अबिरल भेटला होता. अबिरल …. Never ending. टुरिस्ट गाईड होता तिथला. म्हणजे तसा तो काठमांडू ला होता कामाला. गावाकडे पैसे पाठवायचा. पर्यटकांची गर्दी कमी असली की गावाकडे जाऊन यायचा. असाच एके दिवशी तिला भेटला त्याच तळ्या जवळ. आणि नंतर काही दिवस तिथेच भेटतच राहिला. काही वर्षांपूर्वी तो तिथे मासे पकडायचा पण नंतर त्याला ते नकोसे वाटू लागले. पण तिथे मन:शांती मिळते म्हणून रोज यायचा.

त्याच्या नावापासून ते त्याचं दिलखुलास हसणं, त्याचं मोहक रूप, त्याचा निखळ स्वभाव ह्या सगळ्याच्या मोहातच पडली ती. त्याच्या कुटुंबाबद्दल तो भरभरून बोलायचा. त्याची आई, त्याच्या दोन बहीणी, त्याचे वडील. त्याचा जीव होता त्यांच्यात.

तिला जाणवलं की ती त्याच्यात गुंतत चालली आहे. दोन दिवस जीवाची होणारी तगमग तिने कशी बशी सहन केली पण तिसऱ्या दिवशी तिने ठरवलं की उद्या परत जाण्यापूर्वी त्याला सांगून टाकायचं की माझं तुझ्यावर प्रेम आहे.... नको ... किंवा मला आयुष्यभर तुझ्यासोबत रहायचंय, किंवा मग आपण लग्न करूया का? तिला रात्रभर सुचलंच नाही उद्या काय बोलायचंय ते. आणि सकाळी भेटल्यावर त्यानंच आधी सांगून टाकलं की बौद्ध भिक्षु होण्याच्या त्याच्या निर्णयाला मठाने आता स्वीकार केलंय आणि लवकरच तो तिकडे जाईल. आणि हे सांगताना तो खूप आनंदी आणि अगदी शांत भासत होता. तिने त्याला हसून निरोप दिला आणि त्याने तिला चांगल्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

तिथून परत आल्यावर मग आयुष्य नेहेमीप्रमाणे सुरु झालं आणि फार काही स्थित्यंतरे न घडता एका लयीत वाहत राहिलं. पण ते तिचं पहिलं प्रेम होतं. तो चेहेरा कायमचा ह्रिदयावर कोरलेला राहिला.....

दुसऱ्या दिवशी सकाळी तिने परत त्या मुलाला तिथे पाहिलं. मासे पकडून झाल्यावर तो मजेत घरी जायला निघाला. ती हळू हळू त्याच्या मागे जाऊ लागली. थोड्या अंतरावर तो एका घरात शिरला. ती तिथूनच मागे फिरली.

दुसऱ्या दिवशी सकाळी ती त्या घरापर्यंत गेली. दार उघडेच होते आणि आतून चहाचा दरवळ येत होता. तिने दारावर टकटक केली. आतून तिच्याच वयाची एक स्त्री बाहेर आली. तोच चेहेरा अगदी त्याच्या सारखा. ही अलिना असावी बहुतेक. त्याची जुळी बहीण. तो सांगायचा तिच्याबद्दल. तिचाच मुलगा असावा. अगदी मातृमुखी.

मग ती खूप आत्मीयतेने अलिनाला भेटली. त्याच्या आणि तिच्या मैत्रीबद्दल बोलली. अलिनाला अर्थातच अबिरलने उर्वी बद्दल सांगितले होते. उर्वीला समजलं की अबिरल आता पूर्णपणे भिक्षु बनला आहे आणि शांती चा संदेश देण्यासाठी भ्रमण करत असतो. मोठी बहीण काठमांडू जवळच्या एका गावामध्ये आपल्या संसारात रमली आहे. आई वडील आता राहिले नाहीत आणि ती स्वतः तिच्या मुलासहित त्यागसहित गावात राहते.

पुन्हा भेटायचं आश्वासन देऊन ती हॉटेल वर परत आली. दोन दिवसांनी त्यांच्या परत जाण्याच्या दिवशी उर्वी तेजसला घेऊन अलिनाला भेटायला गेली. मुद्दाम असं नाही पण तेजसला तिने कधी अबिरल बद्दल काहीच सांगितलं नव्हतं. कारण तो तिच्या मनातला एक सर्वात हळवा आणि विशेष कप्पा होता. आज अलिनाशी ओळख करून दिल्यावर ती तेजसला सगळं सांगणार होती.

ते तळ्या वरून अलिनाच्या घरी जाताना त्यांना त्याग तळ्यात पोहताना दिसला. त्यांना घराकडे जाताना पाहून तो झपाझप पोहत काठाशी आला. काठावरचा टॉवेल उचलून घराकडे धावला.

उर्वीला दारात पाहून अलिना हसत बाहेर आली. पाठीमागून आलेल्या तेजसची उर्वी ने ओळख करून देत असतानाच अलिना आणि तेजस ची दृष्टीभेट झाली. आणि दोघेही थबकले. उर्वी च्या चेहेर्यावरचे गोंधळलेले भाव पाहताच क्षणात भानावर येऊन अलिनाने तेजस ला हात जोडून नमस्कार केला व दोघांचे स्वागत केले. उर्वी संभाषण सुरु ठेवण्याचा प्रयत्न करत होती पण एकंदरीतच तेजस आणि अलिना मध्ये एक अवघडलेपण होतं. शेवटी पर्स मधून एक रंगीत कागदात लपेटलेली भेट वस्तू काढून अलिनाकडे देत उर्वी ने ती त्यागसाठी असल्याचे सांगितले. तितक्यात त्याग धावतच घरात शिरला. दोघांकडे हसून पाहत आतल्या खोलीत पळाला. तेव्हा त्याच्या पाठीवरून टॉवेल घसरला. तळहाताएवढं काळंनिळं ल्हास होतं त्याच्याही पाठीवर.

तेजसने मला कधीच का सांगितले नसेल? उर्वी च्या मनात विचार आला.

लगेचच उर्वी आणि तेजस निघाले घरातून.

तळ्यापर्यंत पोहोचल्यावर उर्वीने मागे वळून पाहिले. घराच्या दारा आड उभे असलेल्या अलिना आणि त्यागच्या आकृत्या तिला दिसल्या.

घरी परत आल्यानंतर काहीच पूर्वीप्रमाणे राहिलं नव्हतं. एक दिवस दोघांनीही एकमेकांना अलिना आणि अबिरल बद्दल सांगितलं. अलिना तेजसच्या आयुष्यात खूपच थोड्या काळासाठी होती. तेव्हा तो कल्चरल स्टडीज च्या अंतर्गत नेपाळला गेला होता दोन महिन्यांसाठी. पण त्याग च्या जन्मा बद्दल त्याला खरंच काही माहिती नव्हतं. तो स्वतःच हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. अलिनाला कशा कशाला तोंड द्यावं लागलं असेल त्यावेळी. आपण तर भारतात निघून आलो. पण तिने तरी का संपर्क केला नाही? तिला घरच्यांनी तो करू दिला नसेल का? मी प्रयत्न केला तेव्हा माझाही संपर्क झाला नाही. मी त्या वयात इतका भावनाशून्य होतो की बेफिकीर, की स्वार्थी आणि बेजबाबदार? तो गोजिरवाणा त्याग तिचा त्याग होता की मी जबाबदारीचा केलेला त्याग होता की समाजाने तिचा केलेला त्याग होता?

उर्वीनेही त्या दिवशी तेजसला अबिरल बद्दलच्या तिच्या भावनांविषयी सांगितलं. इतक्या वर्षांत एकमेकांशी पूर्णपणे एकरूप न झाल्याची अपराधीपणाची भावना दोघांच्याही मनात सलू लागली. का नाही आपापला नेपाळ मधला गतकाळ त्यांनी एकमेकांना सांगितला? मग काहीच पूर्वीसारखं नाही राहिलं. आता यापुढे घराबाहेरचा आणि घरातलाही एकत्र प्रवास पूर्वीसारखा रोमांचक आणि आनंददायी होऊ शकला असता का?

एके दिवशी दोघांनीही बोलून वेगळं व्हायचा निर्णय घेतला.

त्या दिवशी कोर्टाची तारीख होती. दोघांच्या मध्ये एक टेबल होतं. कोर्टाने त्यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयावर जवळजवळ सही केलीच होती. लंच ब्रेक नंतर त्यांचं नातं तुटणार होतं. ती आपल्या फोनवर उगीचच चाळा करत होती. तोवर तिचा फोन वाजला. बाहेरचा नंबर होता. काठमांडू मधून कोणी त्रिभुवन बोलत होता. एक आठवड्यापूर्वी झालेल्या भयानक भूकंपात त्याची पत्नी, मुलं आणि गावाकडून आलेली मेहुणी बेपत्ता होते. त्यांच्याबद्दल आता कोणतीही आशा नव्हती. त्रिभुवन कसाबसा वाचला होता आणि नंतर एका ढिगाऱ्याखाली बेशुद्धावस्थेत मेहुणीचा छोटा मुलगा सापडला होता. आता तो ठीक होता पण खूप घाबरलेला होता. त्याच्या बोलण्यातून व ढिगाऱ्यात सापडलेल्या त्याच्या आईच्या डायरीतून उर्वीचा संदर्भ मिळाला होता.

त्रिभुवनचा भिक्षु झालेला मेहुणा नुकताच भ्रमण करून त्याच्या मठात आला होता. पण भूकंपानंतर त्या मठाचेच अस्तित्व राहिले नव्हते.

धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत तिने फोन तेजस च्या हातात दिला. तो स्तब्ध होऊन ऐकत होता. काही क्षणांनी त्याने फोन टेबलवर ठेवला व तो हमसून हमसून रडू लागला.

"चल तेजस, आपल्या त्यागला आपल्याकडे घेऊन यायला" उर्वी म्हणाली. तिच्या पण डोळ्यांतून अश्रूंची धार लागली होती.

त्यांनी एकमेकांना मिठीच मारायची बाकी ठेवली होती कारण ते कोर्टात बसले होते आणि त्यांच्या मध्ये एका टेबलाचं अंतर होतं.

पण यावेळी ते अंतर पार करून दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि डोळ्यातल्या पाण्याला मुक्तपणे वाहू दिलं.

Group content visibility: 
Use group defaults

छान आहे गोष्ट!
थोडी शैली बदलून लिहिली तर सुरेख कथा होईल.
(सगळाच भार निवेदकाने उचललाय)

कथानक (प्लॉटचा एकंदर साचा) चांगला आहे. आवाका बऱ्यापैकी मोठा आहे. चांगला लेखक याची एक कादंबरी किंवा टीव्ही मिनी मालिका बनवू शकेल.

एकमेकांना हळू हळू समजून घेत असताना त्यांनी कसलेही आडपडदे न ठेवता गत आयुष्यांबद्दल सगळं सांगून टाकलं होतं.

त्याचे हात शांतपणे तिच्या टेबलवर चुळबुळणाऱ्या हातांवर विसावले. तिने वर पाहिलं आणि त्याच्या नजरेतूनच ओळखलं की इथेही त्यांचे विचार जुळत होते. आणि तिला त्याच क्षणी समजून गेलं की तिच्या कल्पनेतलं अनुभव समृद्ध रोमांचक आयुष्य ती त्याच्यासोबत जगणार होती. <<<<<

तरीपण दोघांनी एकमेकांचे गत आयुष्य लपवले
हे तर्कसंगत नाही वाटले.

कदाचित तुमचे बरोबर असेल कितीही आदर्श नातं असलं तरी प्रत्येकाचा चोरकप्पा असतोच असेच म्हणावयाचे.

सुंदर कथानक, अजून खूप फुलवता आलं असतं, पण असं थोडक्यात लिहिलेलं समजून घेण्यातच खरी मजा.

लेखन आवडलं. छान लिहिली आहे कथा.

सुधारणेचा प्रयत्न करते.
Submitted by रोहिणी निला on 19 May, 2019 - 15:27

कथाबीज सशक्त आहे .

फक्त तुम्ही वर लिहिले आहे...
एकमेकांना हळू हळू समजून घेत असताना त्यांनी कसलेही आडपडदे न ठेवता गत आयुष्यांबद्दल सगळं सांगून टाकलं होतं. आशा, आकांक्षा, प्रेमभंग, नंतर आयुष्यात आलेली नाजूक पण अल्पकाळ टिकलेली नाती सगळं सगळं ... एकमेकांबद्दल एक प्रकारचा विश्वास आधीपासूनच वाटायला लागला होता. <<<<

आणि शेवटी म्हणता अलिना, आणि अबिरल विषयी त्यांनी एकमेकांना सांगितले नव्हतं.

हा विरोधाभास वाटतो.
वरच्या ओळीत योग्य बदल केला तर सुंदर कथा होईल.

दत्तात्रयजी कथा व्यवस्थित वाचून हा मुद्दा लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. कथेच्या सुरुवातीच्या भागात बदल केला आहे. त्यानुसार आता कथा सुसंगत वाटत असेल अशी आशा आहे.

दत्तात्रयजी कथा व्यवस्थित वाचून हा मुद्दा लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. कथेच्या सुरुवातीच्या भागात बदल केला आहे. त्यानुसार आता कथा सुसंगत वाटत असेल अशी आशा आहे.

जराशी वेगळी, जराशी धोपटपणे जाणारी पण तरी ही गोड कथा आहे !
उर्वी, तेजस, अबिरल, अलिना चौकोनाचे चार कोन... एकमेकांशी बांधलेले तरी सगळ्यांचं क्षितीज वेगळं च आहे.
आवडली कथा

स्वस्ति Happy
योगायोग
मी नेपाळी नावं google केली कथेसाठी